Total Pageviews

Sunday, 29 April 2018

नक्षल-उच्चाटनासाठी नव्या व्यूहरचना..


महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागड या अतिदुर्गम तालुक्यातील कसनसूर जंगल परिसरात नुकत्याच उडालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत 40 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. यात कुख्यात नक्षली साईनाथ आणि श्रीनु उर्फ श्रीकांत याचाही समावेश आहे. या दोघांवरही प्रत्येकी 16 लाखांचे बक्षीस होते. कसनसूर-बोरिया हा भाग नक्षल्यांचा आराम करण्याचा भाग म्हणून ओळखला जातो. कारण, या भागाला लागून तीन राज्यांची हद्द आहे. शिवाय भामरागडजवळ तीन नद्यांचा संगमही आहे. म्हणून या भागावर नक्षल्यांची अलीकडे विशेष नजर होती व या भागात सतत गस्तही सुरू होती. आपली स्थानिक गुप्तवार्ता यंत्रणाही त्यांनी सक्षम केली होती. पक्की माहिती मिळताच, सी-60 आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बटालियन-9 ने नक्षल्यांना दोन बाजूने वेढा घातला असता, नक्षल्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही चौफेर मारा करीत नक्षल्यांना टिपले. त्यात अनेक ठार झाले तर मोठ्या संख्येत जखमी झाले. पहिल्या दिवशीच्या शोधमोहिमेत 16 प्रेते हाती लागली. यात साईनाथ आणि श्रीकांत हे दोघेही होते. पण, नंतरच्या दोन-तीन दिवसांत काही प्रेते नदीच्या पाण्यात तरंगत असल्याचे दिसल्यावरून ती बाहेर काढण्यात आली. लगोलग दुसर्‍या एका चकमकीत आणखी सहा नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. अजूनही प्रेते सापडत आहेत. पण, या दोन्ही चकमकीत आतापर्यंत 40 नक्षली ठार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याच महिन्यात 3 एप्रिल रोजी तीन नक्षल्यांना ठार मारण्यात आले होते. सोबतच छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात इपेंटा गावाजवळ चकमक उडून पोलिसांनी आठ नक्षल्यांना टिपले. हा भाग तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर येतो. दोन्ही राज्यांच्या पोलिस दलांनी ही संयुक्त कारवाई केली. गेल्याच महिन्यात बिजापूर येथेच दहा नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. याचा अर्थ, गडचिरोली 43 आणि छत्तीसगड 18 असे मिळून 61 नक्षल्यांना ठार मारण्यात आले. बिजापूरमधील कारवाईत 7 रॉकेट लॉंचर्स, हातबॉम्ब, रायफली जप्त करण्यात आल्या. गडचिरोलीतील कारवाईतही मोठा शस्त्रसाठी जप्त झाला.


सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या एकाही जवानाला साधी इजादेखील झाली नाही. यापूर्वी चकमकी व्हायच्या, नक्षलवादी मरायचे पण त्यात आमचेही काही जवान शहीद व्हायचे. पण, गडचिरोली आणि बिजापूरच्या घटनेत अशी कोणतीही घटना न घडल्याने नक्षल-उच्चाटनाकरिता नव्या व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि हे संकेत चांगले आहेत. देशात पाच वर्षांपूर्वी 126 जिल्हे नक्षलप्रभावित म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यातील 44 जिल्हे नक्षलमुक्त झाले आहेत. सोबतच सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 35 वरून 30 वर आली आहे.


मोदी सरकार आल्यानंतर ज्या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यात त्यात मोठ्या संख्येने भाजपाची सरकारे आली. मोदींच्या काळातच आदिवासी जिल्ह्यांचा विकास आणि नक्षल्यांचे उच्चाटन अशा दुहेरी पातळीवर योजना आखण्यात आल्या आणि आज त्याची चांगली फळे दिसत आहेत. शेकडोंच्या संख्येने नक्षलवादी शरण आले आहेत. त्यात काही नक्षलवादी हे अनेक गुन्ह्यांत सहभागी होते. त्यांचीही चांगली मदत होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात जी माहिती मिळाली, ती याच शरण आलेल्या नक्षल्यांकडून. ही बाब नक्षल्यांच्या नेत्यांनीही मान्य केली आहे. आता या घटनेला अपेक्षेनुसार फाटे फोडले जात आहेत. शहरी नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. पोलिसांचे वाढते मनोबल खच्ची करण्यासाठी ते वेगवेगळ्या कहाण्या रचत आहेत. काही नक्षली कमांडरचे म्हणणे आहे की, नक्षल्यांना गावकर्‍यांकडून विष पाजण्यात आले आणि नंतर त्यांना ठार मारण्यात आले, तर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्याने विषप्रयोगाचा मुद्दाच पुढे आणलेला नाही. त्याचे ठासून सांगणे आहे की, शरण आलेल्यांचे संपर्क असल्याने त्यांनीच आमची माहिती पुरविली. मी माझ्या 22 वर्षांच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येत नक्षली मारले जाण्याची घटना पाहिली नाही. तिकडे गटेपल्लीच्या काही गावकर्‍यांना नक्षल्यांनी भडकावले आहे. गावकरी म्हणतात की, आमचे आठसदस्य बेपत्ता आहेत. त्यात पाच मुली आहेत. गावकर्‍यांना सर्व प्रेते दाखविण्यात आली. त्यात त्यांचा कुणीही सगासोयरा नव्हता. तर दुसरीकडे गटेपल्लीच्याच एका ग्रामस्थाने सांगितले की, हा आरोप खोटा आहे. कुणीही नक्षलवाद्यांसोबत गेले नाही. त्यांनीच काही लोकांच्या मदतीने इंद्रावती नदीतून प्रेते बाहेर काढण्यास मदत केली. आतापर्यंत ओळख पटलेल्या 18 प्रेतांना गावकर्‍यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गटेपल्ली हे, मारला गेलेला नक्षली कमांडर साईनाथ याचे मूळ गाव आहे, हे विशेष! त्यामुळे या गावाकडे अधिक लक्ष पुरवावे लागणार आहे. गडचिरोलीतील घटनेमुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही अस्वस्थता आहे. वाचकांना स्मरतच असेल की, ज्या वेळी सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांच्या मोठ्या हल्ल्यात 75 जवान शहीद झाले होते, त्या वेळी जेएनयुच्या देशविरोधी विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला होता. नंतर उमर खालीद, कन्हय्या आणि त्याच्या साथीदारांनी देशविरोधी घोषणा दिल्यानंतर त्यांचे समर्थन करण्यासाठी राहुल गांधी तेथे गेले होते. 

भीमा-कोरेगावमधील घटनेतही नक्षल्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. हा उमर खालीद भीमा-कोरेगावच्या कार्यक्रमात उपस्थित होता. म्हणून प्रकाश आंबेडकर वारंवार मागणी करीत आहेत की, अटक केलेल्या सर्वांना सोडून द्या. प्रकाश आंबेडकरांचाही नक्षली चळवळीला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे आणि ही बाब त्यांनीच मान्यही केली आहे. न्या. कोळसे-पाटलांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळेच आता काही नक्षलसमर्थक लोक पोलिसांना लक्ष्य करण्याची खेळी खेळत आहेत. पोलिसांनी सर्व प्रेतांचा व्हिसेरा सुरक्षित ठेवला आहे. सर्वांचे पोस्टमॉर्टमही झाले आहे. काहींची ओळखही पटली आहे. हा सर्व घटनाक्रम पाहिला, तर पोलिसांनी आपले कर्तव्य अतिशय चोखपणे बजावल्याचेच लक्षात येते. जंगली नक्षलवादासोबतच शहरी नक्षलवादाचीही पाळेमुळे खणून काढण्याची आज नितान्त गरज आहे. कारण, हेच लोक नक्षल्यांना आश्रय आणि रसद पोचविण्याचेही छुपे काम करीत असतात. अशा लोकांना हुडकून काढण्यासाठी स्थानिक गुप्तवार्ता यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सुकमामधील दोन घटनांनंतर नक्षली चळवळीचा खात्मा करण्यासाठी व्यापक योजना आखण्यात आली होती. आपले कोणतेही नुकसान न होता, उद्देश तर सफल होईल, अशी व्यूहरचना आखण्याच्या सूचना त्या वेळी करण्यात आल्या होत्या. त्याला आता चांगले फळ येत आहे. गडचिरोली आणि बिजापूरमधील घटना यशस्वीपणे हाताळणार्‍या पोलिस दलांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

No comments:

Post a Comment