मध्ययुगीन भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक लोकोत्तर युगपुरुष होऊन गेले. त्यांनी स्वराज्य स्वभाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी नवीन दृष्टीने प्रयत्नांची आखणी केली. राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेने 1646 मध्ये त्यांनी तोरणा जिंकून घेतला आणि तेथून पुढे सतत विजयी घोडदौड करून त्यांनी एकानंतर एक अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केले. त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब त्यांच्या कल्याणकारी प्रशासनात उमटले आहेत. शिवाय, त्यांनी प्रगत संज्ञापन आणि व्यवस्थापन दृष्टीचा अवलंब करून आपल्या कर्तृत्वाच्या खुणा आणि संकेत जगभर प्रसारित केले. त्यामुळे 22 फेब्रुवारी 1672 च्या लंडन गॅझेट या साप्ताहिकात त्यांचे वर्णन ‘हिंदुस्थानचा सम्राट’ असे करण्यात आले आहे. तोरणा घेतल्यापासून रायगडावर 6 जून 1674 मध्ये डोळे दीपवून टाकणारा राज्याभिषेक समारंभ साजरा करेपर्यंत महाराजांनी केलेल्या कार्याचा आलेख हा सतत श्रेष्ठ बिंदूवर पोहोचणारा होता. या लेखात असा प्रयत्न करण्यात आला आहे. संज्ञापन आणि व्यवस्थापन या परस्पर पूरक ज्ञानशाखा असून, प्रगत संज्ञापन करताना अद्ययावत व्यवस्थापन तज्ज्ञ हे दोघेही काळाच्या पुढे पाहून आपल्या साधनसामग्रीची व्यूहरचना करत असतात, हे प्रकर्षाने लक्षात घेऊन येथे उपलब्ध ऐतिहासिक सामग्रीच्या आधारे नवे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
सर यदुनाथ सरकार यांनी म्हटल्याप्रमाणे छ. शिवाजी महाराज हे मध्ययुगातील एक महान कर्तृत्ववान पुरुष होते. काळाच्या पुढे असलेले शिवाजी महाराजांचे प्रगतिशील धोरण हे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक होते. अलीकडे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संज्ञापन व व्यवस्थापन दृष्टीने विचार केला जातो. मध्ययुगाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या धोरणांचे शास्त्रीय परिशीलन केले असता, त्यातील अनेक धागे विचारात घ्यावे लागतात. शिवकालीन इतिहासाचे आणि साधनांचे वर्गीकरण व विश्लेषण करून हा अभ्यास नव्याने मांडला आहे.
2013 मध्ये नागपूर येथे झालेल्या व्यवस्थापन परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मनुष्यबळ व्यवस्थापन धोरण आणि आजचे स्थानिक उद्योग यांचे तौलनिक अध्ययन सुमंत टेकाडे आणि रिचा जोसेफ यांनी केले होते. शिवरायांच्या मनुष्यबळ विकास दृष्टीची चर्चा करून त्यांच्या नेतृत्व आणि नियोजन कौशल्याची मांडणी त्यात करण्यात आली. यामध्ये त्यांनी नेतृत्व, अचूक व निर्दोष नियोजन, धोरण निश्चिती, प्रशिक्षण व विकास तसेच संपर्क दृष्टी आणि योग्य कार्याचा सन्मान आणि चुकांबद्दल शिक्षा या घटकांचा विचार करून शिवरायांच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाचे सूत्र मांडले आहे. त्यापलीकडे जाऊन प्रस्तूत लेखात संज्ञापन आणि व्यवस्थापन दृष्टीने शिवचरित्राचे नव्याने आकलन केले आहे.
शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा तत्कालीन अनौपचारिक शिक्षण संस्कार प्रक्रियांतून झाला. रामायण, महाभारत पुराणकथा आणि भारतीय वीर पराक्रमी पुरुषांच्या कथा आणि संदेशातून शिवाजी महाराजांच्या मनात प्रखर व जाज्वल्य देशभक्तीच्या प्रेरणांचा स्फुलिंग जागृत झाला. मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार तोरणा गड जिंकण्यासाठी प्रेरक ठरले. ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा’, असा सभासद बखरीतील उल्लेख बोलका आहे. रोहिडेश्वरी मावळ प्रांतात तत्कालीन त्यांच्या सहकार्यांनी घेतलेली शपथ ही त्यांची दृष्टी व ध्येयवाद स्पष्ट करणारी होती. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, येसाजी कंक, नेताजी पालकर, हिरोजी फर्जंद, जीवा महाले इत्यादी निष्ठावान मावळे तयार केले. त्यापैकी काहींनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुतीही दिली. ‘लाख गेले तरी लाखांचा पोशिंदा जाता कामा नये’, असा या निष्ठावानांचा दृढत्तर आत्मविश्वास होता. या विश्वासातूनच स्वराज्याचा भगवा सतत गगनात फडकत राहिला. शिवरायांच्या अजोड आणि अभेद्य किल्ल्यांप्रमाणेच त्यांचे मावळे हेसुद्धा अजिंक्य राहिले. त्यामुळे स्वराज्याचे रक्षण त्यांच्या काळात आणि त्यांच्यानंतरही या ऊर्ज्वस्वल प्रेरणेने केले. हे छत्रपतींच्या संज्ञापनाचे खरे यश म्हटले पाहिजे.
अपूर्व नियोजनाचे फलित
विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती अफझलखानाचे सैन्य संख्येने अधिक होते. परंतु, शिवरायांनी हजारोंच्या संख्येने चालून आलेल्या आक्रमणांचा मोजक्या मावळ्यांच्या आधारे पराभव केला. कारण, शिवाजी महाराज हे अचूक नियोजन, प्रभावी संघटन आणि मानव संसाधन विकासाच्या तत्त्वांचे काटेकोर पालन करत होते. त्यांच्या या कुशलतेचे विश्लेषण प्रा. नरहर कुरूंदकर यांनीही यथार्थपणे केले आहे. काळ, काम, वेगाचे गणित सिद्ध करून महाराजांनी प्रतापगडाचे युद्ध जिंकले.
छ. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचे तंत्र वापरून बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. अशा कार्यामध्ये योग्य व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि नियोजित घटनाक्रम आणि त्यातील समन्वित दृष्टिकोन महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. छ. शिवाजी महाराजांनी कार्यविभागणी आणि विशेषीकरण हे सूत्र अत्यंत योजकतेने वापरले. बहिर्जी नाईक यांच्यासारखा चतुर गुप्तहेर व्यवस्थेचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आला. शत्रूच्या हालचाली आणि त्याच्या कारवाया याबाबतची माहिती शिवाजी महाराजांना तत्परतेने देणार्या गुप्तहेरांचे कौशल्य हे प्रगत संज्ञापन पद्धतीवर आधारलेले होते. आग्य्राहून सुटका यशस्वीपणे करण्यासाठीसुद्धा या हेरांच्या अचूक व नेमक्या माहितीचा महाराजांना उपयोग झाला.
शाहिस्तेखानास कायमची आठवण
छ. शिवाजी महाराजांनी पुणे येथील लाल महालात मुक्कामी असलेल्या शाहिस्तेखानावर योजकतेने हल्ला चढविला. पळून जाताना त्याची बोटे छाटली गेली. खानास त्यामुळे कायमची आठवण राहिली, असे रियासतकार सरदेसाई नमूद करतात. निवडक सैन्याच्या साहाय्याने मावळे लाल महालात घुसले आणि त्यांच्या नियोजनबद्ध कृतीने शाहिस्तेखानास जरब बसली. शाहिस्तेखानाचे सैन्य बळ आणि त्याची ताकत पाहता, हे आव्हान महाराजांनी स्वीकारले आणि त्यामध्ये अपूर्व विजय संपादन करण्याचा विक्रम केला. नियोजन, व्यवस्थापन आणि समन्वय यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली. एप्रिल 1663 मधील लाल महालावरील हल्ल्याच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत 200 निवडक मावळे होते. लग्नाच्या वर्हाडासोबत हे मावळे पुणे शहरात घुसले. शाहिस्तेखानाचा अंगठा व बोटे कापली गेली. त्याचा मुलगा त्यात दगावला. शेवटी बादशहाने शाहिस्तेखानाची बंगालला बदली केली व त्याची नामुष्की झाली. शिवचरित्रातील हा प्रसंग उत्कृष्ट नियोजन व नेतृत्व गुणाचा प्रत्यय आणून देणारा आहे.
व्यवस्थापन कुशलतेचे वैशिष्ट्य
अनेक वेळा एक पाऊल पुढे टाकण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावे लागते, असे लेनिनचेे धोरण होते. काही किल्ले परत करून पुरंदरच्या तहानुसार मुगल बादशहाच्या भेटीस जाण्याचे शिवरायांनी मान्य केले. 12 मे 1666 रोजी महाराज आग्रा येथे पोहोचले. 22 जुलै 1666 रोजी शिवाजी महाराज आग्रा येथून सहीसलामत सुटले, ही सुटका कुशलतेचे द्योतक म्हटली पाहिजे. हिरोजी फर्जंद, मदारी म्हेतर यांच्यासारख्या निष्ठावान सहकार्यांमुळे हे अवघड कार्य सुकर झाले. विशिष्ट काळानंतर वेगवान घोड्यांमध्ये बदल करण्याची पद्धत, कमालीची गोपनीयता आणि अचूकता, आग्रा नगरीतील संपर्क, तसेच रामसिंग व राजपुतांचे सहकार्य यामुळे हे अशक्य ते शक्य घडू शकले. आग्रा येथील नजरकैदेतून सुटका म्हणजे मृत्यूच्या कराल दाढेतून सुटका होती. महाराजांच्या व्यवस्थापन व नियोजन कुशलतेचा हा एक अद्भुत दाखला म्हटला पाहिजे. शिवाजी महाराज स्वराज्यात परतले. जिजाऊंच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आणि उभा महाराष्ट्र पुलंकित झाला.
अपूर्व राज्याभिषेक
6 जून 1674 रोजी रायगडावर साजरा करण्यात आलेला राज्याभिषेक म्हणजे स्वातंत्र्याची मंगल पहाट होती. मुगल, सिद्दी, आदिलशाही, इंग्रज, पोर्तुगीज अशा मातब्बर शत्रूंशी लढून स्वराज्याची स्थापना केल्यानंतर साजरा करण्यात आलेला राज्याभिषेक हा अपूर्व व अलौकिक सोहळा होता. 50 हजारांच्या उपस्थितीतील हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. शिवकालीन होन ही सोन्याची नाणी आणि चांदीची नाणी ही शिवरायांनी स्वराज्यात आणलेल्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू होता. शिवकालातील कल्याणकारी जनसंवादाचे मुख्य सूत्र या राजमुद्रेत अभिव्यक्त झाले आहे. हिंदवी स्वराज्याच्या फलश्रुतीचे हे मौलिक संज्ञापन होते.
शिवरायांच्या पत्रामधील आदेश हे जनकल्याणाची साक्ष पटवितात. “रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे। नाहीतर मुगल मुलकात आले त्याहून तुम्ही ऐसा तळतळाट होईल’’, हा पत्रामधील संदेश शिवरायांच्या कल्याणकारी प्रदेशामध्ये महत्त्व सांगणारा आहे. (वि. का. राजवाडे - मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड 8) या पत्रात असे म्हटले होते की, “पणतीतील वाती उंदीर पळवितील। त्यामुळे गंज कोठीस आग लागेल. त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी॥’’ अशा प्रकारच्या बारीक सूचनाही महाराजांनी केल्या होत्या. जनतेच्या आणि खासकरून शेतकर्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे अचूक लक्ष होते. शिवकालीन पत्रव्यवहारातून प्रकट होणारे पर्यावरण रक्षणाचे संदेश हे खरोखरच काळाच्या पुढे होते, असे म्हटले पाहिजे.
लोककल्याणाचे संज्ञापन
शिवकालीन प्रमुख नऊ बखरी आणि उपलब्ध पत्रव्यवहाराचा अभ्यास केला असता असे दिसते की, लोककल्याणकारी सुशासनाचा तो अभूतपूर्व आविष्कार होता, युक्तिवाद होता. शिवरायांनी संस्कृत व मराठी भाषांना उचलून धरले. राज्य व्यवहार कोष तयार केला. ‘आज्ञापत्रा’तून सुशासनाची साक्ष पटविली. त्यातील संज्ञापन हे जनहिताचे महत्त्व प्रकट करते. जयराम पिंडे या संस्कृत पंडिताने शिवरायांची मुद्रा लिहिली होती. सिंधुदुर्ग, पंचदुर्ग, सुवर्णदुर्ग ही गडकोटांची संस्कृत नावे शिवरायांच्या सांस्कृतिक संवादाची महत्ता स्पष्ट करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची उभारणी केली ‘गड बहोत चखोट यासि राजधानी करावे ऐसे महाराज बोलिले’ हा संदर्भ दूरदृष्टी प्रकट करणारा आहे. रायगडावर महाराजांनी उद्योग, कारखाने उभे केले. त्यांच्या राज्याभिषेकाचे हेन्री ऑक्झिन डेन, फ्रान्सिस जर्मिन या परकीयांनी केलेले वर्णन राज्याभिषेकाचे वैभव स्पष्ट करते. शिवरायांच्या राज्याभिषेकाद्वारे त्यांच्या संज्ञापन व व्यवस्थापनाचा संदेश जगभर पुरस्कृत झाला.
या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की, छ. शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली ती संज्ञापन आणि व्यवस्थापन दृष्टीमुळे, कार्य विभागणी आणि विशेषीकरण या तत्त्वामुळे. त्यांनी प्रत्येक कार्य आणि जबाबदारीचे सन्मानपूर्वक नियोजन केले. प्रतापगडचे युद्ध, पन्हाळ्याहून विशाळगडाकडे वाटचाल, आग्य्राहून सुटका, तसेच दक्षिण दिग्विजय या सर्व घटना व क्षेत्रामध्ये छ. शिवाजी महाराजांनी अभूतपूर्व यश संपादन केले. शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाचे दर्शन शिवकालीन पत्रव्यवहारातून घडते.
वि. का. राजवाडे, सर यदुनाथ सरकार, गो. स. सरदेसाई, स. मा. गर्गे, ग. ह. खरे इत्यादी संशोधकांच्या ग्रंंथ लेखनाचा आढावा घेऊन ही व्यवस्थापन दृष्टी अधिक सखोलपणे अभ्यासली आहे. व्हिएतनामचे लोकनेते हो चि मिन्ह, तसेच बांगलादेशचे शिल्पकार शेख मजिबूर रहेमान आणि क्युबाचे संस्थापक फिडेल कॅस्ट्रो यांनी शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्याचे रक्षण केले. 21 व्या शतकात भारतवर्षालासुद्धा स्वराज्याचे सुराज्यात आणि स्वराज्याचे रामराज्यात रूपांतर करण्यासाठी शिवचरित्र एखाद्या सोन्याच्या खाणीप्रमाणे नवा मार्ग दाखवू शकेल. तोच त्यांच्या संज्ञापन, व्यवस्थापन दृष्टीचा खरा अर्थ होय...
No comments:
Post a Comment