राम रहीम या नराधमानंतर तथाकथित आध्यात्मिक नेते आसाराम यालाही न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावल्याने, आतातरी भोंदू बाबांच्या नादी लागून आपले जीवन बरबाद करणार्या भक्तांनी धडा घेतला पाहिजे. राम रहीमलाही कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. युवतींना फसवून आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्यांचे लैंगिक शोषण करणे, यात या कथित धर्मगुरूंचा हातखंडा होता. राम रहीम आणि आसाराम या दोघांनीही कित्येक मुलींना नासवले. पण, भीतिपोटी अनेक जणींनी मूक राहणे पसंत केले. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, काही प्रकरणात तर आईवडिलांनीच आपल्या कोवळ्या मुलींना या नराधम लांडग्यांच्या हवाली केले होते. पण, राम रहीम आणि आसाराम यांच्या प्रकरणात दोन मुली समोर आल्या आणि धाडसाने त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. त्या वेळी या दोन्ही गुरूंच्या भक्तांनी केवढे अकांडतांडव केले होते, हे सार्या देशाने पाहिले. आमचे धर्मगुरू असे करूच शकत नाही, या मुद्यावर ते ठाम होते. त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, सूडबुद्धीने केले आहेत, बाबांना बदनाम करण्यासाठी केले आहेत, असे आरोप भक्तांकडूनच होऊ लागले.
केवढा हा अंधविश्वास! पण, या दोन्ही प्रकरणांतील फिर्यादी मुली डगमगल्या नाहीत. त्यांनी आपली केस खंबीरपणे पुढे नेली. यात सर्वाधिक कौतुक करावे लागेल ते तपास अधिकार्यांचे! आसाराम प्रकरणात सहायक पोलिस आयुक्त चंचल मिश्रा यांनी ज्या धाडसाने, आसारामच्या इंदूरहून मुसक्या बांधून आणल्या, ती बाब तर विशेष अभिनंदनीय आहे. यासाठी न्यायाधीश भगवानदास यांनीही चंचल मिश्रा यांना केस पुढे नेण्यासाठी मोलाची मदत केली. मिश्रा यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीही त्यांना मोकळीक दिली. आसारामविरुद्ध आरोपपत्र दाखल करायचे होते. पण, आसाराम फरार झाला होता व इंदूरमधील आश्रमात लपून बसला होता. त्याला पकडून आणण्याची जबाबदारी चंचल मिश्रा यांच्यावरच होती. त्या आपली चमू घेऊन इंदूरच्या आश्रमात पोहोचल्या, तेव्हा त्यांचा मार्ग भक्तांनी अडवून ठेवला होता. पथकावर हल्ला होण्याचीही दाट शक्यता होती. अशा वेळी इंदूर पोलिसांच्या एका शिपायाने सांगितले की, जवळच दुसरा दरवाजा आहे. पण, तेथून कार जाणार नाही. लगेच जेसीबी मागविण्यात आली आणि प्रवेशद्वार तोडण्यात आले.
आसाराम कुठे आहे, हे कुणीच सांगत नव्हते. त्याच्या शोधार्थ प्रत्येक खोली उघडून पाहण्यात आली. शेवटी तो एका खोलीत सापडला. पण, त्याने आतून दरवाजा बंद केला होता. चंचल मिश्रा कडाडल्या- ‘‘दरवाजा खोल दो, वरना तोड देंगे!’’ आसारामपुढे पर्यायच नव्हता. त्याने दरवाजा उघडताच पथक आत घुसले. आसारामने चंचलचे पाय धरले आणि म्हणाला, ‘‘पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण मला सोडून द्या.’’ चंचलने त्यांना अटक केली आणि तातडीने वाहनात कोंबून जोधपूरला आणले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास करण्यासाठी महिला पोलिस अधिकार्यांचीच नेमणूक होते. सारी दारोमदार या महिला अधिकार्यावरच असते. पण, आपले अनुभव, महिलांविषयी संवेदनशीलता, न्यायिक प्रक्रियेतील खाचाखोचा, एखादे प्रकरण ख्यात व्यक्तीबाबत असेल तर आलेला दबाव हे सर्व सहन करून आरोपींच्या मुसक्या बांधायच्याच, याच एका उद्देशाने चंचल मिश्रा यांनी आपली कारवाई केली आणि आज आसारामला आजन्म कारावासाची शिक्षा झाली. चंचल मिश्रा यांना आसारामभक्तांच्या, देशभरातून दोन हजार धमक्या आल्या. हा विक्रमच म्हणावा लागेल! यात अनेक धमक्या या जिवे मारण्याच्याही होत्या. पण, या धमक्यांना भीक न घालता, त्यांनी गोळा केलेले पुरावे पूर्ण ताकदीनिशी मांडले. आसारामकडून सात प्रख्यात वकिलांसह तीस वकिलांची फौज होती. या सात प्रख्यात वकिलांमध्ये राम जेठमलानी, सलमान खुर्शीद, के. टी. एस. तुलसी, यु. यु. ललित, सिद्धार्थ लुथरा, राजू रामचंद्रन् आणि सुब्रमण्यम स्वामी यांचा समावेश आहे. या सर्वांनी आसारामला जामीन मिळावा, यासाठीच युक्तिवाद केला. या केसमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचे वकीलपत्रच नव्हते. पण, चंचल मिश्रा यांनी कोर्टात सादर केलेले पुरावे एवढे भक्कम होते की, आसारामने नऊ वेळा जामीनअर्ज दाखल केले, पण त्याला त्यात यश मिळाले नाही.
मिश्रा यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी आणि न्यायालयीन कामकाजासाठी महिनोगणिक सुटी घेतली नाही. त्यांना एकच ध्यास होता की, आरोपीला कडक शिक्षा व्हावी. त्यांच्या या निर्धाराला अखेर फळ आले. केवळ वकिलांवर आसारामने पन्नास कोटी रुपये खर्च केले. 450 आश्रमांचा मालक असलेल्या आसारामची संपत्ती दहा हजार कोटींच्या वर आहे. हे एवढे वैभव त्याला कुठून मिळाले? भक्तांकडूनच ना! राम रहीमला अटक करण्यास पोलिस येणार, या वार्तेनेच त्याच्या समर्थकांनी पंजाब आणि हरयाणात एवढा हिंसाचार माजविला होता की, त्यात 38 जणांचा बळी गेला होता! कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची जाळपोळ करण्यात आली होती. आसाराम प्रकरणात तसे काही घडले नाही. आता त्याचे भक्त हायकोर्टात अपील करणार आहेत. हायकोर्टात त्याला मुक्त करण्यात येईल, अशी त्यांना आशा आहे. त्यासाठी ते सत्संग भरवीत आहेत आणि हजारो भक्त अजूनही त्यात सामील होत आहेत. त्यात महिलांची संख्या मोठी आहे. केवढा हा दैवदुर्विलास...! आज समाजात अशा भोंदू बाबांची कमतरता नाही.
दर दिवशी देशात कुठे ना कुठे असे बाबा अवतरत असतात आणि सर्वात आधी भक्त बनतात त्या महिला! सोबत त्या मुलींनाही घेऊन जातात. या मुलींवर या भोंदू बाबांचा डोळा असतो. आसारामने केलेल्या युक्तीत असे दिसून आले की, अनेक शाळांमधील दहावी ते बारावीच्या विद्यार्थिनींचे तो सत्संग भरवायचा आणि त्यातून आपल्याला हव्या असलेल्या मुली निवडायचा. आसारामच्या ज्या दोन साथीदारांना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा झाली आहे, त्यात सर्वाधिक पापी महिलांच्या वॉर्डनची प्रमुख शिल्पी ही आहे. हीच मुलींचे समुपदेशन करायची. तू पूर्वजन्मीची गोपिका आहेस आणि आसाराम हे श्रीकृष्णाचा अवतार आहेत. त्यांना तन, मन, धन अर्पण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्यांनी तुला कुठेही स्पर्श केला तर वाईट वाटून घेऊ नकोस, असे ती त्या कोवळ्या मुलींना सांगायची आणि आसारामच्या दालनात घेऊन जायची. अशा कितीतरी शाळकरी मुलींना आसारामने नासविले. या शिल्पीची महिला पोलिसांनी आपल्या पद्धतीप्रमाणे विचारपूस केली असता, हे सत्य समोर आले. वास्तविक पाहता कटकारस्थानात सहभागी म्हणून शिल्पीलाही आजन्म कारावासच व्हायला हवा होता. महिलांना अजूनही अशा भोंदू बाबांचा एवढा लळा का आहे, हे कळायला मार्ग नाही. पालकांनी या प्रकरणावरून तरी आपल्या मुलींना सावध करायला हवे. आध्यात्मिक मन:शांती अशा भोंदू बाबांच्या नादी लागून कधीच मिळत नसते. आपल्या घरीही आपण रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी वाचली तरी त्यातून आपणास अध्यात्माची अनुभूती होते. सर्वच संत हे राम रहीम, आसारामसारखे नसतात. अनेक संत आपल्याला शुद्ध आचरण, सत्य, अिंहसेचे पालन करण्याचे मार्गदर्शन करतात. तेव्हा सर्व पालकांनी आणि मुलींनीही यानंतर तरी आसारामसारख्या भोंदू बाबांपासून सावध असायला हवे.
No comments:
Post a Comment