रविवार, दि. 22 एप्रिल 2018 रोजी 64 महाराष्ट्र सी-60 आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ) कमांडोंनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगावजवळच्या जंगलात कसनासूर येथे काही काळ विसावा घेत असलेल्या नक्षल्यांवर हल्ला केला. यामध्ये 16 नक्षली जागीच मारले गेले. दुसर्या दिवशी झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये इंद्रावती नदीतून आणखी 21 मृतदेह शोधून काढण्यात आले.
दोन कमांडर्सचा खात्मा
मारल्या गेलेल्या या 16 नक्षल्यांमध्ये पेरिमिली दलम कमांडर आणि डिव्हिजनल कमिटी सदस्य असणारा दोलेश आत्राम ऊर्फ साईनाथ आणि दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमांडर वीजेंद्र रावथू ऊर्फ सिन्यू हे दोन नक्षलप्रमुख आणि दोन षोडशींसह सात नक्षली स्त्रियांचा समावेश आहे. या दोघांखेरीज अन्य 11 जणांवर मिळून एकूण 76 लाखांचे बक्षीस आहे. ‘मॉप अप ऑपरेशन्स’ दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणावर एके-47 रायफल्स, दारूगोळा, रेडिओ सेटस् व वॉकीटॉकीज्, स्फोटके, वायर्सची बंडले, संगणकीय पेन ड्राईव्हज, लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणात नक्षली प्रचारपत्रक व साहित्य मिळाले आहे. एकाच वेळी दोन डिव्हिजनल कमांडर्सचा खात्मा पहिल्यांदाच झाला आहे हे या चकमकीचे विशेष.
काय आहे सी-60 कमांडो युनिट?
1992 मध्ये नागपूरस्थित नक्षलविरोधी मुख्यालयाने मुख्यत: गडचिरोली आणि उर्वरित महाराष्ट्र पोलिसांमधून काही तरुण निवडून केपी रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सी सिक्स्टी कमांडो युनिटची स्थापना केली. यापूर्वी ओडिशाच्या मलकानगरी जंगलामध्ये 2016 मध्ये एकाच वेळी 24 नक्षल्यांचा खात्मा करण्याचा मान आंध्र प्रदेशच्या ‘ग्रे हाऊंड कमांडों’चा होता.
नक्षली हिंसाचाराचे वास्तव
एका अंदाजानुसार, मागील 20 वर्षांमध्येे नक्षली तांडवात 12,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. तसेच किमान 9300 नागरिकांना पोलिस खबरे हे लेबल लावून नक्षल्यांनी मारण्यात आले आहे. पोलिस नक्षली धुमश्चक्रीमध्ये 2700 पोलिस शहीद झालेत आणि 2874 नक्षली मारले गेले आहेत.
दरवर्षी 320 कोटींची खंडणी
गडचिरोलीमधील तेंदू पत्ता व्यापारी दरवर्षी 320 कोटी रुपयांची खंडणी नक्षल्यांना देतात. तेंदू पत्ता दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गोळा केला जातो. सिन्यू व साईनाथ हे दोन डिव्हिजनल कमांडर्स आपल्या 60 अनुयायांसह गडचिरोलीतील तेंदू पत्ता व्यापार्यांकडून खंडणी घेण्यासाठी तेलंगणातून गडचिरोलीला जात असताना ताडगावजवळ इंद्रावती नदीकाठी सकाळचा नाश्ता करण्यासाठी थांबले होते. ते या मार्गे येणार ही बातमी गडचिरोली पोलिसांकडे होती. सकाळी साडेनऊ वाजता पोलिस उपअधीक्षक वासुदेव मडावी आणि मधुकर नेतामच्या नेतृत्वाखाली 34 सी सिक्स्टी कमांडो आणि 30 सेंट्रल रिझर्व्ह पोलिस कमांडोंनी त्यांना घेरले. नक्षली बसले होते त्याच्या तीन बाजूंना असलेल्या उंच ठिकाणांवर कमांडोंनी गुपचूप पोझिशन अखत्यार केली. उंचावरील पोलिसांनी खोलगट भागात नाश्ता करणार्या नक्षल्यांना तीन बाजूंनी घेरण्याच्या या व्यूहरचनेमुळे नक्षली पोलिसांच्या घातक मार्यात आले आणि पोलिस मात्र सुरक्षित राहिले.
नक्षलग्रस्त भागात विकासाची गंगा
नक्षल प्रश्न संपवण्याचे आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास आणि खंबीर कायदा व सुरक्षा अंमलबजावणी प्रणाली हे दोन मार्ग आहेत. दुसर्या मार्गामध्ये निर्णायक शरणागती योजना आणि कट्टर नक्षल्यांचा समूळ नायनाट हे दोन उपमार्ग आहेत. गडचिरोली पोलिसांनी या उपमार्गाची वाट चोखाळली आहे. आता पहिला मार्ग व दुसरा उपमार्ग सरकार व कलेक्टर यांना चोखाळावा लागेल तरच या क्षेत्रातील नक्षली युद्ध थंडावेल. याच अनुषंगाने ‘लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम’ला तोंड देण्यासाठी मोदी सरकारने तयार केलेल्या ‘नॅशनल पॉलिसी अँड अॅक्शन प्लॅन’ला मिळालेल्या यशामुळे केंद्रीय गृह खात्याने 11 राज्यांमधील नक्षल प्रभावी 106 जिल्ह्यांची संख्या आता 90 वर आणि 36 अति नक्षल प्रभावी जिल्ह्यांची संख्या 30 वर आणली आहे.
नक्षल समर्थकांची आर्थिक कोंडी
24 एप्रिल रोजी मोदी सरकारने एका अध्यादेशाद्वारे, एनआयएला नक्षली आणि माओवादी नेते, त्यांचे समर्थक तसेच सहानुभूतीदर्शक विचारवंतांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे अधिकार बहाल केले. हे लोक हवाला माध्यमातून प्रचंड मोठ्या रकमेच्या देवाणघेवाणी करत असतात. कुठलाही पारदर्शी उत्पन्न स्त्रोत नसताना हे लोक मोठाल्या बंगल्यांमध्ये अत्यंत चैनीचे आयुष्य जगतात. त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात आणि त्यांची जीवनपद्धती भल्या भल्यांना लाजवणारी असते. केंद्रीय गृह खात्याने यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या सर्व घडामोडींमधून मोदी सरकार विकासाबरोबरच नक्षल्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे अभियानही तितक्याच सामर्थ्याने राबवते आहे हे उजागर होत.
बेसावध राहून चालणार नाही!
कोणतेही गनिमी युद्ध जिंकण्यासाठी शत्रूची इत्थंभूत माहिती मिळवणे आवश्यक असते. ते गडचरोली पोलिस करत आहेत. दुसरीकडे ग्रास रूट लेव्हलवरील अधिकार्यांमध्ये स्वत:च्या आणि नक्षल्यांच्या डावपेचात्मक कारवायांबद्दल जागरुकता निर्माण झालेली दिसून येत आहे. ताडगाव आणि पत्तीगावमध्ये पोलिसांनी ज्या त्वरेेनी जमिनी बनावटीनुरूप स्वत:ला पूरक जागा शोधून तेथून नक्षल्यांना कचाट्यात पकडले ते केवळ ‘काबिले तारीफ’ होते. नक्षल्यांना आपली रणनीती ठरवण्याची किंवा असलेले प्रशिक्षण अमलात आणण्याची संधीच या जांबाजांनी दिली नाही हेच या यशाच गमक आहे. अर्थात या कारवाईमुळे नक्षलवादाविरुद्धचे युद्ध जिंकलेले अथवा संपलेले नाही. केवळ एका लढाईत यश मिळवले आहे. या यशाला विकासाची जोड मिळाली नाही तर ते व्यर्थ जाईल हेही तेवढेच खरे आहे. म्हणूनच या यशाचा डंका वाजवताना पुढील युद्धासाठी तयारी करायची आहे हे त्यांनी विसरून चालणार नाही. या घटनेमुळे चवताळलेले नक्षली केव्हा, कुठे आणि कधी पोलिसांवर किंवा संसाधनांवर, अतिशय घातक प्रतीवार करतील हे सांगता येत नाही आणि त्यासाठी पोलिसांना सदैव सतर्क राहून, तडक प्रति कारवाई करण्यासाठी कंबर कसून तयार राहणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment