Total Pageviews

Wednesday, 25 April 2018

कर्नाटकात येत्या 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका-कॉंग्रेस आणि जदयु(एस) या दोन पक्षांच्या वाहनांवर आयकर, निवडणूक आयोगाच्या विविध दक्षता पथकांनी धाडी घालून आतापर्यंत 37 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या

कर्नाटकात येत्या 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही निवडणूक कॉंग्रेसने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद आणि त्यापलीकडेही जाऊन जर काही अवैध कार्ये करता आल्यास त्याचाही वापर कॉंग्रेस मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे दिसूून आले आहे. आपणास आश्चर्य वाटेल, या निवडणुकीत कॉंग्रेस आणि जदयु(एस) या दोन पक्षांच्या वाहनांवर आयकर, निवडणूक आयोगाच्या विविध दक्षता पथकांनी धाडी घालून आतापर्यंत 37 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. या 37 कोटींमध्ये सर्वाधिक दोन हजारांच्या नोटा 36 कोटींच्या आहेत आणि उर्वरित एक कोटीच्या नोटा या 500 रुपयांच्या आहेत. शिवाय पोलिसांनी या वाहनांमधून ज्या वस्तू जप्त केल्या, त्या यादीत 6 कोटींच्या दारूच्या पेट्या, 5 कोटीचे सोने, लक्षावधी रुपयांची चांदी, साड्यांचे गठ्ठेे, लहान बालकांचे शर्ट-पॅण्ट, प्रेशर कूकर, ग्राईंडर, तवे, मफलर, टोप्या... अशा अनेकविध वस्तूही जप्त करण्यात आल्या. राज्याच्या कॉंग्रेस महिला प्रमुख लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ट्रक भरून प्रेशर कूकरचे बॉक्स वाटण्यासाठी आणले होते. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. कॉंग्रेसचे असे ट्रकच्या ट्रक कर्नाटकात फिरत आहेत आणि गरीब मतदारांची मते मिळविण्यासाठी त्यांना या वस्तूंचे आमिष दाखविले जात आहे. लक्ष्मी मॅडमची सध्या कसून विचारपूस सुरू आहे. कारण, अन्य जप्त केलेल्या वाहनांमध्ये कॉंग्रेसचे हॅण्डबिल आणि पुस्तक पावत्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या वस्तू कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी वाटण्यासाठी आणल्या होत्या, याची कारणे आयकर आणि अन्य विभाग लक्ष्मीकडून जाणून घेत आहेत. लक्ष्मीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निवडणुकीत मादक पदार्थ वाटपाचाही मोठा कार्यक्रम आखण्यात आलेला दिसतो. सुमारे दोन कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्स पोलिसांनी आतापर्यंत जप्त केले आहेत. कॉंग्रेसचे खासदार डी. के. सुरेश आणि आमदार मुनीरत्नम् यांच्या वाहनातून प्रेशर कूकर, तवा, साड्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. राजराजेश्वरी नगरातून प्रत्येकी 90 साड्या असलेल्या चार पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पथकांनी आणि आयकर विभागाने राज्यातील बागलकोट, विजयपूर, रामदुर्गा, अरासीकेेरे, रायचुरू, इल्लाकल आदी जिल्ह्यांतही धाडी घालून मोठ्या प्रमाणावर नोटा, साड्या, दारू जप्त केली आहे. कर्नाटकात एटीएमध्ये पैसे नाहीत, अशी ओरड कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चालविली होती. आयकर आणि निवडणूक आयोगाच्या दक्षता समितीने बँकांकडून माहिती घेतली असता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा गेल्या महिनाभरात कर्नाटकातील अनेक बँका आणि एटीएममधून दोन हजार आणि पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी काढल्याचे निदर्शनास आले. त्यावरून निवडणूक आयोगाने व्यापक प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली असता, हे मोठे घबाड हाती लागले. यात 91 टक्के नोटा या दोन हजार आणि 8 टक्के नोटा या पाचशेच्या जप्त करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ, कॉंग्रेस आणि जद(एस)ने आधीपासूनच दोन हजार आणि पाचशेच्या नोटा जमा करण्यास प्रारंभ केला होता, हे या धाडींमुळे स्पष्ट झाले.
 
विमानातून आल्या नोटा!
 
कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर नोटा जप्त होत असल्याचे पाहून निवडणूक आयोग आणि आयकर विभागाने सर्व प्रमुख रेल्वेस्थानके आणि विमानतळांवरही करडी नजर ठेवली होती. असाच एक प्रवासी मुंबईहून विमानाने आला असता, पथकाला त्याचा संशय आला. त्यांनी त्याच्या बॅगेची झडती घेतली असता, 10 लाख 65 हजारांच्या नोटा आढळून आल्या. त्याची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. त्याची कसून विचारपूस केली असता, त्याने आपण मुंबईहून आल्याचे सांगितले. त्याच्या घरचा पत्ता घेऊन लगेच मुंबई कार्यालयाला कळविण्यात आले. त्याच्या मुंबईच्या घराची झडती घेतली असता, 30 लाख 70 हजारांच्या नोटा सापडल्या. त्यानंतर आणखी पाहणी केली असता, त्याच्या घरातून आणखी नोटा सापडल्या. या सर्व मिळून 50 लाखापेक्षा अधिक नोटा जप्त करण्यात आल्याचे आयकर विभागाचे महासंचालक (अन्वेषण) जी. रमेश यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. तसेच एका कंत्राटदाराच्या घरावर धाड घातली असता, त्याच्याजवळून 55 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. त्याला ‘प्रेमाने’ विचारले असता, त्याने सांगितले की, आणखी एक कोटी 60 लाख रुपयांच्या नोटा दडवल्या आहेत. त्यासुद्धा जप्त करण्यात आल्या. म्हैसूरू येथे एका गोदामावर पथकांनी धाड घालून 9 कोटी रुपयांच्या घरगुती साहित्याचा साठा जप्त केला. हे साहित्य निवडणुकीत वाटप करण्यासाठी येथे ठेवण्यात आल्याचे त्याने कबूल केले. आणखी एका इसमाजवळून 50 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. आयकर विभागाने बँकांची मदत मागितली असून, गेल्या महिना-दोन महिन्यात ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात बँकांमधून आणि एटीएममधून दोन हजार आणि पाचशे, शिवाय अन्य मोठ्या रकमा काढल्या त्यांची यादी देण्याची विनंती केली आहे. आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या दक्षता समित्यांनी 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केले असून, जेथे कुठे असे साहित्याचे, पैशाचे वाटप केले जात असेल, त्याची तत्काळ माहिती नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन रमेश यांनी केले आहे. शिवाय 24 तास दक्षता पथके राज्यात सर्व 30 जिल्ह्यांत वाहनांनी गस्त घालत आहेतच. व्हिडीओ कॅमेर्यांची मोठी चमू त्यांच्यासोबत आहे.
 
एटीएमबाबतचा प्रचार बंद का?
 
कर्नाटकात कॉंग्रेसच्या वाहनांमधून नोटा, साड्या आणि अन्य साहित्य जप्त करण्याच्या बातम्या येताच अचानक, एटीएममध्ये पैसे नाहीत, हा प्रचार एकदम कसा काय बंद झाला? याचा अर्थ काय लावावा? असा विषारी प्रचार करण्यामागे वाहिन्यांना हाताशी धरून काही सुनियोजित कटकारस्थान रचले गेले होते काय? अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. सध्यातरी हाच निष्कर्ष काढता येतो. राहुल गांधी यांची तर या विषयावर बोलतीच बंद झाली आहे! ते म्हणाले होते- ‘‘मोदीने सारे बँिंकग सिस्टिमको बरबाद किया है...’’ पी. चिदम्बरम् म्हणाले होते, ‘‘एटीएममध्ये पैसे नसणे हे सरकारचे अपयश आहे...’’ आता हे दोन्ही नेते गप्प का? त्यांनी, एटीएममधील दोन हजाराच्या नोटा कुठे गेल्या, हे सांगायला हवे! कॉंग्रेसला अशी भीती वाटत आहे की, ज्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नोटा आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे, त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द होते की काय? एक मात्र नक्की की, देशात कोणत्याही गोष्टीचे राजकारण करून त्यावर प्रचाराचा धुराळा उडवून देण्याचे काम काही वाहिन्यांना सोपविण्यात आले होते. निवडणूक आयोगाने या पैलूचाही विचार करावा आणि सत्य जनतेसमोर आणावे.

No comments:

Post a Comment