आज सात दशकं लोटली तरी काश्मीरचा तिढा सुटता
सुटत नाहीय्. जी धग खोर्यात जाणवते, ती लद्दाखमध्ये जाणवत नाही अन् जी शांतता जम्मूत अनुभवता येते ती
तेथून 270 किलोमीटर दूर असलेल्या श्रीनगरमध्ये अनुभवता
येत नाही. कारण हा भेद केवळ भूप्रदेशाचा, त्याच्या रचनेचा नसतो. तो
बदललेल्या परिस्थितीचा अन् लोकांच्या बदललेल्या मानसिकतेचा असतो. विशेषत: काश्मीर
खोर्याबाबत ही दाहक परिस्थिती नेहमीच अनुभवता येते. तिथले लोक नेमके कुणाच्या
बाजूने आहेत, तेच कळत नाही. त्यांना राहायचे भारतात असते.
कारण इथल्यासारखे पोषक वातावरण इतरत्र सापडणार नाही, याबाबत त्यांची खात्री
झालेली असते. त्यांना नको तेवढा धिंगाणाही इथंच घालायचा असतो. तरीही पाठराखण मात्र
भारताची करत नाही.
भारतापेक्षा सीमेपलीकडचे लोक त्यांना अधिक जवळचे
वाटतात. वर्षानुवर्षे मिळत राहिलेल्या राजकीय आश्रयामुळे खोर्यातल्या स्थानिक
नागरिकांची मुजोरी तर एवढी वाढली आहे की, ते भारताच्या बाजूने आहेत
की पाकिस्तानच्या, असा प्रश्न आपसूकच उभा राहतो. पण करता काय? तसे काही विचारताही येत नाही या कथित सेक्युलर देशात. विचारलेच
कुणी काही, केलाच व्यक्त कुणी संशय, तर लागलीच चवताळून उठतात अब्दुल्लासाहेब! हा देश काय तुमच्या
बापाचा आहे का, असा रोख सवाल असतो त्यांचा. सीमेवर
पाकिस्तानविरुद्ध लढून आपलं रक्षण करणारे भारतीय सैनिक आपल्यावर अन्याय करीत
असल्याचा कांगावा तर कायम तोंडी असतो त्यांच्या. पण, आता त्याच सैनिकांच्या गोळीबारात
दहशतवादी मारले गेले, तर त्याचाही उघडपणे निषेध करू लागलेत हे लोक.
परवा दक्षिण काश्मिरात तेरा दहशतवादी मारले गेलेत, तर आनंद झाला नाही
कुणाला. उलट तिळपापड झाला फुटीरतावादी नेत्यांचा. लागलीच बंदचे आवाहन. तेवढ्याच
तातडीने, त्याच तोडीचा प्रतिसादही मिळाला त्या बंदला.
शाळा बंद, सरकारी कार्यालये उजाड पडलेली. विद्यापीठाच्या
परीक्षांना स्थगिती मिळाली. व्यापारपेठ आणि व्यवहार ठप्प झाले. बंद मात्र जाम
यशस्वी ठरला.
काश्मीर खोर्यातील लोकांनी पुकारलेला, भारतीय सैनिकांविरुद्धचा बंद शंभर टक्के यशस्वी ठरल्याचा उन्माद
जाहीरपणे व्यक्त झाला नसता तरच नवल! बदंचा पुढचा टप्पा म्हणून ‘शोपियॉं चलो’ची हाक देण्यात आली आहे आता. त्याला भरघोस
प्रतिसाद मिळाल्यास तेही नवलाईचे ठरणार नाही. दहशतवादी कृत्याचे कित्येक आरोप
असलेला एक बुरहान वानी सैनिकांकरवी मारला गेला तर त्याच्या अंत्ययात्रेला अलोट
गर्दी करणारा समुदाय हा. एकाच कारवाईत, एकाच दिवशी झालेल्या, तब्बल तेरा दहशतवाद्यांच्या खातम्याने तो बिथरला नाही, तरच गोष्ट आश्चर्याची. या लोकांनी ज्यांना देवत्व बहाल केलेय्, त्या गिलानी,
मीरवाईज, यासीन मलिक यांच्यासारख्या नेत्यांनी साद घालण्याचीच देर की, हा जमाव त्या हाकेला ओ देत श्रीनगरच्या लाल चौकात लगबगीने जमा
होतो. स्थानिक पोलिसांवर दगडफेक करतो. सीमेवर ‘शहादत’ स्वीकारत देशाचे रक्षण करणार्या आपल्याच सैनिकांच्या नावाने जाहीर
शिमगा करतो. कारण त्यांना सैनिकांनी देशरक्षणासाठी वेचलेल्या प्राणांपेक्षाही
दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाने घातलेला धिंगाणा अधिक मोलाचा वाटतो. वीर जवानांना
उच्चरवात शिवीगाळ करीत, दहशतवाद माजविणार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
राहण्यात त्यांना धन्यता वाटते. एका मोठ्या संख्येतला समुदाय याच पद्धतीच्या विचार
आणि संस्कारांनी निपजतोय्. यातच त्यांना आपल्या धर्मासाठी कर्तबगारी बजावल्याचा
भास होतो. यातून आपण देशविघातक कृत्यांना पाठबळ देत असल्याची वस्तुस्थिती
त्यांच्या ध्यानात येत नाही. पुढ्यात चार तुकडे फेकले की, आपल्याच रक्षणकर्त्यांविरुद्ध छातीठोकपणे उभी राहणारी जनता, हीच फुटीरतावादी नेत्यांची मोठी ताकद ठरली आहे आजवर. त्याच्याच
बळावर त्यांची मुजोरी चालली आहे. गेली कित्येक वर्षे काश्मिरात या नेत्यांचे हे
घाणेरडे राजकारण चालले आहे. जनजीवन उद्ध्वस्त करून त्यांचे मात्र फावते आहे.
धर्माच्या नावाने हुंकार दिला की, मग खरे-खोटे शोधण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. गुमान सारा जमाव, नसलेला संताप चेहर्यावर मिरवत रस्त्यावर उतरतो. या असल्या कवडीमोल
कारणांसाठी ठप्प पडलेल्या शाळांमुळे आपल्या पोरांचे भवितव्य बर्बाद होत असल्याचे
वेदनादायी वास्तव फारच थिटे पडते त्यांच्या लेखी. या नागरिकांची माथी कायम
भडकाविण्याची आणि स्वत:च्या राजकारणाच्या पोळ्या व्यवस्थितपणे शेकून घेण्याची रीत
नेत्यांच्याही अंगवळणी पडलीय् आताशा. फक्त दरवेळी चवताळून रस्त्यावर उतरून
त्यांचे राजकारण साध्य करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार्या आम जनतेलाच त्यातील
मेख कळत नाही, हेच दुर्दैव! दरवेळी कुठलेसे निमित्त काढून लाल
चौकात घडणारी दगडफेक असो, की परवा घडवून आणण्यात आलेला बंदचा तमाशा, सारा त्या दुर्दैवाचाच परिपाक आहे. निलाजरेपणाने, देशहित वेशीवर टांगून धर्मासाठीची लढाई लढायला निघालेल्या
बहाद्दरांच्या पुढाकारातून असली कृत्ये करवून घेताना फुटीरतावादी नेत्यांनी कधीच
तमा बाळगली नाही. कधीही पूर्ण न होणार्या स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न त्यांनी
लोकमानसात जाणीवपूर्वक जिवंत ठेवले. जिहादची आग त्यांनी त्या समूहात जाणतेपणाने
धगधगती ठेवली. कारण त्याच भरवशावर आपली राजकीय दुकाने चालणार असल्याची खात्री तर
त्यांनाही झाली आहे एव्हाना... ज्यांनी निर्दयीपणे हजारो लोकांचे जीव घेतले, जागोजागी बॉम्ब पेरले, रक्ताचे पाट वाहविले, आपलाच परिसर नेस्तनाबूत केला, खोरे उद्ध्वस्त करण्याचा
प्रयत्न केला, त्या नराधमांचा अंत इतक्या मोठ्या संख्येतील
लोकांना कमालीचे हळवे करून जातो,
तेव्हा त्या धिंगाणा
घालणार्यांच्या अंतिम उद्दिष्टाला त्यांचेही समर्थनच होते, हेच सिद्ध करतो हा समुदाय.
काश्मिरात गेली कित्येक वर्षे या समर्थनाचाच
तमाशा चालला आहे... बंदच्या या काळात काश्मिरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात
पोलिस कुमक तैनात करण्यात आली होती म्हणे! कुठला भाग संवेदनशील असतो हो या देशात? जिथे मुस्लिमांची संख्या अधिक असते तो? याच संवेदशील भागात बंद दरम्यान परिस्थिती हाताळताना तीन सैनिकांचा
मृत्यू होतो? अन् तरीही बंद ‘सफल’ झाल्याचा दावा काही निर्लज्ज लोक करतात? या देशाचे सैनिक मारले गेल्याचा आनंद होतो त्यांना? कुठली धार्मिक लढाई लढताहेत अन् कुठल्या स्वातंत्र्याच्या गप्पा
मारताहेत हे लोक? हा केवळ त्या सैनिकांचाच नव्हे, तर या देशातील प्रत्येक देशाभिमानी माणसाचा अपमान आहे. या देशाचा
एक अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरात बसून पाकधार्जिण्या दहशतवादाचे समर्थन करणारे
लोक तो अपमान करताहेत. अगदी जाणतेपणाने करताहेत. त्याचे कठोर प्रत्युत्तर हीच
काळाची गरज आहे..
केंद्रात मोदी
सरकार सत्तेत आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद्यांबाबत अधिक कठोर धोरण अवलंबण्यास
सुरुवात झाली होती. गेल्या चार वर्षांच्या काळात काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑलआऊट’ या नावाने
मोहीम आखून दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारण्यात आले. गेल्या वर्षी तर, सुमारे अडीचशे दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले होते. या वर्षात
आतापर्यंत पन्नासपेक्षाही अधिक दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. एखाद्या संघटनेचा
नवा म्होरका आला की, त्याला कंठस्नान घालण्याचा सपाटाच
लष्कर आणि पोलिसांनी लावलेला आहे. दुसरीकडे पाकधार्जिण्या हुर्रियत कॉन्फरन्सच्या
नेत्यांच्या मुसक्या ‘एनआयए’ने आवळलेल्या असल्याने दहशतवाद्यांची रसदही कमी झालेली आहे. गेल्या
रविवारी शोपियाँ आणि अनंतनाग जिल्ह्यांत तीन जागी झालेल्या चकमकीत तेरा
दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यामध्ये लेफ्टनंट उमर फयाज यांच्या
मारेकर्यांचाही समावेश होता. हुर्रियतवाल्यांनी आणि पाकिस्तानने नेहमीच अशा
दहशतवाद्यांना हीरो ठरवलेले आहे. बुरहान वानीचे उदाहरण तर ठळकच आहे. आताही या तेरा
दहशतवाद्यांच्या खात्म्याने हादरलेल्या हुर्रियतवाल्यांनी काश्मीरमध्ये बंद
पुकारला. सीमेपलीकडेही या दहशतवाद्यांच्या खात्म्याने मातम सुरू आहे. दहशतवादी ठार
झाल्याचे समजताच पाकिस्तान सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि 6 एप्रिलला ‘काश्मीर एकता दिन’ पाळण्याचे जाहीर केले. शिवाय, जगभर विशेष दूत पाठवून काश्मीरमधील स्थितीची माहिती देण्याचाही
निर्णय घेण्यात आला. काश्मीरमध्ये कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना ‘शहीद’ ठरवण्यात आले. पाकचे पंतप्रधान
शाहिद खाकान अब्बासी आणि परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी यानिमित्ताने
काश्मीरचा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी केली. खरे तर, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील लोक सातत्याने पाकच्या
अत्याचारांविरुद्ध आणि हे नसते जोखड फेकून देण्यासाठी निदर्शने करीत असताना पाक
सरकारने मानभावीपणाने जम्मू-काश्मीरमधील स्थितीची चिंता वाहणे हे ‘चोराच्या उलट्या ुुुुुु’ अशा थाटाचेच आहे. अर्थात, मांजराने डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न केला, तरी जगाने डोळे झाकलेले नसतात. हाफिज सईदबाबत पाकिस्तानचा बुरखा
आता चांगलाच फाटलेला आहे. हाफिजने निवडणुकीत उतरण्यासाठी ‘मिल्ली मुस्लिग लीग’ची स्थापना केली होती; मात्र अमेरिकेने या पक्षालाही दहशतवादी संघटनांच्या यादीत
टाकल्याने पाकिस्तानची किंवा हाफिजसारख्या उजळमाथ्याने वावरत असलेल्या
दहशतवाद्यांची आता डाळ शिजणार नाही, हे उघड झाले आहे. त्यामुळे तेरा दहशतवाद्यांच्या खात्म्याबाबत
पाकिस्तानने किंवा हुर्रियतवाल्यांनी कितीही आकांडतांडव केले, तरी जग याबाबत भारताला दोषी ठरवू शकणार नाही. सध्या सगळे जगच
दहशतवादाच्या सावटाखाली असल्याने आपल्या देशाच्या व देशवासीयांच्या संरक्षणासाठी
सगळेच तत्पर झालेले आहेत. अशा वेळी भारताने केलेली कारवाई चुकीचे आहे, असे म्हणण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही. पाकिस्तान मात्र
आपल्या काळ्या कृत्यांवर पांघरून घालण्यासाठी काश्मीरचा राग आलापणार हे काही नवे
नाही. अर्थात, असा राग आळवण्याचे दिवसही आता
संपले आहेत!
No comments:
Post a Comment