खलिस्तानवाद्यांचे भूत
पंजाबमधल्या खलिस्तानवादी चळवळीचे दहन होऊन
अनेक वर्षे लोटली आहेत. परंतु उरलेल्या राखेतले काही निखारे अजून जिवंत आहेत.
त्याला जाणीवपूर्वक फुलविण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जाऊ शकतो. नव्हे तसा
तो केला जात असल्याचे पुरावे अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केले गेले आहेत.
भारताने त्याची दखल वेळीच घेणे आवश्यक आहे. खलिस्तानवाद्यांचे भूत बाटलीबंद
करण्यासाठी भारताला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. हे भूत बाटलीतून मोकळे करता
आले तर पाकिस्तानला हवेच आहे. नाकापेक्षा मोती जड व्हावा त्याप्रमाणे दहशतवादी
संघटनांच्या कारवायांनी पाकिस्तानला पोखरून काढले आहे. विशेष म्हणजे आयएसआयचे
त्यांना प्रोत्साहन आहे. त्यामुळेच जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद उजळ
माथ्याने फिरू शकतो. चिथावणीखोर भाषा करू शकतो. खलिस्तानवादी नेता गोपाल चावलाची
त्याने अलीकडेच घेतलेली भेट हा त्या अर्थाने धोक्याचा इशाराच मानला जातो. कोणत्या
ना कोणत्या माध्यमातून खलिस्तानवाद्यांना भारताविरोधात सक्रिय करण्याची कारस्थाने
आयएसआय करू शकते. पंजाबमधील बेरोजगार तरूण, गुन्हेगारांचा वापर त्यासाठी केला जाऊ शकतो
अशी माहिती आहे .पाकिस्तान ही अनेक दहशतवादी संघटनांची जन्मभूमी असल्याचे भारत
अनेक वर्षांपासून सांगत आला आहे. मात्र त्याकडे अमेरिकेसारख्या महासत्तेने
सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. खरे म्हणजे अमेरिकेच्या राजकारणामुळे मूलतत्त्ववादी
संघटनांच्या दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळाले. त्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा
अमेरिकेने वापर केला. राजकीय नेते आणि आयएसआय यांच्या संगनमतातून हे सगळे घडले.
पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱयांनीही त्यात हात धुवून घेतले हा इतिहास आहे.
त्याची फळे भारतासह जगभरातल्या अनेक देशांना भोगावी लागली आहेत. खुद्द पाकिस्तानी
नेतेही त्याला अपवाद राहिले नाहीत. झिया ऊल हक, बेनझीर भुत्तो मृत्यु ही त्याची
उदाहरणे आहेत. रशियाच्या ताब्यातील अफगाणिस्थानमध्ये मुस्लिम मूलतत्ववादी संघटनाना
आर्थिक आणि शस्त्रांची रसद अमेरिकेतून पुरवली गेली. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हे
केले जात होते. झुल्फिकार अली भुट्टो, झिया ऊल हक यानी आपल्या सत्ताकाळात
देशातल्या मुल्ला मौलवींना हाताशी धरले. त्यातून धर्मांध प्रवृत्ती वाढत
गेल्या. आय.एस.आय.चा उपयोग त्यासाठी केला गेला. अफगाण बंडखोरांना पाकिस्तानमधल्या
तळांवर प्रशिक्षण दिले गेले. हे सर्व घडत होते त्या काळातच पंजाबमधल्या खलिस्तानवाद्यांनी
जोर धरला होता हा योगायोग नव्हता. दोन दशकापूर्वी पंजाब आणि काश्मीरच्या भूमीत
दहशतवादी संघटनांनी हिंसाचाराचे जे थैमान घातले त्याला सर्वप्रकारचे बळ
पाकिस्तानातून ]िमळत होते. अमेरिकेकडून मिळालेल्या मदतीचा उपयोग पाकिस्तानने पंजाब
आणि काश्मीरमधल्या घातपाती कारवायांसाठी केला. मुंबईसह महत्त्वाच्या शहरातील
बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले यांची कटकारस्थानेही पाकिस्तानच्या भूमीतच शिजली
होती. आयएसआयच्या पुढाकाराने, त्यावेळच्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व घडत होते.
भारताबरोबरच्या युद्धात झालेले मानहानीकारक पराभव, काश्मीर ताब्यात घेण्यात आलेले अपयश, स्वतंत्र
बांगलादेशच्या निर्मितीमधला भारताचा सहभाग ही अशी काही कारणे त्यामागे होती.
भारतासारखे प्रगल्भ नेतृत्व पाकिस्तानला लाभले नाही. त्यामुळे तिथल्या लोकशाही
राजवटी अल्पकाळच्या ठरल्या. बहुतेक काळ सत्तासूत्रे लष्कराकडेच राहिली. आयएसआयचे
प्रमुख हे सुद्धा सत्तेचे समान्तर केंद्र राहिले. भारताविषयी त्यांच्या मनात प्रचंड
द्वेष होता. हमीद गुल हे त्याचे बोलके उदाहरण ठरावे. ते आयएसआयचे कदाचित
सर्वात वादग्रस्त प्रमुख ठरतील. भारताविरोधात दाऊद इब्राहिमला सामील करून घेण्यात
त्यांचा पुढाकार होता. ओसामा बिन लादेनशीही त्यांचे जवळचे संबंध होते. गुल यानी
आयएसआयला दहशतवादी कारवायांच्या दावणीलाच बांधले होते.आज काश्मीरमधील हिंसाचार
किंवा घातपाती कारवाया पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. त्या तुलनेत पंजाबमधील
परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे. जर्नेलसिंग भिंद्रनावालेचा खात्मा, सुवर्ण मंदिरातील
लष्करी कारवाई हा सर्व जुना इतिहास नव्या पिढीला आठवणार नाही. पंजाब प्रश्नी
इंदिरा गांधी यानी ज्या भूमिका घेतल्या, जे राजकारण केले त्याची किंमत बलिदानाने
मोजावी लागली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजीव गांधी यांच्या प्रयत्नाने पंजाब
शांत झाला. मात्र दुर्दैवाने श्रीलंकेतल्या तमिळ बंडखोरांविषयी घेतलेल्या
भूमिकेमुळे त्याच राजीव गांधींचा बळी घेतला. मुळात पंजाब हा अत्यंत समृद्ध प्रांत.
तशी ही शूर वीरांची भूमी. मात्र हिंसाचार आणि रक्तपाती घटनांचे दोन कटू अनुभव या प्रांताने
घेतले. त्यातला पहिला होता फाळणीचा आणि दुसरा होता खलिस्तानवादी अतिरेकी
कारवायांचा. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत पंजाबच्या जनतेचे योगदान मोठे होते.
स्वातंत्र्यानंतर फाळणीने पंजाबचे दोन तुकडे केले. त्यातून घडलेल्या हिंसाचारात
हजारो पंजाबी नागरिकांना प्राण गमवावे लागले. फाळणीनंतर विस्थापित झालेल्या पंजाबी
नागरिकांच्या जखमा अजूनही भळभळत आहेत. त्यातूनही पंजाब उभा राहिला. या राज्यातल्या
शेतकऱयाने विक्रमी गव्हाचे उत्पादन करून हरितक्रांती यशस्वी केली. त्याच भूमीत
खलिस्तानवाद्यांनी आव्हान निर्माण केले. संपूर्ण पंजाब अतिरेकी कारवायांनी धगधगत
राहिला. हा सर्व इतिहास विसरून चालणार नाही. देशात सध्या धार्मिक असहिष्णुतेचे
वातावरण वाढत आहे. जम्मू काश्मीरच्या सीमाभागात वारंवार चकमकी झडत आहेत. गेल्या
काही महिन्यात भारताचे अनेक जवान बळी गेले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध
तणावाचे आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाबला आयएसआय आपले
लक्ष्य बनवू शकतो. कारण खलिस्तानचे भूत बाटलीबंद असले तरी जिवंत आहे. ते कायमचे
कसे गाडले जाईल याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. पंजाब अशांत होणे
कोणत्याही अर्थाने भारताला परवडणार नाही.
No comments:
Post a Comment