Total Pageviews

Tuesday, 17 April 2018

आपल्याकडे टीव्हीच्या वाहिन्यांचे युग अवतरू लागलेले आहे. त्यामुळे यापुढे आपल्या समाजात व देशात कोणीही अब्रूदार शिल्लक उरणार नाही. कॅमर्‍यांची संख्या जसजशी वाढत जाईल, तशी भल्याभल्यांच्या अब्रूची लक्तरेच चव्हाट्यावर येत जातील



मागल्या शतकाच्या अखेरीस भारतात माध्यमांचा विस्तार सुरू झाला. अनेक प्रस्थापित माध्यम कंपन्या व समूहांच्या खेरीज विविध भांडवलशहांनी या क्षेत्रात अधिकचा पैसा गुंतवला. काही राजकीय नेते, उद्योगपतींनी मोठी गुंतवणूक केली आणि क्रमाक्रमाने पत्रकारिता व माहितीचे स्रोत अशा भांडवलदारांच्या हाती गेले. अशा गुंतवणूकदारांना पत्रकारिता वा बौद्धिक प्रबोधनात रस असायचे कारण नसते. त्यांची नजर कायम नफा व पैशांवर असते. त्यामुळेच माध्यमांना एकप्रकारे सनसनाटी व्यापत गेली. त्यादरम्यान म्हणजे, विसाव्या शतकाच्या अखेरीस वृत्तवाहिन्यांची संख्या वाढू लागली. त्यात एक इंग्रजी व एक हिंदी वृत्तवाहिनी इतकाच पसारा होता. त्यादरम्यान, एकमेव हिंदी वाहिनीवर चर्चेत भाग घेतलेल्या एका अनुभवी पत्रकाराने व्यक्त केलेली भीती आठवते. तो म्हणाला होता, आता आपल्याकडे टीव्हीच्या वाहिन्यांचे युग अवतरू लागलेले आहे. त्यामुळे यापुढे आपल्या समाजात व देशात कोणीही अब्रूदार शिल्लक उरणार नाही. कॅमर्‍यांची संख्या जसजशी वाढत जाईल, तशी भल्याभल्यांच्या अब्रूची लक्तरेच चव्हाट्यावर येत जातील. आज दोन दशके उलटल्यावर त्याचे भाकीत खरे ठरल्याचे आपल्या अनुभवास येत आहे. चोवीस तास वाहिन्या चालवायच्या तर तितक्या बातम्या आणायला हव्या आणि नसतील तर बातम्या घडवायला हव्यात. ही धंद्याची सक्ती झाली. त्यामुळे कुठली-कुठली माहिती उकरून काढणे वा कुठल्याही नगण्य व्यक्तीच्या विधानांवरून हलकल्लोळ माजवणे अपरिहार्य होत गेले. मग जितकी वाहिन्यांची गर्दी वाढली, तितकी टिकून राहायची स्पर्धाही वाढत गेली. खर्च आणि उत्पन्नाची सांगड घालताना तारांबळ उडणे स्वाभाविकच होते. हे आता माध्यमांचे स्वरूप झाले आहे आणि पर्यायाने वाचाळवीरांना महत्त्व येत गेले आहे. म्हणून मग शेतकरी आत्महत्या वा सुरक्षेचे प्रश्‍न अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी बाजूला पडल्या असून, जनहिताशी संबंधित नसलेल्या विषयांवर अखंड काहूर माजवले जात असते. सामान्य लोक त्यापासून किती दूर असतात, त्याची प्रचिती मग विविध निवडणुकांच्या निकालातून येत असते. माध्यमे पत्रकारिता हा जनमनाचा आरसा असला पाहिजे असे मानले जाते; पण हल्लीच्या काळात माध्यमे व जनमानस यातली दरी वाढत चाललेली दिसते आहे. तसे नसते, तर विविध पक्षांनी सोशल माध्यमे वा त्यात उचापती करू शकणार्‍या कंपन्यांची मदत मागितली नसती. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका नावाच्या कंपनीच्या उचापतीविषयी भयंकर काहूर माजले; पण त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्नही कोणी केला नाही. अशा कंपन्या सोशल माध्यमातील लोकांची माहिती काढून लोकमत बनवू शकत असतील, तर ते माध्यमांवर कुरघोडी करतात ना? त्यांना कोणी रोखायचे?
नुसते कायदे करून अशा प्रवृत्तीला पायबंद घातला जाऊ शकणार नाही. वास्तवात, या कंपन्या जाहिरातीसारखेच काम करत असतात. मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनाला ग्राहक मिळवून देण्याचे काम जाहिराती करतात आणि त्या आकर्षक जाहिरातींची निर्मिती वेगळ्या कंपन्या करीत असतात. त्यालाही हरकत नाही. अशा जाहिराती वर्तमानपत्रे वा वाहिन्यांवरच प्रदर्शित होत असतात. बातम्या वाचताना वा मनोरंजक कार्यक्रम बघत असताना जाहिराती बघितल्या जातात. त्यामुळेच त्याने सर्जनशील निर्मितीला बाधा आली, असे मानता येणार नाही. पण, केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका वा तत्सम कंपन्या जाहिरात म्हणून बातम्या व माहितीची मोडतोड करतात. 
त्यामुळे लोकांची दिशाभूल होते आणि दुसरीकडे पत्रकारितेलाही दुबळे केले जात असते. पत्रकारितेतून समाजात घडणार्‍या घडामोडींचा ऊहापोह होत असतो, विश्‍लेषण चालते. त्यातूनच लोक आपले मत बनवत असतात. त्यातून लोकांच्या ज्ञानात भर पडते आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळून समाजाचे अधिक प्रबोधन होत असते. समाज अधिक प्रगत होण्यासाठी ते आवश्यकही आहे. कारण, त्यातून लोकांना निवड करण्यास मदत होत असते. जाहिरात आणि बातमी यातला तो फरक असतो. अ‍ॅनॅलिटिकासारख्या कंपन्यांनी त्यालाच बाधा आणली आहे. या कंपन्या बातमी व जाहिरातीची गल्लत करून लोकांना थेट निवडच पुरवीत असतात. त्यातून लोकांची चिकित्सक वृत्ती मारली जाते आणि त्यांचा मेंदू प्रगल्भ होण्यापेक्षा यंत्रवत आज्ञापालन करू लागतो. हे आज राजकीय मतदानापुरते मर्यादित असले, तरी हळूहळू तेच जीवनाच्या अन्य क्षेत्रांतही होऊ शकते. माहितीची चोरी हा विषय म्हणूनच राजकीय वादावादीपुरता मर्यादित नाही, ती समाजमनाला दुबळे बनवणारी प्रक्रिया आहे; पण याही बाबतीत काहूर माजले, तरी त्यापासून एकूण समाजाला असलेल्या धोक्याची कुठलीही गंभीर चर्चा झाली नाही. मुद्दा नुसत्या माहितीच्या चोरीपुरता मर्यादित ठेवला गेला; पण त्यातून सामान्य जनतेच्या मनावर कब्जा मिळवण्याच्या कारस्थानाविषयी चर्चा होऊ शकली नाही. त्याला माध्यमातला सनसनाटीचा हव्यास हेच कारण आहे. त्यामुळेच अ‍ॅनॅलिटिकाच्या विषयावर आरोप, प्रत्यारोपांचे फड रंगवले गेले आणि गदारोळ खूप झाला; पण त्यापासून सामान्य जनता पूर्णपणे अलिप्त राहिली. कारण, वाद कसला चालला आहे व त्याचा आपल्याशी काय संबंध आहे, त्याचा खुलासाच होऊ शकला नाही. जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा समाजाचे अधिक नुकसान होते. प्रबोधनाची व जागृतीची साधनेच दुर्बल केली जातात. म्हणून अ‍ॅनॅलिटिका हा विषय माहितीच्या व्यक्तिगत गोपनीयतेपेक्षा समाज प्रबोधनाला घातक कसा आहे, त्याची चर्चा व्हायला हवी होती. अजूनही व्हायला हरकत नाही; पण त्यासाठी त्यातले गांभीर्य ओळखले गेले पाहिजे. दुर्दैवाने ते होऊ शकलेले नाही


No comments:

Post a Comment