सर, तुमच्यासाठी जोशी हॉस्पिटलमधून फोन आहे.’ आमच्या स्वागतकाने सांगितलं. हा फोन जोडला गेला आणि पलीकडुन आवाज आला ’नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी बोलतेय.’ मला क्षणभर समजेच ना. या मृणाल कुलकर्णी म्हणजे ’स्वामी’मधल्या रमाबाई किंवा ’राजा शिवछत्रपती’मधल्या जिजाऊ किंवा ’अवंतिका’ वा ’सोनपरी’ तर नव्हेत ? नाही – नाही, या दुसऱ्याच कुणीतरी असणार, नावे एकसारखी असतातच की. त्या मृणाल कुलकर्णींचा इथे फोन यायचं काय कारण ? असे कितीतरी विचार त्या एका क्षणात माझ्या मेंदुने केले. पण अर्थात पुढच्या काही क्षणांतच हा गोंधळ संपला आणि वरील भूमिका ज्यांनी अमर केल्या अशा सुविख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याशीच आपण बोलतो आहोत हे माझ्या लक्षात आलं. त्या पुढे म्हणाल्या, ’माझे बाबा विजय देव यांना सध्या इथे जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्यांचे केमोथेरपीचे सायकल्स चालु आहेत. त्यासाठी तुमच्याच रक्तपेढीमधून रक्तघटक येत आहेत. जनकल्याण रक्तपेढीचं नाव ऐकल्यावर बाबांनी तुमची आठवण केली. तुम्ही एकदा त्यांना भेटायला आलात तर त्यांना बरं वाटेल.’ देव सर अस्वस्थ आहेत हे समजून वाईट वाटलं हे तर खरंच पण देव सरांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकाने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची आठवण ठेवावी आणि भेटीची इच्छा व्यक्त करावी ही बाब मात्र माझ्याकरिता अतीव समाधान देणारी होती. त्यात त्यांची ही इच्छा माझ्यापर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांच्याच कर्तृत्ववान आणि सदैव प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कन्येनं किती सहजपणे केलं होतं. मला फारच संकोचल्यासारखं झालं. अर्थात ’नाही’ म्हणायचं कारणच नव्हतं, किंबहुना देव सरांचा सहवास पुन्हा मिळाला तर तो हवाच होता.
तशी देव सरांशी माझी ओळख फार जुनी नव्हे. मागे ’गीतरामायण-हिरक महोत्सवानिमित्त भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर स्वत: श्रीधर फडक्यांनी सादर केलेला गीतरामायणाचा भव्य कार्यक्रम झाला. त्यावेळी गीतरामायणावरील एका स्मरणिकेचं प्रकाशनही झालं. या संपूर्ण कार्यक्रमात मी माझी आवड म्हणून स्वयंसेवक या नात्याने सहभागी झालो होतो. स्मरणिकेतील लेखांसाठी यावेळी काही मान्यवरांना घरी जाऊन भेटण्याचा योग आला. त्यात सौ. वीणाताई देव याही होत्या. याच वेळी वीणाताई आणि देव सर यांच्याशी चांगला परिचय झाला. स्वाभाविकच रक्तपेढीबाबतही यावेळी चर्चा झालीच होती. नवनवीन विषयांबद्दल सरांना आणि वीणाताईंना असणारे औत्सुक्य यावेळी चांगले अनुभवता आले होते. मागे वीणाताईंच्या मातोश्रींना रक्ताची गरज असताना जनकल्याण रक्तपेढीमधूनच ही गरज पूर्ण झाल्याची आठवणही सरांनी मला आवर्जून सांगितली होती. शिवाय वीणाताईंचे पिताश्री ज्येष्ठ साहित्यिक स्व. गो. नी. दांडेकर स्वत: संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आणि रक्तपेढीचाही वारसा संघाचाच, यामुळे एकाच गावातले असूनही फार दिवसांनी भेटल्यानंतर दोन व्यक्तींत जी सलगी निर्माण होते ती या भेटीतून साधली गेली, असे मला वाटले. यानंतरही स्व. ’गोनीदां’च्या ’ही तो श्रींची इच्छा’ या कादंबरीचे अभिवाचन अंतर्भूत असलेल्या एका कार्यक्रमास देव सरांनी स्वत: फोन करुन मला अगत्याने बोलावले होते. एक तर सोबत माहिती आणि अनुभवांचा प्रचंड मोठा खजिना आणि तो लोकांसमोर मांडण्याचं विलक्षण कसब या सर्वच ’देव’माणसांकडे आहे, हे मी पूर्वीदेखील अनुभवलं होतं आणि आता तर मला या श्रेष्ठ व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची संधीही सहजपणे मिळाली होती.
त्या सायंकाळी ठरल्या वेळी अन्य कामे आटोपून मी जोशी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. देव सरांच्या कक्षामध्ये यावेळी सरांसोबत स्वत: मृणालताई आणि रुचिरजी हे दोघेच होते. सुमारे अर्धा तास दिलखुलास गप्पा झाल्या. स्वत: देव सर रुग्णशय्येवर असले तरी व्याधिग्रस्त मुळीच वाटले नाहीत, उलट या ठिकाणीदेखील एखाद्या लेखनिकाला बोलवून काही नवीन लिखाण करण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल ते यावेळी बोलत होते. यावर मृणाल त्यांना प्रेमाने रागे भरत होत्या. पिता-पुत्रीचं विलक्षण नातं मला पहायला मिळत होतं. या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढी आणि रक्तप्रक्रियेशी संबंधित येथील तांत्रिक अद्ययावतता या विषयावरही आमच्या भरपूर गप्पा झाल्या. मृणाल स्वत: ’दातार जेनिटिक्स’ या संस्थेशी संबंधित आहेत. कॅन्सर आणि अनुवांशिकता यांचा अभ्यास आणि संशोधन करणारी ही संस्था आहे. कॅन्सरसंबंधी प्रबोधनाच्या अनेक कार्यक्रमांतूनही त्यांचा सक्रीय सहभाग असतो, ही नवीन माहिती मला यावेळी समजली. आपल्या रक्तपेढीमध्ये जागतिक दर्जाचे ’नॅट’, ’इरॅडिएशन’सारखे तंत्रज्ञान उपलब्ध आहे हे मी अर्थातच आवर्जून त्यांना सांगितले आणि ’देव सरांना सध्या दिले जात असलेले रक्तघटक हे जगातील सर्वांत सुरक्षित रक्तघटक आहेत’ हे देखील मी त्यांना सांगितले. असे गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित रक्तघटक पुण्याबरोबरच आजुबाजुच्या ग्रामीण भागातही पोहोचविले जात असून गरीब व गरजूंसाठी ते अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत, हे ऐकून तर या सर्वांना विशेष आनंद वाटला आणि तसा त्यांनी तो व्यक्तही केला. शेवटी मी मृणालताईंना म्हणालो, ’आपण एकदा वेळ काढून रक्तपेढी पहायला आल्यास आम्हाला सर्वांना आनंद वाटेल. रक्तपेढीची अद्ययावत प्रयोगशाळा पाहून आपल्यालाही छान वाटेल.’ यावर रक्तपेढीत येण्याचे अत्यंत उत्साहाने त्यांनी कबुल केले. ’आज साक्षात ’जिजाऊ मॉंसाहेब’ किंवा ’रमाबाई पेशवे’ यांचे दर्शन झाल्यासारखे वाटले’ अशी मनात असलेली प्रतिक्रिया त्यांना दिल्यावाचून मला राहवलं नाही. एका चांगल्या वातावरणात आमची ही भेट संपली.
मध्ये काही दिवस गेले आणि एक दिवस पुन्हा एकदा मृणालताईंचा फोन मला आला. ’आपल्याला रक्तपेढीत जायचं आहे’ हे त्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवलं होतं. त्याकरिताच त्यांनी फोन केला होता. रक्तपेढी भेटीचा दिवस, वेळ सर्व काही ठरलं आणि ठरल्या वेळी खरोखरीच मृणाल कुलकर्णी रक्तपेढीत आल्या. यावेळी त्यांच्यासोबत दातार जेनिटिक्सच्या डॉ. दर्शना पाटील याही होत्या. रक्तपेढी पाहण्याबरोबरच काही तांत्रिक विषयावर चर्चा हाही या भेटीचा अजेंडा होताच. ’सुविख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी रक्तपेढीत आल्या’ हे सर्व कर्मचारी आणि उपस्थित रक्तदात्यांना जाणवेल आणि दीर्घकाळ लक्षात राहील इतपत भरपूर वेळ त्यांनी यावेळी दिला. सर्वांशी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांच्या अभिनयासंबंधी विचारल्या गेलेल्या प्रश्नांनाही त्यांनी व्यवस्थित उत्तरे दिली. मागे एकदा रक्तपेढीचा वार्षिक वृत्तांत ’समर्पण’ चा अंक मी देव सरांना दिला होता, त्या वेळी ते मला सहजपणे ’आमच्या मृणालला तुम्ही अतिथी संपादक म्हणून या अंकासाठी बोलावु शकता, तीही छान लिहिते,’ असे म्हणाले होते. हा धागा पकडत आम्ही त्यांना याच भेटीत तशी विनंती केली. सोबत त्यांच्याच बाबांचा ’वशिला’ ही लावला. इतका मजबूत वशिला असताना त्यांनी नाही म्हणायचे कारणच नव्हते. जनकल्याण रक्तपेढीची प्रयोगशाळा आणि कामाची पद्धत पाहून मनस्वी समाधान मृणाल आणि डॉ. दर्शना यांनी जाताना व्यक्त केले. जनकल्याण रक्तपेढीच्या कामाबद्दल वीणाताई, देव सर अथवा मृणाल कुलकर्णींसारख्या कर्तृत्ववान व्यक्ती जेव्हा मनापासून समाधान व्यक्त करतात तेव्हा आमच्या दृष्टीने ते अमूल्य असते. आपण जे करत आहोत, ते योग्य आहे हा विश्वास यातून वाढीस लागतो.
यथावकाश आमचा वार्षिक वृत्तांत ’समर्पण’ प्रकाशित झाला. आमच्या विनंतीवरुन मृणाल यांनी अतिथी संपादक या नात्याने एक सुंदरसा लेख या अंकासाठी अगदी वेळेत लिहुन दिला. हा अंक देण्यासाठी आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हाही आवर्जून ’जनकल्याणशी संबंधित कुठलेही काम मला नि: संकोचपणे सांगत रहा, मी आपल्यासोबत आहेच’ असे त्यांनी बोलुन दाखविले.
सदैव ग्लॅमरमध्ये असणाऱ्या कलाकार मंडळींबाबत सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात एक दडपण असते आणि बहुतांश कलाकार मंडळी आपल्या वागण्या-बोलण्यातून हे दडपण सार्थही ठरवत असतात. पण इथे ’देव’ कुटुंबीयांच्या बाबतीत मात्र माझा अनुभव निराळा होता. कलेची साधना करत असताना ’आपण या समाजाचा भाग आहोत आणि त्याप्रति आपले काही दायित्व आहे’ असा अन्यत्र दुर्मीळ असलेला भाव इथे मला सहजपणे दिसत होता. ’कला ही केवळ घटकाभराच्या मनोरंजनासाठी नाही, तर अनेक विषयात जनजागृती करुन समाजाला विचारप्रवृत्त करण्यासाठी आहे’ हे ’समर्पण’ मध्ये लिहिणाऱ्या मृणालताई स्वत:च या विचाराचा ’आचार’देखील आहेत. कॅन्सरबाबत जनजागृतीच्या कार्यक्रमांतील त्यांचा मनस्वी आणि सक्रीय सहभाग हेच दर्शवितो. ही सक्रीयता आणि घरातील संस्कारांचे भरभक्कम अधिष्ठान पाठीशी असल्याने त्या सर्वच क्षेत्रांत प्रभावीही आहेत आणि आदरणीयही आहेत.
नावात अंतर्भूत असलेले ’देवत्व’ या कुटुंबीयांच्या कृतीतही उतरले आहे. अशी ’देवमाणसं’ म्हणजे रक्तपेढीसारख्या प्रकल्पाची संपत्तीच जणु !
No comments:
Post a Comment