इंटरनेटवर आधारित जी माध्यमे
आहेत, त्यांसाठी
‘सोशल मीडिया’ किंवा ‘समाज माध्यमे’ हा शब्द वापरला जातो. फेसबुक, ट्विटर, युट्युब अशा अनेक माध्यमांचा सोशल मीडियात
समावेश होतो. या माध्यमांत खरचं किती सामाजिकता आहे, की हे
आभासी जग आहे, हा एक गहन प्रश्न आहे. समाज माध्यमांची ताकद लोकांना दरवेळी सत्ता हस्तगत करायची असते किंवा सत्तेच्या समीप
राहायचे असते. यासाठी समाज जसजसा विकसित होत गेला, तसं तशी साधने विकसित होत गेली असे म्हटल्यास वावगे
ठरू नये. माणूस जेव्हा शेती करत होता, तेव्हा कृषिप्रधान
समाजाची निर्मिती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर समाज उद्योगप्रधान झाला. आता
२१व्या शतकातील आजचा समाज माहितीप्रधान समाज म्हणता येईल. कारण, माहितीला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व. ही माहिती आपल्याजवळ असणे
किंवा या माहितीचे जलद गतीने हस्तांतरण करणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
यातली बरीचशी माहिती ही सकारात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते. कारण, मुख्य प्रवाहातील मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कुणाचे तरी वर्चस्व
अथवा मालकी आहे. त्यामुळे या माहितीवर हे वर्चस्व सतत डोकावत असते. समाज
माध्यमांचे मूलभूत वैशिष्ट्य असे की, सामान्य माणसांकडे याची मालकी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एक वेगळे आभासी
जग प्रत्येक जण तयार करत असतो. अतिशय वेगाने बातम्यांचे आदान-प्रदान या समाज
माध्यमांतून होत असते. समाजात जे वेगवेगळे घटक आहेत - व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य-देश
यांना सशक्त करण्याचे प्रयत्न या समाज माध्यमांतून होत आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकीय या सगळ्याच दृष्टिकोनातून
राष्ट्राला किंवा व्यक्तीला समृद्ध करण्याचे कार्य समाज माध्यमे करत आहे. या
सगळ्यात जाती, धर्म, लिंग, भाषा यांचा अडसर होत नाही आहे, ही समाज माध्यमांची
मोठी ताकद आहे. पाश्चात्य राष्ट्रांत फेसबुक, ट्विटर,
युट्युब या सगळ्या माध्यमांचा वापर राजकीय व्यक्ती आणि संस्थांकडून
राजकारणात आणि निवडणुकीत पूर्वीपासून केला जातो. भारतात त्याचा वापर तितका होत
नव्हता. शशी थरूर हे काँग्रेस खासदार फार आधीपासून
ट्विटरवर सक्रिय होते. त्यांच्या फॉलोअर्सचे प्रमाणसुद्धा लक्षणीय होते. पण,
या माध्यमाचे महत्त्व त्यांच्याच पक्षाला माहीत नव्हते. २०१४च्या
लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांनी समाज
माध्यमांचा, तसेच त्या वेळच्या काँग्रेसविरोधी
वातावरणाचा प्रचारासाठी पूर्ण उपयोग करून घेतला. तसेच युवा वर्गात निवडणुकीबद्दल
जागरुकता निर्माण होण्यात समाज माध्यमांचा मोठा वाटा आहे. त्या आधी २०११ साली
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात
पाठिंबा मिळाला होता, तर २०१३ साली निर्भया प्रकरणात लोकांनी
रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला. या गोष्टीसाठी समाज माध्यमे बर्याच अंशी कारणीभूत ठरली. सध्या मोठे सेलिब्रिटीदेखील समाज माध्यमांवर
सक्रिय राहून, त्यावर
पोस्ट टाकणे, लोकांशी संपर्कात राहून, त्यांना
प्रतिसाद देणे याचे प्रमाण वाढले आहे.
अती तिथे माती :
मात्र
अती तिथे माती जेव्हा आपण म्हणतो, तशी परिस्थिती सध्या आपल्या समाज
माध्यमांबद्दल दिसत असून, या माध्यमांच्या उणिवा समोर येत
आहेत. या समाज माध्यमांवर खूप सारी माहिती येत असते. माहितीच्या स्पर्धेत खोट्या
माहितीचे प्रमाणही जास्त आहे. विशिष्ट विधान विशिष्ट नेत्याच्या नावाने फोटोसह
पाठवले जाते. बर्याच वेळेला एकच विधान अनेक नेत्यांच्या नावे खपवले जाते.
त्यामुळे माहितीच्या सत्यतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या
माध्यमांवर सातत्याने आशयनिर्मिती होत असते. बर्याच वेळेला या आशयाचा निर्माता
कोण आहे, हे सांगणे अवघड होऊन जाते. या माध्यमांत खाजगीपणाचा
अभाव असतो किंवा खाजगीपणा भंग पावतो. नुकत्याच झालेल्या केंब्रिज ऍनेलेटिका
प्रकरणामुळे ही गोष्ट समोर आलेली आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून माहितीत छेडछाड
करून भ्रम आणि
खोटी माहिती पसरवली जाते. दोन समाजात तेढसुद्धा निर्माण व्हायला समाज माध्यमांतील
आशय कारणीभूत ठरतात.
अनियंत्रित आणि निरंकुश
माध्यमे :
आपल्या राज्यघटनेत १९ (१) (अ) नुसार प्रत्येक नागरिकाला
अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्यासह काही मर्यादाही राज्यघटनेत
नमूद केल्या आहेत. पण, त्याची नेमकी अंमलबजावणी समाज माध्यमांवर होताना दिसत नाही. तसेच ती
प्रक्रिया प्रचंड अवघड आहे. या माध्यमांना ‘माध्यमे’ म्हणायचे तर सत्य, अचूकतेसारख्या तत्त्वांचा काही
प्रमाणात अभाव आहे. माहितीचा वापर एक शक्ती म्हणून होताना दिसत आहे. त्यामुळे
एकांगी, सनसनाटीपणा, बटबटीतपणा असलेला
आशय समाज माध्यमांवर पसरवला जात आहे. समाज माध्यमांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर जे जाळे पसरले आहे, त्याचा दुरूपयोग समाज
विघातक प्रवृत्तींकडून होत आहे. पण, ज्या प्रमाणात जनजागृती
होत आहे त्याचा फायदा होताना दिसत आहे. तसेच या समाज माध्यमांचा वापर नियंत्रित
आणि सकारात्मक पद्धतीने होईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.
समाज माध्यमांचा विघातक वापर जगात आणि भारतात कशा पद्धतीने केला जातो याचा आढावा
पुढील लेखात घेऊ.
No comments:
Post a Comment