एमटीबी 01-Apr-2018
|
दलाई लामांना भारतात
आश्रय दिल्यापासून चीन भारताकडे संशयाच्या नजरेने पाहतो. एवढेच नव्हे तर १९५९
साली चिनी अध्यक्ष माओ-त्से यांनी तर तिबेटमधील विद्रोहाला भारताचीच फूस असल्याचा
आरोप केला होता. दलाई लामांचे भारतातील वास्तव्य चीनला हृदयातील एखाद्या
काट्याप्रमाणे खुपते. परिणामी भारताला डिवचण्यासाठी चीन नेहमीच संधी शोधतो.
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या तिबेटमध्ये
परतण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला, संघर्षाला आपला पाठिंबा असल्याचे केंद्रीय
सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी नुकतेच सांगितले. तिबेटला
चीनच्या पोलादी पकडीतून मुक्त करण्यासाठी दलाई लामा गेल्या ६० वर्षांपासून कार्यरत
असून त्यांना प्रत्येक वेळी भारतानेच साथ दिली. अगदी १९५९ साली चीनने तिबेटवर
हल्ला केल्यापासून काल-परवा त्यांच्या अरुणाचल दौर्याला चीनने विरोध करेपर्यंत
भारत दलाई लामांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. गेल्या
६० वर्षांपासून तिबेटच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत दलाई लामा भारतात आश्रयाला
आहेत. तिबेटचा मुद्दा हा भारत, चीन
आणि दलाई लामा या तीन मुद्द्यांच्या भोवती फिरणारा असून त्याला आंतरराष्ट्रीय
राजकारणाचेही पदर आहेतच. तिबेट प्रश्न समजून घेण्यासाठी
आधी त्याच्या इतिहासाचीही माहिती असणे आवश्यक आहे.
१९४९ साली चीनने तिबेटवर प्रथम आक्रमण केले, त्यानंतर
१९५९ साली चीनने तिबेट गिळंकृत केला. चीनच्या पहिल्या
आक्रमणावेळी भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू होते आणि त्यावेळी नेहरूंनी चीनच्या
राक्षसी महत्त्वाकांक्षेला जशास तसे उत्तर देत विरोध केला असता तर तिबेटचा प्रश्नच
निर्माण झाला नसता. नेहरूंच्या नेतृत्वात चिनी
आक्रमणाविरोधात भारत ठामपणे उभा ठाकला असता तर संपूर्ण जगानेही भारताला पाठिंबा
दिला असता. कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध संपून केवळ
चार वर्षे झाली होती. जगभरातील लोक युद्धाच्या
विनाशलीलेने आधीच भीतीच्या वातावरणात जगत होते, त्यावेळी
चीनसारख्या देशाने तिसर्या विश्वयुद्धाची पृष्ठभूमी तयार करणे, ही गोष्ट कोणालाही आवडण्यासारखी नव्हती. तेव्हा जगभरातील देश
साम्राज्यवादाला ‘पाप’ समजत होते
आणि त्यामुळेच या दिशेने पुढे सरकणार्या चीनला रोखण्यासाठी तेव्हा सगळे जग एक होऊ
शकले असते. शिवाय त्यावेळी आताच्या चीनला युनोची
मान्यता नव्हती तर तैवानला चीन म्हणून मान्यता होती, पण
नेहरूंची अशी समजूत होती की, आपण चीनशी जेवढे
सौहार्दाचे संबंध ठेऊ तेवढे तो देश आपल्याशीही सौहार्दाचे संबंध ठेवेल. चीनवर भाबडेपणाने विश्वास ठेवल्यामुळे चीनने तिबेटला आपल्या कह्यात घेतले
व नेहरूंच्या या समजुतीला तडा दिला. तिबेटला आपले
स्वातंत्र्य गमावत चीनच्या मगरमिठीत जावे लागले. तेव्हापासून
ते आजपर्यंत तिबेटी जनतेला चिनी वरवंट्याखाली जीवन कंठावे लागत आहे.
भारत आणि तिबेटमधील
नातेसंबंधांना शेकडो वर्षांचा इतिहास असून त्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक, भावनिक आयामआहेत. भारताने जगाला दिलेली देणगी
म्हणून बौद्ध धम्माकडे पाहिले जाते. गौतम बुद्धांच्या काळापासून हजारो बौद्ध भिक्खू निरनिराळ्या देशात
धम्मप्रसारासाठी गेले. त्यानंतर
सातव्या-आठव्या शतकात धर्मांध इस्लामी अतिरेक्यांचे आक्रमण होईपर्यंत भारतीय
उपखंडातील बर्याचशा देशांत बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. तिबेटमध्येही सातव्या शतकात बौद्ध धम्माचा प्रवेश झाला पण पुढील काळात
इस्लामी आक्रमकांनी भारतातील बौद्ध मठ-मंदिर-विहारांवर हल्ले
केले, बौद्धमूर्तींची, विहारांची
तोडफोड-विटंबना केली. त्यामुळे
भारतातील बौद्ध धर्मगुरूंनी आपले ग्रंथ घेऊन तिबेटला पलायन केले. नंतर पंडित राहुल सांकृत्यायन यांनी ते धर्मग्रंथ भारताला परत मिळवून दिले.
त्यांनी तिबेटमधील कुन-ब्दे-ग्लिंग, प्यो-खांग,
शा-लु यासारख्या ठिकाणी असलेल्या बौद्ध मठांतून अनेक संस्कृत
ग्रंथांची छायाचित्रे किंवा नकला आणल्या. पाटणा येथील
बिहार रिसर्च सोसायटी व जयस्वाल संशोधन संस्थेच्या ग्रंथालयांत हे साहित्य आजही
जतन करून ठेवलेले दिसते. भारताचे तिबेटशी असलेले ऋणानुबंध
याच बौद्ध धम्माच्या पायावर आधारलेले आहेत. दलाई लामांच्या मते तर भारत आणि
तिबेटचे नाते गुरू आणि शिष्याचे आहे. म्हणजे बौद्ध
धम्माची दीक्षा देणारा भारत गुरू आणि ती दीक्षा ग्रहण करणारा तिबेट शिष्य. याचाच अर्थ असाही होतो की, आपल्या शिष्याला
चिनी ड्रॅगनने जखडून ठेवलेले असताना त्याच्या मुक्ततेसाठी गुरू असलेल्या भारताने
सर्वतोपरी साह्य करावे.महेश शर्मा यांनीही भारत आणि तिबेट
यांच्यामधील संबंध कधीही न तुटणारे असून फूल आणि सुगंधाचे जसे नाते असते, तसे असल्याचे सांगितले.
दलाई लामांच्या भारतातील
वास्तव्याला ६० वर्षे झाल्याप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘थँक यू इंडिया’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला तो
म्हणजे, दलाई लामा, बौद्ध
धर्मगुरू आणि तिबेटी नागरिक हे भारतासाठी निर्वासित नसून आदरणीय पाहुणे असल्याचे
ते म्हणाले. हे असे का, कारण पाहुणा
त्यालाच म्हणतात, ज्याच्याशी आपले बंधुतेचे, एकतेचे, आत्मीयतेचे नाते असते. तसे नाते भारताचे
तिबेटशी, तिथल्या नागरिकांशी शेकडो वर्षांपासून आहे.
भारताच्या तिबेटशी असलेल्या संबंधांतील एक
महत्त्वाचा घटक म्हणजे चीन. दलाई
लामांना भारतात आश्रय दिल्यापासून चीन भारताकडे संशयाच्या नजरेने पाहतो. एवढेच नव्हे तर १९५९ साली चिनी अध्यक्ष माओ-त्से
यांनी तर तिबेटमधील विद्रोहाला भारताचीच फूस असल्याचा आरोप केला होता. दलाई लामांचे भारतातील वास्तव्य चीनला हृदयातील एखाद्या काट्याप्रमाणे
खुपते. परिणामी भारताला डिवचण्यासाठी चीन नेहमीच संधी
शोधतो. भारतद्वेषावर पोसलेल्या पाकिस्तानला चीनचा असलेला
पाठिंबा, पाकच्या चिथावणीखोर वागणुकीमागे असलेले चीनचे
समर्थन हे त्याचमुळे होते. भारताचे अविभाज्य अंग असलेले
अरुणाचल प्रदेश भारतीय संघराज्याचा भाग असल्याचे अमान्य करणे, अरुणाचलला तिबेटचाच एक भाग असल्याचे म्हणणे, मसूद
अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीत खोडा घालणे, भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला विरोध करणे या सगळ्या गोष्टींमागे दलाई लामा
हा एक मुद्दा असतोच असतो.संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन
यांच्या अरुणाचल दौर्यालाही चीनने विरोध केला होता. हे
सर्व कशामुळे होते? चीनची जमिनीची भूक ही काही कोणापासून
लपून राहिलेली नाही. जे जे शक्य असेल त्या त्या जमिनीचा, बेटांचा वा सागरी भागाचा घास घेण्याची चीनची नीती असते. तिबेटवर कब्जा करण्यापासून ते आता आता दक्षिण चिनी सागरावरील मालकी हक्क
सांगण्यापर्यंत चीनचे हे उद्योग सुरूच आहेत.जमिनीची भूक आणि सामरिकदृष्ट्या
बलवान होणे ही कारणे त्यामागे आहेत. तिबेटला ‘जगाचे छप्पर’ असेही म्हणतात. सामरिकदृष्ट्या हा भाग महत्त्वाचा असून तिथून जगभरावर नियंत्रण प्रस्थापित
करता येईल, एवढी त्या भूभागाची क्षमता आहे. शिवाय तिबेट हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा प्रदेश आहे. चीनमधील कित्येक विकास प्रकल्प इथली साधनसंपत्ती ओरबाडूनच उभारण्यात आले.
तिबेटसह चीनच्या विकास आणि प्रगतीचा विचार करता
तिबेट मागासलेले असल्याचेच दिसते. इथल्या लोकांचा चीनने कधी आपलेपणाने विचारच केला नाही. त्यांच्याकडून काबाडकष्ट करून घ्यायचे, तिथल्या
साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून अन्य भागातील चिनी नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा
पुरवायच्या, हे चीनचे धोरण. त्यामुळे
मध्यंतरी चीनमधील विकासाच्या असमतोलपणाचीही चर्चा झाली होती. चीनच्या स्वतःपुरते पाहण्याच्या आणि तिबेटला सापत्नपणाची वागणूक
देण्याच्या वृत्तीमुळे तिबेटमधील नागरिक दलाई लामांनाच आजही आपला नेता मानतात तर
भारत तिबेटी स्वातंत्र्याचा सूर्योदय होण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो,
म्हणून तिबेटी नागरिक भारताकडे आशेने पाहतात. अशावेळी तिबेटच्या स्वातंत्र्याला भारताने पाठिंबा द्यायचा वा नाही, हा जरी केंद्र सरकारचा विषय असला तरी तिबेटच्या नागरिकांची, तिथल्या विकासाची काळजी वाहण्यात भारताने नक्कीच महत्त्वाची भूमिका
निभावली पाहिजे, असे वाटते
No comments:
Post a Comment