Total Pageviews

Thursday, 26 April 2018

तंत्रज्ञान यशस्वी करण्यासाठी त्याला मानवी शक्तीची जोड द्यावी लागते.

नरेंद्र मोदी व अमित शहा ही जोडी बेसावध राहणारी नाही. देशातील वारे सत्ताधारी पक्षाला अनुकूल नाहीत याची जाणीव त्यांना झाली आहे. मोदींनी रविवारी खासदार व आमदारांशी साधलेल्या संवादाकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे. या संवादातून मोदींचे धोरण व त्यांच्यापुढील अडचणी याची कल्पना येऊ शकते. मोदींनी खासदार-आमदारांशी संपर्क साधला तो अॅपच्या साहाय्याने. प्रचाराची ही नवी पद्धत अनेक राजकीय पक्ष सध्या वापरत आहेत.
वृत्तपत्रे व अन्य माध्यमांतून एकमार्गी प्रचार करता येत नाही. जाहिराती महाग असतात आणि जाहिरातबाजी करून केलेल्या प्रचाराचा प्रभावही पडत नाही. यापेक्षा अॅपच्या माध्यमातून आपल्या मतदाराशी थेट संपर्क साधता येतो. निष्ठावान मतदारांच्या निष्ठा बळकट करता येतात. अमेरिकेतील माध्यमांकडून बेसुमार टीका होत असल्याने ट्रम्प अॅपच्या माध्यमातून मतदारांशी बोलतात. जबर टीका होत असूनही ट्रम्प यांचे मतदार अजून विचलीत झालेले नाहीत. कारण ते त्यांच्याशी अॅपवरून सतत संपर्कात असतात. मोदी हाच प्रयत्न करणार आहेत. मोदी अॅपमधून एक कोटी मतदारांशी रोज मोदी संपर्क साधत असतात. माध्यमांत मौन बाळगणारे मोदी अॅपमधून सतत बोलतात व त्यांना हवे तितकेच बोलतात. अॅपवर प्रश्न विचारता येत असले तरी सोयीस्कर प्रश्नांनाच उत्तरे मिळतात.
प्रचलीत माध्यमांना बाजूला ठेवून मतदारांशी एकतर्फी थेट संपर्क साधण्याची ही युक्ती आहे. काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्यासाठी अॅप तयार केले होते. मात्र, केंब्रिज अॅनालॅटिकावरून वाद उठल्यावर ते मागे घेण्यात आले. मोदी अॅपवरून व्यक्तिगत डेटा उचलला जातो, असा आरोप केला गेला आहे. परंतु, प्रत्येक मोबाइलवरून अनेक अॅप डाऊनलोड होत असतात व त्या वेळी काही माहिती गोळा होतच असते. ती प्रत्येक माहिती संवेदनशील असते असे नव्हे.
अॅपच्या माध्यमातून मोदींनी खासदार-आमदारांशी संपर्क साधला व काम करण्याचे आवाहन केले. सरकारी योजनांबद्दल माहिती देत असतानाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत अॅप व ट्विटरच्या माध्यमातून पोहोचण्याचे उद्दिष्ट त्यांना भाजपच्या खासदार-आमदारांना दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक लाख नमो अॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट आहे, तसेच प्रत्येक खासदारांना तीन लाख, तर आमदारांना दोन लाख ट्विटर फॉलोअर्स जोडण्याचे उद्दिष्ट दिले गेले आहे. उद्या उमेदवारी देतानाही कदाचित हा निकषही लावण्यात येईल. निश्चित लक्ष्य समोर ठेवून ते पूर्ण करण्याची जिद्द ही संघ परिवाराची खासियत असते. अन्य पक्षांप्रमाणे ते बोलघेवडे नाहीत. जागोजाग भाषणे ठोकण्यापेक्षा व्यक्तिगत संपर्कातून मतदार जोडण्याला ते प्राधान्य देतात.
यामुळेच गेली कित्येक दशके संघ परिवाराविरोधात व्यासपीठांवरून आग ओकूनही परिवाराला सत्तेपासून दूर ठेवता आले नाही हे काँग्रेससह अन्य पक्ष तसेच त्यांच्या वतीने व्यासपीठ गाजवणारे विसरतात. अॅपच्या माध्यमातून कित्येक कोटी मतदारांना रोज भाजपबद्दल व भाजपच्या विरोधकांबद्दल माहिती देण्याची योजना मोदी-शहा यांची आहे व याचा काँग्रेससह अन्य पक्षांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. अर्थात केवळ अॅपवरून माणसे जोडता येतात, असे नव्हे.
केवळ अॅप कसे कुचकामी ठरू शकते याची प्रचिती मोदींच्या रविवारच्या संपर्क मोहिमेतच आली. या ई-सभेमध्ये खासदारांनी विचारलेले प्रश्न पाहता, खासदार-आमदारांनाच सरकारी योजनांची नीट माहिती नाही हे कळून आले. त्याचबरोबर मोदींनाही सरकारच्या कामाबद्दल ठोस काही सांगता आले नाही. मोदी केअर म्हणजे काय, कौशल्य विकास म्हणजे काय, ग्रामशक्ती कशी वाढवावी असे प्रश्न खासदारांनी विचारले. यातून मोदींच्या नेतृत्वातील एक मोठी त्रुटी समोर आली. मोदींना देशात बदल घडवून आणायचे होते, पण त्यासाठी कार्यकर्त्यांच्या अफाट कार्यशक्तीची गरज होती. सरकारी योजना वा सरकारी धोरण जनतेपर्यंत पोहोचवणारी कार्यकर्त्यांची फौज मोदींना उभी करता आलेली नाही.
महाराष्ट्रात कर्जमाफीमधील भ्रष्टाचार निपटून काढून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे भरण्याचे उत्तम उद्दिष्ट देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले. मात्र, ते पूर्ण करण्यासाठी बँकेच्या पातळीवर शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याची गरज होती. या कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांना मदत झाली असती व प्रशासनावरही वचक राहिला असता. पण गोवंशासाठी गर्दी करणारे संघ परिवाराचे कार्यकर्ते अशा कामासाठी पुढे आले नसल्याने चांगले काम करूनही शेतकरी भाजपबरोबर आलेला नाही. हाच प्रकार राष्ट्रीय पातळीवरही होत आहे. तंत्रज्ञान यशस्वी करण्यासाठी त्याला मानवी शक्तीची जोड द्यावी लागते. परिवाराकडे कार्यकर्ते आहेत, पण ते सरकारसाठी नाहीत, ही नमो अॅपची अडचण आहे. अॅपमधून जनचळवळ उभी राहिलेली नाही व ती उभी राहिली नाही तर निवडणुकीत फक्त तंत्रज्ञान उपयोगी पडणार नाही. मोदी अॅपच्या या मर्यादा आहेत

No comments:

Post a Comment