महेश उपदेव>>
लष्करातून निवृत्त झालेले अनेक अधिकारी सैन्यदले, देशाचे संरक्षण, परराष्ट्र संबंध, लष्करी सुधारणा, बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा आदी विषयांवर लेखन करण्याचा, तज्ञ म्हणून समाजप्रबोधन करणाऱ्याचा मार्ग निवडतात. मात्र काही अधिकारी सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना घडविण्याचा, त्यांनी सैन्यदलांमध्ये प्रत्यक्ष जावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. नागपूरचे कर्नल सुनील देशपांडे त्यांपैकीच एक. ‘प्रहार’ या आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशभक्त युवकांची एक फौजच उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रभक्त युवकांचा मार्गदर्शक हरपल्याची भावना युवकांमध्ये निर्माण झाली आहे.
लष्करी सेवेत असताना कर्नल देशपांडे यांचा पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात सहभाग होता. त्या युद्धातील केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले हेते. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत त्यांचा सहभाग होता. सेवानिवृत्तीनंतरही ते स्वस्थ बसले नाहीत. नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी याकरिता त्यांनी ‘प्रहार’ नावाची सैनिकी शाळा सुरू केली. या शाळेने हजारो सैनिक घडविले आहेत. ‘प्रहार’ या गाजलेल्या चित्रपटाच्या निर्मितीत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना कर्नल देशपांडे यांनी सैनिकी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या संघटनेचे नावही ‘प्रहार’ ठेवले! सैन्यात अनेक वर्षे घालविल्यानंतर ऐषोरामाचे आयुष्य जगण्यापेक्षा सैनिक घडविण्याचे कार्य कर्नल देशपांडे यांनी हाती घेतले.
लहान मुलांमध्ये सैनिकी वृत्ती जागृत करण्यासाठी आणि राष्ट्रभक्त युवक घडावेत यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता. १९६४ मध्ये ते हिंदुस्थानी सैन्याच्या सेकंड मराठा लाइट इन्फंट्रीमधून कमिशण्ड ऑफिसर म्हणून रुजू झाले. बेळगाव येथे प्रशिक्षण केंद्राचे कमांडो म्हणून त्यांचे शेवटचे पोस्टिंग होते. इ. सन २००२ मध्ये त्यांनी सुरू केलेल्या ‘प्रहार’ संस्थेच्या विविध प्रशिक्षणांमध्ये ५० हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून त्यातील २८० विद्यार्थी-विद्यार्थिनी सैन्यदलात देशाची सेवा करीत आहेत. लष्करी सेवेत जाण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळा, जंगल ट्रेनिंग, प्रशिक्षण कार्यशाळा, घोडेस्वारी, फायरिंग रेंज आदी व्यवस्था त्यांनी आपल्या संस्थेत उपलब्ध करून दिली आहे.
उमरेड मार्गावर अडीच एकर जागेत मोठे प्रशिक्षण केंद्र ‘प्रहार’च्या वतीने राबविण्यात येते. मूळचे नागपूरचे असलेले कर्नल सुनील देशपांडे यांच्या पत्नी शमा देशपांडे यांचादेखील सर्व उपक्रमांमध्ये सहभाग असतो. स्नेहा अनिल महाजन ही त्यांची मोठी मुलगी कमर्शियल आर्टिस्ट आहे, तर दुसरी लहान मुलगी शिवाली ही सेनादलात फ्लाइंग ऑफिसर होती. ती आता प्रहार समाज जागृती संस्थेच्या उपक्रमामध्ये सक्रिय आहे. कर्नल देशपांडे यांनी सेवेत असताना आणि त्यानंतरही मोठी कामगिरी बजावली.
आगीने वेढलेल्या ट्रकमधील नागरिकांना वाचविण्यासाठी शौर्य दाखविल्याबद्दल १९८२ मध्ये त्यांना लष्करप्रमुखांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. १९८८ मध्ये प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते. १९८६ दरम्यान मणिपूर आणि मिझोराममधील ७६ घुसखोरांना मराठा रेजिमेंटच्या जवानांनी पकडल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले होते. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मित्रांना एक पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी प्रहार समाजजागृती संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याचा उल्लेख होता.
संस्थेचा रौप्य महोत्सव आणि त्यांचा सुवर्ण महोत्सव असा दुहेरी योग कर्नलसरांचे आजी-माजी विद्यार्थी आणि त्यांचा मित्र परिवार यांना साधायचा होता. दुर्दैवाने तो आता कधीच साधला जाणार नाही
No comments:
Post a Comment