Total Pageviews

Thursday, 29 March 2018

दीर्घायुषी व्हायचं असेल तर हे कराच! फ्रँक स्वैनबीबीसी फ्युचर



जास्तीत जास्त लोक वयाची शंभरी गाठत असतील, तर सैद्धांतिकरित्या आपण किती प्रदीर्घ आयुष्य जगू शकतो, हा प्रश्न विचारलाय फ्रॅंक स्वैन यांनी. आणि प्रत्यक्षात असं प्रदीर्घ आयुष्य हवं असेल तर काय करायला हवं?
जर्मनीतले प्रख्यात विचारवंत डॉ. ह्युसलंड यांनी 1797मध्ये तब्बल 8 वर्षांच्या अभ्यासानंतर 'On the Art of Prolonging Life' हे पुस्तक लिहिलं. दीर्घायुष्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असल्याचे त्यांना आढळलं. त्यात भाज्यांनी परिपूर्ण, बेताचा मांसाहार आणि गोड कमी असलेला मोजका आहार, सक्रिय जीवनशैली (active lifestyle), दातांची काळजी, आठवड्यातून एकदा कोमट पाण्यानं साबण लावून आंघोळ, शांत झोप, स्वच्छ हवा आणि दीर्घायुषी पालकांपोटी जन्म या काही बाबींचा समावेश होतो.
American Review साठी केलेल्या भाषांतराच्या शेवटच्या भागात डॉक्टर ह्युसलंड आशा व्यक्त करतात की शारीरिक क्षमता आणि उपयोगिता न गमावताही मानवाची सरासरी वयोमर्यादा दुप्पट होऊ शकते.
ह्युसलंड यांच्या त्यावेळच्या अंदाजानुसार तब्बल निम्मी बालकं ही वयाची 10 वर्षं पूर्ण होण्याआधीच जीव गमावायची. हा अत्यंत भयावह असा मृत्यूदर आहे.
पण बालकानं देवी, गोवर, रुबेला आणि बालवयातील इतर आजारांवर मात केली तर त्याच्याकडे वयाची पस्तीशी ओलांडण्याची बऱ्यापैकी संधी असते. आदर्श परिस्थितीत आयुर्मान दोनशे वर्षांपर्यंत वाढू शकते, असं ह्युसलंड यांना वाटायचं.
§   
अठराव्या शतकातील एका संशोधकाच्या या काल्पनिक दाव्यांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? जेम्स व्हेपल यांना ही मांडणी पटते. ते म्हणतात, "आयुर्मान प्रत्येक दशकात अडीच वर्षांनी वाढतं आहे. म्हणजेच एका शतकात आयुर्मान पंचवीस वर्षांनी वाढते."
रहस्य कशात आहे?
जर्मनीतील रोस्टोक येथील Max Planck Demographic Research संस्थेच्या Survival and Longevity प्रयोगशाळेचे संचालक व्हेपल हे मनुष्य आणि प्राण्यांचं आयुर्मान आणि जीवन याचा अभ्यास करत आहेत.
ते सांगतात मृत्युदरातील सुधारणेचा आलेख गेल्या शंभर वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलला आहे. 1950 पूर्वी बालमृत्युदराविरोधातल्या लढ्यामुळे आयुर्मान वाढण्यात मोठा फायदा झाला. हेच ह्युसलंड यांनी नमूद केले होते. त्यानंतर मात्र वयाची साठी पार केलेले आणि गेल्या काही वर्षांत वयाची ऐंशी पार केलेले यांच्या मृत्युदरात मोठी घसरण झालेली दिसते.
वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर आपण केवळ बालमृत्युची कसोटी पार केलेली नाही, तर एकूणच मोठं - खूप मोठं आयुष्य जगत आहोत.
वयाचा जांगडगुत्ता
जगभरात 2010 ते 2050 दरम्यान शंभरी पार केलेल्यांची संख्या दहापट वाढेल, असा अंदाज आहे.
ह्युसलंड यांनी सांगितल्याप्रमाणे वयाचा हा टप्पा गाठण्यात तुमच्या पालकांचं वय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच दीर्घायुष्य लाभण्यामध्ये अनुवांशिक घटकाचाही समावेश आहे.
पण शंभरी पार केलेल्यांच्या संख्येत होणारी वाढ केवळ अनुवांशिकतेवर अवलंबून नाही. याबाबतीत गेल्या काही शतकात फारसा फरक पडलेला नाही.
उलट आपल्या जगण्यात झालेल्या इतर अनेक सुधारणांच्या एकत्रित परिणामांमुळे दीर्घ आणि सुदृढ आयुष्य जगण्याची संधी वाढली आहे.
यात ह्युसलंड यांनी सांगितलेल्या अनेक घटकांचाही समावेश आहे. उत्तम आरोग्यसेवा, वैद्यकीय उपचारातील सुधारणा, स्वच्छ हवा आणि पाणी, सार्वजनिक आरोग्य सुविधा, शिक्षण आणि उंचावलेले जीवनमान या कारणांचा त्यात समावेश होतो. व्हेपल म्हणतात, "प्रगत औषधोपचार आणि पैसा यामुळे हे शक्य झालं आहे".
असं असलं तरी सुधारित आरोग्यसेवा आणि जीवनमानानंही अनेकांचं समाधान होतं नाही. म्हणूनच आयुष्य वाढविणाऱ्या उपचारांची भूक वाढतानाच दिसते.
यातील एक लोकप्रिय पर्याय म्हणजे आहारातील कॅलरीवर नियंत्रण. 1930मध्ये केलेल्या एका संशोधनात लक्षात आले की, पोटभर अन्न मिळालेल्या उंदरांपेक्षा उपाशीपोटी राहिलेले उंदीर जास्त जगतात.
पुढे माकडांवर केलेल्या संशोधनातही हेच आढळले. मात्र अमेरिकेतील राष्ट्रीय वयोमान संस्थेनं ( US National Institute of Ageing) केलेल्या तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनात विरोधाभास आढळला.
या अभ्यासात असं निदर्शनाला आलं की नियंत्रित कॅलरी असलेला आहार दिलेल्या माकडांमध्ये वयोमानानुसार होणारे आजार इतर माकडांच्या तुलनेत उशिरा झाले, पण त्यांचे सरासरी आयुर्मान वाढलं नाही.
यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की जास्त आयुष्य जगलेल्या प्राण्यांना नियंत्रित भोजनामुळे काही प्रमाणात फायदा झाला. पण तो अनुवांशिकता, पोषण आणि पर्यावरणातील घटक यांच्यातील जटील अशा परस्पर क्रियेवरही अवलंबून असतो.
आयुर्मान वाढविण्याच्या दृष्टीनं आणखी एक मोठी आशा आहे ती म्हणजे रिझव्हरेट्रोल (Resveratrol). रिझव्हरेट्रोल हे वनस्पतींपासून मिळणारं एक रसायन आहे. द्राक्षाच्या सालात ते मोठ्या प्रमाणात आढळतं.
पण म्हणून द्राक्षाच्या मळ्यात तारुण्याचं रहस्य दडलेलं असेलच, हे मात्र सांगता येत नाही. नियंत्रित कॅलरी असलेल्या भोजनाइतकेच फायदे हे रसायनसुद्धा देतं. मात्र रिझव्हरेट्रोल मानवी आयुष्य वाढवतं का, हे अजून सप्रमाण सिद्ध झालेले नाही.
म्हातारपण का येतं? व्हेपल यांच्या म्हणण्यानसार, "आपल्या शरीराची रोज हानी होत असते. ती पूर्णपणे भरून निघत नाही आणि याच भरून न निघालेल्या हानीच्या एकत्रित संचयामुळे वयोमानानुसार होणारे आजार होतात."
पण हा गुणधर्म सर्वच सजीव प्राण्यांमध्ये आढळत नाही. उदाहरणार्थ जेलीफिशसारखा दिसणारा हायड्रा हा जीव. हायड्रा स्वत:च्या शरिराची जवळपास संपूर्ण हानी भरून काढतो आणि ज्या पेशी दुरुस्तीपलिकडे जखमी झाल्या असतील त्या टाकून देतो. मनुष्य प्राण्यात मात्र अशा पेशी कॅन्सरसारख्या गाठींचं कारण बनतात.
व्हेपल म्हणतात, "हायड्रा आपले सर्व स्रोत प्रजननाऐवजी प्रामुख्यानं दुरुस्तीसाठी वापरतो. त्याउलट मनुष्य सर्व संसाधनं प्रामुख्यानं प्रजननासाठी वापरतो. स्वत:चं अस्तित्व टिकविण्याची प्रत्येक सजिवाची पद्धत निराळी असते."
मानव झपाट्यानं जगत असला आणि तारुण्यात मृत्यू येण्याचं प्रमाण अधिक असलं तरी प्रजननाच्या अफाट क्षमतेमुळे तो या मोठ्या मृत्युदरावर मात करू शकतो. पण व्हेपल यांच्या म्हणण्यानुसार आता बालमृत्युदर खूप कमी झाला असल्याने सर्व संसाधनं प्रजननासाठी वापरण्याची खरंच गरज नाही.
"फॅट (चरबी) वाढविण्यापेक्षा शरीराची हानी भरुन काढण्यात एनर्जी (शक्ती) वापरणे, ही एक युक्ती आहे. सैद्धांतिकरित्या हे शक्य असायला हवं, पण ते प्रत्यक्षात कसं करावं, याबद्दल कुणाला माहिती नाही."
IMAGES
आपल्या पेशींची सातत्यानं होत असलेली हानी रोखता आली (वाढत्या वयाची थोडीफार लक्षणं वगळता) तर कदाचित वार्धक्य येणारच नाही. तशा परिस्थितीत मरण्याचं कारणच उरत नाही.
"जिथे सर्व प्रकारचा मृत्यू पर्यायी असेल, असं जग किती अद्भूत असेल! प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे. आपल्यापैकी अनेकांनी काहीही केलेलं नसतानासुद्धा आपल्या सर्वांनाच ही देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे," असं म्हणणं आहे गेनडी स्टोलेरॉव्ह यांचं.
गेनडी हे transhumanist philosopher आहेत. त्यांनी 'Death is Wrong" हे लहान मुलांसाठीचं पुस्तकही लिहिले आहे. मृत्यू अटळ आहे, या धारणेविरोधातल्या लिखाणामुळे हे पुस्तक वादग्रस्तही ठरलं. स्टोलेरॉव्ह यांच्या मते मृत्यू केवळ एक तांत्रिक आव्हान आहे आणि पुरेसा पैसा आणि मनुष्यबळाच्या सहाय्यानं हे आव्हान सोडवता येईल.
बदलाचे दूत
तांत्रिक अभ्यासासाठी 'टेलोमर्स' (telomeres) एक पर्याय आहे. गुणसूत्रांवर असलेल्या कॅप्स म्हणजे टेलोमर्स. पेशींचं विभाजन झालं की प्रत्येकवेळी या कॅप्स आक्रसतात. यालाच telomeres shortning म्हणतात. यामुळे पेशीच्या पुनरूत्पादनावर मर्यादा पडतात. सर्वच प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया आढळत नाही. उदाहरणार्थ हायड्रा. पण हे telomeres shortningफायद्याचंही आहे.
काहीवेळा पेशींच्या विभाजनानंतर टेलोमर्स आक्रसत नाहीत. यामुळे कधीही नाश न होणाऱ्या 'अमर' पेशींची एक साखळी तयार होते. अशा पेशींमुळे कॅन्सरच्या गाठी तयार होऊ शकतात. त्यामुळे या पेशी ज्या व्यक्तीच्या शरीरात असतील त्याच्यासाठी त्या अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
स्टोलेरॉव्ह सांगतात, "जगभरात दररोज 15 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातले दोन तृतियांश मृत्यू हे वार्धक्याशी संबंधित कारणांमुळे होतात.
म्हणजेच वार्धक्य कमी करण्याचं तंत्रज्ञान लवकर विकसीत झाले, तर लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात. "वार्धक्याशी संबंधित शास्त्राचे अभ्यासक आब्रे डी ग्रे यांच्या मते पुढच्या 25 वर्षांत वार्धक्यावर मात करता येण्याची 50 टक्के शक्यता आहे. स्टोलेरॉव्ह म्हणतात, "याचाच अर्थ आपण वार्धक्याचे भयंकर दुष्पपिणाम सोसण्याआधीच हे होण्याची उत्तम संधी आहे."
व्हेपल म्हणतात, "येत्या 25 वर्षांत वार्धक्य कमी करता येण्याची शक्यता आहे. पण हे असंभव आहे." ते मान्य करतात की वैद्यक शास्त्रातील संशोधनांमुळे आयुर्मान वेगानं वाढवता येऊ शकतं.
पण त्याचबरोबर ते हा इशाराही देतात की, यामुळे भविष्यात आपल्याला अनेक अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ते म्हणतात, "आजार, आर्थिक संकटं आणि हवामानातील बदल यामुळे मृत्युदर वाढू शकतो."
स्टोलेरॉव्ह यांना आशेच्या एका छोट्या किरणातून शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्याची अपेक्षा आहे. ते म्हणतात, "मला वाटतं तांत्रिक प्रगतीचा वेग लक्षणीयरित्या वाढविण्यासाठी खंबीर प्रयत्नांची गरज आहे. सध्या आपल्याकडे लढायची संधी आहे. पण हे शक्य करून दाखवायचे असेल तर आपल्याला बदलाचे दूत व्हावे लागेल."
सध्यातरी पाश्चिमात्य जगात सर्वाधिक बळी घेणारे हृदयरोग आणि कॅन्सर यांना आळा घालण्याचे उत्तम पर्याय आहेत, यावरच वाचकांना समाधान मानावे लागेल.
व्यायाम, पौष्टिक आहार आणि मद्य, मांसाहार यावर नियंत्रण, यातून हे साध्य करता येते. पण आपल्यापैकी बरेच कमी जण अशी जीवनशैली जगतात.
कदाचित उत्तम जेवण आणि मद्यानं भरपूर छोटं आयुष्य फायद्याचा सौदा आहे, असं लोकांना वाटतं. आणि म्हणूनच प्रश्न उद्भवतो, शाश्वत आयुष्य शक्य असेल तर तुम्ही त्यासाठीची किंमत मोजायला तयार आहात का


No comments:

Post a Comment