छत्रपती
शिवाजी महाराजांनी मोठय़ा धैर्याने आणि भवानी तलवारीच्या तळपत्या जोरावर मराठी
सत्तेचे अर्थातच स्वाभिमानी हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले. बहयमी, मोगल, निजाम, तुघलक या जुलमी
सत्तेला हिंदवी साम्राज्यापासून सीमापार लोटण्यासाठी डोळ्यात तेल घालून मराठी शूर सरदारांनी
प्राणांची बाजी मारली. हे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आणि मोठय़ा
कौशल्याचे तंत्र म्हणावे लागेल. अराजकतेपासून मराठी जनतेला दूर ठेवत स्थैर्य, संपत्ती आणि बळकटी
देण्याकरिताच शिवाजी महाराजांनी साम्राज्याचा डोलारा उभा केला. तसेच शत्रूंशी निकराचा
लढा दिला. शत्रू सैन्याची वाताहत करून विजय संपादन करायचा हे तंत्र शिवाजी
महाराजांनी कुशलतेने हाताळले. अर्थात ही काही सोपी बाब नव्हती. शत्रूसैन्याकडे
बलाढय़ सरदार, घोडदळ, तोफखाना, हत्तीदळ यांची
प्रचंड उपलब्धी होती. या उलट शिवाजी महाराजांचे सैन्य तोकडे जरी असले तरी घोडदळ व
पायदळाच्या जोरावर मराठी सैन्याने शत्रू सैन्याची वाताहत करण्याची कला जोपासली.
आसपासची स्थिती, डोंगरदऱयांची
इत्थंभूत माहिती, घोडदळ
व पायदळीचा जागता पहारा या जोरावर शिवाजी महाराजांनी आपला दबदबा निर्माण केला. काय
होते हे तंत्र, कशी
सत्ता टिकवली, मोठमोठय़ा
सरदारांना यमसदनी कसे धाडले, मावळय़ांचे जीवनमान कसे होते.
शत्रूसैन्यांची दाणादाण कशी करायची या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा
प्रयत्न प्रा. डॉ. राम फाटक यांनी लिहिलेल्या ‘शिवकालीन घोडदळ आणि
युद्धनीती’ या
पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे.
युद्धाचा
प्रसंग कधी व कसा येईल याचे उत्तर देता येत नाही. साम्राज्यवादामुळे १७व्या शतकात
प्रचंड संघर्षाचे प्रसंग उद्भवले. उत्तरेकडून मोगलांचा, पूर्वेकडून विजापूर, तसेच सिद्धी जोहर
तसाच निजामी हल्ल्याची वेळ आल्यानंतर मराठी सैन्याने मोठय़ा हिकमतीने सर्वच हल्ले
मोडून काढले. शिवाजी महाराजांनी घोडदळाच्या जोरावर शत्रूसैन्यास जेरीस आणले. यातून
त्यांची युद्धनीती किती प्रबळ होती हे समजणे अगत्याचे ठरते. शिवरायांनंतर पेशवाई
अस्तित्वात आली. तेव्हाही युद्ध जिंकण्यासाठी मराठी सरदारांनी शिवकालीनच
युद्धतंत्र वापरून दरारा कायम ठेवला. कूटयुद्ध पद्धतीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करीत
शत्रूला नामोहरम करण्यात मराठी सैन्य तरबेज होते. घोडदळही शत्रूंवर गतीने हालचाल
आणि आक्रमण करू शकत असल्याने मराठय़ांनी घोडदळावर व्यापक भर दिला.
अत्यंत
कार्यक्षम असणाऱया घोडदळामुळे मराठी सरदारांनी युद्धात विजयश्री मिळवून भगव्याचा
मान राखला. शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांच्याकडे खासगी सैन्यात
तीन हजार घोडेस्वार होते. शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील भीमथडी आणि निरथडी
घोडय़ांच्या सहाय्याने आपले घोडदळ बलवान केले. काटक व कडक जीवन पद्धती, ऐषआरामशून्य राहणीमान
व अत्यंत मर्यादित गरजा हेच मराठी सैन्याच्या युद्धपद्धतीचे मुख्यतः लक्षण
शेवटपर्यंत कायम राहिले. शिपायांजवळ लवाजमा नसल्याने लष्करी हालचाली चपळतेने पार
पडल्या. भाला, तलवार, ढाल फार तर बंदूक
ही मराठय़ांची हत्यारे होती. अवजड तोफखाना मराठी लष्करात नसायचा. घोडय़ाच्या
तोबऱयाचे हरभरे, एखादी
घोंगडी, सैनिकाजवळ
हमखास असायची. घोडय़ाचा लगाम मनगटाला बांधूनच सैनिक झोपायचा. शिवरायांच्या सैन्याचे
लष्करी तळ उघडय़ा मैदानावर असायचे. तंबू, शामियाने यासारखे
अवघड सामान कटाक्षाने टाळले जायचे. लष्करी छावणीत दिमाख तर नसायचा. मुख्य म्हणजे
बायकाही नसायच्या.
शिवाजी
महाराजांनी १६६४ मध्ये सुरतवर स्वारी केली. त्याप्रसंगी महाराजांचा तळ कसा होता
याची नोंद शिवकालीन दफ्तरांत सापडते, शिवाजी सुरतेबाहेर
दोन कोसांवर होते. फक्त त्यांचाच शामियाना होता. इतर सर्व लष्करी अधिकारी उघडय़ावर
होते, अशी
नोंद सापडते. शिवाजी महाराजांचे लष्करी मोठेपण लिहावे तितके कमी आहे. त्यांना
डोंगरी मोहिमा आणि गनिमीकाव्याचे युद्ध या दोन्ही तंत्रांमध्ये हलके पायदळ व हलके
घोडदळांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळेच हिंदुस्थानी लष्करी इतिहासात शिवराय
त्यांचे मावळे आणि हेटकरी यांनी खास अढळ, वंदनीय स्थान
प्राप्त केले.
विशेष
म्हणजे युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱयांना शिवाजी महाराज सढळ हाताने
बक्षिसे देत असे. जखमी सैनिकांना भत्ता दिला जायचा. इतकेच नव्हेतर लढाईत कामी
आलेल्या सैनिकांच्या विधवा व अनाथ मुलांना पेन्शनची सोय केली, अशी काळजी घेणारे
शिवाजी महाराज दूरदृष्टीचे महाराज होते. शिवाजी महाराज किंवा त्यांच्या महान
सरदारांनी कधीच हत्तीवर बसून स्वारी केली नाही. केवळ घोडय़ावर बसूनच लढाई केली.
शिवरायांनी प्रशिक्षित केलेले घोडदळ गनिमी हालचालीस प्रसिद्ध राहिले. शिवरायांच्या
घोडदळाच्या हालचालींना साधा मागमूस शत्रूंना लागत नसे. अतिवेगवान हालचालींमुळे
मराठी घोडदळ शत्रू पक्षाच्या एकापाठोपाठएक ठिकाणांवर हल्ला करीत असत. त्यामुळे
शिवाजी महाराज एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होत, अशी अफवा त्यावेळी
पसरली होती. त्यांच्यात भीमाचे पराक्रम होते. अशीच नोंद इंग्रजी दफ्तरातही सापडते.
शिवाजी
महाराज आणि त्यांची युद्धकला हिंदुस्थानातील महान लष्करी नेत्यांमध्ये वरचढ आहे.
स्वतः ते अव्वल लष्करी नेतेही आहेत. सैनिकी क्षेत्रातील मूलभूत संशोधक म्हणून
शिवराय मानावेत एवढी त्यांची थोरवी आहे. असा गौरव प्रसिद्ध इतिहासतज्ञ डॉ.
सुरेंद्रनाथ सेन यांनी केला. युद्धनीतीसाठी शिवाजी महाराजांनी सैन्य व्यवस्था
मजबूत करूनच हिंदवी स्वराज्याचा डोलारा कायम ठेवला हे निश्चित.
हा
युद्धनीतीचा प्रपंच डॉ. राम फाटक यांनी आपल्या पुस्तकात सक्षमपणे मांडला आहे. 160 पानांच्या या
पुस्तकाला प्रदीप म्हैसेकर व प्रा. डॉ. मदन शिंदे यांची प्रस्तावणा लाभली आहे.
पुस्तक वाचनीय पण अभ्यासपूर्ण झाले आहे. शिवरायांची कर्तृत्व थोरवी पानोपानी
वृद्धिंगत होणार आहे. पुस्तकांत शिवरायांनी बनवलेल्या जलदुर्गांच्या जडणघडणीचा
विषय यायला हवा होता. ही उणीव जाणवते. पुस्तकाचे मुखपृष्ठ व मांडणी, सजावट चांगली आहे.
No comments:
Post a Comment