सुनील देवधर यांना २०१४च्या पूर्वार्धात त्रिपुराच्या
प्रभारीपदाची जबाबदारी मिळाली. तेव्हा भाजपचे संघटन जवळपास नव्हतेच. म्हणजे लोकसभा
निवडणुकीसाठी मोदींची आगरतळ्यात जी प्रचारसभा झाली त्याला जेमतेम तीन ते चार हजार
लोक जमले होते. सुनील देवधर हे केवळ कुशल संघटक नाहीत तर टास्क मास्टर आहेत.
त्रिपुराची जबाबदारी मिळताच सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून
परिस्थितीचा आढावा घेतला.
दिल्लीत बसून त्रिपुराचा गाडा हाकता येणार नाही हे लक्षात
येताच आगरतळ्यात भाडय़ाने घर घेऊन महिन्यातले जास्तीत जास्त दिवस त्रिपुरात
राहण्याचा निर्णय घेतला. संघटनात्मक बदल हे त्यांचे पुढचे लक्ष्य होते, कारण भाजपची जुनी
टीम वयस्कर व शहरी भागापुरतीच सक्रिय होती. दिल्लीत त्यांनी बिप्लब देब नावाचा
मूळचा त्रिपुराचा पण दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या ४५ वर्षांच्या तरुणाला हेरले व
त्रिपुराच्या राजकारणात उतरवले. त्रिपुरात गेल्यावर काही महिन्यांनी हा युवक
त्रिपुराचा भाजप प्रदेशाध्यक्ष झाला.
मुळात त्रिपुरा हे आदिवासी राज्य. पण फाळणी आणि ७१चे
बांगलादेश युद्ध यामुळे पूर्व बंगालमधील असंख्य बंगाली समुदायाने त्रिपुरात आसरा
घेतला. परिणामत: आदिवासी अल्पसंख्य झाले. १९८० मध्ये झालेल्या दंगलीमुळे दोन्ही
समाजात तेढ निर्माण झाली. डाव्यांच्या काळात आदिवासी वर्ग कायम उपेक्षित राहिला.
मनरेगाचे काम किंवा राज्य सरकारकडून मिळणारा २००-४०० रुपयांचा भत्ता ह्य़ा भोवतीच
त्यांचे आयुष्य राहिले. त्यामुळे विधानसभेतील ६० पकी या समाजासाठी राखीव असलेल्या
२० जागा दाव्यांची हक्काची मतपेढी बनली. सुनील देवधर यांनी नवीन भाजप संघटनेत
आदिवासी समाजाला योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व दिले. त्याचप्रमाणे दलित व ओबीसी
समाजालाही संघटनेत प्रतिनिधित्व मिळेल याचीही दक्षता घेतली. यापूर्वी कोणीच या
दिशेने पावले टाकली नव्हती.
एकीकडे पक्ष संघटनेची बांधणी होत होती तर दुसरीकडे
सुनीलजींचा प्रवास सुरूच होता. पण डाव्यांची दहशत एवढी होती की सुरुवातीला कोणी
विरोधकांच्या सभेला वा कार्यक्रमाला जायला लोक घाबरत. कारण कोणी पाहिले तर बदली
होईल, मनरेगाचे काम
मिळणार नाही, भत्ता बंद होईल
अशा भीतीने त्यांना ग्रासले होते. तसेच बंगाली-आदिवासी तेढीमुळे एकमेकांवर सहसा
विश्वास ठेवला जात नसे. त्यातच सुनील देवधर यांच्यावरील प्रेमापोटी त्रिपुराच्या
बाहेरील माझ्यासारखे काही कार्यकत्रे वर्ष-दोन वर्षांसाठी त्रिपुरात तळ
ठोकण्यासाठी आले. प्रत्येकाने एक विशिष्ट भूमिका पार पाडायला सुरुवात केली. कोणी १
बूथ १० कार्यक्रमांतर्गत युवकांची मोट बांधण्यासाठी पायाला चक्री लागल्यासारखा
राज्य पिंजून काढत होता. सुनील यांनी एक मोदीदूत टीम बनवली जी गेले एक वर्ष दररोज
आगरतळा ते धर्मानगर प्रवास करत मोदी सरकारच्या कामांचा प्रसार आणि प्रचार करत होती, तसेच लोकांच्या
समस्या जाणून घेत होती. या चमूने गोळा केलेला डेटा वॉररूममध्ये अपडेट झाल्यावर कॉल
सेंटरद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून तेथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांला
पाठपुरावा करण्याची सूचना दिली जात असे.
सुनील देवधर स्वत: समाजमाध्यमांवर सक्रिय असल्याने त्यांनी
दोन वर्षांपूर्वीच एक वॉररूम सुरू केली. सुरुवातीला मी वॉररूम पूर्ण वेळ सांभाळत
होतो. वॉररूममधून सोशल मीडियामार्फत प्रचार सुरू झाला. अनेक कार्यकत्रे जोडले जात
होते. माणिक सरकार यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे गुपचूप पाठवत होते.
त्यातच डाव्यांच्या घाणेरडय़ा राजकारणाची शिकार झालेले अनेक
सरकारी कर्मचारी दररोज भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणे घेऊन सुनीलजींना भेटत होते.
अशा कर्मचाऱ्यांशी सतत संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या माहितीचा व प्रकरणांचा कसा
वापर करता येईल याची जबाबदारी माझ्यावर होती. मग अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या
भेटीगाठी सुरू केल्या. लक्षात आले की गुहा खूप मोठी होती, कारण अगदी कॉलेज
प्रवेश, बोर्डाचे निकाल
ते नोकरीतील नियुक्ती प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार व त्याचबरोबर केवळ विरोधक
असल्याने दुस्वास होता.
कम्युनिस्ट राजवटीची एक वेगळीच शैली आहे. इथे डावे समर्थक
आणि विरोधक यांच्यात शत्रुत्वाचे नाते असते. अगदी सख्खा भाऊ वा बहीण असेल तरीही
केवळ या एका राजकीय कारणासाठी दोघांमधले संबंध संपतात. त्यामुळे डाव्या
समर्थकांच्या मनात काय चालले आहे हे कळायला मार्ग नव्हता. मग दर काही दिवसांनी
नवीन ओळख व नवीन सीम कार्ड घेऊन अशा लोकांशी मी संपर्क साधत असे व ती माहिती
सुनीलजींपर्यंत पोहोचवत असे. नंतर त्या माहितीच्या आधारे प्रचाराची व वॉररूममधील
सोशल मीडियाची दिशा ठरत असे. त्याचप्रमाणे सुनीलजींनी मला वेगवेगळ्या राज्यस्तरीय
नेत्यांशी संपर्क ठेवून त्यांच्या भावना व समस्या समजून घेण्याची जबाबदारीही दिली
होती. एकूण काय तर त्रिपुरातील डावे ज्याप्रमाणे आपल्या भाषणात सुनीलजींचा उल्लेख
महाराष्ट्रसे आया हुआ सुभेदार असा करायचे ते सत्यच होते. छत्रपती शिवरायांच्या
राज्यात जन्मलेल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या सुनीलजींनी ही
निवडणूक एका युद्धासारखीच लढली. स्थानिक सन्यासोबत राज्याबाहेरून आलेले आपले
शिलेदार योग्य ठिकाणी नेमून शत्रूचा गड काबीज केला.
No comments:
Post a Comment