आजकाल सोशल
मिडियावरील माहितीने अनेक बाबी मिळविणे खूप सोपे झाले आहे. म्हणूनच आपले सोशल
मिडिया अकाऊंट खरंच सुरक्षित आहे का ? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
आला आहे. फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने या
संदर्भात विश्लेषण दिले आहे. त्याचबरोबर फेक अॅप्सच्या ट्रंकिंगसाठी फेसबुकतर्फे
लवकरच उपाययोजना केली जाणार असल्याचे देखील सांगितले गेले आहे.
गेल्या दोन
दिवसांपासून फेसबुक डेटा गैरव्यवहार प्रकरणी मोठी चर्चा प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियावर सुरु आहे. फेसबुकची
विश्वासार्हता यात पणाला लागली असून, सोशल मिडियावरील आपली माहिती खरंच सुरक्षित आहे का ? हा सामान्यजनांना पडलेला मोठा प्रश्न आहे. ही चर्चा
अमेरिकेत गेल्या २ आठवड्यापासून सुरु झालेली आहे. हळूहळू त्याचे लोण भारतापर्यंत
येत आहेत. यावर पहिले चर्चा सुरु झाली ती, २१ मार्चपासून. भारताचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आणि कायदा
मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या
पत्रकार परिषदेनंतर. फेसबुकवरील सामान्य भारतीयांची माहिती गैरमार्गाने मिळवून
त्याचा उपयोग निवडणुका प्रभावी करण्यासाठी केला जात असल्याची बाब त्यांनी नजरेस
आणून दिली. केंब्रीज अॅनालिटीका नावाच्या बिग डेटा कंपनीशी काँग्रेस पक्षाने सोशल
मिडियाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हातमिळवणी केल्याचा
आरोप आहे.
आजकाल सोशल
मिडियावरील माहितीने अनेक बाबी मिळविणे खूप सोपे झाले आहे. म्हणूनच आपले सोशल
मिडिया अकाऊंट खरंच सुरक्षित आहे का ? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणि म्हणून मला वाटते की, राजकीय संदर्भ वगळता देखील या विषयाकडे अधिक
गंभीरतेने बघितले पाहिजे.
कशी होते डेटा
चोरी?
फेसबुकचा वाढता
वापर लक्षात घेता या साईटला अधिक सामाजिक बनविण्यासाठी फेसबुकने २००७ साली अनेक
अॅप्सला फेसबुकमध्ये शिरण्याची परवानगी दिली होती. आपल्या मित्रांचा वाढदिवस साजरा
करण्यासाठी कॅलेंडर तयार करणे, कँडीक्रश सारखे खेळ मित्रांसोबत शेअर करणे, विविध नकाशांद्वारे चेक इन करणे, दोन मित्रांमधील माहिती शेअर करणे अशा विविध सामाजिक घटनांसाठी या सर्व
अॅप्सना परवानगी देण्यात आली आहे. २०१३ साली अलेक्झांडर कोगन नावाच्या कॅम्ब्रीज
विद्यापीठातील संगणक शास्त्रज्ञाने या परवानगीचा उपयोग करून व्यक्तिमत्व चाचणी
करणारे कोगन नावाचे एक अॅप विकसित केले आणि ते अॅप फेसबुकवर वापरासाठी ठेवण्यात
आले. ते अॅप जवळपास ३ लाख लोकांनी इंस्टॉल केले होते. या ३ लाख लोकांद्वारे स्वत:
सहित आपल्या मित्रांची देखील माहिती शेअर करण्यात आली. खूप कमी कालावधीत प्रसिद्ध
झालेल्या कोगन अॅपकडे अनेक फेसबुक युजर्स येऊ लागले. ज्यामुळे कोगनला १ कोटीपेक्षा
अधिक फेसबुक प्रोफाईलची माहिती सहज मिळू शकली.
ही संपूर्ण
माहिती कोगनने केंब्रीज अॅनालिटीका सारख्या डेटा अॅनालिसीस करणाऱ्या कंपन्यांना
विकली आणि तिथून कोट्यावधी फेसबुक युजर्सची माहिती अनेक कंपन्यांना सहज उपलब्ध होऊ
शकली.
काय आहे केंब्रीज
अॅनालिटीका आणि त्यांची कार्यपद्धती ?
केंब्रीज
अॅनालिटीका ही मूळ इंग्लंडस्थित डेटा अॅनालिसीस (माहिती पृथ्थकरण) करणारी एक कंपनी
आहे. स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरी नावाच्या कंपनीची उप कंपनी म्हणून देखील
ओळखली जाते. ऑनलाइन पद्धतीने माहितीचे संकलन करून, विविध देशांतील मतदारांवर प्रभाव निर्माण करून त्याचा विविध राजकीय पक्षांना
याचा लाभ करून देण्याचे काम ही कंपनी करत असते. २०१६ साली पार पडलेल्या
अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराची धुरा केंब्रीज
अॅनालिटीकाने सांभाळली होती.
कोगन अॅपसारख्या
अनेक अॅप्सकडून विविध सोशल मिडीयावरील माहितीचे संकलन केंब्रीज अॅनालिटीका करत
असते. त्यातून प्रत्येक सोशल मिडिया युजरची वैयक्तिक माहिती, उदा. आवडी-निवडी, पोस्ट्स, संघटनात्मक
दृष्टीकोन, लाईक केलेले
व्हिडिओ पोस्ट्स, पेजेस इत्यादी
सर्व काही केंब्रीज अॅनालिटीका मिळवू शकते. याद्वारे प्रत्येक फेसबुक युजर्सच्या
वैयक्तिक आवडी-निवडीचे अॅनालिसीस करून अधिक प्रभावी प्रकारे पोहोचता येण्याचे
तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे.
सोशल मिडियावर
मोकळ्या मनाने व्यक्त होण्याच्या या युगात आपल्या मनात काय चालू आहे? याचे अॅनालिसीस केंब्रीज अॅनालिटीका करत असून, निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे प्रभावी ठरू शकतील हे
ठरवत असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात कोणते मुद्दे असावेत? अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांची भाषणे, कामे, आराखडे कसे पोहोचतील याची रणनीती केंब्रीज अॅनालिटीका आखत असे. यातून तेथील
निवडणुकांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे वर्चस्व राखण्याचे काम केंब्रीज
अॅनालिटीका करत होती.
मात्र यात
मिळणारी माहिती ही गैरव्यवहारातून मिळवली जात असते. सामान्य फेसबुक युजर्ससाठी
व्यक्तिमत्व चाचणी सारख्या गमंतशीर वाटणाऱ्या अॅप्सची निर्मितीकरून त्याद्वारे
वैयक्तिक माहिती मिळवली जाते आणि ती विकून त्याद्वारे अनेक उद्देश्य सध्या केले
जातात. ही माहिती दहशतवादी गटांकडे सहज पोहोचण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हा
धोका लक्षात घेऊनच फेसबुकने माहितीचा गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्यांना आपला डेटा
घेण्यास २०१४ सालापासून बंदी घातली आहे.
यासाठी काय काळजी
घ्याल
डेटा गैरव्यवहार
करणाऱ्या अनेक कंपन्या ओळखून फेसबुकने त्यांवर बंदी घातली आहे. हे वास्तव जरी असले
तरी देखील या कंपन्या विविध नावाने नवनवीन अॅप्स विकसित करून युजर्सना भुलवण्याचा
प्रयत्न करतात. सध्या सर्वाधिक चर्चा मल्लू अॅप्सची सुरु आहे. प्रथमदर्शी गंमतशीर
वाटणाऱ्या या मल्लू अॅप्सवर अनेक लोक कुतुहुलाने लॉगीन करत असतात, आणि आपली फेसबुक माहिती शेअर करतात. यात विविध भाकीते
वर्तविले जातात, ज्यावर फेसबुकवर
अनेकांचे रिप्लाय देखील येतात. गंमतीदार जरी वाटत असले, तरी देखील अशा अनधिकृत किंवा माहिती नसलेल्या अॅप्सचा
वापर टाळावा.
अशी मागितली जाते खाजगी माहिती
वापरण्याची परवानगी
फेसबुकच्या
सेटिंगमध्ये जाऊन तिथे अॅप्स नावाचा एक ऑप्शन उपलब्ध आहे. त्यावर क्लिक केल्यावर
तुम्हाला नक्की लक्षात येईल की, तुम्ही स्वत: ची माहिती किती थर्ड पार्टी अॅप्ससोबत शेअर केली आहे. त्यात
विश्वासार्ह नसलेले सर्व अॅप्स त्वरित रिमुव्ह करा. कुठल्याही अॅपच्या
सर्वेक्षणाला बळी पडू नका. केवळ अधिकृत वेबसाईटसोबतच आपला फेसबुक डेटा शेअर करा.
कारण फेसबुक डेटा मिळवण्यासाठी या अधिकृत कंपन्यांनी करार केलेले असतात. ज्यात
युजर्सच्या माहितीचा गैरव्यवहार होऊ नये, याची काळजी घेण्याची हमी दिलेली असते. त्यामुळे अशा साईटसोबत माहिती शेअर
करण्यास हरकत नाही. मात्र अनधिकृत सर्व्हेच्या माध्यमातून फेसबुक डेटा वापरणाऱ्या
सर्व अॅप्सचा वापर टाळणे अधिक शहाणपणाचे आहे.
आज फेसबुकचा
संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने या संदर्भात विश्लेषण दिले
आहे. त्याचबरोबर फेक अॅप्सच्या ट्रंकिंगसाठी फेसबुकतर्फे लवकरच उपाययोजना केली
जाणार असल्याचे देखील सांगितले गेले आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात
इंटरनेटवरील माहितीला अनन्य साधारण महत्व आहे. ती प्रत्येक ठिकाणी विविध उद्देश्य
साध्य करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे आपली माहिती चोरीला जात नाही ना..! याची
काळजी दैनंदिन इंटरनेट वापरणाऱ्यांनी नक्कीच घेतली पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करून
चालणार नाही. हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
No comments:
Post a Comment