Total Pageviews

Saturday, 3 March 2018

रूके ना तू, झूके ना तू..MRS SUBHASHINI VASAN- WIFE OF LATE CO VASAN,ASHOK CHAKRA- BY सोनाली रासकर


प्रत्यक्ष सीमेवर राहून आपल्या देशाचे रक्षण करणार्‍या आपल्या जवानांच्या कार्याचे कौतुक करायला शब्दभंडार अपुरे पडेल. त्यांचे विचार, सीमेवर असताना त्यांनी सामना केलेल्या परिस्थितीचे अनुभव ऐकले, वाचले तर प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. पण, युद्धाला सामोरे जाताना जवान ज्यावेळेस शहीद होतात, तेव्हा मात्र मन सुन्न होते. शहीद झालेल्या जवानांच्या कर्तृत्वाची कहाणी, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश, कोवळ्या वयातच वडिलांचे छत्र हरवून बसलेल्या मुलांचे चेहरे बातम्यांमधून झळकू लागतात. कर्तृत्व बजावत असताना त्यांची अचानक झालेली ‘एक्झिट’ कुटुंबाच्या मनाला चटका लावणारी असते. तरीदेखील आलेल्या परिस्थितीसमोर न झुकता त्याचा सामना करण्याचं बळ काही शहीद कुटुंबातील सदस्यांमध्ये दडलेलं असतं. त्यापैकी एक म्हणजे बंगळुरूमध्ये राहणार्‍या सुभाषिनी वसंत.
२००७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या युद्धामध्ये सुभाषिनी यांचे पती कर्नल वसंत वेणुगोपाल शहीद झाले होते. अर्थात, त्यांच्या एकाकी निघून जाण्याने त्यांना धक्का बसला होता. परंतु, तरीदेखील त्यांनी पुन्हा नव्याने उभं राहायचं असं ठरवलं. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी पतीच्या निधनानंतर लगेच तीन महिन्यांनी ’वसंतरत्न फाऊंडेशन’ची स्थापना केली. सुभाषिनी सांगतात की, ’’शहीद जवानांच्या पत्नीकडे, त्यांच्या कुटुंबाकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने न बघता त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्यांना धीर देणं गरजेचं असतं. पण, आपल्याकडे तसं केलं जात नाही. कारण, पुढचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला सहानुभूती उपयोगी पडत नाही, तर तुम्ही त्याला कसं सामोरं जाता यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं. ’वसंतरत्न फाऊंडेशन’च्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. खरं तर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी काही खास योजना, सवलती असतात. परंतु, मुळातच त्यांची माहिती नसल्याने काहींना त्याचा लाभ घेता येत नाही. ’वसंतरत्न फाऊंडेशन’च्या सदस्यातील महिला शहीद जवानांना या योजनांची, सवलतींची माहिती करून देत असतात. या फाऊंडेशनच्या माध्यमातून शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना स्वावलंबी कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करत असतात.
या फाऊंडेशनच्या माध्यमातून सरकारी कार्यालयांशी संपर्क साधून अत्यावश्यक मदत घेतली जात आहे. या फाऊंडेशनमार्फत महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल, याकडे जास्त लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर शहीद जवानांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठीही फाऊंडेशन खास प्रयत्नशील आहे. मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी गरजवंतांना आर्थिक मदत केली जाते. यासाठी फाऊंडेशनला काही संस्था, होतकरू मंडळी आर्थिक मदत करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी शहीद जवानांच्या जीवनावर आधारित ‘द सायलेंट फ्रंट’ नावाचे एक नाटक बसवले आहे. या नाटकाचे प्रयोग दिल्ली, बंगळुरूमध्ये केले जातात आणि तिकिटाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम फाऊंडेशनच्या कामासाठी वापरली जाते. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता, इंग्लिश स्पिकिंग, ऑनलाईन कामे कशी करावी याचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाते. सुभाषिनी वसंत यांना २०१६ मध्ये ’नीरज भानोत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर सुभाषिनी यांना भरतनाट्यमची आवड असून भरतनाट्यमचे प्रयोग त्या करत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या छंदामध्ये स्वतःला गुंतवल्यानंतर दुःखाचा विसर पडतो आणि त्यातून एक नवीन ऊर्जा मिळते. २००७ मध्ये स्थापन झालेल्या या फाऊंडेशनचा आतापर्यंत १२० शहीद जवानांच्या पत्नींना लाभ मिळाला असून त्यांना एक नवी दिशा मिळाली आहे

No comments:

Post a Comment