सन 2014 मधे लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवताना भाजपने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती, गेल्या चार वर्षात प्रत्येक राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला नेस्तनाबुत करण्याचा भाजपने प्रयत्न केला. काँग्रेसप्रमाणेच कम्युनिस्टांनाही राजकारणातून हद्दपार केले पाहिजे असा अजेंडा भाजपने हाती घेतला आणि गेली तीन वर्षे पध्दतशीर रणनिती राबवून त्रिपुरा आणि नागालँडमधे काँग्रेसचा पूर्ण पराभव केला. या दोन्ही राज्यात काँग्रेसला आपल्या पक्षाचा एकही आमदार निवडून आणता आला नाही. मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला पण त्या राज्यात भाजपने स्थानिक पक्षांशी साटेलोटे करून काँग्रेसला सत्तेच्या जवळपासही फिरकू दिले नाही. केंद्रात सत्तेवर असणारा पक्ष काय करू शकतो हे भाजपने या तिन्हीही राज्यात दाखवून दिले. काँग्रेस व कम्युनिस्ट अशा दोन्ही पक्षांना धडा शिकवला. मेघालयात भाजपने गोवा पॅटर्न राबवला. आम्ही सांगू व आम्हाला पाहिजे, त्याच्याच नेतृत्वाखाली त्रिपुरा, नागालँड व मेघालयमधे सरकार स्थापन करण्यात, भाजपची रणनिती यशस्वी ठरली.
ईशान्येकडील राज्यात भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. देशातील बावीस राज्यात भाजप सत्तेवर आहे. या विजयानंतर देशभर भाजपने जल्लोश साजरा केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या आनंदोत्सवात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा सामील झाले. मात्र एकीकडे त्या त्या राज्यात सरकार स्थापन होत असतानाच त्रिपुरामधील शासकीय महाविद्यालयासमोरील रशियन क्रांतीचे प्रणेते ब्लादिमीर लेनिन यांचा साडे अकरा फूट उंचीचा पुतळा उखडून टाकण्यात आला. कम्युनिस्टांचे सरकार उलथविल्याच्या जल्लोशात डाव्याचे आदर्श असलेल्या लेनिनच्या पुतळ्याची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. अवघ्या चोवीस तासात त्रिपुरामधील लेनिनचे दोन पुतळे भाजप कार्यकर्त्यांनी उखडून टाकले. सलग पंचवीस वर्षाच्या कम्युनिस्टांच्या राजवटीला त्रिपुरातील जनता कंटाळली होती. माणिक सरकार यांची त्रिपुराचे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून जनमानसात प्रतिमा असली तरी अँटीइनकबन्सीचा फटका त्यांच्या सरकारला बसला. निवडणुकीत भाजपने परिवर्तन अशी घोषणा दिली होती, लोकांनाही बदल पाहिजे होता. निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या कमळाला भरभरून मतदान केले. मोदी- शहांनी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन भाजप व मित्र पक्ष असलेल्या इंडिजिनिअस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांचे 60 पैकी 43 आमदार निवडून आले. जनतेने भाजपला मतदान केले ते त्या पक्षाने चांगले काम करावे, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने केंद्र सरकारने त्रिपुराला विकास कामांसाठी भरपूर निधी द्यावा, यासाठी… लेनिनचे पुतळे रातोरात तोडण्यासाठी त्रिपुरात सत्ता परिवर्तन झालेले नाही.
विशेष म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि राज्यपालांनी सुध्दा लेनिनच्या पुतळ्याच्या तोडफोडीचे सुरूवातीला समर्थनच केले. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय हे भाजपने नियुक्त केलेले आहेत. पण त्यांनीही राज्यपालपदाच्या मर्यादा सोडून तोडफोडीचे समर्थन करण्याचा उघडपणे प्रयत्न केला. लेनिनचा पुतळा ही काही सार्वजनिक मालमत्ता नाही, असे भाष्य भाजपचे नेते राम माधव यांनी करून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. लेनिनचा पुतळा पाडला तो रशियात नव्हे तर त्रिपुरात, अशी उद्दाम भाषाही त्यांनी केली. लेनिनचा पुतळा तोडताना भाजपा कार्यकर्त्यांना आपण काही तरी मर्दुमकी गाजवल्याचा आनंद होत असावा. बुलडोझरखाली पुतळा चिरडताना त्यांनी `भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. आपण पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून देण्यासाठी त्यांनी या घोषणा दिल्या की सत्ताधारी पक्षाला सर्व गुंडगिरी माफ असते, असा त्यांचा कोणी समज करून दिलाय….
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नवी दिल्लीत इंडिया गेटसमोर असलेला पंचम जार्जचा पुतळा हटवला, कोलकत्यातून राणी व्हिक्टोरियाचा पुतळा हटवला, मोदी सरकार सत्तेवर आल्यावर सन 2015 मधे दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे . अब्दुल कलाम असे नामांतर केले, मग त्रिपुरातून लेनिनचा पुतळा पाडला तर एवढा गहबज कशासाठी… असा युक्तीवाद भाजप समर्थकांनी केला.
डा. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तर लेनिन हा विदेशी व एक प्रकारे दहशतवादी होता, अशी प्रतिक्रीया दिली. लेनिनचा पुतळा आपल्या देशात हवाच कशाला असा प्रश्न त्यांनी विचारून, पाहिजे तर तो पुतळा कम्युनिस्ट पक्षाने आपल्या मुख्यालयात ठेवावा व त्याची पुजा करावी असाही सल्ला दिला.
तामिळनाडूमधील भाजपचे नेते एच. राजा यांनी तर कहर केला. ते म्हणाले, लेनिन आहे कोण… त्याचा भारताचा व कम्युनिस्टांचा संबंध काय… आज त्रिपुरामधे लेनिनचा पुतळा पाडून टाकला, उद्या तामिळनाडूत इ. व्ही, रामस्वामी (पेरियार) चा पुतळा हटवला जाईल… आणि खरोखरच चोवीस तासाच्या आतच तामिळनाडूतील वेल्लूर जिल्ह्यात तमिळ अस्मितेचे प्रतिक असलेल्या पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग हे भाजपचे भंपक नेते म्हणन प्रसिध्द आहेत. त्यांनी म्हटले, त्रिपुरात कम्युनिस्ट सरकारने पंचवीस वर्षे लोकांनी खूप त्रास दिला. लोक दुखावले गेले. त्यांच्यापैकी काहींनी बदला घेण्यासाठी लेनिनचा पुतळा पाडला.
पुतळा पाडापाडीची किंवा पुतळ्याची विटंबना करण्याची मालिका त्रिपुराच्या निकालानंतर देशभर पसरली. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यावर शाई फासण्याचा प्रयत्न कोलकता येथे झाला. तर उत्तर प्रदेशात मेरठ येथे डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली. केरळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचीही नासधूस केली गेली. लेनिनचा पुतळा पाडल्याचा निषेध गुवाहाटीत अकरा पक्षांनी रस्त्यावर येऊन केला. पुतळ्यांची तोडफोड व विटंबना करण्याचे लोण देशभर पसरले तर कायदा व सुव्यस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल, त्यांतून हिंसाचार व जाती- जातीत दंगली घडू शकतील याचे भान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना नसावे याचे मोठे आश्चर्य वाटते. त्रिपुरातील ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपचे निकालाच्या दिवशी सर्वत्र कौतुक झाले. पण विजयाचा माज चढल्यावर तोडफोडीच्या घटना सुरू झाल्याने त्याचीच चर्चा देशभर सुरू झाली. जेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासले गेले त्यानंतर मोदी आणि शहा यांनी आपल्या पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी तंबी दिली. राजकीय व सामाजिक श्रध्दास्थाने असलेल्या पुतळ्यांची विटंबना करणे मुळीच योग्य नाही व तसे करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे दोघांनी बजावले.
त्रिपुराच्या निकालानंतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिवंत माणसाच्या सुरक्षिततेपेक्षा पुतळ्याचे संरक्षण महत्वाचे वाटू लागले आहे. भावनिक प्रश्नांमधे लोकांना गुंतवून ठेवण्यातच काही राजकीय पक्षांना धन्यता वाटते. रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य व्यवस्था, वाढत्या झोपडपट्टया, बेसुमार वाढत असलेली अतिक्रमणे, कायदा व सुव्यवस्था या प्रश्नांपेक्षा पुतळ्यांची तोडफोड करून बदला घेतल्याचा विकृत आनंद काही जण मिळवत आहेत. पुण्यात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात लाल महालातून कचरा वाहून नेणार्या वाहनातून हटवला, संभाजी उद्यानात असलेला राम गणेश गडकरींचा पुतळा असाच रातारोत तोडून टाकला. पण पुतळ्यावरून राजकारण खेळणारे सामाजिक प्रश्नावर जीव तोडून संघर्ष करताना दिसत नाहीत. भ्रष्टाचाराच्या विरोधात कधी आवाज उठवत नाहीत. तरूण मुलांना परवडणार्या फीमधे उच्च शिक्षण व सामान्यांना परवडणार्या किंमतीत हक्काचे घर मिळावे म्हणून आवाज उठवत नाहीत. शिवाजी महाराज आमचे- लेनिन तुमचे, टिळक आमचे- आंबेडकर तुमचे, अण्णाभाऊ आमचे- फुले तुमचे, श्यामाप्रसाद आमचे- पेरियार तुमचे, असे समाजात भेदाभद निर्माण केले जाणार असतील तर समाज एकजिनसी कसा राहील… लेनिनचा पुतळा तोडला म्हणून आज जे गळा काढत आहेत ते दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला म्हणून किंवा गडकरींचा पुतळा तोडला म्हणन किंवा आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून कधी आक्रोश करताना दिसले नाहीत. मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर आणि बाबरी मशीद उध्वस्त झाल्यावर देश दोन विचारसणींमधे विभाजित झाला, तो अजून एकसंध झालेला नाही हेच त्रिपुराच्या निकालानंतर जो विजयाचा उन्माद प्रकटला त्यातून दिसून आले. विकासाच्या मुद्यांपेक्षा भावनिक मुद्यांनीच समाजमन ढवळून निघत आहे.
त्रिपुरामधील निवडणूक प्रचारात भाजपने 50 हजार तरूणांना नोकर्या देण्याचे आश्वासन दिले. राज्यातील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे अमिष दाखवले. शिवाय प्रत्येकाला स्मार्ट फोन भाजप देणार आहे… आश्वासनांची पूर्तता कधी होईल हे देवच जाणे, पण निवडून दिलेत तर लेनिनचे पुतळे बुलढोझर लावून तोडू, असे आश्वासन मात्र कोणी दिलेले नव्हते. पुतळा पाडल्यानंतर लेनिन कोण होता, याची चर्चा सोशल मिडियावर सुरू झाली. लेनिनचे महात्म्य वर्णन करणारी शेकडो पोस्ट फिरू लागली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम लेनिनच्या रशियाने भारतात सार्वजनिक उद्योग उभारणीत कसे योगदान केले त्याच्या याद्या झळकू लागल्या. शिक्षण, संरक्षण, अणुविज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश संशोधनात रशियाने भारताला केलेल्या मदतीचा तपशील दिला जाऊ लागला. शहीद भगत सिंग फाशीवर चढण्यापूर्वी लेनिनचे पुस्तक कोठडीत वाचत होता, अशा आठवणी सांगितल्या जाऊ लागल्या. भाजपने लेनिनचा त्रिपुरात पुतळा पाडला, पण त्याचा परिणाम लेनिन सोशल मिडियावर पुन्हा जिवंत झाला
No comments:
Post a Comment