अग्रलेख
मध्यंतरी पुण्यात पाळत ठेवून व सापळा लावून पाच बांगलादेशी जिहादींची धरपकड करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून मिळणारी माहिती थक्क करून सोडणारी आहे. मुंबई वा पुणेच नव्हे, तर महाड या रायगड जिल्ह्याच्या एका मोठ्या गावातही या लोकांचा एक साथीदार आढळला आहे. या लोकांकडे भारतीय ओळखीची कागदपत्रे व दस्तावेज असावेत, ही त्यातली सर्वात गंभीर गोष्ट आहे. एकतर ही मंडळी बेकायदा भारतात घुसखोरी करतात आणि कुठल्याही गावात शहरात येऊन वास्तव्य करतात. मिळेल ते काम कमी पैशात करतात. त्यामुळे विकसित होत असलेल्या प्रदेशात त्यांना विनाविलंब रोजगार मिळू शकतो; पण रोजगारापेक्षा त्यांना कुठे तरी आश्रय हवा असतो आणि अशा रोजगारातून तो मिळून जातो. भाषा बंगाली असल्यामुळे ते भारतीय आहेत की बांगलादेशी, त्याचा काम देणार्याला थांगपत्ता लागत नाही; पण स्वस्तातला मजूर म्हणून अशा लोकांना कुठल्याही चौकशीखेरीज सामावून घेतले जात असते. ज्यांची पुण्यात धरपकड झाली, त्यातले काही अनेक वर्षांपासून इथे वास्तव्य करीत असून, त्यांनी अड्डाच निर्माण केला होता. अशा आठ-दहा लोकांचा पाया पक्का झाला, मग ते इतरांना बोलावून घेतात. मग त्यांची ओळख ही पुरेशी ठरते आणि बांधकाम व्यवसायात नवागतांची विनाविलंब वर्णी लागत असते. हळूहळू त्यांचा एक मोहल्ला उभा राहतो आणि त्यातून उचापती सुरू होत असतात. अशा कुठल्याही शहरात वा गावात येऊन वस्त्या करणार्यांवर पोलिसांनी तरी कशी पाळत ठेवायची? मध्यंतरी एक चित्रण सोशल मीडियात व्हायरल झाले होते. कोणी राजस्थानी माथेफिरू एका बंगाली कामगाराला जीवानिशी ठार मारत असल्याचे दिसत होते. त्यातली अमानुषता निंदनीय आहे; पण त्याच्याही पलीकडे त्यात एक बाब खटकणारी होती आणि त्याविषयी कुठली चर्चा झाली नाही. एक मोलमजुरी करणारा बंगाली कामगार राजस्थानात काय करीत होता? त्याचे असे कोणते कौशल्य आहे, की तसे काम करणारा राजस्थानी मजूर मिळू शकत नव्हता? राजस्थानातून दिल्ली वा मुंबईपर्यंत रोजगारासाठी येणारे शेकडो लोक आहेत. मग त्याच राजस्थानात असे साधे मजुरी करणारे बंगाली येतातच कशाला व करतात काय? हा प्रश्न तिथे विचारला गेला नाही, की आता पुणे-महाड वा महाराष्ट्राच्या अनेक तालुके, शहरांत दिसणार्या या बंगाली मजुरांबद्दल तो प्रश्न विचारला जात नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या विकसित होणार्या अनेक लहानसहान शहरांत असले बंगाली मजूर दिसतील. ते खरोखरच बंगाली आहेत, की बांगलादेशी आहेत, याचा कोणी तरी तपास करणार की नाही? की अशा प्रत्येक मजुराचा शोध घेण्याचे काम फक्त पोलिस यंत्रणेनेच करायचे आहे? सामान्य नागरिक वा कंत्राटदार म्हणून बाकी कोणाची जबाबदारी नाही काय?
तुम्ही कुठल्याही शहरात वा महानगरात वास्तव्य करणारे भारतीय असलात, तरी आपल्या सुरक्षेची काळजी आपणही घेतली पाहिजे आणि ते आपले व्यक्तिगत नव्हे, तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या आसपास वावरणारे धोके वा संकटे दिसत असतानाही तिकडे काणाडोळा करणार असू, तर पोलिस यंत्रणा आपली सुरक्षा करू शकत नाही. आताही पुण्यात ज्या टोळीला पकडलेले आहे, त्यांच्यापाशी खतरनाक हत्यारांचा साठा मिळालेला आहे आणि तेही कुठल्या तरी बांधकामाच्या जागी सामान्य दर्जाची मोलमजुरी करत होते. हे लोक इतरवेळी काय करतात? कामधंदा सोडून त्यांचे वर्तन किती संशयास्पद आहे? त्यांच्यात काय कुजबुज चालते, याची माहिती तिथे वास्तव्य करणार्यांना सहज मिळू शकत असते. किमान त्यातल्या शंकास्पद व विचित्र भासणार्या गोष्टींविषयी नजीकच्या पोलिसांना कळवले, तरी आपल्याच जीवाला संभवणारा धोका कमी होत असतो. माध्यमांना वा पोलिसांना अशा शंका कळवल्या, तरी त्यांचे काम सोपे करण्याला हातभार लावला जातो. पाच-सात बांगलादेशी पुणे वा अन्यत्र कुठे असतील, तर त्यांचे वेगळेपण लपून राहणारे नाही. त्यांच्या वागण्याबोलण्यातूनही अनेक गोष्टी खटकू शकतात. तितकी चिकित्सकवृत्ती नागरिक दाखवू शकले असते, तर या संशयितांना खूप आधीच पोलिस पकडू शकले असते. त्यांना दूरवर पसरलेले जाळे विणता आले नसते. पुण्यातल्या संशयितांच्या कबुलीजबाबातून महाडचे संशयित हाती लागतात. याचा अर्थ अशा भुरट्यांनी महाराष्ट्राच्या अनेक शहरे व तालुक्यांत मोठे जाळे विणलेले असू शकते. त्याचा केवढा मोठा धोका राज्याला आहे? आपण कधी त्याचा समंजसपणे विचार करतो काय? करत नसू तर सरकारला दोष देण्यात अर्थ आहे काय? एक तर बेकायदा असे लोक आपल्या देशात येऊन वास्तव्य करतात आणि पुन्हा इथेच उत्पात घडवण्याची कारस्थाने शिजवीत असतात. त्यांच्या अशा कारस्थानांकडे कायद्यापेक्षा आपणच काणाडोळा करतो. एक प्रकारे मग आपणच त्यांच्या घातपाती कारवायांना हातभार लावत नाही काय? नागरिक म्हणून आपण थोडी जागरूकता दाखवली, तरी किती मोठमोठे घातपात टाळण्यात पोलिसांना यश मिळू शकेल. ज्या बांधकाम स्थानी ही टोळी काम करत होती, तिथल्या कुणा सावध मुकादम वा इंजिनिअरने डोळसपणे त्याकडे बघितले असते, तरीही खूप आधी कारवाई होऊ शकली असती आणि हे जाळे विस्तारले नसते; पण स्वस्तातला मजूर व किमान गरजेत बिनतक्रार काम करणारा, या मोहात सापडलेले ठेकेदार, अशा संकटांना आमंत्रण देत असतात. सरकार व पोलिस आपले काम करतीलच; पण नागरिक म्हणून आपली नेमकी काय जबाबदारी आहे, ते आपणच ठरवले पाहिजे. कारण, जीव सरकारचा नव्हे, आपला जाणार असतो, हे विसरता कामा नये
२०२१ पूर्वी आसम.प बंगालच्या मुख्यमंत्रिपदी
दोन बांगलादेशी ?
-LATEST MUST READ BOOK BY BRIG
HEMANT MAHAJAN,AVAILABLE WITH
BHARTIYA VICHAR SADHANA,PUNE,BHAVISA BHAVAN,1214,15 NEAR PERUGETBHAVE HIGH SCHOOL TELE 020-24485632
BHARTIYA VICHAR SADHANA,PUNE,BHAVISA BHAVAN,1214,15 NEAR PERUGETBHAVE HIGH SCHOOL TELE 020-24485632
No comments:
Post a Comment