शेतकरी हा उद्योजक आहे ही भावना आम्ही रुजवू शकलो नाही. शेतकरी हा उत्पादक आहे हा विचार आम्ही पेरू शकलो नाही. जमिनीवर अत्यंत अत्याचार करून त्या जमिनीतून जास्तीत जास्त पीक काढणे, उत्पन्न काढणे हा एकच दृष्टिकोन आम्ही राबवत राहिलो.
गेल्या दहा वर्षात राज्यात हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा अर्थ हजारो कुटुंबे गेल्या दहा वर्षात उद्ध्वस्त झाली. शेतक-यांवर आत्महत्या करायची पाळी येते. सरकार त्या शेतक-यांना मदतीसाठी पॅकेज दिल्याचे जाहीर केले जाते. या पॅकेजमध्ये घोटाळा होतो म्हणून प्रशासकीय अधिका-यांवर कारवाई करायची वेळ येते. शेतक-यांना मदतीच्या जाहीर केलेल्या पॅकेजमध्येही घोटाळा होतो. हा प्रकार म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार आहे.
सरकार नावाची यंत्रणा या राज्यात, या देशात काय काम करते आणि काय त्यांचा उपयोग आहे असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. आज शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे आम्ही सांगतो. पण तो कणाच मोडलेला, पोखरलेला असेल तर आम्ही आमची अर्थव्यवस्थाच मोडून काढायला निघालो आहोत, असे दिसून येते. यासाठी सर्वात प्रथम कृषी क्षेत्राकडे उद्योग म्हणून पाहायची दृष्टी निर्माण केली पाहिजे. आपला शेतकरी हा कर्जबाजारी का होतो? दिलेल्या कर्जाचा त्याला बोजा का वाटतो? त्यापायी त्याला आपल्या जमिनी का गमवाव्या लागतात? स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडून, सावकारांकडून, जमीनदारांकडून शेतक-यांचे शोषण होत होते. त्यांना कर्जबाजारी करून त्यांच्या जमिनी घेतल्या जात होत्या. मग स्वातंत्र्यानंतरही या परिस्थितीत का बदल झाला नाही?
शेतकरी हा उद्योजक आहे ही भावना आम्ही रुजवू शकलो नाही. शेतकरी हा उत्पादक आहे हा विचार आम्ही पेरू शकलो नाही. जमिनीवर अत्यंत अत्याचार करून त्या जमिनीतून जास्तीत जास्त पीक काढणे, उत्पन्न काढणे हा एकच दृष्टिकोन आम्ही राबवत राहिलो. त्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार मारा करून संकरीत आणि नवनवी पिके निर्माण केली. चवदार धान्यापेक्षा संकरीत असे धान उत्पादन वाढवले. पिके, आंतरपिके घेऊन जमिनीचा जास्तीत जास्त लाभ उठवला. मात्र त्या जमिनीचा पोत कायम राहण्यासाठी फारसे प्रयत्न केले गेले नाहीत. परिणामी जमिनीची नापिकी वाढू लागली. या नापिकीमुळे जमिनीत होणारी गुंतवणूक आणि शेतीवरील खर्च करण्याची शक्ती कमी झाली. कर्ज परतफेड करणे अशक्य झाले. हे सगळे नियोजन नसल्यामुळे होत गेले आहे. शेतीच्या योग्य नियोजनासाठी आज गरज आहे ती शेती व्यवस्थापनाचे शिक्षण घेण्यासाठी.
केवळ उत्पादन करणे म्हणजे शेती नव्हे. शेतीचे फक्त उत्पादन केले तर त्या उत्पादनाचा विकण्याचा अधिकार शेतक-यांकडे राहात नाही. फायदा फक्त मध्यस्थांचा आणि दलालांचा होत राहतो. आपल्या मालाची किंमत दलाल आणि मध्यस्थ ठरवणार. हे नाकारायची ताकद शेतक-यांमध्ये आली पाहिजे. आजची शेती ही पिकवण्याऐवजी बांधकामे करून नगरविस्तारासाठी केली जात आहे. जमिनी नापिक ठरवून गावठाण विस्तार आणि नागरिकीकरणासाठी वापरल्या जात आहेत. याला कुठे तरी आळा बसला पाहिजे. किती जमिनीत किती काळात किती उत्पन्न मिळाले पाहिजे याचे गणित बांधता आले पाहिजे. त्याचा ताळेबंद हाताच्या बोटावर न राहता तो कागदोपत्री आला पाहिजे. शेतक-यांचे व्यवहार हे कागदोपत्री आले पाहिजेत. शेतक-यांच्या मालाला किंमत नाही अशी अवस्था होता कामा नये.
सांगलीच्या बाजारात तासगांव आणि आसपासहून बेदाणे विकायला येतात तेव्हा बाजारातील दलाल ते बेदाणे चांगल्या दर्जाचे आहेत काय हे पाहण्यासाठी बेदाण्याची पाकिटे फोडून उधळून टाकतात. जमिनीवर असा दररोज कित्येक क्विंटल बेदाण्यांचा नाश होत असतो. ही झळ शेतक-यांना सोसावी लागते. अन्य कोणत्याही औद्योगिक उत्पादनाची टेस्ट घेताना आपण एवढा नाश करतो काय? मग शेतीच्या मालाचाच का असा नाश केला जातो? शेतक-यांनी अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्या उत्पादनाला दलालांना हात लावून देण्यापूर्वी त्याचा नाश होणार नाही, नासाडी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी योग्य व्यवस्थापन तंत्र समजून घेतले पाहिजे. माझा मुलगा डॉक्टर, इंजिनीयर होईल असले स्वप्न पाहण्यापेक्षा तो तज्ज्ञ प्रगतशील शेतकरी होईल, असे स्वप्न सत्यात आणले पाहिजे. कृषी व्यवस्थापनाचा अभ्यास केला पाहिजे. उत्पादनाबरोबरच वितरणाचे तंत्र त्याला अवगत झाले पाहिजे. मालाला योग्य किंमत येईपर्यंत त्याची साठवणूक करण्याची कला त्याला प्राप्त झाली पाहिजे. मोठाली घरे आणि बंगले बांधतानाच धान्यसाठा करण्यासाठी सोय करण्याची खबरदारी घेता आली पाहिजे.
घर बांधणीसाठी कर्ज न घेता धान्याची कोठारे बांधण्यासाठी कर्ज त्यांनी घेतली पाहिजेत. मध्यस्थांना टाळून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे. आपल्याच गोदामातील साठवलेल्या मालाच्या तारणावर त्याला कर्ज मिळवता आले पाहिजे. आपण स्वत:च्या शयनगृहात वातानुकूलित हवामानाची योजना करत असू, घरात टीव्ही, फ्रीज, गाडी अशा सगळ्या सुविधा घेत असू, दागदागिने करत असू तर ज्यापासून हे सगळे मिळणार आहे त्या धान्यउत्पादनासाठी, साठवणीसाठी चांगली कोठारे निर्माण करण्याची जबाबदारी घेतली तर बाहेरच्या कोठारांवर अवलंबून राहून आपले नुकसान शेतक-यांना करावे लागणार नाही. बाजारपेठेत चढ-उतार हे असतातच. आज शेअरमार्केटमध्ये कमोडीटी बाजारात पैसा गुंतवून गहू, साखर, गूळ यावर शेती उत्पादन न करणारे पैसे लावून नफा कमावतात. मग आपल्याच मालावर आपण का नाही नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत? आज शेती शिक्षणासाठी आरक्षणाचा नियम करणे गरजेचे आहे.
कृषी उत्पन्नावर जसा आयकर नसतो त्याप्रमाणेच कृषीविषयक विविध प्रकारचे शिक्षण देणा-या संस्था आणि शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विशेष अनुदान दिले पाहिजे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. औद्योगिक उत्पादन करताना यंत्रणेची संपूर्ण क्षमता पणाला लावून कधी उत्पादन केले जात नाही. मात्र जमिनीची उत्पादकता शंभर टक्के पणाला लावली जाते. आपल्या जमिनीपैकी काही भाग आलटून पालटून पीक न घेता त्या जमिनीला विश्रांती देण्याचा प्रयोग आपल्याला करता आला पाहिजे. शेतक-याने आता आपला लढा आपणच लढला पाहिजे. त्यासाठी त्यांनी योग्य प्रकारचे व्यवस्थापन करून स्वत:चा मार्ग निर्माण करायचा आहे.
No comments:
Post a Comment