Total Pageviews

Friday, 9 March 2018

श्रीलंका पेटली-PUDHARI



पुन्हा एकदा लंकादहन व्हायची वेळ आलेली आहे. तीन दशके तामिळी वाघांच्या हिंसाचाराने होरपळलेल्या श्रीलंकेला गेल्या सात वर्षांत शांततेचा श्‍वास घेता आलेला होता. राजपक्षे या नेत्याने वाघांचे निर्दालन करण्याचा निर्धार व्यक्त करून लोकांचा कौल मागितला आणि तो मिळाल्यावर निष्ठूरपणे दहशतवाद संपवला होता. तेव्हापासून श्रीलंकेतील वातावरण निवळले होते. तामिळी वाघांच्या बालेकिल्ल्यात घुसून लष्कराने कारवाई केली आणि एक एक वाघ टिपून मारला होता. त्यानंतर सात वर्षे कुठल्याही हिंसेला श्रीलंकेत स्थान नव्हते. अपवाद होता चार वर्षांपूर्वीच्या मुस्लिम-बौद्ध दंगलीचा. तिथे मुस्लिमांशी बहुसंख्य बौद्ध लोकसंख्येचा खटका उडाला आणि जागोजागी दंगली उसळल्या होत्या. त्याला अर्थातच म्यानमार देशातील तशा दंगलीची पार्श्‍वभूमी होती. मुस्लिम आपली लोकसंख्या वाढवतात आणि श्रीलंकेचे सामाजिक संतुलन बिघडवत आहेत, असा मूळचा आक्षेप आहे. त्यातून हा संघर्ष पेटलेला आहे. मध्यंतरी म्यानमार येथून हिंसाचाराने परागंदा झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांना अनेक देशांत आश्रय घ्यावा लागला. त्यात खर्‍या अगतिक व उद्ध्वस्त रोहिंग्यांपेक्षा जिहादी मुस्लिमच परदेशात घुसले असल्याच्या तक्रारी भारतात व अन्यत्रही झाल्या होत्या. तीच श्रीलंकेची कहाणी आहे. तिथे रोहिंग्या मुस्लिम आल्यापासून त्यांनी स्थानिक बौद्धांना त्रास द्यायला आरंभ केल्याची कुरबुर दीर्घ काळ चालू होती; पण राजकीय लोक अशा विषयात अल्पसंख्याकांचे समर्थन करतात. त्यातून संघर्षाची ठिणगी पडत असते. इथेही तेच झाले आणि बौद्ध धर्मगुरू व भिख्खूंनी त्यात पुढाकार घेतला. कँडी हे मध्य श्रीलंकेतील एक मोठे शहर असून तिथल्या एका ट्रक ड्रायव्हरशी चार मुस्लिमांची हाणामारी झाली. त्यात जखमी झालेला तो ड्रायव्हर नंतर मरण पावला. तो बौद्ध होता आणि त्याच्या अंत्ययात्रेनंतर हिंसेचा भडका उडाला. कँडीनजीकच्या एका उपनगरात बौद्धांनी मुस्लिम वस्तीवर हल्ला चढवून दुकाने व घरेदारे पेटवून दिली. तो हिंसाचार इतका भयंकर होता, की देशाच्या सत्तेने विनाविलंब देशात आणीबाणी घोषित करून टाकली. त्याचे मुख्य कारण दोन समाजघटकांतील विकोपास गेलेले वैर हेच आहे. मध्यंतरी भारतातील इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याच्यावरून काहूर माजले होते आणि आपल्या प्रवचनातून तो जिहादला प्रोत्साहन देतो, असा गवगवा झाला होता. त्याचीच एक संस्था श्रीलंकेत कार्यरत असून केरळातील अनेक तरुणांना तिथे प्रशिक्षित करायला धाडले जात असल्याच्याही बातम्या आलेल्या होत्या. त्यातून सध्या उफाळलेल्या हिंसेचे कारण लक्षात येऊ शकेल. जी मूठभर मुस्लिम लोकसंख्या त्या देशात आनंदाने इतकी वर्षे नांदलेली आहे, तिथे जिहादी घुसल्याने समन्वय बिघडला म्हणता येईल.
श्रीलंकेची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा थोडी अधिक असून  त्यातील 70 टक्के बौद्धधर्मीय आहेत. उरलेल्यांमध्ये 13 टक्के तामिळी व 9 टक्के मुस्लिम आहेत. बाकीचे ख्रिश्‍चन व अन्य श्रद्धा पाळणारे आहेत. तिथे आश्रित, निर्वासित म्हणून आलेल्या रोहिंग्यांविषयी बौद्धांमध्ये आधीचाच राग आहे. कारण, त्यांनीच म्यानमारच्या बौद्ध समाजाला त्रास दिल्याचा पूर्वग्रह आहे. त्यातच अशा काही किरकोळ घटना घडल्या. मग भडका उडत असतो. भारतातील बौद्ध व अन्य देशांत बहुसंख्य असलेले बौद्ध यामध्ये मोठा फरक आहे. तिथे बौद्ध धर्माचे नेतृत्व राजकीय नसून धर्मगुरूंकडे असते आणि बाकीच्या राजकारणात बौद्धांना राजकीय पक्ष नेतृत्व देत असतात. सरकारे पुरोगामी वा सेक्युलर असल्याने धर्माचे राष्ट्र वा राज्य नाही; पण त्यामुळेच बहुसंख्य लोकसंख्येचे धार्मिक नेतृत्व धर्ममार्तंडांकडे राहिलेले आहे. त्यांचा लोकसंख्येवर इतका प्रभाव आहे, की त्यांनी हाक दिल्यावर हजारोंच्या संख्येने लोक बाहेर पडतात आणि कुठलाही हिंसाचार करू लागतात; मात्र जितका बौद्ध-मुस्लिम हिंसाचार होतो, तसा इतर धर्मीय व बौद्धांचा खटका उडालेला नाही. तामिळी वाघांचा दहशतवाद दीर्घ काळ चालला व त्याचे नेतृत्व हिंदू असूनही बौद्धांशी जातीय हिंसाचार होऊ शकला नव्हता; पण मुस्लिमांचे नेतृत्वही धर्मगुरूच करत असल्याने दोन गटांच्या धर्मगुरूंकडे या संघर्षाचे नेतृत्व गेलेले आहे. 2014 सालात पेटलेला दुजाभाव थांबलेला होता; पण आता रोहिंग्या निर्वासितांची भर पडल्याने पुन्हा बौद्धांना आपल्यावर लोकसंख्येने आक्रमण होत असल्याची भावना दुणावली आहे. मूळच्या द्वेष व रोषाला कुठली तरी ठिणगी पुरेशी असते. ट्रक ड्रायव्हरचा मुस्लिमांशी झालेला संघर्ष म्हणूनच इतका भडका उडवून गेला. तत्काळ सैन्याला पाचारण करून सरकारने तिथे संचारबंदी लागू केली व आणीबाणी घोषित केली. या घोषणेतच किती स्फोटक स्थिती असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो. 13 टक्के हिंदूंशी तिथल्या बौद्धांचा कुठे खटका उडत नसेल, तर 9 टक्के मुस्लिमांशी बौद्धांचे इतके वैर कशाला, त्याचेही परिशीलन आवश्यक आहे. नुसताच धर्मनिरपेक्षतेचा झेंडा उचलून भागत नाही. विविध समाजघटकांत असलेले वैर किंवा पूर्वग्रह दूर करून त्यांच्यात सामंजस्य व सौहार्द निर्माण करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. नुसते कायदे वा जनभावनेला दाबून सत्ता शांतता नांदवू शकत नसते. एकूण लोकसंख्येत परस्पर विश्‍वासाचे वातावरण निर्माण करणे अगत्याचे असते. रोहिंग्या निर्वासितांना सामावून घेताना त्याचेच भान राखले गेले नसल्याचा हा दुष्परिणाम आहे. त्याला वेळीच वेसण घातली गेली नाही, तर मारुतीचे पेटलेले हे शेपूट नव्या लंकादहनाची सुरुवात करण्याचा धोका आहे; पण सरकारने तत्काळ आणीबाणी घोषित करून विषयाची जाण असल्याचा तरी संकेत दिला आहे.


No comments:

Post a Comment