Total Pageviews

Thursday, 1 March 2018

गेल्या आठवड्यात उबरचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खुस्रोशाही भारतात आले होते. गेल्या वर्षी आपला चीनमधील व्यवसाय डीडीला विकून उबर तेथून बाहेर पडली. त्यामुळे उबरसाठी भारताची बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.



देशातील चारचाकी वाहनांची संख्या पाहाता १००० लोकांसाठी सुमारे ४० गाड्या आहेत. त्यांच्या संख्येने आजच्या गतीने वाढ झाल्यास २०२० पर्यंत हाच आकडा जवळपास दुप्पट आणि २०४० पर्यंत पाचपट होईल, असा अंदाज आहे. तरीही २०४० साली हजारी २०० हून कमी गाड्या असतील. आज अमेरिका आणि बहुतांश विकसित देशात गाड्यांची संख्या हजारी ७०० हून अधिक आहे. वाहनकोंडी, प्रदूषण, त्यातून सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, एका ठिकाणहून दुसर्‍या ठिकाणी जायला लागणार्‍या वेळामुळे घटणारी क्रयशक्ती, पेट्रोेलियमआयातीचे वाढते बिल या सर्व समस्या आणखी जटिल होतील. केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्या भेडसावत आहेत. माहिती-तंत्रज्ञान आणि एकूणच चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये ‘मोबिलिटी’ म्हणजेच अमुक एका व्यक्तीला, वस्तूला किंरा सेवेला ‘अ’ ठिकाणाहून ‘ब’ ठिकाणी पोहोचविण्याच्या उद्योगाला सर्वाधिक महत्त्व आलं आहे. ‘मोबिलिटी’ या संज्ञेची व्याख्या बरीच विस्तृत असून त्यात वीज किंवा बॅटरीवर चालणारी वाहनं, चालकरहित वाहनं, सौरऊर्जेवर चालणारी वाहनं, दळणवळणाच्या विविध पर्यायांचे एकत्रिकरण असे बरेच विषय येत असले तरी सर्वात पहिले डोळ्यांसमोर येते ती चालकांना एकत्रित करून प्रवाशांना तिच्याशी जोडणारी ई-टॅक्सी उबर.

गेल्या आठवड्यात उबरचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खुस्रोशाही भारतात आले होते. २००९ साली सिलिकॉन व्हॅलीमध्ये जन्मलेली उबर अल्पावधीतच सुमारे ४० देशांतील ६५० शहरांत सेवा पुरवू लागली. टॅक्सीचालकांची मनमानी, मीटरहून जास्त दर आकारणी आणि प्रवाशांच्या; खास करून महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्नांमुळे ग्रस्त असलेल्या या क्षेत्राला उबरच्या रूपाने जादूचा दिवाच सापडला. एकाही गाडीची मालकी नसलेली उबर, अल्पावधीतच जगातील सर्वात मोठी टॅक्सी सेवा बनली. प्रचंड तोटा सहन करत असूनही जागतिक गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे उबर जगातील १० मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली. उबरच्या प्रवासातही खाचखळगे कमी नाहीत. उबरने जगभरातील टॅक्सीचालक-मालक संघटनांचा रोष पत्करला. चालकांची पार्श्वभूमी नीट न तपासल्यामुळे त्यांच्याकडून घडलेले अपघात ते अगदी बलात्कारापर्यंतचे गुन्हे, कंपनीच्या संस्थापकांकडून होत असलेली पैशाची उधळपट्टी, महिला कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण, कर चुकवेगिरी यामुळे अनेक देशांमध्ये उबरवर बंदी किंवा कडक निर्बंध लादले गेले. उबरच्या वाढत्या तोट्यामुळे आणि मलिन झालेल्या प्रतिमेमुळे अखेर संस्थापक ट्रॅविस कालानिकला जून २०१७ मध्ये राजीनामा द्यावा लागला. त्याची जागा इराणमध्ये जन्मलेल्या दारा खुस्रोशाही यांनी घेतली. एकीकडे कंपनीची प्रतिमा सुधारण्यासोबतच उबरच्या जीवावर उठलेली देशोदेशींची सरकारे, कामगार संघटना आणि स्पर्धक ई-टॅक्सी कंपन्यांना तोंड देणे आणि प्रवाशांच्या वाहतुकीखेरीज मोबिलिटीच्या बृहत् व्याख्येतील अन्य क्षेत्रात स्थान निर्माण करणं, अशी दुधारी आव्हाने दारापुढे आहेत. उबरला मोठे होताना पाहून देशोदेशीच्या नवउद्यमींनी उबरची नक्कल करून स्थानिक बाजारात आपले स्थान निर्माण केले. मग ती भारतातील ओला असो, आसियान देशांतील ‘ग्रॅब’, दक्षिण अमेरिकेतील ‘नाइन्टी नाइन’, अमेरिकेतील ‘लिफ्ट’ अशी अनेक नावे घेता येतील. चीनच्या डीडी चुशिंगने उबरला टक्कर देत जगातील सगळ्यात मोठ्या बाजारपेठेतून तिला माघार घ्यायला लावली.

गेल्या वर्षी आपला चीनमधील व्यवसाय डीडीला विकून उबर तेथून बाहेर पडली. त्यामुळे उबरसाठी भारताची बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यासाठीच दारा खुस्रोशाहीनी आपल्या भारतभेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आणि शाहरूख खानसोबत सेल्फी काढला. बोलण्याच्या ओघात दारांनी भविष्यात ओला आणि उबरच्या एकत्रिकरणाचे संकेत दिले. वरकरणी अनाकलनीय वाटणारी ही गोष्ट शक्य आहे, कारण दोन्ही टॅक्सी कंपन्यांच्या पाठी एकच मासा आहे. जपानच्या ‘सॉफ्ट बँक’ या बलाढ्य जोखीमभांडवल संस्थेचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन हे ’मासा’ या टोपणनावाने ओळखले जातात. जपानमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या सोन यांना अगदी तरुण वयापासून भविष्यात मोठ्या होऊ शकणार्‍या उद्योगांत गुंतवणूक करण्याचा छंद, म्हणावा तर व्यसन आहे. याहू आणि अलिबाबासारख्या कंपन्यांचे शेअर कवडीमोल भावाने घेऊन त्यावर गडगंज नफा कमावणारा मासा तीन दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला होता. डॉट कॉमचा फुगा फुटल्याने अल्पावधीतच त्याची संपत्ती ७० अब्ज डॉलरने कमी झाली असली तरी त्याची गुंतवणुकीची भूक मात्र वाढतच गेली. ’मासा’ने भविष्यातील उद्योगांत गुंतवणुकीसाठी १०० अब्ज डॉलरचा मूमेंटमफंड उभारला असून केवळ ४५ मिनिटांच्या बैठकीत त्याने सौदीचे युवराज महंमदकडून या फंडासाठी ४५ अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळवली. मोबिलिटी क्षेत्रामध्ये प्रचंड भवितव्य दिसत असल्यामुळे मासाने एकापाठोपाठ एक ई-टॅक्सी कंपन्यांत गुंतवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. ओला, ग्रॅब, डीडी चुशिंग आणि नाइन्टी नाइन नंतर ’मासा’ने अडचणीत सापडलेल्या उबरकडे लक्ष वळवले. स्पर्धक कंपन्यांची भीती दाखवत ‘मासा’ने उबरचे १५ टक्क्यांहून अधिक समभाग ३० टक्के सवलतीत मिळवले. एकीकडे ई-टॅक्सी क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करताना या क्षेत्राशी संलग्न सिलिकॉन चिप, मोबाइल सेवा, ई-कॉमर्स इ. उद्योगांतही मासायोशी सोन यांच्या सॉफ्ट बँकेने गुंतवणूक केली आहे. भारतातील आय-मोबी, स्नॅपडिल, ओयो, ओला ते फ्लिपकार्ट अशा आघाडीच्या स्टार्ट-अप कंपन्यांमध्ये सॉफ्ट बँकेने ६.५ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. मोबिलिटी क्षेत्रातील इकोसिस्टिममध्ये शिरकाव केल्यामुळे मासा सोन यांच्या कंपन्यांना भविष्यात ई-टॅक्सी कंपन्यांचे एकत्रिकरण, त्यांच्या माध्यमातून ई-कॉमर्स किंवा हॉटेलमधील ऑर्डर घरपोच करणे, खाजगी गाड्यांचा टॅक्सीप्रमाणे वापर, वाहन कंपन्यांशी बोलणी करून टॅक्सी उद्योगांसाठी खास गाड्या बनवणे, गाड्यांमध्ये बसवलेल्या टीव्ही-टॅबलेटवरील मनोरंजन आणि जाहिराती, ट्रॅफिक व्यवस्थापन, शहरांतील तोट्यात गेलेली परिवहन सेवा ताब्यात घेऊन किफायतशीर सेवा पुरवणे अशा अनेक गोष्टी करणं शक्य होणार आहेत.

मोबिलिटी क्षेत्रातील क्रांतीमुळे रस्ते व अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लागणार्‍या भांडवलाची कमतरता, भांडवल मिळाल्यास रस्ते आणि अन्य सुविधा उभा करण्यास लागणारा मोठा वेळ, दुसरीकडे वाहनांची वाढती संख्या आणि लोकांची प्रवासाची वाढलेली गरज अशा कात्रीत सापडलेल्या भारतासारख्या विकसनशील देशांसाठी ही जादूची कांडी असली तरी या क्षेत्रामुळे सध्याच्या उद्योगांवर तसेच रोजगारावर होणारा विपरित परिणामआणि दुसरीकडे नवीन प्रकारच्या रोजगारांसाठी आवश्यक तंत्रकुशल कामगार पुरविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. त्याचबरोबर या मोबिलिटी क्षेत्रात भारत ही केवळ बाजारपेठ न राहता भारतात जन्मलेल्या स्टार्ट-अप कंपन्यांनी मोठे होऊन जगाच्या बाजारपेठेचा एक हिस्सा काबीज करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच विदेशनीतीच्या दृष्टीने चीनचे शी जिनपिंग आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याइतकेच मोबिलिटीच्या क्षेत्रातील उबरचे दारा खुस्रोशाही आणि सॉफ्ट बँकेचे मासायोशी सोनही महत्त्वाचे आहेत

No comments:

Post a Comment