Total Pageviews

Wednesday, 28 March 2018

लोकशाही देशांपुढे पर्याय म्हणून एकीकडे चीन आणि रशियाचे आव्हान उभे ठाकले असतानाच दुसरीकडे केंब्रिज अॅनालिटिका आणि फेसबुकच्या प्रकरणामुळे भविष्यात खुल्या व मुक्त निवडणुका होऊ शकतील का?

 हा प्रश्न ऐरणीवर आला. मतदारांबद्दल माहिती शोधून काढून, ती संरचित करून त्यांच्या वागण्याचा तसेच मतदानाला परावृत्त करणार्‍या परिस्थितीचा अभ्यास गेली अनेक दशकं चालू आहे. अनेक कंपन्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे काम करून राजकीय पक्षांना तसेच नेत्यांना प्रचाराचे कोणते मुद्दे कोणत्या मतदारांपुढे आणि कुठल्या वेळी उपस्थित करावेत याबाबत मार्गदर्शन करतात.
 
अमेरिकेचे अध्यक्ष इकडे पुतीन आणि तिकडे पोर्नस्टार अशा कोंडीत सापडले आहेत. प्रौढ चित्रपटात काम करणार्‍या स्टॉर्मी डॅनियलने टीव्हीवर मुलाखत देऊन ट्रम्पशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आणि ते दडवण्यासाठी ट्रम्प यांच्या वकिलाकडून मिळालेल्या पैशाबद्दल आणि धमक्यांबद्दल जाहीर वाच्यता केल्यामुळे ट्रम्प यांची पंचाईत झाली आहे. ट्रम्प यांच्या रंगेल स्वभावाबद्दल आजवर बरीच चर्चा झाल्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाला नसला तरी एरवी आपल्या विरोधकांवर ट्विटरच्या माध्यमातून अश्लाघ्य टीका करणार्‍या ट्रम्प यांना स्टॉर्मी डॅनियलवर टीका करण्याची फारशी सोय नाही. जेवढी टीका करावी तेवढी त्यांना प्रसिद्धी मिळणार आणि ट्रम्प यांची आणखी बदनामी होणार. कदाचित या कारणामुळेच ट्रम्प अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत. व्लादिमीर पुतीन यांचे रशियातील निवडणुकांमधील विजयाबद्दल अभिनंदन केल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या ट्रम्पनी सोमवारी तडकाफडकी अमेरिकेतील ६० रशियन राजनैतिक अधिकार्‍यांना देश सोडून जायला सांगितले. याशिवाय रशियाला सीएटल येथील आपला वाणिज्य दूतावास सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यास सांगण्यात आले. इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेले रशियाचे माजी हेर निकोलाई ग्लश्कोव, सर्जेई स्क्रिपाल आणि त्याची मुलगी युलिया यांच्यावर नर्वगॅसचा प्रयोग केल्यामुळे ब्रिटन आणि रशियातील संबंध ताणले गेले असून दोघांनी एकमेकांच्या दूतावासातील २३ राजनैतिक अधिकार्‍यांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. या वादात अमेरिकेने ब्रिटनच्या बाजूने एवढी मोठी उडी घेतल्याने २० युरोपीय देश, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने एकत्रितपणे आपल्या येथील १०० हून अधिक रशियन राजनैतिक अधिकार्‍यांना देश सोडून जायला सांगितले आहे. रशिया विरुद्ध पाश्चिमात्त्य जगातील नव्या शीतयुद्धाची ही तर केवळ सुरुवात आहे.
 
एकीकडे रशियाविरुद्ध आघाडी उघडताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार युद्ध अधिक तीव्र केले आहे. तंत्रज्ञानाची चोरी आणि कृत्रिम सवलती देऊन अमेरिकेला निर्यात करण्याची शिक्षा म्हणून चीनकडून होणार्‍या माहिती-तंत्रज्ञान, दूरसंचार, ग्राहकोपयोगी उत्पादनं इ. क्षेत्रातील सुमारे ६० अब्ज इतक्या मूल्याच्या निर्यातीवर वाढीव शुल्क लावले आहे. चीन अमेरिकेला करत असलेली निर्यात ही आयातीपेक्षा ३७५ अब्ज डॉलर अधिक असून चीनने ती १०० अब्ज डॉलरच्या मर्यादेत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चीनला सांगण्यात आले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतून आयात होणार्‍या तीन अब्ज डॉलर मूल्याच्या, मुख्यतः कृषिमालावर आयात कर लावले आहेत. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी संतुलित भूमिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मिकमास्टर यांची हकालपट्टी करून त्यांच्याजागी अत्यंत आक्रमक व युद्धखोर विचारांचे जॉन बोल्टन यांना त्यांच्या जागी नेमले. बोल्टन तसेच गेल्या काही आठवड्यांतील केलेल्या नियुक्त्यांमुळे ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण अधिकाधिक आक्रमक होणार आहे.
 
लोकशाही देशांपुढे पर्याय म्हणून एकीकडे चीन आणि रशियाचे आव्हान उभे ठाकले असतानाच दुसरीकडे केंब्रिज अॅनालिटिका आणि फेसबुकच्या प्रकरणामुळे भविष्यात खुल्या व मुक्त निवडणुका होऊ शकतील का? हा प्रश्न ऐरणीवर आला. मतदारांबद्दल माहिती शोधून काढून, ती संरचित करून त्यांच्या वागण्याचा तसेच मतदानाला परावृत्त करणार्‍या परिस्थितीचा अभ्यास गेली अनेक दशकं चालू आहे. अनेक कंपन्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे काम करून राजकीय पक्षांना तसेच नेत्यांना प्रचाराचे कोणते मुद्दे कोणत्या मतदारांपुढे आणि कुठल्या वेळी उपस्थित करावेत याबाबत मार्गदर्शन करतात. माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे अशा प्रकारचे काम करणार्‍या कंपन्यांची सर्वेक्षणं अधिक व्यापक आणि अचूक ठरू लागली आहेत. लंडनस्थित ‘केंब्रिज अॅनालिटिका’ तसेच तिची पालक कंपनी ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स लॅबोरेटरीज’ या कंपन्या अशा सर्वेक्षणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.
 
फेसबुक हा जर देश असता तर लोकसंख्येच्या बाबतीत तो जगात पहिल्या क्रमांकावर असता. चीनमध्ये बंदी असूनदेखील दररोज जगभरातील सुमारे २१० कोटी लोक फेसबुकवर सक्रिय असतात. मानवी स्वभावातील दुसर्‍याच्या आयुष्यात काय चाललंय याबाबतच्या कुतूहलाला इंटरनेटवरील मैत्रीची जोड देत फेसबुक अल्पावधीतच नेटकर्‍यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात स्थायिक झालेल्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी जोडणारे फेसबुक स्वतःविषयी अधिकाधिक माहिती इंटरनेटवर सादर करायला भाग पाडते. आपले फेसबुकवर खाते असले म्हणजे आपण फेसबुकचे ग्राहक आहोत, असा अनेकांचा गोड गैरसमज असतो. वास्तवात याच्या बरोबर उलट घडते. फेसबुक वापरकर्त्यांनीच टाकलेल्या माहितीचे संकलन करून, तिची सुसूत्रित रचना करून जाहिरातदार कंपन्यांना पुरवत असते. तुम्ही कोण आहात हे तुमच्या मित्रांपेक्षा, तुमच्या कुटुंबीयांपेक्षा फेसबुकला चांगले माहीत असते.
 
सुरुवातीची काही वर्षं मोठ्या प्रमाणावर तोटा करून कोट्यवधी लोकांना चटक लावल्यानंतर फेसबुकने जागतिक कंपन्यांना आपल्या वापरकर्त्यांद्वारे अपलोड केलेली माहिती, ते वापरत असलेली उत्पादनं, ऐकत असलेली गाणी, बघत असलेले चित्रपट, भेट दिलेली पर्यटनस्थळं यासोबतच त्यांची जात, धर्म, भाषा, सामाजिक आणि राजकीय विषयांवरील मतंही जाहिरातदारांपर्यंत पोहोचवू लागले. कंपन्यांपुढे आपल्या वापरकर्त्यांचे मानसचित्र अचूकपणे उभे करण्यासाठी फेसबुक वेळोवेळी आघाडीच्या विद्यापीठातील डेटा विज्ञान तसेच मानसशास्त्र इ. विषयांत काम करणार्‍या संशोधकांची मदत घेते. पण, या संशोधकांना किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर अॅप तयार करणार्‍यांना वापरकर्त्यांची माहिती उपलब्ध करून देताना ती माहिती इतरत्र पसरणार नाही, ही काळजी घेण्यात फेसबुक कमी पडले. किंबहुना, जेव्हा जेव्हा असे प्रकार घडले तेव्हा तेव्हा प्रायश्चित्त घेण्याऐवजी फेसबुकने आपल्या चुकांवर पांघरूण घातले. फेसबुकचे उद्दिष्ट उदात्त असल्याच्या समजापोटी वापरकर्त्यांनीही या गोष्टीचा बाऊ केला नाही. पण, ‘केंब्रिज अॅनालिटिका’ने ज्या पद्धतीने प्रा. अलेक्झांडर कोगान यांच्याकडून सुमारे पाच कोटी फेसबुक वापरकर्त्यांच्या आणि त्यांच्या ५७ अब्ज मैत्री तसेच नातेसंबंधांची माहिती गोळा केली, ज्या पद्धतीने तिचा डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाची निवडणूक, ब्रेक्झिटवरील मतदान, नायजेरिया, केनिया, ब्राझिल आणि भारतासारख्या देशांत वापर केला, ते पाहता एका आठवड्याभरात फेसबुक नायकाचे खलनायक ठरले. इंटरनेटवर ‘डिलिट फेसबुक’ ही चळवळ सुरू झाली असून एलॉन मस्कसारखे नामवंत उद्योजक, जिम कॅरे ते फरहान अख्तरसारखे अभिनेते आणि कंपन्यांनी आपली फेसबुक खाती गोठवली आहेत. आपला डेटा किती मौल्यवान असू शकतो, याची कल्पना नसलेले किंवा कल्पना असूनही फेसबुकच्या आहारी गेलेल्या कोट्यवधी वापरकर्त्यांकडून फेसबुक खाते गोठवले जाणार नसले तरी ते भविष्यात आपली कोणती माहिती कोणाला शेअर करावी, याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने झालेल्या चुकांची कबुली देऊन माफी मागितली असली तरी भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून करणार असलेल्या उपाययोजनांनी जगाचे समाधान झालेले दिसत नाही. भारताने आगामी लोकसभा निवडणुकांत कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ न करण्याबाबत फेसबुकला ताकीद दिली असून अमेरिकन कॉंग्रेसमध्ये झुकेरबर्गला उलट तपासणीसाठी पाचारण करण्यात येईल, अशी चर्चा आहे. युरोपीय महासंघानेही या घटनांची गंभीर दखल घेऊन फेसबुक, गुगल आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांची एकाधिकारशाही मोडण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे चहूबाजूंनी आलेल्या संकटांना सामोरे जाताना लोकशाही देशांचे पाय लटपटत असले तरी इरादे खंबीर असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
 

No comments:

Post a Comment