आईची माया नि पित्याची छाया हरपलेली रस्त्यावरची पोरं! त्यांना ना घर, ना दार! ना मित्र, ना परिवार! ऊन, वारा, पावसात पाय पोटाशी घेऊन झोपायचे. कधी कचरा उचलून, कधी बूट पॉलिश करून, कधी हमाल होऊन, कधी नालेसफाई करून तर कधी भीक मागून जगायचे!आईची माया नि पित्याची छाया हरपलेली रस्त्यावरची पोरं! त्यांना ना घर, ना दार! ना मित्र, ना परिवार! ऊन, वारा, पावसात पाय पोटाशी घेऊन झोपायचे. कधी कचरा उचलून, कधी बूट पॉलिश करून, कधी हमाल होऊन, कधी नालेसफाई करून तर कधी भीक मागून जगायचे!पालकांविषयी कमालीचा तिटकारा, अविश्वास. त्यातच नैराश्य आले की काही मुले स्वत:वरचाच विश्वास हरवून बसतात. पालकांच्या थोड्याशा रागाने, माराने त्यांचे नाजूक भावविश्व अक्षरश: कोलमडून पडते. मग, घरात नाही राहायचे, असे विचार मनात घोंघावू लागतात. ही अशी पालकांनी ठोकरलेली, समाजाने नाकारलेली नि स्वत्व: गमावले ली मुले घर सोडून थेट रस्त्यावर येतात. पदपथ, उड्डाणपूल, रेल्वे, बस स्थानके, मंदिरे, बागबगिचे हेच त्यांचे घर बनते. पोलिसांपासून गावगुंडांपर्यंत सगळ्यांच्याच लाथाबुक्क्यांचा मार खाता खाता त्यांचे मन जणू दगड बनते. तोंडात घाणेरड्या शिव्या. अंगावर कळकटमळकट कपडे. डोळ्यांत सार्या समाजाविषयीची तीव्र घृणा नि पराकोटीचा तिरस्कार! परिणामी, त्यांचा मानसिक कल गुन्हेगारीच्या दिशेने झुकलेला….मुंबईसारख्या बहुभाषिक महानगरीत जवळपास दीड कोटी लोक आहेत. यापैकी तब्बल चाळीस हजार मुलांचे रस्ते, पदपथ हेच घर नि जीवन बनलेय. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे संगोपन करणे, त्यांना शिक्षण-प्रशिक्षण देणे नि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे अवघड वाटणारे काम ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’ने आपल्या मायाममतेने अगदीच सोपे केले आहे.महालक्ष्मी रेल्वे स्थानकात उतरल्यावर वरळी नाक्याच्या दिशेने काही अंतर चालून गेल्यावर एक सिग्नल लागतो. या सिग्नलजवळ ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चे रस्त्यावरच्या मुलांसाठी आईच्या मायेने काम चालते. या वात्सल्य फाऊंडेशनच्या संकुलाचा फेरफटका मारला असता, संस्थेच्या आभाळाएवढ्या कार्याची महती पटली. मुंबईतील रस्ते, चौक नि गल्लीबोळातील रस्त्यावर राहणार्या 7 ते 17 वयोगटातील मुलांशी संवाद साधून त्यांना वात्सल्य फाऊंडेशनमध्ये आणले जाते. डोळ्यांत राग, तोंडात शिव्याशाप नि अंगावर घाणेरडे कपडे परिधान केलेली ही मुले संस्थेच्या आवारात पाय ठेवताक्षणी आपले मागील खडतर जीवन विसरतात. त्यांच्या वागण्याबोलण्यात आमूलाग्र बदल घडू लागतो. त्यांची भाषा सुधारते. वागण्यात विनम्रता येते. समाजाविषयीचा नकारात्मक भाव जाऊन त्याविषयी त्यांना आस्था वाटू लागते. ‘आपले कुणीतरी आहे,’ ही आपुलकीची भावना त्यांच्या हृदयी वाढीस लागते. त्यांच्या रापलेल्या चेहर्यावर कधी नव्हे ते हसू खुलते….दि वात्सल्य फाऊंडेशन मुंबईतील रस्त्यावरल्या जवळपास दहा हजार मुलांसाठी काम करीत असले तरी या संस्थेत पंचेचाळीस निराधार मुले सध्या दाखल आहेत. या मुलांना प्रार्थनेचे आत्मबळ देऊन त्यांचे मन संस्कारक्षम केले जाते. इथे मुलांना अनौपचारिक, औपचारिक व व्यावसायाभिमुख शिक्षणाचे धडे दिले जातात. तसेच, आयटी, ब्युटिशियन, शिवणकामाचे मुलींना प्रशिक्षण दिले जाते. या मुलांच्या पालनपोषण, संगोपन, शिक्षणाची जबाबदारी संस्थाच खंबीरपणे पेलते. दि वात्सल्य फाऊंडेशनमधून शिकूनसवरून मोठ्या हुद्यावर पोहोचलेला अनिल माने हा मुलगा सध्या फिनलंडला आहे. नरेश आपल्या मूळ गावी जाऊन शेती करू लागलाय. शंकर हा मुलगा क्रूझमध्ये शेफ म्हणून नोकरी करतोय.इथेच लहानाचा मोठा झालेल्या रामू ओमप्रकाश सोनी वर्मा याच्याशी काही वेळ गप्पा रंगल्या. त्याने गप्पांच्या ओघात सांगितले की, मी मध्य प्रदेशातील इटारसीचा. गावात शाळा नव्हती. त्यामुळे दूरवरच्या गावात शिक्षणासाठी जावे लागत असे. मला अडखळत बोलण्याची सवय. त्यामुळे मुले चिडवायची. एवढ्या दूरवर शाळेत जायचीही इच्छा नसायची. त्यामुळेच मी घर सोडले. ट्रेन पकडून मुंबईला आलो. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसलाच राहू लागलो.. तिथल्या एसटीडी बुथवाल्याशी माझी मैत्री झाली. त्यातूनच पुढे माझी रवानगी वात्सल्य फाऊंडेशनमध्ये झाली. इथे बारावीनंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून शेफचा कोर्स केला. आता मी पाणीपुरी, छोलेपुरीसह कॉन्टिनेन्टल फूड बनविण्यात अगदी तरबेज झालोय. माझ्यातील आत्मविश्वास इतका वाढला की, मी गणेश बुकी या पार्टनरसोबत खाद्यपदार्थ विक्रीचा धंदा सुरू केलाय. वात्सल्य फाऊंडेशन हेच आता माझे घर आहे. या घरानेच मला एक चांगला माणूस म्हणून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची, जगण्याची उमेद दिलीय. वात्सल्य फाऊंडेशनच माझे मायबाप!रस्त्यावरल्या मुलांना जीवनात उभे करण्याच्या उदात्त हेतूने 1982मध्ये स्थापन झालेल्या दि वात्सल्य फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आपल्या मानवतेच्या कार्यातून समाजासाठी एक आदर्श उभा केलाय. या संस्थेच्या अध्यक्षा नीला श्रॉफ आहेत. स्वाती मुखर्जी या कार्यकारी संचालक व विश्वस्तपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. फ्रेडी मार्टस्, डॉ. सफला श्रॉफ, डॉ. निलिमा मेहता यांचेही संस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. माहीम, वांद्रे, ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील कळंभेजवळ संस्थेची ‘डे केअर सेंटर्स’ आहेत. कसारा येथे शैक्षणिक केंद्र आहे. मुरबाडजवळच्या टोकावडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेशीही फाऊंडेशनने समन्वय साधून गरजू मुलांना मदतीचा हात दिलाय. मुंबई शहराच्या कानाकोपर्यांत संस्थेचे ‘कॉन्टॅक्ट पॉईंटस्’ आहेत. या संस्थेमध्ये मुलांना बॅगा, मेणबत्त्या, राख्या, शुभेच्छापत्रे, रेशीमकाम, मेंदीवर्क, एम्ब्रॉयडरी, कुंभारकाम, फॅब्रिक पेंटिंगचे धडे दिले जात आहेत. तरुण मुलांना संगणक प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हिंग, पाककृती, स्क्रीन प्रिटिंगचे प्रशिक्षणही दिले जात आहे. इथल्या ‘मनमौजी’ उपक्रमातून झाडांची निगा राखली जाते. ‘लाजवाब’ उपक्रमात सहभागी होऊन निराधार मुलांसोबत आपले वाढदिवस साजरे करता येतात. इथलल्या मुलांसोबत मिष्ठान्नाचा आनंद लुटता येतो. इथे मुलांना त्यांची दैनंदिनी लिहिण्याची सवय लावून त्यांच्या लेखनकौशल्याला चालना दिली जात आहे. ‘संदेश’ उपक्रमातून निराधार मुलांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम केले जात आहे. इतकेच नव्हे, तर इथे मुलांना नृत्य, गायन आणि नाट्यकलेचेही धडे दिले जात आहेत. ज्ञानदान उपक्रमातून मुलांच्या सृजनशीलतेचा विकास घडविला जात आहे. अशा विविध प्रकल्पांतून ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा वेलू गगनावरी गेला असून त्यांच्या या मानवतावादी कार्याला मनोमन सलाम! िी
No comments:
Post a Comment