आपल्या दैनंदिन जीवनात टीव्ही न्यूज चॅनेलनी इतकी खोलवर घुसखोरी केली आहे की त्याच वेगाने ही इंडस्ट्री स्वत:च्या पतनाकडे जाताना दिसते. समाजहिताच्या, व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या बातम्या, निष्पक्ष पत्रकारिता व प्रबोधन यांची चौकट आपल्याकडील न्यूज चॅनेलनी पूर्वी स्वीकारली नव्हती, आजसुद्धा ती नाहीच असे म्हणावे लागेल. कारण हे माध्यम दृश्य माध्यम असल्याने हंगामा करणारी, समाजात सनसनाटी निर्माण करणारी दृश्ये प्रेक्षकांपुढे सतत ठेवल्यासच प्रेक्षक टीव्ही स्क्रीनपुढे खिळून राहील, तो केवळ आपले चॅनेल पाहील, अशा भ्रामक व संकुचित मानसिकतेतून ही चॅनेल इंडस्ट्री वाढत गेली आहे. बरे या माध्यमात पत्रकारितेचा गाढा अनुभव असणारे, संवेदनशीलता असणारे पत्रकारही काम करतात, पण त्यांच्या हातात दुर्दैवाने काही राहिलेले नाही. जवळपास सर्वच न्यूज चॅनेल बड्या कॉर्पोरेट हाउसेसकडून चालवले जातात. अशा चॅनेलचा वरिष्ठ पदावरचा समूह संपादक म्हणून काम करणारी व्यक्ती पत्रकारितेशी संबंधित असेलच असे नसते. बहुसंख्य न्यूज चॅनेल चालवणारे वरिष्ठ पत्रकारितेशी संबंध नसलेले असतात, त्यांच्यापुढे सतत टीआरपीचे आकडे ठेवलेले असतात. आगामी आठवड्यात आपल्या चॅनेलचा टीआरपी इतरांपेक्षा अधिक हवा या उद्देशातून कोणताही विधिनिषेध न पाळता बातम्या केल्या जातात. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ज्या पद्धतीने या घटनांचे सुमारे ७२ तास वार्तांकन सुरू होते ते पाहता न्यूज चॅनेलने किमान संवेदनशीलता नव्हे तर सभ्यताही पाळली नाही, असे म्हणावे लागते. त्यांनी प्रेक्षकांना गृहीतच धरले, शिवाय श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांच्या खासगीपणाचा मुलाहिजा बाळगला नाही. या कुटुंबीयांच्या विरोधात संशयाचे वातावरण निर्माण केले. अपघाती मृत्यूची बातमी सनसनाटी करण्याच्या प्रयत्नात कोणतेही पुरावे ठेवले नाहीत. शोधपत्रकारितेच्या नावाखाली गणंग पत्रकारिता केली. अशा चुकीच्या पद्धतीने केलेल्या वार्तांकनामुळे भारतीय प्रसारमाध्यमांबाबत जी जगभर नेहमी छी-थू होत असते ती या वर्तनाने सप्रमाण सिद्ध झाली.
हे खरे आहे की, श्रीदेवी यांचा आकस्मिक झालेला मृत्यू प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी होती. रविवारी सकाळी ही बातमी न्यूज चॅनेल, इंटरनेट व सोशल मीडियातून प्रसिद्ध होताच ती अफवा असावी असा समज झाला होता पण कालांतराने ही बातमी खरी असल्याची माहिती कपूर कुटुंबीयांकडून पुढे आल्यानंतर श्रीदेवी यांच्या चाहत्यांमध्ये व चित्रपट रसिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त झाली. पण जेव्हा श्रीदेवी यांचा मृत्यू टबबाथमध्ये बुडून झाला अशी माहिती बाहेर आली तेव्हा न्यूज चॅनेलपुढे विकृत कल्पनांचे दालन उघडे झाले. काही चॅनेलनी श्रीदेवी यांची हत्या झाल्याचे गृहीतक मांडून वृत्तांकन सुरू केले. काही न्यूज चॅनेलनी टबबाथचे माप व श्रीदेवी यांची उंची, असे समीकरण मांडत हा मृत्यू झाला कसा, असा सवाल उपस्थित केला. एका चॅनेलच्या पत्रकाराने टबबाथमध्ये झोपून श्रीदेवी यांचा मृत्यू असा झाला असावा या पद्धतीने वृत्तांकन केले. त्यात श्रीदेवी यांचा मृत्यू दारू पिऊन झाला असे एक वृत्त झळकले त्यालाच प्रमाण मानून एका इंग्रजी न्यूज चॅनेलने ‘फोर्टी मिनिट’ नावाचा एक शो सुरू करून ही घटना एक कटकारस्थान असल्याचा दावा केला. वास्तविक एकाही भारतीय न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी दुबईत घटनास्थळी उपस्थित नव्हता. पण या चॅनेलमधले पत्रकार बिनदिक्कतपणे विकृत कल्पनांचे इमले रचत होते. टीव्ही स्टुडिओमध्ये अनेक विषयांचे एक्स्पर्ट श्रीदेवी यांच्या मृत्यूचे विच्छेदन करत होते. काही चॅनेलनी तर श्रीदेवी यांनी त्यांच्या शरीरावर केलेली कॉस्मेटिक सर्जरीच त्यांच्या जिवावर बेतली असा निष्कर्ष काढून आपल्या शरीराशी खेळू नका असे संदेश देण्यास सुरुवात केली. काहींनी श्रीदेवी यांचे कौटुंबिक जीवन अस्थिर होते असे सांगण्यास सुरुवात केली. श्रीदेवी यांचे मद्यपान ही अशीच उठवली गेलेली आवई. त्यावर जेवढ्या बातम्या शिजवता येतात त्या शिजवल्या गेल्या. हा प्रकार उबग आणणारा, किळसवाणा होता. एखाद्याच्या मृत्यूबद्दल वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यापेक्षा कंड्या कशा पिकवता येईल याचा नमुना सांगणारी ही बेजबाबदार पत्रकारिता होती. श्रीदेवी हे व्यक्तिमत्त्व भारतीय मनावर निश्चितच गारुड करणारे होते. या अभिनेत्रीने एकेकाळी आपल्या चतुरस्र अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीला एका उंचीवर ठेवले होते. त्यांना मिळालेला प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार ही त्याची पावती होती. त्यांची दुसरी इनिंग्जही दमदार झाली होती. पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्यांचे व्यक्तिगत, खासगी जीवन मन मानेल तसे खणून काढण्याचा विषय नव्हता. माध्यमांनी कसे वागावे याची जबाबदारी या माध्यमांवर आहे. त्यांनी पत्रकारितेला बेतालपणा दिल्यास त्यांच्याच मुळावर तो येईल
No comments:
Post a Comment