रविवारी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी अखेर इसिसने घेतली आहे. ईस्टर संडेला श्रीलंकेतील तीन चर्च आणि तीन पंचतारांकित हॉटेलांमध्ये जे बॉम्बस्फोट घडवून आणले गेले, त्यात मरण पावणार्यांची संख्या आता तीनशेवर गेली आहे. हे साखळी बॉम्बस्फोट संपूर्ण जगाला हादरवून सोडणारे आहेत. मानवतेच्या नावावर कलंक असलेल्या इसिसला संपविण्यात अमेरिकेसह बडे पाश्चात्त्य देश अपयशी ठरल्याने इसिसने आता दक्षिण आशियात शिरकाव केला आहे. इसिसचा हा धोका वेळीच ओळखून दक्षिण आशियातील प्रमुख देेशांनी दहशतवादाविरुद्ध एक होत इसिसची पाळेमुळे इथे रुजायच्या आत बंदोबस्त करणे गरजेचे आहे. इसिसच्या हल्ल्यात जे शेकडो लोक जखमी झाले आहेत, त्यातील अनेक गंभीर आहेत आणि त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत आणिबाणी लागू करण्यात आली आहे. तिथल्या राष्ट्रपतींनी बॉम्बस्फोटांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. असे असले तरी आपल्या शेजारचा देश म्हणून आपण श्रीलंकेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. श्रीलंकेला तपासकार्यात काही मदत हवी असेल तर ती भारत सरकारने उपलब्ध करून दिली पाहिजे.
इसिसचा आशियातील शिरकाव हा भारतासह सगळ्याच देशांसाठी घातक आहे. याचा आशियाई देशांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आज श्रीलंकेत हल्ले झाले, उद्या आणखी कुठे होतील. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि आशियाई श्रेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी इसिसचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे. इसिसने घडवून आणलेल्या विनाशकारी स्फोटांमुळे दक्षिण आशियात दहशत निर्माण झाली आहे. दहशतीपेक्षाही परस्परांबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे आशियाई देशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही, परस्परांच्या हेतूबाबत शंका घेतली जाणार नाही, या दिशेनेही आताच प्रयत्न सुरू करावे लागणार आहेत. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाने तर यापुढे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. श्रीलंका आपला शेजारी आहे. समुद्रमार्गे इसिसचा भारतात शिरकाव होऊ नये याची काळजीही पुढच्या काळात घ्यावी लागणार आहे. इसिसने जाणीवपूर्वक ईस्टर संडेची निवड केली. या दिवशी चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव राहतील, त्याचप्रमाणे पंचतारांकित हॉटेलांमध्येही विदेशी पर्यटकच असतील, विशेषत: अमेरिका आणि युरोपमधील पर्यटक मोठ्या संख्येत असतील, हे हेरून इसिसने बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळे इसिसचे लक्ष्य नेमके कोण होते, हेही आता स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेत आजवर शांतता होती. फार पूर्वी लिट्टेने तिथे धुमाकूळ घातला होता. श्रीलंकेतले जनजीवन अस्ताव्यस्त केले होते. पण, श्रीलंका सरकारने लिट्टेचा बंदोबस्त करून देशात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळविले होते. मात्र, बर्याच वर्षांच्या शांततेनंतर श्रीलंकेत रविवारी इसिसने एकामागोमाग एक सात बॉम्बस्फोट घडवून आणले आणि श्रीलंकेचाच नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदायाचा थरकाप उडवला. सुरुवातीला इसिसवर शंका नव्हती. पण, आता इसिसनेच दावा करून हल्ल्यांची जबाबदारी घेतल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. आता गरज आहे ती आशियाई देशांनी एकजूट होत इसिसचा मुकाबला करण्याची. आताही जर आम्ही एकमेकांविरुद्धच लढत राहिलो आणि इसिसच्या कारवायांकडे दुर्लक्ष करीत राहिलो, तर काळ आम्हाला कधीच माफ करणार नाही!
रविवारी बॉम्बस्फोट झाले त्या दिवशी स्फोटांची जबाबदारी कुणीही घेतली नव्हती. त्यामुळे हा नेमका अतिरेकी हल्ला आहे की आणखी काही, हे निश्चित होत नव्हते. पण, स्फोटांची तीव्रता लक्षात घेता हा अतिरेकी हल्लाच आहे, हे स्पष्ट होत होते. अतिरेकी हल्ला आहे तर मग तो कुणी घडवून आणला, याबाबत कयास लावले जात होते. नॅशनल तौहित जमात या संघटनेकडे संशयाची सुई वळली होती. श्रीलंका सरकारच्या अधिकृत प्रवक्त्यानेही असाच संशय व्यक्त केला होता. जर का हा संशय खरा ठरला असता, तर भारतासाठी ही मोठीच डोकेदुखी ठरली असती. कारण, या नॅशनल तौहित जमातचा एक गट गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडूतही सक्रिय आहे. खरोखरीच या संघटनेने हा स्फोट घडवून आणला असता, तर भारतासाठी िंचतेची बाब ठरली असती. भारताला अधिक सतर्क राहावे लागले असते. असे असले तरी भारताने आता गाफील राहून चालणार नाही. या संघटनेच्या तामिळनाडूत काही कारवाया सुरू आहेत का, यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एकदा का या संघटेनेने आपली पाळेमुळे तामिळनाडूत रुजवली, तर देशाच्या इतर भागातही ते पोहोचतील आणि उपद्रव निर्माण करतील, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे इसिसच्या बाबतीत तर सतर्क राहायलाच हवे, तौहित जमातच्या बाबतीतही आताच सतर्क होत बंदोबस्त केला पाहिजे. आपण काही दिवस मागे जायला हवे. न्यूझीलंडमधील एका मशिदीत एका गोर्या माणसाने- ऑस्ट्रेलियन नागरिकाने- अंदाधुंद गोळीबार करीत 50 पेक्षा जास्त लोकांना ठार मारले होते. त्यामुळे श्रीलंकेत जे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत, त्याकडे न्यूझीलंडमधील घटनेचा बदला म्हणूनच बघितले पाहिजे. आज जागतिक स्तरावर धार्मिक बाबतीत जी ओढाताण आपल्याला दिसते आहे, तिच्या परिणामीही असे हल्ले घडून येत असावेत, असे मानले तर अतिशयोक्ती ठरू नये. धार्मिक वर्चस्व आणि अन्य धर्मीयांचा द्वेष यातून असे हल्ले होत असतील, तर हा संपूर्ण जगासाठीच मोठा धोका मानला पाहिजे. संपूर्ण जगात आज इस्लामच्या बाबतीत जी धारणा बनत चालली आहे, त्यामुळे तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून तर इस्लामच्या नावावर द्वंद्व वाढले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. तिकडे सीरियात झालेल्या संघर्षानंतर युरोपातील अनेक देशांमध्ये घुसखोरी झाली आहे. मोठ्या संख्येत सीरियन नागरिक युरोपीय देशांमध्ये शरणार्थी म्हणून घुसल्याने अनेक देशांमधील सामाजिक चित्र बदलले आहे. तणाव वाढला आहे. शरणार्थी आक्रमक वागत असल्याने मूळ युरोपियन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आजही अनेक युरोपीय देशांमध्ये आक्रोश आहे. लोकभावना संतप्त आहे. शरणार्थ्यांमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. त्यामुळे युरोपीय जनमानस एकजूट होतानाही दिसत आहे. त्याच्याच परिणामी इसिसने श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणत युरोपीय देश आणि अमेरिकेला इशारा दिला असावा कदाचित! आता इसिसने हल्ल्यासाठी श्रीलंकेचीच निवड का केली, हाही प्रश्नच आहे. त्याचाही शोध आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतला पाहिजे. श्रीलंकेत 70 टक्के बौद्ध बांधव राहतात, 13 टक्के िंहदू, 10 टक्के मुसलमान आणि सात टक्के ख्रिश्चन बांधव राहतात. श्रीलंकेत भारताप्रमाणेच विविधतेत एकता आहे. पण, स्फोटांसाठी इसिसने श्रीलंकेची निवड का केली, याचा शोध घेतला जाऊन जो निष्कर्ष निघेल त्यानुसार भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाय योजावे लागतील. अन्यथा, काळ आम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे...
No comments:
Post a Comment