Total Pageviews

Sunday 14 April 2019

अभिवादन- धर्मवीर संभाजी महाराज : अलौकिक योद्धा-PRABHAT-विठ्ठल वळसे पाटील



धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपला देह बलिदान केला. असे बलिदान जगाच्या पाठीवर कुठेच नाही. 40 दिवसांच्या यातनामय प्रवासातून बलिदान झाले ते 11 मार्च 1689 रोजी. त्यावेळी फाल्गुन अमावास्येचा दिवस होता. तो दिवस शकेप्रमाणे 5 एप्रिल 2019 रोजी येत असून संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक ता. शिरूर व तुळापूर ता. हवेली, जि. पुणे येथील समाधीस्थळी लाखो शंभूभक्‍त नतमस्तक होण्यासाठी देशभरातून येत असतात. धर्मवीर संभाजी महाराजांचा 330 वा बलिदान स्मरणदिन असून त्यानिमित्त शंभूराजांच्या चरणी वाहिलेली पुष्पांजली
अनेक वर्षांपासून वढू बुद्रुक व तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या अशा एक महिन्याच्या कालखंडात अनेक शंभूभक्‍त बलिदान मास पाळतात. यात अनवाणी चालणे, दिवसातून एकदा अन्न ग्रहण करणे, मिष्टान्न भोजन न घेणे, व्यसन न करणे तसेच मासप्रारंभी मुंडन केले जाते. शोक मास असल्याने उत्सवाचे कार्यक्रम करत नाहीत. शंभूभक्‍त धर्मकर्तव्य म्हणून हे पार पाडत असतात. याप्रकारे बलिदान स्मरण केले जाते. शंभूराजांना 40 दिवस यातना सहन कराव्या लागल्या. त्यांच्या बलिदानातून मनात कुठेतरी राष्ट्र भावना वाढीस लागल्याशिवाय राहात नाही.

या बलिदान समरणदिनानिमित्त दर वर्षी शासकीय पूजा, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरमधून समाधी स्थळावर पुष्पवृष्टी केली जाते. पुरंदर ते वढू पालखी सोहळा होतो. विविध कार्यक्रमाचे आयोजन असते. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवशंभू भक्‍त उपस्थित राहतात. 1 जानेवारी 2018 नंतर या भागात कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस फाटा तैनात केला गेला आहे. तसेच कायमस्वरूपी पोलीस चौकी ठेवण्यात आली आहे. विशेषकरून या वर्षी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे लाखो शंभूभक्‍त याठिकाणी येणार आहेत. संभाजीराजे यांनी देव, देश आणि धर्मासाठी बलिदान केले म्हणून ते धर्मवीर ठरले. राष्ट्रभक्‍तांसाठी वढू व तुळापूर ही दोन शक्‍तिपीठे आहेत.
1689 मध्ये शंभूराजेंचा मेहुणा गणोजी शिर्के याने पन्हाळा भागात कवी कलशांवर हल्ला केला. याची खबर मिळताच शंभूराजे समाचार घेण्यास निघाले. हे समजताच शिर्के संगमेश्‍वरला आले त्यावेळी संभाजीराजांनी महत्त्वाच्या सरदारांची कोकणातील संगमेश्‍वरची बैठक बोलावली. ती संपवून राजे रायगडाकडे रवाना होत असतानाच शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्‍वरवर गुप्त हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने मात्र संभाजीराजांना व कवी कलशांना अखेर 1 फेब्रुवारी 1689 रोजी जिवंत पकडले.
बहादूर (धर्मवीर) गडावर औरंगजेबासमोर शंभूराजे व कवी कलश यांना हजर केले. सर्व किल्ले स्वाधीन व धर्मांतर केल्यास जीवदान या दोन गोष्टी पुढ्यात टाकल्या; पण स्वाभिमानी, धर्मनिष्ठ व गवताची काडीसुद्धा औरंगजेबास देणार नाही म्हणून स्वराज्य रक्षणासाठी या गोष्टी लाथाडल्या. पुढे शंभू व कवींची एका घाणेरड्या उंटावर उलटे बसवून, विदूषकाचे कपडे घालून धिंड काढण्यात आली. कुराणाप्रमाणे शिक्षा फर्मावण्यात आली. यावेळी दुतर्फा असलेल्या सैन्याने दगड व भाल्यांचा मारा केला. पुढे हा मुक्काम तुळापूर येथे हलवला. तुळापूर संगमावर तेजस्वी नेत्रकमल काढण्यात आले. त्यानंतर कवी कलश व शंभूराजांची जिव्हा छाटली. या घटनेने औरंगजेबाच्या छावणीत आसुरी जल्लोष माजला होता. शेवटाला शरीराची कातडी सोलली गेली व वीतभर तुकडे केले गेले आणि परिसरात फेकले गेले. असा 40 दिवसांचा यातनामय प्रवास शंभूराजे व कवी कलशांनी सोसला. पुढे वढू येथे शरीराचे तुकडे गोळा केले गेले. त्यावर अग्निडाग देण्यात आला. त्या ठिकाणी शंभूराजे व कवी कलशांची समाधी बांधण्यात आली. पुढे हीच बलिदानाची गाथा मराठा साम्राज्य विस्ताराची प्रेरणा ठरली.
शंभूराजे हे स्वराज्य रक्षक तर होते, शिवाय विविध पैलूंचा रथ होते. ते एक महान योद्धा होते. हिंदुत्वाचे महान रक्षक होते. तब्बल 140 लढाया जिंकणारा अपराजित, संस्कृत पंडित, 14 भाषांवर प्रभुत्व गाजवणारा 14 व्या वर्षी बुधभूषण, नखशिखा, सातसतक ग्रंथ लिहिणारा राजा जगातला एकमेव अद्वितिय होत. जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्‍त एका महिन्यात तयार करणारा, जगातील पहिला तरंगता तोफखाना, जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रजांबरोबर मोघलांचा कर्दनकाळ ठरला. दुष्काळग्रस्त गावांत जलनियोजन, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा, इतर धर्मांचा सन्मान, धर्मांतरावर कायदेशीर बंदी, बालमजुरी व वेठबिगारी विरुद्ध कायदा, देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण व अर्थपुरवठा, शेतीसाठी पीक कर्ज योजना, सैनिकांच्या उत्पन्नाला चरईची सवलत, सुसज्ज आरमारनिर्मिती, आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र जपला या सर्व गोष्टी पार पाडत असताना आपल्या बलिदानातून धर्मनिष्ठा जागवणारा धर्मवीर ठरला. छावा खरा मृत्युंजय ठरला. जेव्हा औरंगजेबासमोर संभाजीराजेंना व कवी कलश यांस हजर केले जाते तेव्हा खुद्द औरंगजेब सिंहासन सोडून खुदाचे आभार मानण्यास गुडघे टेकून बसतो. त्यावेळी कवी कलशांनी लिहिलेल्या काव्यपंक्‍ती शौर्य निर्माण करतात.
राजन तुम हो सांजे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखतं त्यजत औरंग या पंक्‍तीचा अर्थ राजन काय लढलात आपण, काय तुमचं ते शौर्य, तुमचा प्रताप पाहून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून समोर गुडघे टेकून बसला आहे. त्यानंतर सुरू झाला 40 दिवसांचा प्रवास, या प्रवासात राजे क्षणभरसुद्धा झुकले नाही. म्हणून मृत्यूवर सुद्धा त्यांनी विजय मिळवला


No comments:

Post a Comment