लोकसभा निवडणुकीचे दुसर्या टप्प्यातील मतदान गुरुवार 18 एप्रिलला होत असताना, निवडणूक प्रचाराने अतिशय खालची पातळी गाठली आहे. प्रचारात अश्लीलतेकडे झुकणार्या शब्दांचा वापर केल्यामुळे सपाचे नेते आजम खान यांच्यावर तसेच जातिधर्माच्या नावावर मते मागितल्यामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री श्रीमती मेनका गांधी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. दलित आणि मुस्लिम असल्यामुळे निवडणूक आयोगाने आमच्यावर निर्बंध घातले, असा आरोप मायावती यांनी तसेच आजम खान यांच्या मुलाने केला आहे. मात्र, ज्या कारणांसाठी बंदी घातली, त्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली नाही. मायावती यांनी मुस्लिम मतदारांना महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, सपा नेते आजम खान यांचा गुन्हा मात्र अतिशय गंभीर आणि अक्षम्य असा आहे.
वादग्रस्त विधाने करण्याची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची आजम खान यांना सवय झाली आहे. त्यामुळे रामपूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आणि चित्रपट अभिनेत्री जयाप्रदा यांच्याबाबत, नाव न घेता आजम खान यांनी नुकतेच केलेले विधान अतिशय आक्षेपार्ह आणि स्त्रीत्वाचा अपमान करणारे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजम खान यांनी अनावधानाने नाही तर जाणीवपूर्वक हे विधान केले आहे, असे त्यांच्या देहबोलीवरून दिसते आहे. आपल्या विधानाबद्दल कोणतीही खंत त्यांना वाटत नाही, तर ते त्याचे उद्दामपणे समर्थन करताना दिसत आहेत. मी कुणाचे काही वाईट केले नाही, कुणाची प्रतिष्ठा धोक्यात येईल, असे मी बोलल्याचे कुणी सिद्ध केले तर मी स्वत: निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेईल, असे आजम खान म्हणाले.
आजम खान यांनी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत हे विधान करत आपली लायकी दाखवून दिली. अखिलेश यादव यांनीही त्यांना रोखण्याऐवजी अप्रत्यक्षपणे त्यांची पाठराखणच केली. कारण, समाजवादी पक्षाचे सगळे राजकारणच मुस्लिम मतांच्या आधारावर चालणारे आहे आणि आजम खान हे समाजवादी पक्षाचा मुस्लिम चेहरा आहे. त्यामुळे मुस्लिम समाज दुखावेल म्हणून आजम खान यांच्यावर कारवाई करण्याची समाजवादी पक्षाची तयारी नाही. त्यामुळेच तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तुम्ही पितामह भीष्मासारखे चूप राहण्याची चूक करू नका, असे परराष्ट्रव्यवहार मंत्री सुषमा स्वराज, मुलायमिंसह यादव यांना उद्देशून म्हणाल्या, पण मुलायमिंसह यादव यांचे मौन मुस्लिम मतांच्या भीतीमुळे तुटले नाही.
माझ्यावरचे आरोप न्यायालयात टिकणारे नाहीत, असे आजम खान म्हणाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना 72 तासपर्यंत प्रचारात सहभागी होण्यावर जी बंदी घातली, ती त्यांच्या गुन्ह्याच्या दृष्टीने अतिशय कमी अशी शिक्षा आहे. आयोगाने आजम खान यांची रामपूर मतदारसंघातील उमेदवारीच रद्द करायला पाहिजे. आजम खान यांच्यावर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत. आजम खान यांनी जे विधान केले त्यात कुणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे, ते स्पष्ट आहे. आजम खान यांनी याआधी जयाप्रदा यांचा उल्लेख ‘नाचने-गानेवाली’ असा केला होता.
भाजपात येण्याआधी जयाप्रदा समाजवादी पक्षात होत्या. तेव्हापासून आजम खान यांच्याशी त्यांचे शत्रुत्व आहे. समाजवादी पक्षात असतानाही जयाप्रदा यांनी आजम खान यांच्या वागणुकीची अनेक वेळा तक्रार केली होती, पण त्याची मुलायमिंसह यादव आणि नंतर अखिलेश यादव यांनी कधीच दखल घेतली नाही. आजम खान यांच्या त्रासाला कंटाळूनच जयाप्रदा आणि त्यांचे राजकीय गुरू अमरिंसह यांना समाजवादी पक्ष सोडावा लागला.
राजकारणात मतभेद असू शकतात, आपल्या विरोधकांवर टीका करण्याचाही तुम्हाला अधिकार आहे, मग तो विरोधक बाहेरचा असो की पक्षांतर्गंत. मात्र, त्याच्या विरोधात कंबरेखालची भाषा वापरणे आजम खान यांना शोभत असले तरी राजकीय शिष्टाचारात आणि नैतिकेत बसत नाही.
2014 च्या लोकसभा निवडणुकीतही आजम खान यांनी अशीच आक्षेपार्ह विधाने केली होती, त्या वेळीही आयोगाने त्यांच्या भाषणावर बंदी घातली होती. मात्र, या बंदीपासून कोणताही धडा आजम खान यांनी घेतला नाही. वाट्टेेल तसे बरळण्याची आजम खान यांना सवय झाली आहे, असे दिसते. जो माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाट्टेेल तशी भाषा वापरू शकतो, त्याने जयाप्रदा यांच्यासाठी अशी भाषा वापरली तर आश्चर्य नाही.
भारतमातेला डायन ठरवायलाही आजम खान यांनी मागेपुढे पाहिले नाही! अशी भाषा वापरून आजम खान यांनी आपली लायकी दाखवून दिली. आजम खान कधी काय बोलतील, ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांची निष्ठा या देशावर आहे की नाही, अशी शंका येते.
संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्याबाबतही आजम खान यांनी अशीच वादग्रस्त मुक्ताफळं उधळली होती. आणिबाणीच्या काळात मुस्लिमांची जबरदस्तीने नसबंदी केल्याबद्दल अल्लाह संजय गांधी यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असे आजम खान म्हणाले होते. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादग्रस्त ठिकाणी शिलान्यासाची परवानगी दिल्याबद्दलही आजम खान यांनी राजीव गांधी यांच्याबाबतही अशीच भावना व्यक्त केली होती.
आजम खान यांनी याआधी जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असण्यावरच संशय व्यक्त केला होता. ‘‘कारगील की पहाडियोकों फतेह करने वाले कोई हिंदू जवान नही तो मुसलमान फौजी थे,’’ असे विधानही आजम खान यांच्याशिवाय दुसरा कुणी करू शकत नाही. मुजफ्फरनगर दंगलीतील हत्याकांडाचा बदला घेण्याचे आवाहन करणारेही आजम खानच होते. ताजमहाल वक्फ बोर्डाच्या सुपूर्त करण्याची मागणी करणारे आजम खानच होते. 2014 च्या आधी म्हशी चोरीला जाण्याच्या घटनेमुळे आजम खान चर्चेत आले होते. त्या वेळी आजम खान अखिलेश यादव मंत्रिमंडळात होते. आजम खान यांच्या चोरीला गेलेल्या म्हशींचा शोध घेण्यासाठी उत्तरप्रदेशची संपूर्ण पोलिस यंत्रणा जुंपली गेली होती.
अखिलेश यादव मंत्रिमंडळात असताना आजम खान यांनी मुलायमिंसह यादव यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता, त्या वेळी या कार्यक्रमासाठी पैसे कुठून आणले, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, काही पैसे तालिबानकडून आले, काही दाऊद इब्राहिमने दिले, तर काही अबू सालेेमने, असे आजम खान उत्तरले होते. 2016 मध्ये बुलंदशहरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना हे राजकीय षडयंत्र असल्याचे तारे आजम खान यांनी तोडले होते. नंतर या प्रकरणातील पीडितेच्या पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आजम खान यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. एप्रिल 2017 मध्ये छत्तीसगडच्या सुकमा जंगलात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता, त्या वेळी महिला नक्षल्यांनी शहीद जवानांची गुप्तांगे कापून नेल्याचे वृत्त आले होते, त्या वेळीही आजम खान यांनी शहीद जवानांबद्दल असेच अतिशय आक्षेपार्ह विधान केले होते, त्याबाबतचे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. याचाच अर्थ, आजम खान यांना वादग्रस्त विधाने करण्याची सवय लागली आहे, असे दिसते. आजम खान यांच्यातील ही विकृती म्हणावी लागेल.
जिची सदसद्विवेकबुद्धी जागी असते ती व्यक्ती अशी विधाने कधी करतच नाही. मात्र, ज्याच्याजवळ बुद्धी आहे, त्याच्याजवळच सदसद्विवेकबुद्धी असते. ज्याच्याजवळ बुद्धीच नाही, त्याचा सदसद्विवेकबुद्धीशीही कोणताच संबंंध नसतो. आजम खान यांच्या या विकृतीचा कठोरपणे मुकाबला केला पाहिजे. आजम खान ही वृत्ती नाही, तर देशद्रोही प्रवृत्ती आहे, ती जास्त फोफावणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून या देशात असे बोलण्याची वा बरळण्याची पुन्हा कुणाची हिंमत होणार नाही. आज जर रामशास्त्री प्रभुणे असते, तर त्यांनी आजम खान यांच्या अशा देशद्रोहाच्या गुन्ह्याला देहान्त प्रायश्चित्ताचीच शिक्षा ठोठावली असती
No comments:
Post a Comment