सहसा एका लोकशाही देशात निवडणुका चालू असतात तेव्हा इतर देशांचे नेते मतदारांना शुभेच्छा देण्यापलीकडे त्यात ढवळाढवळ करत नाहीत. पण, पाकिस्तान ना लोकशाही देश आहे, ना इमरान त्याचा नेता. नाही म्हणायला, निवडणुकांत विजयी होऊन ते पंतप्रधान बनले आहेत. महाराष्ट्रात राजकारणी पोपट पाळून त्याला निवडणुकीच्या वेळेस बोलतं करायला बहुदा पाकिस्तानच्या लष्कराकडूनच शिकले असावेत. पाकिस्तानचे लष्कर जेव्हा थेट सत्तेत नसते, तेव्हा कोणत्या तरी राजकीय पक्षाचा पोपट पाळून त्याच्यामार्फत देश चालवते. इमरान खान हा सध्याचा पोपट आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे लष्कराला एक आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेला, सफाईदार इंग्रजीत बोलू शकणारा, शांततेची कबुतरं सोडू शकणारा मुखवटा हवा आहे. पंतप्रधान इमरान खानने भारतातील पहिल्या फेरीचे मतदान पार पाडायच्या एक दिवस आधी ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि अन्य मोजक्या विदेशी पत्रकारांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेचा मुख्य विषय अर्थातच भारत होता.
इमरान म्हणाला की, “या निवडणुकीत नरेंद्र मोदी विजयी होऊन पंतप्रधान बनल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता नांदायला चांगली संधी आहे. जर काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे सरकार आले तर ते उजव्या राजकीय पक्षांच्या टीकेला घाबरून शांततेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. भाजपचा विजय झाला तर काश्मीर प्रश्नावरही काही तोडगा निघू शकतो.” तो पुढे म्हणाला की, ”निवडणुकीपूर्वी तुम्हाला मोदींचे एक रूप दिसत आहे, निवडणुकांनंतर वेगळे मोदी दिसू शकतील.” पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाची आणि त्याच्या इतिहासाची कल्पना नसलेल्या विदेशी वार्ताहरांना इमरान खानमध्ये शांततेसाठी धडपडत असलेला राष्ट्रपुरुष दिसला. मोदींनी इमरानच्या वक्तव्याची दखल घेतली नसली तरी काँग्रेस समर्थकांना त्यात इमरान-मोदी यांच्यात साटेलोटे असल्याचा साक्षात्कार झाला.
अर्थात, या मुलाखतीत दिसलेले इमरानचे दात केवळ दाखवायचे होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दहशतवादाला समर्थन देत असल्याबद्दल कोपर्यात उभे केले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून जूनमध्ये होत असलेल्या नाणेनिधीच्या बैठकीपर्यंत आपला दहशतवादी संघटनांशी काही संबंध नाही, असे पाकिस्तान सिद्ध करू शकला नाही तर त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल. असे झाल्यास त्याला पाश्चिमात्त्य देशांकडून कर्ज मिळवणे दुरापास्त होईल. यासाठी पाकिस्तानने या विदेशी पत्रकारांना, काही देशांच्या राजनैतिक अधिकार्यांसह बालाकोटला नेण्याचाही घाट घातला होता. बालाकोटला, ज्या ठिकाणी भारत ‘जैश’चे सर्वात मोठे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते असे म्हणत आहे, तिथे प्रत्यक्षात मदरसा असून एक हजार मुलं कशाप्रकारे कुराणाचे शिक्षण घेत आहेत, कशाप्रकारे तिथे मुख्य इमारत आणि अन्य इमारती सुस्थितीत आहेत आणि बाजूला जंगलात कशाप्रकारे भारतीय विमानांनी फेकलेल्या बॉम्बमुळे खड्डे पडले आहेत, हे दाखवायचा या दौर्याचा उद्देश होता.
या दौर्यावर गेलेल्या पत्रकारांच्या अहवालावरून असे वाटते की, पाकिस्तानने नेपथ्य रचना चांगली केली होती. पण, पत्रकारांचे समाधान करण्यात तो कमी पडला. हा मदरसा पोहोचण्यास अत्यंत दुर्गम ठिकाणी, म्हणजेच दीड तासांची पायपीट करून, मोठी चढण पार करून जावे लागते, अशा ठिकाणी का बांधण्यात आला होता? तो बघण्यास आलेल्या पाहुण्यांना जेमतेम तासाभराचा अवधी का देण्यात आला? स्वतःच्या गाड्यांनी तेथवर आलेल्या लोकांना तर अर्ध्या तासाचा अवधी मिळाला. या भेटीत लष्कराचे प्रतिनिधी कायम सोबत असल्यामुळे मुलांशी किंवा शिक्षकांशी बोलण्याची, तसेच स्वतःहून या परिसराची पाहणी करायची फारशी संधी मिळाली नाही. कथित मदरशाची इमारत सुस्थितीत वाटत असली तरी ते भारताच्या दाव्याच्या विपरीत नाही. भारत पहिल्यापासून म्हणत आहे की, या हल्ल्यासाठी इस्रायलच्या ‘स्पाइस २०००’ बॉम्बचा वापर केला गेला. हे बॉम्ब उपग्रहाद्वारे निश्चित अक्षांश-रेखांश असलेल्या जागी अचूक आदळतात आणि संपूर्ण इमारत उद्ध्वस्त न करता केवळ आतील व्यक्तींना मारतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे हा दौरा आयोजित करायला पाकिस्तानने तब्बल ४३ दिवसांचा अवधी का घेतला? यातून स्पष्ट होते की, पाकिस्तानकडून या प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दौर्यावरून आलेल्या जवळपास प्रत्येक पत्रकाराची प्रतिक्रिया ही “हल्ला झालाय असे वाटत नाही, पण नाही झाला असेही खात्रीशीररित्या सांगता येत नाही,” अशी आहे. दरम्यानच्या काळात ट्विटरने पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाच्या पाठिंब्याने चालविण्यात येत असलेली १०३ पेज, खाती, ग्रुप आणि इन्स्टाग्राम खाती फेसबुकने रद्द केली.
हे सगळे नाटक पार पडत असताना मानवाधिकारांच्या हननाबद्दलचा पाकिस्तानचा काळा चेहराही जगासमोर आला आहे. पाकिस्तानच्याच मानवाधिकार समितीच्या अहवालात असे म्हटले आहे की, दरवर्षी तेथे सुमारे एक हजार हिंदू आणि ख्रिस्ती मुलींचे बळजबरीने धर्मांतर करण्यात येते. दक्षिण सिंध आणि पूर्व पंजाबमध्ये हे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालतात. याबाबत अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध होऊ दिली जात नसल्यामुळे प्रत्यक्ष आकडा मोठा असू शकतो. १९९० सालापासून इस्लामचा अपमान केल्याप्रकरणी ७० लोकांना दगडांनी ठेचून मारल्याची नोंद आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वृत्तपत्रस्वातंत्र्यावरही मोठ्या प्रमाणावर गदा आली आहे. असे असताना इमरान खान वरचेवर भारताला सर्वधर्म समभाव आणि अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत शहाणपण शिकवत असतो.
भारतात भाजप, काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्ष एकमेकांच्यात कितीही भांडोत, कितीही टोकाचा प्रचार करोत, निवडणुकीत काय झाले तर काय होईल, असा उपदेश पाकिस्तानकडून घ्यायची गरज नाही. एरवी आम्ही ‘शंभर विरुद्ध पाच’ असू, पण पाकिस्तानसाठी कायम ‘१०५’ असू, हे त्याने ध्यानात ठेवावे. नरेंद्र मोदींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांचे पाकिस्तान धोरण निवडणुकांशी नाही, तर देशाच्या हिताशी बांधले गेले आहे. म्हणूनच गुजरातचे मुख्यमंत्री असताना ५६ इंची छातीचा उल्लेख करणार्या, परवेझ मुशर्रफ यांना ललकारणार्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी बसताना अन्य सार्क नेत्यांसोबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही निमंत्रण दिले.
पाकिस्तानने भारताला विश्वासात न घेता काश्मिरी फुटीरतावाद्यांना स्वातंत्र्य दिन समारंभाचे निमंत्रण दिले असता चर्चेवर बहिष्कार टाकला. शांततेचा आणखी एक प्रयत्न म्हणून मोदींनी २५ डिसेंबर, २०१५ रोजी पाकिस्तानला अनौपचारिक भेट देण्याचे धाडस दाखवले.पाकिस्तानने त्याचे उत्तर प्रथम पठाणकोट आणि नंतर उरी येथील हल्ल्याने दिले असता पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून अनेक डझन अतिरेक्यांना ठार करण्यात आले. त्यानेही समाधान न झालेल्या पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या. पाकने पुलवामा येथील हल्ला घडवून आणला असता भारताने बालाकोट येथील ‘जैश’चा सर्वात मोठा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केला. एवढ्यावरच न थांबता अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियासारख्या आजवरच्या पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांकडून त्याची कोंडी केली. ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमात ‘पाकिस्तानको अपनी मौत मरने दो, हम हमारा विकास करेंगे,’ असे म्हणत मोदींनी निवडून आल्यास आपल्या पाकिस्तान धोरणाबाबत कल्पना दिली. त्यामुळे इमरान खान, तू तुझा देश सांभाळ, आम्ही आमचा सांभाळतो!
No comments:
Post a Comment