नोटाबंदीनंतर नक्षल्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता त्यांच्यात जिहादी आर्थिक मदतीद्वारे जान फुंकली जात आहे हे एक ढळढळीत सत्य आहे. बरेच दिवस शांत बसलेल्या नक्षल्यांनी आता डोकं वर काढायला सुरुवात केली आहे हे दंतेवाडातील हल्ल्याने दाखवून दिले आहे. भविष्यातील हल्ले टाळण्यासाठी नक्षल्यांना आताच ठेचावे लागेल. त्यात कसूर करून चालणार नाही. कश्मीरला आपले लष्कर बघून घेईल, पण मध्य हिंदुस्थानात सुरक्षा दलांना कंबर कसून नक्षल्यांचा नायनाट करावाच लागेल.
छत्तीसगढमधील दंतेवाडा परिसर नक्षलवाद्यांच्या भयंकर हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या हल्ल्यांत आजवर अनेक सुरक्षा जवान ठार झाले आहेत. 15 दिवसांपूर्वीदेखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे नक्षल्यांनी ‘आयईडी’ स्फोट घडवून आणला. त्यात भारतीय जनता पक्षाचे बस्तरचे आमदार भीमा मंडावी यांच्यासह चार अंगरक्षक ठार झाले. अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने नक्षल्यांनी हा हल्ला घडवून आणला. छत्तीसगढच्या डीजीपींच्या म्हणण्यानुसार नक्षलवाद्यांना आमदार कोणत्या गाडीत आहेत हे माहीत होते. कारण बरोबर ती गाडी जात असतानाच त्यांनी आयईडीचा स्फोट केला. यावरून सुरक्षा यंत्रणांपेक्षाही नक्षल्यांची गुप्तचर यंत्रणा किती भक्कम आणि कार्यक्षम आहे हे लक्षात येते. हल्ल्याच्या ठिकाणी काही मोबाईल्स आणि एक जीपीएस नंतर सापडला. मात्र इतर कोणतीही शस्त्रास्त्रs मिळाली नाहीत. म्हणजेच हा हल्ला अत्यंत सुनियोजित, जलद आणि ‘रिझल्ट ओरिएण्टेड’ होता.
छत्तीसगढमध्ये आजही हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रावर नक्षल्यांचा प्रभाव आहे. निक्रिय राज्य प्रशासन, विकासाचा अभाव आणि काही दबंग राजकीय नेते यांच्याद्वारे स्थानिक आदिवासींचे आर्थिक शोषण यामुळे नक्षल्यांची या क्षेत्रात चलती आहे. मध्ये काही दिवस नक्षली आपले ‘मेंटल ऍण्ड फिजिकल रिक्रूपरेशन/ स्ट्रटेजिक रिफिटिंग’ करण्यासाठी आणि छत्तीसगढमधील नेतृत्वबदलामुळे काय होईल या शंकेमुळे शांत बसले होते. त्यामुळे सुरक्षा दल/राज्य प्रशासनावर वार करण्याची त्यांची तयारी किंवा मनीषा नव्हती.
मागील काही वर्षांमध्ये सैन्याला नक्षलविरोधी अभियानात आणावे की नाही यावर मोठी चर्चा झाली. सरतेशेवटी सुरक्षा दलांना सैन्याने सहा आठवडय़ांचे ‘ऍण्टी गोरिला ट्रेनिंग’ देऊन नक्षलविरोधात उभे करायचे यावर सर्व पोलीसप्रमुखांचे एकमत झाले. अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या अर्धसैनिक दलांना तीव्र कोष्टक पद्धतीने (कॉन्सण्ट्रेटेड ग्रीड सिस्टम) तैनात करायचे आणि त्यांच्या रसद/गोळाबारूद/गाडय़ांची तजवीज करायची असा प्लॅन तयार झाला. अर्थात मोठा भूभाग आणि खडतर क्षेत्राचा विचार करता ही एक प्रदीर्घ लढाई असणार हे उघड आहे.
सुरक्षा दलांना या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले असले आणि ते नक्षल्यांना मूंहतोड जवाब द्यायला तयार असले तरी कायद्यानुसार तैनात असलेल्या परिघाबाहेर जाऊन काम करण्याला त्यांना मनाई असते (लिमिटेड टू देअर स्टेट) या एकाच गोष्टीमुळे सुरक्षा दलांचे हात बांधले जातात. मात्र नक्षल्यांवर असले कुठलेही बंधन/रिस्ट्रिक्शन नसल्यामुळे एका राज्यात नक्षल्यांवर सुरक्षा दलांचा सामरिक दबाव वाढला की ते जवळच्या दुसऱया राज्यात पलायन करतात. सुरक्षा दलांसमोरचा दुसरा आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नक्षल्यांनी पेरलेल्या आयईडीच्या विनाशापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हा असतो. नक्षली आयईडी बिनचूक शोधून काढणारी यंत्रणा अजूनही विकसित झालेली नाही. वृत्तपत्रीय बातम्यांनुसार एका शाळकरी मुलाने अशी प्रणाली विकसित केली आहे, पण सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. मागील काही वर्षांपासून एका बाजूने सुरक्षा दलांचा वाढता दबाव आणि दुसऱया बाजूला हळूहळू का होईना, पण होत असलेला विकास यामुळे मध्य हिंदुस्थानात नक्षलविरोधी वातावरण निर्माण होणे सुरू झाले आहे. प्रत्येक जिह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वनाधिकाऱयाला त्यांच्या क्षेत्राच्या विकासासाठी मिळणाऱया प्रतिवर्षी प्रत्येकी दहा कोटी रुपयांच्या अनुदानामुळे विकासाची एकूणच गती वाढून हा एक प्रकारचा ‘गेम चेंजर’ झाला आहे. असे असले तरी नक्षलप्रभावीत क्षेत्रात अजूनही प्रशासकीय पारदर्शकता निर्माण झालेली दिसत नाही. आरोग्य, शिक्षण, पोलीस आणि इतर हितकारक खात्यांमध्ये कर्मचाऱयांची अजूनही मोठी कमतरता आहे. सामान्य माणसाच्या गाऱहाण्यांना सोडवू शकणारी सोपी, सुलभ शासकीय व्यवस्था अजूनही अस्तित्वात नाही.
दुसरीकडे नक्षल्यांचा मोठा हत्यारबंद जत्था अजूनही कार्यरत आहे हे विसरून चालणार नाही. बसवराज नक्षल्यांचा प्रमुख बनल्यामुळे नक्षली चळवळीला नवी सामरिक धार आली आहे. आजपर्यंत जेरबंद असलेल्या नक्षल्यांना खंबीर नेतृत्वाखालील सामरिकी कारवायांची मुभा मिळाली आहे. दंतेवाडाचा ताजा नक्षली हल्ला आणि तेथील एकमेव भाजप आमदाराची निर्घृण हत्या याचेच द्योतक आहे. तसेच नक्षल्यांच्या पोस्टर्सवर जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट आणि त्याचा प्रमुख यासिन मलिक याचे नाव पहिल्यांदाच दिसून आले आहे. त्यामुळे नक्षली आणि जिहादी अशी अभद्र आघाडी तर झाली नाही ना अशी शंका येऊ शकते. दंतेवाडातील नक्षली हल्ला झाल्याच्या दुसऱयाच दिवशी जेकेएलएफच्या यासिन मलिकच्या घरावर दहशतवाद्यांना पैसे देण्याच्या आरोपाखाली धाड पडते आणि त्याची रवानगी तुरुंगात होते किंवा एकाच दिवशी दंतेवाडय़ात मोठे राजकीय नक्षली हत्याकांड घडते आणि त्याच सुमारास पंजाबात दोडा बदरवालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारप्रमुखाची हत्या होते हा केवळ एक योगायोग नक्कीच नाही. नोटाबंदीनंतर नक्षल्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता त्यांच्यात जिहादी आर्थिक मदतीद्वारे जान फुंकली जात आहे हे एक ढळढळीत सत्य आहे. नक्षल्यांचा नवा प्रमुख बसवराज याचे संघटन कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाला इस्लामी जिहाद्यांची साधनसामुग्री आणि शस्त्रास्त्रांचे बळ मिळाले तर कश्मीर आणि मध्य हिंदुस्थानात हत्याकांडांचा धुमाकूळ होऊ शकतो. तेथील निवडणुका एकतर रद्द कराव्या लागतील किंवा पुढे ढकलाव्या लागतील. बरेच दिवस शांत बसलेल्या नक्षल्यांनी आता डोकं वर काढायला सुरुवात केली आहे हे दंतेवाडातील हल्ल्याने दाखवून दिले आहे. भविष्यातील हल्ले टाळण्यासाठी नक्षल्यांना आताच ठेचावे लागेल. त्यात कसूर करून चालणार नाही. कश्मीरला आपले लष्कर बघून घेईल, पण मध्य हिंदुस्थानात सुरक्षा दलांना कंबर कसून नक्षल्यांचा नायनाट करावाच लागेल
No comments:
Post a Comment