Total Pageviews

Thursday, 18 April 2019

अफगाणिस्तानातील नवा उषःकाल By dhanaji.surve | डॉ. जयदेवी पवार-PUDHARI



अफगाणिस्तानात प्रथमच हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. देशातील दहशतवादासह घरगुती हिंसाचाराविरुद्ध या महिलांनी आवाज बुलंद केला आहे. अफगाणिस्तानसारख्या देशात महिलांची परिस्थिती काय असते, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे येथील नारीशक्तीही अशी पेटून उठल्याचे दिसताना महिलांना अबला समजणार्‍यांना योग्य संदेश मिळाला असणार. तालिबानसारख्या निर्दयी शक्तीसमोर या महिला ताठ मानेने उभ्या राहिल्या आहेत आणि म्हणूनच ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरते.

अमेरिका, जपान आणि भारतासारख्या देशांकडून महिला सशक्तीकरणाची शिकवण घेतलेल्या अफगाणिस्तानातील महिलांनीसुद्धा आता बंधने झुगारून, परंपरेच्या बेड्या तोडून खुलेपणाने जगण्याचा संकल्प केला आहे. अफगाणिस्तान हा अनेक दशकांपासून तालिबान्यांच्या दहशतीमुळे पिचलेला देश आहे. तालिबान्यांपासून सुटका होताच तेथील महिला इतर अनेक देशांतर्गत समस्यांच्या चक्रात अडकल्या. केवळ तालिबान्यांची दहशतच नव्हे तर अफगाणिस्तानातील रूढीवादी आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेने महिलांवर लादलेला घरगुती हिंसाचार हीसुद्धा त्यांची मोठी समस्या आहे. परंतु, आता या समस्येपासून सुटका मिळविण्याचा मार्ग तेथील काही महिला संघटनांनी शोधला आहे. एकजुटीने हजारो महिला रस्त्यावर उतरण्याचा प्रसंग या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे.


अफगाणिस्तानात पुन्हा एकदा डोके वर काढू लागलेला दहशतवाद आणि घरगुती हिंसाचार याविरुद्ध लढण्यासाठी या महिलांनी महिला सशक्तीकरणाचे हत्यार उपसले आहे. अफगाणिस्तानातील जातीय आणि भाषिक अशा 35 संघटनांच्या महिलांनी एक संयुक्त संघटना तयार केली असून, त्या माध्यमातून देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी रस्त्यांवर मोर्चे काढण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात हा मोर्चा गेल्या महिनाभरापासून फिरत आहे आणि देशातील महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देऊन त्यांना जागरूक बनवीत आहे.

वाईट प्रवृत्तींविरुद्ध आता रस्त्यावर उतरलेल्या अफगाण महिलांची ही मोहीम महिलांना कमकुवत मानणार्‍यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. बिगरमुस्लिम देशांप्रमाणेच मुस्लिम देशांमधील महिलांमध्येही आपल्या अधिकारांसाठी लढण्याची चेतना निर्माण झाली आहे, हे अफगाणिस्तानातील घडामोडींवरून लक्षात येते. अनेक शतकांपासून असलेल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यास अधीर झालेल्या अनेक महिलांना हा मोर्चा बळ देणारा ठरेल. या ठिकाणी एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, तालिबान्यांच्या क्रूरतेचा अनुभव पुन्हा घ्यावा लागू नये, यासाठीच महिलांनी एकत्र येऊन हा मोर्चा सुरू केला आहे. महिला सशक्तीकरणाची ताकद पाहून तेथील रूढीवादी लोक चांगलेच धास्तावले आहेत. या चळवळीमागे महिलांचा आणखी एक उद्देश आहे. वस्तुतः अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवादाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. तालिबान्यांच्या हातात पुन्हा देश जाऊ नये, यासाठी महिलांनी आता पुढे सरसावून स्वतः लढा उभारण्याचा निश्‍चय केला आहे. त्यांना तेथील नागरिकांचा पाठिंबाही मिळत आहे, याचाच अर्थ त्यांची मोहीम यशस्वी होत आहे.

अफगाणिस्तानात या घडीला तरी तालिबान्यांचा दहशतवाद दिसून येत नाही. देशातील नागरिक सुमारे वीस वर्षांनंतर स्वातंत्र्याच्या वातावरणात खुला श्‍वास घेत आहेत. बदलांचे पडघम वाजू लागले आहेत. मुली भयमुक्त वातावरणात शाळेत जाऊ लागल्या आहेत. तेथील महिला आता खुलेपणाने क्रिकेट खेळताना दिसू लागल्या आहेत. वस्तुतः महिलांनी क्रिकेट खेळणे या देशात पूर्वी स्वप्नातही कुणाला खरे वाटले नसते. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून अनेक महिला लोकप्रतिनिधी बनून संसदेत पोहोचल्या आहेत. परंतु, त्यांच्या या स्वातंत्र्याला काही रूढीवादी लोक पुन्हा एकदा ग्रहण लावू पाहत आहेत. या सार्‍या गोष्टी महिलांनी कराव्यात, असे या रूढीप्रिय व्यक्तींना पटत नाही. परंतु, अशा माणसांना सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रत्यक्ष महिलांनीच आता कंबर कसली आहे.

महिलांनी काढलेल्या देशव्यापी मोर्चाला प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम तालिबान्यांच्या डोळ्यात खुपू लागल्यामुळे तेही आता आपल्या परीने ही मोहीम कशी थंडावेल, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अफगाणिस्तानात 19 वर्षांपूर्वी तालिबानी शासकांना सत्तेतून उखडून फेकण्यात आले. त्यानंतर तालिबानी पुन्हा आपले जाळे विणू पाहत आहेत. परंतु, आता ते आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात सफल होऊ शकणार नाहीत, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण, आता हे सगळे एवढे सोपे राहिलेले नाही. अफगाणिस्तानात नवी सकाळ उजाडू लागली आहे. या परिवर्तनात भारत सरकारची भूमिकाही साह्यभूत ठरली आहे. पूर्वी तालिबानचे अधिपत्य संपूर्ण अफगाणिस्तानावर होते. परंतु, 2001 मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनी तालिबान्यांना सत्तेवरून खेचून काढले. त्यांची संघटना विखुरली गेली. आता ही संघटना पुन्हा डोके वर काढू पाहत असेल, तर इतक्या वर्षांत ही संघटना पुन्हा एवढी सामर्थ्यशाली कशी बनली, हा प्रश्‍न विचारला जाणे स्वाभाविक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हानी झाल्यानंतर पुन्हा डोके वर काढण्यासाठी त्यांना नक्कीच कुणीतरी सक्रिय पाठिंबा देत आहे, असाच याचा अर्थ घेतला जाईल.

अफगाणिस्तानच्या नकाशावर तालिबानचा उदय सर्वप्रथम 1990 च्या दशकात झाला. त्यावेळी देशात प्रचंड प्रमाणावर यादवी युद्ध झाले होते. प्रत्येक शक्तीशाली कमांडरची आपली-आपली फौज होती. सर्वांना देशातील सत्तेत भागीदारी हवी होती आणि त्यासाठी ते लढत होते. त्या दरम्यानच या तालिबान्यांना पडद्यामागून पाकिस्तान मदत करीत असल्याचे समोर आले होते. या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पाकिस्तानातूनच पुरविली जात होती. अशीच काहीशी शंका यावेळीही बोलून दाखविली जात आहे. या चर्चेत सत्यता असल्याचे आढळल्यास, पाकिस्तान तालिबान्यांना पुन्हा एकदा मजबूत करून भारताची घेराबंदी करू पाहत आहे, हे स्पष्ट होईल. कारण, गेल्या काही वर्षांपासून भारत अफगाणिस्तानला सर्वतोपरी सक्रिय मदत करीत आहे. ही बाब पाकिस्तानला खुपत आहे. आता तर तालिबान्यांना केवळ पाकिस्तानच नव्हे तर चीनही मदत करीत असल्याच्या बातम्या येत आहेत.

तालिबान ही एक कट्टरपंथीयांची क्रूर संघटना आहे. त्यांचा विचार विभाजनवादी आहे. एकेकाळी रक्ताचे पाट वाहवूनच त्यांनी अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केला होता. तालिबानच्या शासन काळात महिलांना घराबाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती. मुलींना शाळेतसुद्धा जाणे शक्य नव्हते. महिलांनी निवडणुका लढविणे तर फारच दूरची गोष्ट होती. तालिबानी शासन काळात सर्वाधिक जुलूम महिलांवर झाले. तालिबानी दहशतवादी कोणाच्याही घरात घुसून महिलांशी घृणास्पद कृत्ये करीत असत. महिलांनी विरोध केल्यास त्यांची सर्वांसमक्ष गोळ्या झाडून हत्या केली जात होती. शिक्षण घेणार्‍या मुलींना भररस्त्यात विवस्त्र करून चाबकाचे फटके दिले जात असत. अत्याचारांनी कळस गाठला होता. परंतु, तालिबान्यांना सत्तेवरून दूर करताच सर्व काही सुरळीत झाले. मुली शाळेत जाऊ लागल्या. महिला निवडणुका लढवू लागल्या. सर्व प्रकारची बंधने झुगारून महिला घराबाहेर पडल्या.

तालिबानी पुन्हा एकदा देशात सक्रिय होत आहेत, हे लक्षात आल्याबरोबर अफगाणिस्तानातील महिला संघटना आता रस्त्यांवर उतरल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी तालिबान्यांनी स्प्रिंग ऑफेन्सिव्हची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. तालिबानी नेता मुल्ला ओमर याची आठवण म्हणून या मोहिमेचे नाव ओमारीअसे ठेवण्यात आले होते. म्हणजेच, पुन्हा एकदा तालिबान सक्रिय होत आहे, याचे हे संकेत होते. या संकटापासून बचाव करण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने भारताकडे मदत मागितली आहे. वास्तविक, पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे नंदनवन बनणे अफगाणिस्तानला मंजूर नाही.

आता या देशातील नागरिकांना मोकळ्या हवेत श्‍वास घेण्याची सवय लागली आहे. तेथील जनता आता पुन्हा गुलामगिरीच्या बंधनात अडकू इच्छित नाही. त्यामुळेच तेथील महिला जे काही करीत आहेत, त्याला तेथील जनतेने पाठिंबा द्यायलाच हवा. अफगाणिस्तानातील महिला आणि नागरिकांनी आपल्याला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी भारताकडून मदत मागितली आहे. भारत स्वतःसुद्धा दीर्घकाळ दहशतवादाशी झुंजत आहे. तालिबानने पुन्हा डोके काढावे, असे भारताला कदापि वाटणार नाही. तालिबानची अफगाणिस्तानातील उपस्थिती केवळ तेथील जनतेच्याच दृष्टीने वाईट नसून, संपूर्ण जगासाठी ती घातक आहे.

No comments:

Post a Comment