https://www.youtube.com/watch?v=Znwnevn_hNM&t=3s
अखेर 43 दिवसांनंतर 10 एप्रिलला पाकिस्तानने काही निवडक पत्रकारांना बालाकोट येथे नेले.
पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवॉं प्रांतातील बालाकोट येथील डोंगरशिखरावर असलेल्या
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरावर भारताने हवाई कारवाई
केली होती आणि कारवाईत जे साध्य करायचे ते पूर्णपणे साध्य केले आहे, असा दावा भारताने केला होता. ‘भारताचा हा दावा खोटा आहे. तिथे काही झाडे तुटलीत आणि उजाड जागी
खड्डे पडले, एवढे सोडले तर तिथे काहीही नुकसान
झाले नाही,’ असा प्रतिदावा पाकिस्तानने केला. आपला
दावा किती सत्य आहे हे दाखविण्यासाठी, खरेतर पाकिस्तानने लगेचच त्या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश द्यायला
हवा होता. परंतु, त्यासाठी पाकिस्तानला 43 दिवस लागावेत?
पाकिस्तान कैचीत सापडला होता. भारताच्या हल्ल्यात बालाकोट येथील
जैशचा मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, हे सत्य मान्य केले, तर पाकिस्तानच्या भूमीत दहशतवाद्यांना फळण्यास-फुलण्यास पूर्ण मुभा
आहे, हे वास्तव जगासमोर पुराव्यानिशी आले असते. त्यामुळे आयएसआयपोषित 300 ते 350 प्रशिक्षार्थी दहशतवाद्यांच्या ‘अकाली’ मरणाचे दु:ख, हृदयावर दगड ठेवून, पाकिस्तानने महत्प्रयासाने गिळले आणि लगेचच या संपूर्ण परिसराला
लष्कराने जबरदस्त वेढा देऊन तिथे कुणालाही प्रवेशाची अनुमती दिली नाही. भारताने या
हल्ल्यात जे स्पाईस नावाचे बॉम्ब वापरले, त्याने बहुतांशी दहशतवादी जळून गेले होते. असे म्हणतात की, पाकिस्तानने या मृतदेहांना कबरीत पुरण्यासाठी वेळ खर्च न करता, त्यांना जाळले आणि बाजूने वाहात असलेल्या नदीत त्यांची राख
विसर्जित केली. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर हिंदू अंत्यसंस्कारच केले, असे म्हणता येईल. नाइलाज होता. भारताने घडवून आणलेल्या विनाशाच्या
सर्व खाणाखुणा पुसून टाकण्याची घाई होती ना! आमचे काहीच नुकसान झाले नाही, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी तिथे प्रत्यक्ष जाऊ देण्याची मागणी
आंतरराष्ट्रीय मीडिया सतत करत राहिला. परंतु, कधी स्थानिक परिस्थिती बरोबर नाही, तर कधी हवामान योग्य नाही, असली कारणे पाकिस्तान देत राहिला.
आपल्या हवाई दलाच्या कौशल्याच्या व भेदक सिद्धतेच्या जनतेसमोर
केलेल्या वल्गनांवरून त्यांचा विश्वास उडून जाऊ नये म्हणून, पाकिस्तानला काहीतरी करणे भाग होते. ते त्याने केले. भारताच्या
हवाई हद्दीत घुसण्याचा असफल प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्याचे अमेरिकी
बनावटीचे एफ-16 हे अत्याधुनिक विमान, भारताच्या जुन्या मिग-21 बायसन विमानाने पाडले. आता पुन्हा पाकिस्तानची पंचाईत झाली. आमचे
एफ-16 हे विमान भारताने पाडले, याची जाहीर कबुली त्याला देता येईना. कारण, ही लढाऊ विमाने खरेदी करताना, भारताच्या दबावामुळे अमेरिकेने पाकिस्तानसमोर अट ठेवली होती की, या विमानांचा वापर भारताविरुद्ध कधीही करणार नाही. परंतु, गडबडीत तो वापर तर केला गेला होता. त्यामुळे आजही पाकिस्तान एफ-16 विमान भारताने पाडलेच नाही, असे म्हणत आहे. या विमानाचा चालक यात मरण पावला आहे. पण, त्यालाही कुठलाच लष्करी सन्मान पाकिस्तान देऊ शकत नाही. कारण, तसे केले तर आपण भारताविरुद्ध एफ-16 विमान वापरले होते, हे सिद्ध होईल. आधीच रागावलेली अमेरिका त्यानंतर आपले काय हाल करील, याची पाकिस्तानला कल्पना असली पाहिजे.
या सर्व घडामोडीत जगाचे लक्ष बालाकोटहून दुसरीकडे वळविण्यात
पाकिस्तानला थोडे यशही आले. तिकडे बालाकोट येथे उद्ध्वस्त झालेल्या सर्व इमारती
युद्धपातळीवर बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कुठे आंतरराष्ट्रीय पत्रकारांना
तिथे नेण्याचा मुहूर्त काढण्यात आला. तोही केव्हा, तर भारतात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या
आधल्या दिवशी. हा काही निव्वळ योगायोग नाही. मुद्दामच हा दिवस निवडला असावा.
जेणेकरून भारतातील पाकिस्तानधार्जिण्या पत्रकारांना तसेच राजकीय नेत्यांना, मोदी सरकारविरुद्ध धुराळा उडविण्यासाठी एक नवे अस्त्र उपलब्ध
व्हावे.
यासंबंधीचा एक व्हिडीओ पाकिस्तानने जारी केला आहे. त्यात, बालाकोटच्या डोंगरशिखरावर एक अत्याधुनिक नवी कोरी करकरीत शाळा
दिसते. नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आली आहे. प्रशस्त खोल्या आहेत. त्यात गणवेश
घातलेली काही मुले आहेत. त्यांना शिकविणार्या देखण्या शिक्षिका आहेत. पत्रकार
त्या मुलांना प्रश्न विचारतात. मुले म्हणतात, आम्ही सर्व इथलीच स्थानिक मुले आहोत. या पथकासोबत पाक लष्कराचे
प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर आहेत आणि ते सर्वांना माहिती देत आहेत. जेमतेम 20 मिनिटांची ही भेट आहे. या भेटीत ही मुले आणि पत्रकार यांना कुठेही
मोकळा संवाद करू देण्यात आला नाही. जगाने सोडाच, परंतु भारतातील पाकधार्जिण्या मीडियानेदेखील या व्हिडीओला
विश्वसनीय मानले नाही. आपण जर या व्हिडीओवरून मोदी सरकारला घेरले, तर कदाचित जनता आपल्याला चांगलीच सोलून काढेल, अशी भीती भारतीय मीडियाला असावी. पण केव्हा ना केव्हातरी, कदाचित निवडणूक झाल्यावर भारतीय मीडियाची पाकधार्जिणी वृत्ती उसळून
बाहेर येऊ शकते. जगाला बालाकोटची जागा दाखविण्याच्या बहाण्याने भारतातील
निवडणुकीचे वातावरण विषाक्त करण्याची पाकिस्तानची ही एक विषगर्भी कृतीच म्हणता
येईल.
अगदी याच सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, इस्लामाबाद येथे काही विदेशी पत्रकारांशी संवाद साधताना विधान केले
की, जर भारतात यावेळी भाजपा िंजकली तर काश्मीरबाबत काहीतरी तोडगा
निघण्याची आशा आहे; तसेच भारत-पाकदरम्यान शांतिवार्ता
सुरू होण्याची अधिक संधी आहे. इम्रान खान असेही म्हणाले की, जर कॉंग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, तर उजव्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रियेला घाबरून हे सरकार
पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयार होणार नाही. यावरून इम्रान खान यांना असे
दर्शवायचे आहे की, भारत-पाकिस्तानदरम्यानच्या
शांतिवार्तेचा इतिहास बघितला, तर भाजपा सोडली तर
कॉंग्रेससह कुठल्याही पक्षाने पाकिस्तानशी शांतिवार्ता करण्यास पुढाकार घेतलेला
नाही. इम्रान खान यांचे हे प्रतिपादन काही अंशी खरेही आहे. भाजपाचे अटलबिहारी
वाजपेयी व नरेंद्र मोदी हे पंतप्रधान सोडल्यास, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव
आणि मनमोहन सिंग या कॉंग्रेसी पंतप्रधानांनी त्यांच्या
कारकीर्दीत कधीही पाकिस्तानला भेट दिलेली नाही. परंतु, इम्रान खानच्या या वक्तव्याने एकदम हुरळून जायचे कारण नाही. इम्रान
खानचीही इच्छा आहे की, भारतात मोदीच जिंकावे वगैरे असले निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. इम्रान खानच्या या
वक्तव्यावर कॉंग्रेससहित विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया बघितल्या, तर इम्रान खान यांनी हे विधान निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय
मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच केले असण्याची दाट शक्यता आहे.
No comments:
Post a Comment