Total Pageviews

Saturday, 6 April 2019

वंगभूमीत मोदी अस्त्र? Parashuram Patil- TARUN BHARAT BELGAUM



आज अनेक वृत्तवाहिन्या आपापले सर्वे दाखवित असले तरी देखील प्रत्येक सर्वेक्षण हे देशात आगामी सरकार मोदींचेच येईल अशी परिस्थिती व्यक्त करीत आहे. या सर्वेक्षणांवरून प्रत्येक राज्यातील स्थानिक राजकारणदेखील त्या दिशेने वळण घेत आहे आणि त्यातील सर्वात लक्षात घ्यावे असे राज्य म्हणजेच पश्चिम बंगाल. या राज्यावर 34 वर्षे हेकेखोर लाल बावटय़ाची अमर्याद सत्ता होती. डाव्यांच्या या भरभक्कम आघाडीला आणि मूळ पायाच उखडून काढणाऱया ममता बॅनर्जी या गेली 9 वर्षे या ठिकाणी राज्य चालवित आहेत. या गडबडीत बंगालमधून काँगेस, डावे गायब आणि त्या जागी हट्टी दीदीनी आपले बस्तान घट्टपणे बसविलेले आहे. काँग्रेसची पाळेमुळे उखडून टाकून लाल बावटय़ाने या ठिकाणी 34 वर्षे एकहाती सत्ता सांभाळली. देशभरात प्रत्येक राज्यात भाजपने आपली पाळेमुळे घट्ट केली तथापि, केरळ आणि प. बंगाल ही दोन अशी राज्ये आहेत ज्या ठिकाणी तेथील जनतेने भाजपला फिरकूही दिले नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ममता बॅनर्जी यांनी अटलजींना साथ दिली व त्यावेळी प्रथमच बंगालमध्ये आघाडी केल्याने भाजपला तिथे खाते उघडायला संधी मिळाली. परंतु फार काळ भाजप या राज्यात तग धरू शकला नाही. सध्या भाजपचे या राज्यात केवळ 2 खासदार आहेत. या मोठय़ा राज्यातून 42 खासदार संसदेत पाठविले जातात. डाव्या आघाडीचे राज्य संपुष्टात आल्यानंतर ममतेचे राज्य चालू आहे. आक्रस्ताळेपणा हा स्थायिभाव असलेल्या ममता बॅनर्जी यांनी गेले दीड वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांचा बंगालमध्ये अतोनात छळ आरंभिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर ते घेत असलेल्या सभा ठिकाणी पोलिसांचा लाठीहल्ला, त्यांचे मंडप तोडून टाकणे, मिळेल त्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करणे, त्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर अनेक गुन्हे तयार करून पोलिसी बडगा दाखविणे, कित्येक कार्यकर्त्यांचे तर बंगालमध्ये खून झालेले आहेत. यात अडकलेली जास्तीत जास्त संशयित हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते वा पदाधिकारीच आहेत. एकवेळ लाल बावटा परवडला पण तृणमूल नको अशी भयानक अवस्था बंगालमध्ये करून टाकली आहे. त्यातल्या त्यात ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम समाजासाठी वेळोवेळी व वारंवार ममता दाखविली किंवा त्यांना खूष करण्यासाठी विविध योजना मांडल्या. प. बंगालमधील सर्वात मोठा उत्सव हा दुर्गापूजेचा. या उत्सवाच्या समाप्तीला दुर्गामातेच्या विसर्जनावर याच ममता बॅनर्जी यांनी टाच लावून दुर्गापूजा विसर्जन त्या तिथी दिवशी न करता दुसऱया दिवशी करा असा आदेशही जारी केला. कारण त्याच दिवशी मुस्लीम समाजाचा उत्सव होता. केवळ मतांसाठी अल्पसंख्यकांना खूष ठेवता ठेवता बहुजनांवर अन्याय व अत्याचार होत असल्याने साहजिकच या परिस्थितीचा लाभ नरेंद्र मोदी यांचा भाजप उठविणार नसेल तर नवल! भाजप कार्यकर्त्यांवर अमानुषपणे होत असलेल्या अत्याचाराने बंगालमधील हिंदू नागरिकही संतप्त बनले आणि भाजपसाठी बंगालमध्ये जनतेत सहानुभूती वाढत गेली. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कोलकत्ता येथील ब्रिगेड मैदानावर झालेल्या सभेने अनेक जणांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. ज्या भाजपला आजवर वंगभूमीने बाजूला ठेवले त्या पक्षाला आज बंगालने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहे. हा चमत्कार केवळ नरेंद्र मोदी यांनीच घडविलेला आहे. अलीकडे अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी दीदींच्या राज्यात पोहोचले, त्यामुळे दीदांचा अक्षरशः तीळपापड झालेला आहे. बंगालमध्ये ज्या पक्षाला हजारभर माणसेदेखील जमत नसतात त्या राज्याच्या राजधानीत मोदींच्या सभेला हजारोंच्या संख्येने चेंगराचेंगरी होईपर्यंत नागरिक जमतात याचाच अर्थ बंगालच्या आधुनिक राजकारणाच्या इतिहासात आता नवा अध्याय सुरू झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. गेली तीन वर्षे ममता बॅनर्जी या मोदींवर वाट्टेल त्या पातळीवर जाऊन आक्रस्ताळेपणाने करत असलेले बेछूट आरोप, केंद्राशी घेतलेला पंगा या साऱया प्रकारामुळे बंगालच्या विकासावर परिणाम होत आहे. जनतेचा आक्रोश हा केंद्रापर्यंत पोहोचला आहे. मात्र ममता बॅनर्जी केवळ आपल्याच दुनियेत वावरत आहेत. मोदींच्या परवाच्या सभेला जमलेला प्रचंड जनसमुदाय बंगालमध्ये बदलत्या राजकारणाची नांदी ठरणार आहे, यात आता शंकाच नाही. जलनेवाले को जलने दो’! असे म्हणतात त्यानुसार केंद्रातील भरभक्कम सत्ता हाती असल्याने ममतादीदांचा योग्य बंदोबस्त करण्यात मोदींना भारी यश आलेले आहे. सीबीआयच्या कार्यात अडथळा आणून दीदीनी जे उपोषणाचे अस्त्र उगारले त्यातून सर्वोच्च न्यायालयानेही एकापेक्षा एक झटके बॅनर्जी यांना दिले. मोदींना राजकारणातून संपविण्यासाठी जंग जंग पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांना आता स्वकियांचीच जास्त भीती वाटू लागली आहे. त्यांच्याच तृणमूल काँग्रेसमधील काही शिलेदारांनी भाजपमध्ये पटापट उडय़ा मारण्यास सुरुवात केल्याने ममतांना या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या धोरणाबाबत फेरविचार करावाच लागेल अशी चिन्हे आज दिसू लागली आहेत. बंगाल पाठोपाठ केरळमध्येही झेंडा फडकविण्यास भाजप सज्ज झाला आहे. या दोन राज्यांमध्ये भाजप विरोधात जे पूर्वापार वातावरण होते त्यातील गडदपणा जाऊन फिकेपणा आला आणि आता प्रत्यक्षात दोन्ही राज्यात भाजपने सध्या जे काही वातावरण तयार केले आणि मोदींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी काळात या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता आणली तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. कम्युनिस्टांचे गड व किल्ले असलेली दोन्ही राज्ये. बंगाल त्यांच्या हातून जाऊन दीदींच्या हाती पोहोचले खरे परंतु त्यांच्या विक्षिप्त वागण्याने बंगाली जनता वेगळा विचार करू लागली आहे असा संदेश 3 एप्रिलच्या मोदींच्या सभेने दिलेला आहे. या राज्यात जर भाजपने स्वबळावर काही प्रमाणात मते मिळविली तर ममताला आपल्या ध्येय धोरणात बदल करावा लागेल. वंगभूमीत राजकीय परिवर्तनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एक उत्तम उतारा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही

No comments:

Post a Comment