श्रीलंकेत
आणीबाणी,हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’
रविवारी
ईस्टर साजरा होत असतानाच येथे झालेल्या 8 साखळी स्फोटांमुळे श्रीलंकेसह जग हादरले.
या घटनेनंतर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा
परिषदेने श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली. ही आणीबाणी मध्यरात्रीपासूनच लागू होणार असून
त्यामुळे सुरक्षारक्षकांना दहशतवाद निपटून काढण्यासाठी जादा शक्ती मिळू शकणार आहे.
दरम्यान, मंगळवारी श्रीलंकेत राष्ट्रीय दुखवटा पाळला
जाणार असून याप्रकरणी 22जणांना अटक करण्यात आली आहे.
या दहशतवादी
आत्मघातकी हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ या कुख्यात कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांचा
हात असल्याचे बोलले जात आहे. रविवारी झालेल्या साखळी स्फोटांमध्ये किमान 290जणांचा
बळी गेला असून 500हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रविवारी रात्री लागू करण्यात आलेली
संचारबंदी सोमवारी सकाळी 6 वाजता शिथिल करण्यात आली होती. मात्र सोमवारी रात्री 8 वाजता
पुन्हा ती लागू करण्यात आली आहे.
रविवारी
स्फोटांनी कोलंबो हादरले असतानाच सोमवारी मध्य कोलंबोतील एका बस स्थानकावर आणखी 87
डिटोनेटर्स पोलिसांना आढळून आल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे या साखळी स्फोटांमागे
मोठा कट रचण्यात आल्याची शंका व्यक्त होत आहे. यातील 12 बॉम्ब डिटोनेटर्स बस स्थानकाच्या
मैदानात सापडले. त्यानंतर शोधमोहीम सुरू करताच आणखी 75 डिटोनेटर्स त्याच परिसरात आढळून
आले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एकीकडे कोलंबो स्फोटांमधील मृतांचा आकडा वाढत जात असतानाच कोलंबोमधील एका चर्चजवळ
सोमवारीही एक मोठा स्फोट झाला. या चर्चजवळ उभ्या असलेल्या एका व्हॅनमध्ये जबरदस्त स्फोट
झाला. या स्फोटाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली असून व्हॅनमधून आगीचे लोळ उसळताना दिसत
आहेत.
डेन्मार्कच्या
अब्जाधीशाची तीन मुले ठार
रविवारी
कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात डेन्मार्कचा अब्जाधीश अंद्रेस पॉलसन यांच्या तीन
मुलांचा मृत्यू झाला. ते, पत्नी आणि चार मुलांसह श्रीलंकेत सुट्टी घालवण्यासाठी
आले होते. रविवारी ईस्टर संडेनिमित्ताने पॉलसन कुटुंबासह चर्चमध्ये गेले असताना झालेल्या
बॉम्बस्फोटात त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला.
तपासासाठी
समितीची स्थापना
श्रीलंकेत
दोन ठिकाणी स्फोटांसह तीन लक्झरी हॉटेलांमध्ये आणि तीन चर्चमध्ये रविवारी स्फोट झाले.
या स्फोटांच्या तपासकार्यासाठी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी तीन सदस्यीय समितीची
स्थापना केली आहे. या समितीमध्ये तेथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किजित माललगोडा
यांचाही समावेश आहे. या तपासात स्फोटांशी संबंधित सर्वच बाजूंचा तपशील, त्यांची पार्श्वभूमी आणि इतर बाबींचाही आढावा घेण्याचा आदेश समितीला देण्यात
आला आहे. समितीने येत्या दोन आठवडय़ांत आपला अहवाल सादर करायचा आहे.
आयफेल
टॉवरचे दिवेही मालवले
श्रीलंकेतील
कोलंबोत रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत नाहक बळी पडलेल्या मृतांना आणि जखमींना
आयफेल टॉवरनेही आपले दिवे मालवून श्रद्धांजली वाहिली. पॅरिसमधला हा टॉवर नेहमी प्रकाशमान
असतो, पण कोलंबो स्फोटांतील मृतांच्या आदरांजलीसाठी
मध्यरात्री 12 वाजता ते बंद ठेवण्यात आले. आयफेल टॉवरच्या अधिकृत ट्विटरवर त्यापूर्वीच
‘मध्यरात्री 12 वाजता टॉवरवरील दिवे विझवले जातील’ असा मेसेजही व्हायरल करण्यात आला
होता.
बॉम्ब
निकामी करताना गाडीत झाला नववा स्फोट
कोलंबोत
आज चर्चजवळ गाडीत सापडलेला बॉम्ब निकामी करताना त्याचा स्फोट झाला. त्यामुळे गाडीचा
चक्काचूर झाला आणि गाडीला आग लागली. मात्र, त्यात कोणालाही
दुखापत झाली नाही. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. हा नववा स्फोट आहे. त्या आधी
आज सकाळी विमानतळाजवळूनही एक बॉम्ब ताब्यात घेण्यात आला.
आतापर्यंत
8 हिंदुस्थानी ठार
श्रीलंकेत
झालेल्या बॉम्बस्फोटांमधील मृतांमध्ये 8 हिंदुस्थानींचा समावेश आहे. एच. शिवकुमार, वेमुराई तुलसीराम, एस. आर. नागराज, के. जी. हनुमंतरायप्पा, एम. रंगप्पा, लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर, रमेश
अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये कर्नाटक, तामीळनाडूचे रहिवासी
आहेत.
सर्व
आत्मघाती हल्लेखोर श्रीलंकन
श्रीलंकेसारख्या निसर्गरम्य आणि जगातील पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या 'पाचूच्या बेटा'ने आधी तामिळी वाघांच्या सशस्त्र बंडखोरीचा बीमोड करण्यात बराच काळ आणि मोठी शक्ती खर्ची घातली. आता भारताच्या या शेजाऱ्याला भारताप्रमाणेच जिहादी दुष्टशक्ती छळत आहेत. ख्रिस्ती धर्मियांसाठी 'इस्टर'नंतरचा रविवार हा विशेष पवित्र. तोच काळमुहूर्त पकडून आत्मघाती दहशतवाद्यांनी किमान आठ स्फोट केले. देशोदेशीचे पर्यटक आणि स्थानिक येशूभक्त कॅथलिक यांचे बळी गेल्याची जबाबदारी अजून कोणी घेतली नसली तरी हे साखळीस्फोट 'नॅशनल तौहीद जमात' या इस्लामी गटाने केले असणार, असा अंदाज आहे. असे स्फोट होऊ शकतात, असा गंभीर इशारा भारतीय तसेच अमेरिकी गुप्तचर संस्थांनी श्रीलंका सरकारला नऊ एप्रिलच्या सुमारास दिला होता. पण अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यातील सत्तासंघर्षात त्याकडे दुर्लक्ष झाले की नेमके काय करायचे, हेच सुरक्षा दलांना समजले नाही, हे पुढे स्पष्ट होईल. मात्र, राजधानी कोलंबो, निगोम्बा आणि बट्टिकलोआ या तीन शहरांमध्ये एकाच दिवशी इतके शक्तिशाली बाँबस्फोट करण्याएवढी ताकद स्थानिक संघटनांमध्ये नाही.
श्रीलंका हा भारतासारखाच बहुधर्मी, शांतताप्रिय
देश आहे. तेथे शेकडो वर्षे जगाच्या विविध भागांमधून अनेक कारणांनी जनसमूह स्थलांतरित
झाले. ७० टक्के बौद्ध आणि उरलेल्या ३० टक्क्यांमध्ये हिंदू, ख्रिस्ती
आणि मुस्लिम यांची विभागणी असे तेथील लोकसंख्येचे गणित आहे. पण साऱ्या दक्षिण आशियाला
ज्या विखारी धर्मवादाने ग्रासले आहे, तोच श्रीलंकेलाही छळतो आहे. यात सर्व
धर्मांचे अनुयायी आक्रमक व विध्वंसक पवित्रा घेऊन इतरांवर तुटून पडत आहेत. 'जिहाद
श्रीलंका' हा तरुणांचा गट स्थापन होऊन वहाबी इस्लामशी आपले नाते जोडण्याचा
प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने करीत आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेत ख्रिस्ती आणि बौद्ध
समुदाय अल्पसंख्य मुस्लिमांना सुखाने जगू देत नाहीत, अशी तक्रार 'इस्लामिक
स्टेट'चे समर्थक खुलेआम करीत होते. छोट्यामोठ्या धार्मिक चकमकी चालूच
होत्या. पण ताज्या साखळीस्फोटांनी श्रीलंकेत जिहादी युद्धाचा नवा टप्पा गाठला गेला.
इस्लामिक स्टेट किंवा आफ्रिका खंडात धुमाकूळ घालणाऱ्या सशस्त्र इस्लामी संघटनांनी स्थानिक
श्रीलंकी तरुणांना कितपत मदत केली, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, मुंबईवर
झालेल्या हल्ल्याचे किंवा बाँबस्फोटांचे पाकिस्तानात जे दीर्घकाळ नियोजन चालू होते, ते पाहता
श्रीलंकेतील स्फोटांसाठीही कित्येक महिने नियोजन आणि रेकी झाल्या असणार. त्याशिवाय, इतका
व्यापक हल्ला अशक्य असतो.
श्रीलंकेची भौगोलिक रचना सागरी मार्गाने स्फोटके वा रसद येण्यासाठी
कमालीची अनुकूल आहे. त्यातच, 'तामिळनाडू तौहीद जमात' ही कडवी
संघटना भारताच्या भूमीवर आहेच. तामिळनाडू व श्रीलंका यांचे जे विचित्र, बहुपदरी
नाते आहे, त्यातला हा इस्लामी दहशतवादाचा कोनही या स्फोटांच्या निमित्ताने
उघड होतो आहे. श्रीलंकेत आता आणीबाणी जाहीर झाली आहे. देशभर अटकसत्रही चालू झाले आहे.
मात्र, या साऱ्यांतून दक्षिण आशियापुढील जो जिहादी धोका पुन्हा अधोरेखित
झाला, त्याची भारताने दखल घेऊन वेगाने व्यापक पावले टाकण्याची गरज
आहे. एकतर, आता श्रीलंकेला सावरण्यासाठी चीन तेथे अधिक प्रमाणात हातपाय
पसरण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन भारताने दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषदेतील
म्हणजे 'सार्क'मधील सदस्य देशांची मजबूत दहशतवादविरोधी आघाडी उघडण्याची
गरज आहे. त्यात येण्यास पाकिस्तान खळखळ करणार, हे उघड
आहे. पण भूतान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान
यांच्या सहकार्याने दक्षिण आशियातील दहशतवाद खणून काढण्यासाठी काय करता येईल, याचा
नव्याने विचार करण्याची गरज या स्फोटांनी निर्माण झाली आहे.
शीतयुद्ध संपल्यानंतर जगात संघर्षांची जी नवी बेटे तयार झाली, तीत दक्षिण
आशियातील अनेक टापू अधिकाधिक अशांत व रक्तरंजित बनत गेले आहेत. तेथे शांतता आणण्यासाठी
मोठा देश म्हणून भारताने पुढाकार घेण्याची तसेच 'सार्क'सारखी
संघटना जिवंत ठेवण्याची नितांत गरज आहे. आज कडव्या इस्लामी दहशतवादाने जगाच्या सर्व
खंडांमध्ये उच्छाद मांडला आहे. तो रोखायचा तर एक नवे सामंजस्याचे पर्व शेजारी देशांमध्ये
सुरू व्हायला हवे. या स्फोटांचा तपास करण्यासाठी आणि त्या मागच्या संघटनांच्या मुसक्या
आवळण्यासाठी भारताने श्रीलंकेला हवी ती सर्व मदत करण्यातून यातले पहिले पाऊल पडू शकेल.
दिल्लीतील आत्ताचे व नवे सरकारही श्रीलंकेकडे यासाठी खुल्या दिलाने मैत्रीचा हात पुढे
करील, अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment