शक्तिशाली पंजाबी मुस्लिमांकडून सैन्यशक्ती, प्रशासकीय ताकद आणि लोकशाही दंभाच्या बळावर नियंत्रित केल्या जाणार्या पाकिस्तानातून नेहमीच आझादीचे नारे ऐकायला मिळतात. तुकड्यातुकड्यांत- छिन्नविछिन्न होऊन विखुरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्या पाकिस्तानच्या प्रेमाचे गोडवे गाणारे भारतातही आहेतच, त्यांनी ही स्थिती पाहावी आणि भारताशी एकनिष्ठ राहावे. तेच त्यांच्या हिताचे ठरेल.
शक्तिशाली पंजाबी मुस्लिमांकडून सैन्यशक्ती, प्रशासकीय ताकद आणि लोकशाही दंभाच्या बळावर नियंत्रित केल्या जाणार्या पाकिस्तानातून नेहमीच आझादीचे नारे ऐकायला मिळतात. कधी सिंधी मुसलमान, कधी मुहाजिर मुसलमान तर, कधी बलुची मुसलमान पाकिस्तानपासून फुटून निघण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आंदोलनांच्या, निदर्शनांच्या माध्यमातून अन्यायी, अत्याचारी सरकारविरोधात आवाज बुलंद करताना दिसतात. फुटीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून स्वतंत्र पख्तुनीस्तानची मागणीही जोरदारपणे होत आहे. सोबतच शियांनीही पाकमध्ये राहण्यास विरोध दर्शवला आहे. धर्मांध विचारांच्या आधारे भारताच्या फाळणीतून अनैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या पाकिस्तानचे भविष्यात अनेक तुकड्यांत विभाजन होईल, अशी तिथली सध्याची परिस्थिती आहे, हा दैवदुर्विलास की काव्यगत न्याय, हे येणारा काळच ठरवेल. परंतु, आपल्यासोबत कित्येक अराजके घेऊन जाणारा पाकिस्तान सध्यातरी धगधगताना दिसतो, इतकेच.
नुकतेच दहशतवादी पिलावळीला पाळणार्या पाकिस्तानात ‘आझादी’ची मागणी करणार्या पश्तूनी नेत्यांनी संसदीय आणि लोकशाही प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. कारण, पश्तूनी नेत्यांच्या मते पाकिस्तानची नॅशनल असेम्ब्ली एका रबरस्टॅम्पप्रमाणे काम करते. सोबतच पाकिस्तानात सत्तेच्या खेळात राजकीय नेत्यांचा दुरुपयोगही केला जात आहे, त्याचमुळे पश्तूनी नेत्यांनी हे पाऊल उचलले. हे खरेच आहे की, पाकिस्तान सरकार सैन्याच्या आणि आयएसआयच्या हातातील कठपुतळीप्रमाणेच ते सांगेल तितकेच पाहते, ऐकते आणि बोलतेही.तिथला लोकनियुक्त पंतप्रधानदेखील स्वतःच्या इच्छेनुसार एखादा निर्णय घेऊ शकत नाही, तर त्याला सैन्याच्या आणि ‘आयएसआय’च्या इशार्यावरच नाचावे लागते अन् या सगळ्यांचाच जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी गटांना खुलेआम पाठिंबाही असतो. म्हणूनच मसूद अझहर असो वा हाफिज सईद तिथे उजळमाथ्याने राजरोस वावरतात.
दरम्यान, लोकशाही प्रक्रियेवरील बहिष्काराची घोषणा ‘पश्तून तहफ्फूज मूव्हमेंट’ म्हणजेच ‘पीटीएम’च्या युरोपातील शाखेने केली आहे. माशेर मंजूर अहमद पश्तीन या पश्तून नेत्याच्या पीटीएमला संसदीय राजकारणापासून दूर ठेवण्याच्या निर्णयाचे संघटनेनेदेखील समर्थन केले आहे. पीटीएम-युरोपकडून असेही सांगण्यात आले की, “आम्ही संसदीय राजकारणाला पूर्णपणे नाकारतो. पीटीएम संसदीय राजकारणात सामील झाली तर ती राष्ट्रीय संकटासारखी स्थिती असेल. कारण, त्यातून पश्तूनी लोकांच्या आंदोलनावर विपरित परिणाम पडेल. या आंदोलनानेच निरनिराळ्या क्षेत्रात काम करणार्या लाखो पश्तूनी लोकांना एकत्र आणले आहे.”
‘पश्तून तहफ्फूज मूव्हमेंट’ अर्थात ‘पीटीएम’ ही संघटना पाकिस्तानात पश्तूनी नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलने करणारी महत्त्वाची संघटना आहे. एकच धर्म असूनही पाकिस्तानात सुन्नी-वहाबी वा पंजाबी मुस्लीम वगळता शिया, मुहाजिर, अहमदिया, सिंधी आदी समुदायांना नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळाल्याचे शेकडो दाखले दिसतात. गेल्या काही काळापासून तर पाकिस्तानात धर्मांध कट्टरवाद्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून जो त्यांच्या विचारांच्या विरोधी असेल, मग तो अल्लाहला मानणारा मुस्लीम असला तरी ते त्याला शत्रूच समजतात. पश्तूनांची अवस्थादेखील अशा अत्याचारग्रस्तांहून निराळी नाही. ‘पीटीएम’ ही संघटना अशाचप्रकारे बर्याच वर्षांपासून पश्तूनांवर होणार्या अन्याय व मानवाधिकार उल्लंघनाविरोधात काम करत आहे, तेही ‘आझादी’च्या मागणीसह!
दरम्यान, पश्तूनींसाठी काम करणारे प्राध्यापक अरमान लुनी यांच्या हत्येविरोधात काढलेल्या ‘पश्तून लाँग मार्च’च्या यशानंतर आता ही संघटना आणखी आक्रमकपणे आंदोलनाच्या तयारीत आहे, ज्याला त्यांनी ‘पश्तून लाँग मार्च-२’ असे नाव दिले आहे. पश्तूनींनी पाकिस्तान सरकार आणि ‘आयएसआय’ला अशाप्रकारे थेट आव्हान दिल्याचेच यातून स्पष्ट होते. दुसरीकडे तुकड्यातुकड्यांत- छिन्नविछिन्न होऊन विखुरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्या पाकिस्तानच्या प्रेमाचे गोडवे गाणारे भारतातही आहेतच, त्यांनी ही स्थिती पाहावी आणि भारताशी एकनिष्ठ राहावे. तेच त्यांच्या हिताचे ठरेल
No comments:
Post a Comment