Total Pageviews

Thursday 11 April 2019

मतदारांनो, पेकाटात लाथ हाणा या दीड शहाण्यांच्या अन्‌ बजावा मतदानाचा अधिकार! कुणाला मतदान करायचे हे स्वत: ठरवा. निर्णय देशहितार्थ घ्यासक्षम पर्याय तुम्हीच निवडा. हो! पण, मतदान जरूर करा!.

या देशातले विविध क्षेत्रातले एकत्र येऊन भाजपाला, नरेंद्र मोदींना मत देऊ नका म्हणून सांगतात, सांगू शकतात... अमर्याद अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे अजून काय पुरावे हवेत सांगा? तहीही, विद्यमान सरकारच्या काळात बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचा कांगावा करताहेत सारे. तरी बरं, कॉंग्रेसने लादलेल्या आणिबाणीचा कडवा अनुभव गाठीशी आहे या देशाच्या. केवळ, या देशातल्या रसिकांनी जीव ओवाळून टाकल्यामुळे मोठेपण वाट्याला आलेले अन्‌ रसिकांच्याच खिशातल्या पैशाच्या बळावर मस्तपैकी चैन करणारे हे तमाम कलावंत स्वत:ची एक विचारसरणी गाठीशी बांधून असतात. त्यांच्या लेखी तेच तेवढे पुरोगामी अन्‌ इतर सारे मागास, बुरसटलेल्या विचारांचे असतात. त्यांना पटणार्‍या विचारांचे गाठोडे उराशी बाळगून जगणारी मंडळी तेवढी शहाणी, बाकी सारा मूर्खांचा बाजार असल्याचा त्यांचा गैरसमज असतो. कालपर्यंत कॉंग्रेसच्या विशाल वटवृक्षाखाली यांची खुरटी झाडं जगत होती, कित्येक सरकारी सांस्कृतिक संस्थांवर यांचे प्रभुत्व कायम होते तोवर जणू सारे यथायोग्य चालले होते. पण न पटणार्‍या विचारांचे सरकार दिल्लीत स्थापन झाल्यापासून त्यांना पोटदुखी सुरू झाली आहे. कसेही करून हे सरकार सत्तेतून घालवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू झाला आहे कधीचाच. पुरस्कार वापसीच्या नौटंकीपासून तर आमीर खान, नसिरुद्दीन शाह आदींना हा देश असुरक्षित वाटू लागण्यापर्यंतची पोपटपंची हा त्याच पोटदुखीचा परिपाक!
 
एरवी या हुशार मंडळीला फक्त सेलिब्रेटी म्हणून वावरायला आवडते. यांनी दारू पिऊन धिंगाणा घातला तरी, दारूच्या नशेत कुणी फुटपाथवर झोपलेली माणसं चिरडून टाकलीत तरी तो सेलिब्रेटींचा अधिकार असल्याच्या आविर्भावात जगते ही मंडळी. यातले किती लोक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात, हाही प्रश्नच आहे. यांच्या चित्रपटांना कराची सवलत मात्र सरकारने द्यायची. त्या भरवशावर कोट्यवधीचा गल्ला हे भरणार अन्‌ वर पुन्हा जनतेला शहाणपण शिकवण्यात सरशी यांचीच. परवा ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावर या सार्‍यांना अचानक जाग आली. आपण या देशाचे एक कर्तबगार नागरिक असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. इथल्या सर्वसामान्य जनतेला एक महत्त्वपूर्ण संदेश लागलीच दिला पाहिजे, अशी गरज त्यांना जाणवली अन्‌ कधी नव्हे तो या मंडळींचा गोतावळा एकत्र जमला. मोदींविरुद्ध पेटून उठला. त्यांना मतदान करू नका, असे सांगायला तो विसरला नाही.
 
 
हत्या कुणाचीही असो ती माणुसकीला काळिमा फासणारीच असते. त्यामुळे हत्याप्रकरणातील दोषींवर कठोरातली कठोर कारवाई होणे, हेच त्यावरचे उत्तर असते. पण, रोहित वेमुलाप्रकरणात या देशातल्या कथित बुद्धिवाद्यांनी सार्‍या देशभरात जो धुमाकूळ घातला, केरळातल्या गौरी लंकेश नामक महिला पत्रकाराच्या हत्येनंतर त्या धुमाकुळाची जी पुनरावृत्ती झाली, ती म्हणजे या देशात जणू अराजक निर्माण झाले असल्याच्या थाटातला थयथयाटच होता. काल जम्मू-काश्मिरातील किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी एका संघ स्वयंसेवकाची हत्या केली. मोदींच्या नावाने छाती बडवणार्‍या एकाही दीड शहाण्याला या दहशतवादी कृत्याचा निषेध करावासा वाटलेला नाही अजून. बहुधा मेलेला माणूस संघाचा स्वयंसेवक असल्याने तो मेलेला चालत असावा यांना. छत्तीसगडच्या बस्तर परिसरात एका आमदाराची निर्घृण हत्या केली नक्षलवाद्यांनी. अजून निषेधाचा चकार शब्द निघालेला नाही कुणाच्याच तोंडून. बहुधा आमदार भाजपाचा असल्याने अन्‌ हत्या डाव्या विचारांची निशाणी उंच फडकावणार्‍या नक्षलवाद्यांनी केलेली असल्याने असेल. ही तीच हुशार मंडळी आहे, ज्यांना भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली की पोटात आगडोंब उठतो यांच्या अन्‌ काश्मिरात दहशतवाद्यांनी सरकारी रुग्णालयात धुडगूस घातला तरी चकार शब्द काढीत नाहीत ते तोंडून.
 
हे असे पक्षाच्या, विचारांच्या डाव्या-उजव्या कौलावर फेर धरणारे, एरवी या देशात कुठे आग लागली तरी ज्यातील बहुतांश लोकांना थांगपत्ता नसतो, किंबहुना त्याच्याशी काही घेणेदेणेही नसते ज्यातील कित्येकांना, पैसे हाती पडल्याशिवाय ज्यांना देशभक्तीचा पाढाही धड नीट वाचता येत नाही, ती कथित जागृत मंडळी सार्‍या देशावर त्यांचा अधिकार असल्याच्या आविर्भावात, लोकांनी येत्या निवडणुकीत कुणाला मतदान करायचं याबाबत सल्ले देत सुटली आहे.
बरं! एक कळत नाही, का म्हणून ऐकायचे हो लोकांनी या कलावंतांचे? कोण? आहे कोण ही मंडळी? बोटावर मोजण्याइतक्या लोकांचा अपवाद वगळला, तर सामाजिक योगदान काय त्यांचे? अन्‌ कशाच्या भरवशावर अधिकार गाजवायला निघालेत हे लोक इथल्या जनतेवर?
 
मतदान हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णयाधिकार आहे. मतदान करण्याबाबतची जनजागृती मान्य. राजकीय पक्षांनी, त्याच्या समर्थकांनी त्यांच्या पक्षासाठी मतं मागणेही समजण्यासारखे आहे. पण, एरवी कुठल्याच राजकीय पक्षाशी सख्य नसल्याचे सांगत फिरणार्‍या आणि तरीही कोणत्यातरी विचारांचा छुपा अजेंडा खिशात घेऊन फिरणार्‍या या मंडळींचा, भारतीय जनतेला स्वमताच्या तालावर नाचवण्याचा अधिकार अमान्य करूनही, त्यांचे म्हणणे एकवेळ ऐकायचे असे ठरवले, तरी मत कुणाला द्यायचे हे सांगता येईल का यातील कुणाला? मोदींना मत का द्यायचे नाही, याचेही विश्लेषण करता येईल यापैकी कुणाला? मोदींना मत द्यायचे नसेल, तर ते गांधी घराण्याच्या दिवट्या चिरंजीवाला तरी का द्यायचे, हे तरी समजावून सांगता येईल या शहाण्या मंडळीला? मोदींना बाजूला करून, राजकीय हयातीचा शेवट कारागृहात घालवणार्‍या लालूंना पर्याय म्हणून उभे करायचे, की मुख्यमंत्रिपद हातात आल्यानंतर सरकारी बंगला रिकामा करताना ज्यांनी बंगल्याच्या भिंती फोडून फोडून सामान नेले त्या मुलायमिंसहांच्या पोराला मत द्यायचं, की स्वत:चेच पुतळे उभारण्यात गरीब जनतेचा पैसा खर्ची घालणार्‍या मायावतींना? की पुन्हा इटालियन सोनियांच्या गळ्यात टाकायची सत्तेची माळ? की, कायम हवेची दिशा बघून सरड्यासारखे राजकारणाचे रंग बदलणार्‍या महाराष्ट्रातील ‘जाणत्या राजा’च्या गळ्यात बांधायची घंटा? सांगा ना लेकहो! कुणाला मत द्यावं असं मत आहे तुमचं?
 
किश्तवाड, बस्तर प्रकरणात मेलेल्या माणसांबद्दल मौन पाळायचे हे व्यवस्थितपणे कळते, उमजते, त्यांच्या वागण्यातला छद्मीपणा तर जनतेलाही कळतो. भावले नसतील मोदी गेल्या पाच वर्षांत तर देणार नाहीत लोक मतं त्यांना. पण, जर का त्यांनी लोकहिताचे कार्य केले असल्याचा, भ्रष्टाचार रोखला असल्याचा, कालपर्यंत देश लुटणार्‍यांना भिकेला लावले असल्याचा, गॅस सिलेंडरच्या सब्‌सिडी वाटपातील दलाली संपवली असल्याचा, रस्ते बांधले असल्याचा, विकासाचा मार्ग खुला केला असल्याचा विश्वास लोकांच्या मनात असेल, तर लोक पुन्हा सत्ता सोपवतील त्यांना. तुमच्या पोटात का दुखू लागलेय्‌ हे सांगा अगोदर. अन्‌ कालपर्यंत कुठे होतात शहाण्यांनो? बरोबर मतदानापूर्वीच आपण कलावंत असल्याची जाणीव होते, एरवी त्यांच्या प्रश्नांबाबत केव्हा सवड होते तुम्हाला?
 
मतदारांनो, पेकाटात लाथ हाणा या दीड शहाण्यांच्या अन्‌ बजावा मतदानाचा अधिकार! कुणाला मतदान करायचे हे स्वत: ठरवा. निर्णय देशहितार्थ घ्या. सत्ता, शेकड्याने घोटाळे करणार्‍या चोरांच्या हातात मुळीच सोपवू नका. सक्षम पर्याय तुम्हीच निवडा. हो! पण, मतदान जरूर करा!

No comments:

Post a Comment