रविवारी ईस्टर संडेच्या निमित्ताने कोलंबोमध्ये झालेल्या साखळी स्फोटांनी श्रीलंकेसमोरील आव्हान तर कठीण केले आहेच, पण जगासमोरही एक नवा धोका उभा केला आहे. कारण न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथील मशिदींमध्ये अलीकडे जो दहशतवादी हल्ला केला गेला त्याचा बदला घेण्यासाठी कोलंबोतील ख्रिश्चनांना ‘लक्ष्य’ करण्यात आले अशीही एक माहिती आता समोर येत आहे. हे खरे असेल तर उद्या इस्लामी दहशतवादी असे ‘सूडाग्नी’ देशोदेशी पेटवतील आणि शेकडो निरपराध्यांचे बळी घेतील. श्रीलंकेतील स्फोटांनी सर्वच देशांना हा इशारा दिला आहे.
साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कोलंबो येथील तीन चर्च आणि तीन पंचतारांकित हॉटेलमध्ये ईस्टर संडेचे निमित्त साधून रविवारी आठ बॉम्बस्फोट घडविले गेले. त्यात 290 पेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले तर 500 पेक्षा जास्त जखमी झाले. या आकडय़ांवरूनही दहशतवादी हल्ल्याच्या भीषणतेची कल्पना येते. या हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहिद जमात’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ‘इसिस’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुळात ‘इसिस’कडे संशयाचे एक बोट दाखविले जात होतेच. कारण आईडी आणि आत्मघाती बॉम्बर या पद्धतीने दहशतवादी हल्ला करण्याचे तंत्र सध्या ‘इसिस’कडूनच वापरले जाते. पूर्वी ‘लिट्टे’कडूनही श्रीलंकेत असे अनेक स्फोट घडविले गेले आहेत, पण तो आता इतिहास झाला आहे. शिवाय त्या स्फोटांची तीक्रता रविवारी झालेल्या स्फोटांच्या तुलनेत बर्यापैकी कमी होती. त्यामुळेच बर्याच वर्षांनंतर एवढे मोठे एकापाठोपाठ एक आठ धमाके झाल्याने श्रीलंकेसारखे शांत आणि पर्यटनस्नेही राष्ट्र हादरणे स्वाभाविकच आहे. पुन्हा त्यासाठी ‘ईस्टर संडे’ निवडण्यात आला आणि चर्च तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्ये हे स्फोट करण्यात आले. म्हणजेच हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि ख्रिश्चन समाजाला ‘लक्ष्य’ करून तेथील जातीय, धार्मिक शांततेला चूड लावण्याचा उद्देश त्यामागे होता. श्रीलंकेतील ‘स्लीपर सेल’च्या मदतीशिवाय हे धमाके घडविणे शक्य नव्हते. हिंदुस्थानप्रमाणेच श्रीलंकेतही धर्मांध मुस्लिमांनी दहशतवादाची बिळे तयार करून ठेवली आहेत. रविवारच्या
बॉम्बस्फोटांनी हेच दाखवून
दिले आहे. आधी तामीळ बंडखोर आणि आता जिहादी इस्लामी गट अशा कोंडीत श्रीलंका सापडली आहे. खरे तर रविवारी झालेल्या स्फोटांचा इशारा हिंदुस्थानी आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांनी आधीच दिला होता. तरीही स्फोट झाले आणि मोठी जीवितहानी झाली. तेथील सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांच्या कार्यक्षमतेवर हे प्रश्नचिन्ह असले तरी आता जी माहिती समोर आली आहे ती दहशतवाद्यांएवढीच धोकादायक आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांना गुप्तचरांच्या या अहवालाची आगाऊ कल्पनाच देण्यात आली नाही, असा गौप्यस्फोट तेथील एका मंत्र्यांनीच केला आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. सिरीसेना यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये विक्रमसिंघे यांना तडकाफडकी बरखास्त केले होते. मात्र तेथील सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्याने विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधान करणे सिरीसेना यांना भाग पडले. आता विक्रमसिंघे यांचे मंत्री म्हणतात त्याप्रमाणे पंतप्रधान विक्रमसिंघे यांना खरोखर अंधारात ठेवले गेले असेल तर विक्रमसिंघे आणि सिरीसेना यांच्यातील हे ‘मतभेद’ त्या देशासाठी घातक ठरू शकतात. राजकारणातील अंतर्गत वाद, मतभेद मान्य केले तरी ते श्रीलंकेतील इस्लामी दहशतवाद्यांच्या हातातील ‘कोलीत’ बनू नयेत. मुळात श्रीलंकेला चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. शिवाय ‘तामीळनाडू तौहिद जमात’ ही कट्टर संघटना तामीळनाडूमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे श्रीलंकेने वाढत्या इस्लामी दहशतवाद्यांचा धोका वेळीच ओळखायला हवा. माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्या काळात
पाकिस्तानसोबत केलेल्या
एका कराराचाही पुनर्विचार विद्यमान पंतप्रधान विक्रमसिंघे यांना या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर करावा लागेल. पाकिस्तानी नागरिकांना पासपोर्टशिवाय श्रीलंकेत येण्याची परवानगी देणारा हा करार आहे. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा कारखाना आहे. त्यामुळे या कराराचा गैरफायदा घेऊन तो देश श्रीलंकेत दहशतवाद्यांची घुसखोरी करू शकतो शिवाय विक्रमसिंघे हे चीनकडे ‘झुकणारे’ नसल्याने चीनचाही पाकिस्तानला छुपा पाठिंबा असू शकतो. श्रीलंका आणि मालदीव या देशांतील सत्तांतरे चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांना धक्का देणारी ठरली आहेत. त्यामुळे श्रीलंकेसारख्या शांतताप्रिय देशात इस्लामी दहशतवाद्यांना सक्रिय करायचे, ईस्टर संडेसारखे भीषण स्फोट घडवून शेकडो निरपराध्यांचे बळी घ्यायचे उद्योग केले जाऊ शकतात. त्या माध्यमातून श्रीलंका आणि तेथील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. रविवारी ईस्टर संडेच्या निमित्ताने कोलंबोमध्ये झालेल्या साखळी स्फोटांनी श्रीलंकेसमोरील आव्हान तर कठीण केले आहेच, पण जगासमोरही एक नवा धोका उभा केला आहे. कारण न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथील मशिदींमध्ये अलीकडे जो दहशतवादी हल्ला केला गेला त्याचा बदला घेण्यासाठी कोलंबोतील ख्रिश्चनांना ‘लक्ष्य’ करण्यात आले अशीही एक माहिती आता समोर येत आहे. हे खरे असेल तर उद्या इस्लामी दहशतवादी असे ‘सूडाग्नी’ देशोदेशी पेटवतील आणि शेकडो निरपराध्यांचे बळी घेतील. श्रीलंकेतील स्फोटांनी सर्वच देशांना हा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment