Total Pageviews

Tuesday, 2 April 2019

कुत्र्याचे शेपूट वाकडेच!-TARUN BHARAT-


 

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) पाकिस्तानातील दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी निसार अहमद तांत्रे याला भारताच्या ताब्यात दिले आहे. 'जैश'चा हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. ३०-३१ डिसेंबर, २०१७ मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. त्यावेळी तिन्ही हल्लेखोरांना ठार करण्यात आले होते.

निसार एनआयएच्या ताब्यात

निसार तांत्रे हा जैशच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे यांचा भाऊ आहे. निसारला विशेष विमानाने दिल्लीत आणले गेले. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआय) ताब्यात देण्यात आले. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याच आधारे त्याला यूएईकडून भारतात आणले गेले. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोऱ्यात जम बसवायला मदत केली असे मानले जाते. नूरला डिसेंबर २०१७ मध्ये ठार करण्यात आले.

यूएईने निर्माण केले उदाहरण

गेल्या काही वर्षांपासून यूएईने फरारांना भारताच्या ताब्यात द्यायला सुरू करत जगापुढे एक उदाहरण निर्माण केले आहे. यात काही दहशतवाद्यांचाही समावेश आहे. यूएईने आतापर्यंत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात लाच खाण्याचा आरोप असलेला आरोपी ख्रिश्चियन मिशेल, या प्रकरणातील कथित दलाल दीपक तलवार यांच्या व्यतिरिक्त दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थक, इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दिबापा आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फारूख टकलासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार तांत्रे याच वर्षी भारतातून यूएईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे.

हल्ल्यात सहभागी होता पाक दहशतवादी

लेथपोरा प्रकरणातच पुलवाम्याच्या अवंतीपुराचा रहिवासी फय्याज अहमद मॅग्रे याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्रालचा फरदीन अहमद खांडे, पुलवाम्यातील द्रुबग्रामचा रहिवासी मंजूर बाबा आणि पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल शकूर यांना ठार करण्यात आले होते. शकूर हा पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटचा रहिवासी होता. एनआयने फेब्रुवारीत अटक केलेला फय्याज हा दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मदचा सक्रिय सदस्य होता. फय्याजने हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा, हत्यारे आणि गुप्त माहिती उपलब्ध केली होती.
दिनांक :30-Mar-2019
 पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवॉं प्रांतातील बालाकोट येथे भारताने हवाई हल्ला करून तेथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिराला उद्ध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानने भारताची जी धास्ती घेतली आहे, ती सुमारे एक महिना उलटल्यानंतरही थोडी देखील कमी झालेली नाही. ज्या हवाई दलाच्या भरवशावर पाकिस्तान गुर्मीत होता, ती गुर्मी एका क्षणात भारताने उतरविली आहे. या धक्क्यातून पाकिस्तान अजूनही सावरलेला नाही. भारतीय विमाने केव्हाही हल्ला करू शकतील, या भीतीने पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र एक महिना सर्व प्रकारच्या विमान वाहतुकीस बंद ठेवले होते. ही इतकी भीती कशाची?

पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय विमानांचा पाठलाग करताच, भारतीय विमाने बालाकोट परिसरात घाईघाईने काही बॉम्ब फेकून पळून गेलीत आणि हे बॉम्ब डोंगरातील निर्जन जागी पडलेत आणि त्यामुळे काही झाडे मात्र तुटलीत, असे पाकिस्तानने जगाला सांगितले. हे जर खरे असेल तर, बालाकोट परिसरातील वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे पाकिस्तानने जगाला दाखवायला नको का? परंतु, महिना उलटला तरी त्या ठिकाणी पाकिस्तानने कुणालाच प्रवेश करू दिलेला नाही. वस्तुस्थिती ही आहे की, हल्ला झाला हे जरी पाकिस्तानने मान्य केले असले तरी, तो हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर झाला, हे काही तो सांगत नाही. कसे सांगणार? पाकिस्तान कुठल्या तोंडाने सांगणार की, त्याच्या भूमीत दहशतवाद्यांचे कारखाने बिनबोभाट सुरू होते? या ठिकाणी प्रशिक्षण घेत असलेले तसेच त्यांना प्रशिक्षण देणारे असे सुमारे 350 लोक ठार झाले आहेत, हा भारताचा दावा पाकिस्तान केवळ तोंडाने फेटाळत आहे. पण या बाबतचे पुरावे पाकिस्तानने आजही दिलेले नाहीत. प्रेतांची ताबडतोब विल्हेवाट लावून नंतर, जगाला दाखविता आले असते की, बघा, इथे काहीच झालेले नाही. तसेही झाले नाही. प्रेतांची विल्हेवाट लावतो म्हटले तरी, इतका काळ लागायला नको. असे असतानाही, अजूनही पाकिस्तान त्या ठिकाणी कुणालाच जाऊ देत नाही, याचे काय अर्थ काढायचा? याचा एकच अर्थ निघतो व तो म्हणजे, या ठिकाणी केवळ दहशतवाद्यांचे प्रशिक्षणच सुरू नव्हते तर, अजूनही बरेच काही विघातक कृत्य सुरू असणार आणि ते जगासमोर आले तर मग आपली काही खैर नाही, असेच त्याला वाटत असावे.

ज्या पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोटवर हल्ला केला, त्या पुलवामा हल्ल्याला जबाबदार गुन्हेगारांची व संघटनांची माहिती भारताने पाकिस्तानला पुरविली आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर पाकिस्तानने भारताला कळविले की, पुलवामा हल्ल्यासंबंधी ज्या 54 संशयितांची नावे तुम्ही पाठविली, त्यांची कसून चौकशी केली असता त्यातील कुणाचाही या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नाही तर, बालाकोट आणि गुलाम काश्मिरातील ज्या 22 ठिकाणी दहशतवादी शिबिरे सुरू असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला पाठविले, त्या ठिकाणी एकही दहशतवादी शिबिर असल्याचे आढळून आले नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. एवढी मुजोरी करण्याऐवजी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायापैकी काही देशांना या ठिकाणची पाहणी करून, भारताने उपलब्ध करून दिलेल्या पुराव्यांची तपासणी करण्याची परवानगी द्यावी. असे पाकिस्तान करणार नाही. कारण तसे केले तर आपले पितळ उघडे पडेल, याची त्याला भीती आहे.

ज्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे, अशा दोन-चार जणांना संरक्षण देण्याची पाकिस्तानची अशी कुठली अपरिहार्यता आहे कळत नाही. या दोन-चार दहशतवाद्यांपायी आज पाकिस्तान जगात एकटा पडत चालला आहे. जगातील वित्तीय संस्था पाकिस्तानला अर्थसाह्य देण्यास कां कू करत आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. एका डॉलरला 140 पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील ठराव चीनच्या नकाराधिकारामुळे पारित होऊ शकला नाही. आज या सुरक्षा परिषदेत 15 देश सदस्य आहेत. त्यातील 14 देश या ठरावाच्या बाजूने आहेत. म्हणजेच चीन सोडला तर बाकी सर्व जग एकप्रकारे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास राजी आहे. असे असताना, पाकिस्तान त्या अझहरला कां पाठीशी घालत आहे, समजत नाही. आज पाकिस्तान आत्मनाशाच्या कोंडीत सापडलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जी प्रभावी रणनीती वापरली आणि खेळी खेळली, त्याच्या परिणामस्वरूप पाकिस्तानची ही कोंडी झालेली आहे. भारतातील बालीश विरोधक हे मान्य करणार नसले तरी, सारे जग ते मान्य करत आहे. एक दहशतवाद्यांचे कारखाने सोडले तर, पाकिस्तान भारताची कुठल्याच बाबतीत बरोबरी करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

1971 साली पाकिस्तानपासून दूर होऊन निर्मित बांगलादेश देखील पाकिस्तानपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आलेला आहे. लाखो हिंदूंची कत्तल करून भारतापासून वेगळे झालेल्या पाकिस्तानने गेल्या 70 वर्षांत काय कमविले, असे प्रश्न आता खुद्द पाकिस्तानातच विचारले जाऊ लागले आहेत. अफगाणिस्थानप्रकरणी रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला वापरून घेतले. आज अफगाणिस्ताानच्या जडणघडणीत अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून भारत सहभागी होत आहे. ज्याला पाकिस्तान घनिष्ठ मित्र समजत होता, तो सौदी अरब आज पूर्णपणे भारताच्या बाजूने आला आहे. इराणशी तर भारताने अनेक क्षेत्रात भागिदारी सुरू केली आहे. अमेरिका भारताच्या बाजूने आहे. पाकिस्तानचे सर्व मित्रदेश आज भारताच्या बाजूने उभे आहेत. पाकिस्तान जगात भीक मागत फिरत आहे. जो सतत काश्मीर हवे म्हणत होता तो आज भीक मागत फिरत आहे. परंतु, एकही देश त्याला भीक घालायला तयार नाही. याच संधीचा फायदा चीन घेत आहे. तो पाकिस्तानभोवती चिनी कर्जाचा विळखा अधिकाधिक आवळत आहे. एप्रिल महिन्यात चीनच्या कर्जाचा हप्ता पाकिस्तानला द्यायचा आहे. त्याचे व्याजही देण्याची आज पाकिस्तानची स्थिती नाही. हळूहळू पाकिस्तानचे सार्वभौमत्व चीनच्या कब्जात जाणार, अशी व्यथा पाकिस्तानातीलच लोक उघडपणे बोलत आहेत. भारताच्या मदशीशिवाय पाकिस्तान कणभरही प्रगती करू शकणार नाही. असा मतप्रवाह आता पाकिस्तानात सुरू झालेला आहे. तरीही पाकिस्तानचे डोके ताळ्यावर येण्याचे काही लक्षण दिसत नाही. मरणपंथाला लागलेल्या व्यक्तीला ज्याप्रमाणे औषधही कडू लागते, तसेच पाकिस्तानचे आज होत आहे.

भारतद्वेषावरच ज्याचे अस्तित्व उभे आहे, तो देश भारताला रक्तबंबाळ करण्याचे, गजवा-ए-िंहद (हिंदुस्तानशी धर्मयुद्ध) करण्याचे आपले स्वप्न कसे सोडेल? नजीकच्या काळात पाकिस्तानचे चार तुकडे होण्याचेच लक्षण दिसत आहे. बलुचिस्थानात तर स्वातंत्र्य चळवळीने चांगलाच जोर पकडला आहे. िंसध प्रांतही वेगळे होण्याची वाट बघत आहे. भारतात पुन्हा मोदींचे सरकार आले तर, पाकिस्तानचे तुकडे होण्याचा क्षण अधिक वेगाने जवळ येईल, यात शंका नाही. परंतु, पाकिस्तान काही शहाणपण शिकणार नाही, असेच दिसते. कुत्र्याचे शेपूट कितीही प्रयत्न केला तरी वाकडे ते वाकडेच राहते, हेच खरे.

No comments:

Post a Comment