Total Pageviews

Monday, 6 August 2018

साधेपणाला सलाम! By प्रभात वृत्तसेवा

डॉ. न. म. जोशी 
ज्युलिओ फ्रान्सिस रिबेरो या ख्यातनाम कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं विविध उच्च पदे भूषवून आपली कर्तबगारी सिद्ध केली होती. हेच रिबेरो एकदा मुंबई गुन्हे विभागाचे संचालक होते. आणि त्यावेळी गृहराज्यमंत्री होते भाई वैद्य. भाई वैद्य यांना एका प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी भली मोठी रक्कम लाच म्हणून देऊ केली होती. भाईंनी हे प्रकरण तडीस लावण्याचं ठरवलं. त्यांनी रिबेरो यांना कळवलं. सापळा रचला आणि गुन्हेगाराला पकडलं. स्वतः मंत्रिमहोदयांनीच या प्रकरणात स्वतःची निःस्पृहता सिद्ध केली होती. त्यामुळे रिबेरो यांना भाई वैद्य यांच्याबद्दल नितांत आदर होता.
त्यानंतर काही वर्षे गेली. भाईंचं मंत्रिपदही गेलं. भाई पुन्हा आपल्या नेहमीच्या कार्यक्रमांसाठी भ्रमंती करीतच होते. रिबेरो पंजाबमध्येही सर्वोच्च अधिकारी होते. काही कामानिमित्त त्यांना कधीकधी पुण्यात यावं लागे. एकदा रिबेरो पोलीस महासंचलकांचा चारचाकी गाडीतून पुण्यातून जात होते. त्यांची गाडी सिग्नलला थांबली. शेजारीच सायकलवरून एक व्यक्ती येऊन थांबली होती. खादीचा कुर्ता, पायजमा, नितळ डोळे आणि बुद्धिमान नजर… रिबेरो त्या व्यक्तीला सायकलवर पाहून आश्‍चर्यचकित झाले आणि त्यांनी मनातल्या मनात त्या व्यक्तीला तिथेच सलाम ठोकला. वास्तविक रिबेरो यांना गाडीतून उतरून त्या व्यक्तीशी बोलायचं होतं आणि हस्तांदोलन करून त्या व्यक्तीला कौतुकमिश्रित धन्यवाद द्यायचे होते. पण कामाची गडबड आणि सिग्नलचा इशारा यामुळे त्यांना गाडी पुढे न्यावी लागली. पण तेवढ्या क्षणातही रिबेरो यांनी गाडीच्या काचा खाली करून त्या सायकलवरील व्यक्तीला हात जोडून प्रणाम केला. रिबेरो यांची गाडी पुढे गेली. ती सायकलवरील व्यक्तीही पुढे चौकात वळून दिसेनाशी झाली. रिबेरो त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले होते. कोण होती ती व्यक्ती? भाई वैद्य! एकेकाळचे रिबेरो यांचे बॉस! बॉस सायकलवर आणि सेवक चारचाकी गाडीत! पण या सेवकालाही आपल्या या बॉसबद्दल नितांत आदर होता. भाई गेले. तेव्हा रिबेरो यांनी वृत्तपत्रात लेख लिहून भाईंच्या साधेपणाला सलाम केला.
कथाबोध 
कोणतंही पद हे कायमचं नसतंच. याची जाणीव पदावरील व्यक्तीनं ठेवून आपल्या मूळ जीवनाचा रस्ता सोडला नाही तर त्याला यशस्वीपणे आणि समाधानाने जीवन जगता येते. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयौ। ही गीतेची शिकवण भाई जगत होते. म्हणून रिबेरो यांनी त्यांना सलाम केला.

No comments:

Post a Comment