Total Pageviews

Wednesday, 22 August 2018

आजतरी वेळ केरळसाठी प्रार्थना करण्याची आहे-महा एमटीबी


निसर्गसौंदर्यासाठी ख्यातीप्राप्त केरळात गेले काही दिवस पावसाने जो धुमाकूळ घातलाय्, त्यात त्या प्रांताची झालेली वाताहत दुर्दैवी आहे. पण, समोर उभ्या ठाकलेल्या संकटाला सामोरे जात, निकरानं त्याचा सामना करत, पुन्हा नव्या उमेदीनं उठून उभं राहण्याची जिद्द भारतीय समाजाला कायम एक प्रकारची ताकद देत राहिली आहे. नव्हे, तीच या समाजाची खरी ओळख आहे. शेजारचे राज्य असो की, मग सीमेपलीकडचा एखादा देश, तो संकटात सापडलाय् म्हटल्यावर जातिपातीपासून तर विचार-पक्षापर्यंतच्या सार्याच भिंती आपसूक तुटून पडतात आणि सारेच एकमेकांच्या मदतीला सज्ज होतात. काश्मीरपासून तर केरळपर्यंतची उदाहरणे त्याचीच साक्ष ठरली आहेत. एरवी लोक ज्यांच्या नावाने बोटे मोडतात ते संघाचे स्वयंसेवक नेहमीप्रमाणे याही वेळी, कालपर्यंतचा लोकांनी केलेला दुस्वास विसरून मदतकार्यार्थ मैदानात उतरले आहेत. देशाच्या कानाकोपर्यातून सर्व प्रकारच्या मदतीचा ओघ एव्हाना केरळच्या दिशेने प्रवाहित झाला आहे. पैशापासून तर कपड्यांपर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून तर वैद्यकीय सुविधांपर्यंतच्या बाबींचा त्यात समावेश आहे. निसर्गाच्या कोपापुढे कुणीच तग धरू शकत नाही, हे खरेच. मुळात, त्याच्यापुढे सारेच शून्य आहेत, हेही तितकेच सत्य आहे.
 
 
पण, त्यानंतरच्या प्रवासात मात्र सर्वांनीच एकमेकांच्या साथीला उभे राहण्याची गरज असते. कालपर्यंतचा राग-लोभ, मतेमतांतरे, जाती-धर्म, भाषा-प्रांताच्या, अगदी राजकारणाच्याही भिंती नकळत कोसळतात अन् सारा देश एकसंध असल्याची साक्ष नव्याने पटते. काश्मिरातील अधिकांश जनता कायम दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ उभी राहात आली असल्याचा अनुभव सार्या देशाने घेतलेला. पण, पुराच्या संकटात हा सारा प्रदेश अस्तित्वहीन होऊ पाहतोय् म्हटल्यावर इथून तिथवर सार्यांचीच घालमेल झाली. ‘आपला’ काश्मीर पुराच्या संकटाशी झुंजतोय् हे बघून सारेच कासावीस झाले. केंद्र सरकारसह संपूर्ण देश त्यांच्या दु:खात सहभागी झाला. तेव्हा कुणलाही, ना ते मुस्लिम असल्याची बाब ध्यानात ठेवण्याची गरज भासली, ना कालपर्यंतचे त्यांचे आक्षेपार्ह वागणे त्यांच्यासाठीच्या मदतकार्यात आडवे आले. किल्लारी, भूजमधला भूकंप असो, की मग काश्मीर-चेन्नईतला पूर... भारतीय समूह याच प्रगल्भतेनं वागत आलाय् आजवर. आता केरळातही प्रत्यय येतोय् तो त्याच समंजस वर्तणुकीचा.
 
 
एरवी ख्रिश्चन मिशनरींनी घेरलेला, कम्युनिस्टांचा प्रभाव असलेला हा प्रदेश. इतरांचे विचारही अमान्य असलेला डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असलेला सारा परिसर. आपल्याला न पटणार्या विचारांची गळचेपी करण्याची, विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कित्येक कार्यकर्त्यांचे गळे निर्दयीपणे चिरून टाकण्याची टोकाची भूमिका घेत वावरलेले लोक आज जेव्हा पुराच्या संकटाने बेघर झाले, तेव्हा कालचा त्यांचा तोरा विसरून आज त्यांच्या मदतीला धावून जाणार्या कुण्याही स्वयंसेवकाच्या मनात कसलेही किल्मिष नसणे, यातच सारे आले. दैवी फेरा फार निराळा असतो. तो कुणालाच चुकत नाही. तो कुणाला कोणते दिवस दाखवेल, याचा अंदाज बांधणे कठीण. आपल्यापैकी कुणालाच त्याची झळ बसू नये असे कितीही वाटत असले, तरी प्रत्येकालाच कधी ना कधी त्या दुष्टचक्रातून जावे लागते. फक्त, अशा वेळी वेळ-काळाचे भान जपत, माणुसकी गाठीशी ठेवून वागण्याची तर्हा अनुसरता आली की, क्षणभराच्या त्या भीषण संकटावरही मग लीलया मात करता येते.
 
 
 
केरळमध्ये उभ्या ठाकलेल्या पुराच्या संकटानंतर जे जे म्हणून घडते आहे, मदतीचा हात पुढे करण्यासाठी ज्या पद्धतीने सरकारी, गैरसरकारी, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संस्था आणि माणसं सरसावली आहेत, ते बघितल्यावर हे वचन पूर्णत: सत्य असल्याची खात्री पटते. अशा प्रसंगी सरकारने मदत करण्यात नवल नाही. कदाचित कर्तव्याच्या मापदंडात त्याचे मोजमाप होईल. पण, सरकारशी काडीचा संबंध नसलेली सर्वसामान्य माणसं जेव्हा सारे भेदाभेद बाजूला ठेवून दोन पावलं पुढे टाकतात तेव्हा त्यांची ती कृती दखलपात्र ठरते. खुद्द मंत्री चिखल तुडवून लोकांना मदतीचा हात देत असल्याचे दृश्य असो, की मग दूरवरून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या घरातील लोकांनी, डोळ्यांतील आसवांची टिपुसं बेमालूमपणे लपवत, दोन घास खाऊन घ्या म्हणून आग्रह धरणे... सारेच आगळेवेगळे, अद्भुत आहे. पावसाने थैमान घातले अन् केरळचा सारा परिसर क्षतिग्रस्त झाला. होते नव्हते ते वाहून गेले. भूस्खलनाचे प्रमाण वाढले. लोक घरदार सोडून रस्त्यावर आले.
 
 
कोझीकोडपासून तर अलपुझापर्यंत अन् थ्रिसूरपासून तर एर्नाकुलम्पर्यंत सर्वदूर हाहाकार माजला. होत्याचे नव्हते झाले. परिस्थिती बघून ही राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली. त्यानुसार आता सरकारी पातळीवरूनही मदतीचा प्रवाह केरळच्या दिशेने मार्गस्थ होईल. पण, त्याहीपेक्षा मुंबईच्या डॉक्टर्सपासून तर शेजारच्या कर्नाटकातील महिलांपर्यंत सर्वांनीच ही आपबिती समजून आपल्या बांधवांच्या हाकेला ओ देण्याची स्वीकारलेली भूमिका अधिक महत्त्वाची, समंजस आणि गरजेची आहे. केरळातील पूरस्थिती गंभीर आहे. राज्यातील क्षतिग्रस्त भागातील व्यवस्थांची पुनर्बांधणी करावी लागणार आहे येत्या काळात. पुराचे संकट तर चार-दोन दिवसात ओसरेल, पण त्यानंतर सगळ्यांचाच कस लागणार आहे. हीच प्रगल्भता, याच समंजसपणाची नंतरही गरज भासणार आहे. आजतरी मुख्यमंत्र्यांपासून तर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकार्यांपर्यंत सर्व जण आपापली पदं, मानापमान विसरून लोकांपर्यंत पोहोचताहेत. पूरप्रभावितांना धीर देताहेत. अशा प्रसंगी ज्या खंबीर, धीरगंभीर भूमिकेची अपेक्षा असते, नेमकी तीच भूमिका मुख्यमंत्री विजयन् यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार घेत असताना दिसते आहे, तर केंद्र सरकारनेही या घटनेप्रकरणी मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडण्याकरिता पुढाकार घेतलेला दिसतो आहे.
 
पैशापासून तर आज ज्याची त्या प्रदेशात नितांत आवश्यकता आहे अशा पिण्याच्या पाण्यापर्यंतची व्यवस्था उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील शासनाने घेतलेला पुढाकार नोंद घेण्याजोगा ठरला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील इतर राज्यांनीही अशा प्रसंगात अपेक्षित असलेल्या वर्तणुकीचे दर्शन घडविले आहे. एकूण, कुटुंबातील एखाद्या सदस्यावर वाईट प्रसंग गुदरला असेल, तर त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठीची अहमहमिका, तो समजूतदारपणा परिवारातील इतर सदस्यांनी दाखवल्याचे उदाहरण आज देशभरातील विविध व्यक्ती, संस्था आणि दस्तुरखुद्द सरकारच्या वर्तणुकीतून सिद्ध होते आहे. अगदी परवा युएई, कतार, मालदीवसारख्या देशांनी देऊ केलेली मदत साभार नाकारण्याचे सामर्थ्य भारताला जगाला दाखवता आले ते यामुळेच. अशा एकीचा अनुभव येण्यासाठी दर वेळी संकटांचीच मालिका उभी राहणे आवश्यक आहे का, हा प्रश्न मात्र अस्वस्थ करणारा आहे... अर्थात, आजतरी वेळ केरळसाठी प्रार्थना करण्याची आहे...
हवाए अगर मौसम का रुख बदल सकती हैं
तो दुआएंभी मुसीबत के पल बदल सकती है
परवा एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झालेले व्यंग्यचित्र नेटकर्यांनी समाजमाध्यमांवर भिरभिरवले. आपल्या देशातील माध्यमे- त्यातही इलेक्ट्रानिक्स माध्यमांचे- भानच चव्हाट्यावर आणले आहे. त्यात स्वातंत्र्यदिनाच्या आधीपासून केरळात अतिवृष्टी सुरू झाली अन् तिथे पाण्याने कहरच केला. त्याच वेळी देश एका अटळ अशा दु:खात बुडला होता. अटलबिहारी वाजपेयींचा अनंत विरह भारताच्या डोळ्यांत दाटून आला होता. या व्यंग्यचित्रात अटलजी आकाशात पोहोचले आहेत आणि तरीही माध्यमे त्यांच्याकडे कॅमेरे, माईक रोखून आहेत अन् अटलजी मात्र त्यांचे लक्ष केरळातील संकटात सापडलेल्या आपल्या भावंडांकडे रोखत आहेत, असे दाखविले होते. पंतप्रधान मोदी मात्र तातडीने तिकडे धावले. अटलजींच्या अंत्ययात्रेत पायदळ सोबत करणार्या पंतप्रधानांचे पाय किती जमिनीवर आहेत, हेच दिसत होते अन् त्यांना जमिनीवरच्या माणसांचेही किती भान आहे, हे त्यांनी लगेच दुसर्या दिवशी केरळचा दौरा करून अन् त्यासंदर्भातील मदतकार्याचा आढावा घेऊन दाखवून दिले. केंद्राकडून तातडीने 500 कोटींची मदत जाहीर करण्यात आली. अनेक राज्यांनी, विशेषत: भाजपाशासित राज्यांनी तातडीने मदत केली. महाराष्ट्राकडून आर्थिक मदतीसोबतच वस्तुरूपातली मदत रवानाही झाली.
 
केरळात पर्जन्याचे भीषण अन् रौद्र असे रूप या वर्षी दिसले. त्याची संभावना अस्मानी संकट, दैवी संकट अशी केली जाते आहे. हे नैसिर्गक संकट आहे, त्यामुळे आता त्यावर मानव काय करणार, अशी जबाबदारी झटकणारी विधानेही केली जातात. ‘देवाची करणी अन् नारळात पाणी!’ अशी एक म्हण आहे. त्याच धर्तीवर ‘केरळात पाणी!’ असे म्हटले जात आहे. केरळात जे काय झाले त्याकडे बघताना प्रथमदर्शनी ते अस्मानी संकटच वाटते. मात्र, अलीकडच्या काळात पर्यावरण आणि प्रदूषणाच्या पातळीवर अनेक संकटे माणसाने ओढवून घेतलेली आहेत. निसर्गाशी उभा दावा मांडल्यागत माणूस सार्या जगातच वावरतो आहे, त्यातून असहाय निसर्गाचे चक्र आपोआप उलटे फिरते आहे. माणसांची वाढत जाणारी गर्दी आणि त्याची तहान-भूक यामुळे, त्याच्याशिवाय या जगात राहण्याचा दुसर्या कुठल्या प्राण्याला अधिकारच नाही, अशीच त्याची वर्तणूक आहे. त्याने जंगले फस्त केली, नद्या पिऊन टाकल्या. आता केरळच्या संदर्भात जे काही झाले, त्यामागे किमान गेल्या शतकभरात माणसांनी निसर्गावर केलेला अत्याचार आणि त्याचे दोहन हेच कारणीभूत आहे. केरळच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला, तर ते एक निसर्गसमृद्ध असे राज्य आहे.
 
अत्यंत कुशाग्र बुद्धीचे वरदान तिथल्या माणसांनाही लाभलेले आहे. असे असतानाही गरजा माणसाला अविवेकी करत असतात. निसर्गाशी अविवेकीपणे वागू नये, हे शहाणपण वागवावे अशी शंभर टक्के साक्षरता तिकडे आहे. अत्यंत निसर्गसमृद्ध असा हा प्रदेश आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, कर्नाटक व तामिळनाडूसारख्या राज्यांची सोबत, पलक्कडच्या पश्चिम घाटांमुळे सह्याद्री पर्वताची तयार झालेली भिंत, असा देखणा जामानिमा आहे. नारळ आणि रबर ही दोन नैसर्गिक वरदानेच या राज्याला मिळाली आहेत. केरळचा एक अर्थ ‘पर्वतांच्या पलीकडचा सपाट प्रदेश’ असाही होतो. जलसमृद्धी हे या राज्याचे खास वैशिष्ट्य! चालियार, पेरियार, भरतपुझ्झा, पांबा अशा लहानमोठ्या 44 नद्या सरासरी 64 किलोमीटर लांबीच्या, या छोट्याशा राज्यातून वाहतात. भारतातील एकूण भूमीच्या एक टक्का भूमीच केरळात आहे आणि ‘असतील शिते तिथे जमतील भुते’- लोकसंख्येची घनता देशाच्या तुलनेत तीन टक्के आहे. म्हणजे केरळात प्रती चौरस किलोमीटरला 820 लोक राहतात. हे प्रमाण देशाच्या तुलनेत तिप्पट आहे. त्यामुळे साहजिकच नागरी वसत्या, शेजारच्या राज्यांतून येणारे लोंढे आणि त्यांची सोय, यातच केरळ हे निसर्गलावण्य लाभलेले राज्य घायकुतीला आलेले असते. रस्तेवाहतूकच केवळ तिथल्या जगण्याच्या गतीला न्याय देऊ शकत नाही म्हणून तिथे जलवाहतूकदेखील आहे. त्यासाठी मोठ्या नद्यांसोबतच समुद्राचा प्रवाह 450 किलोमीटर आतपर्यंत नेण्यात आला आहे. त्याला तिकडे ‘बॅकवॉटर’ असे म्हणतात. लोकसंख्येच्या घनतेमुळे नद्यांच्या पूरपातळीच्या प्रदेशातही मानवी वसत्या वाढल्या आहेत.
 
 
इथल्या भूप्रदेशाची लो-लाईन उंची समुद्रसपाटीपासून 7 मीटर एवढीच आहे. केरळला 590 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनार्याने वेढलेले आहे. केरळात दरवर्षीच देशाच्या इतर भागांच्या तुलनेत दुप्पट पाऊस येतो. त्यामुळे पाण्यावर आधारित उद्योग आणि खाद्यसंस्कृती तिथे आहेत. त्याचमुळे केरळात दरवर्षी पाण्यात बुडून मरणार्यांची संख्या दोन हजारांच्या वर आहे. आता यंदा तर अडीच पट पाऊस पडला. आपल्या सोयीसाठी समुद्राचे पाणी आत आणण्यात आलेले आहे. या प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून जास्त नाही. त्यामुळे समुद्राच्या लाटा पाच मीटरपेक्षाही जास्त उसळल्या, तर किनारपट्टीच्या प्रदेशाला धोका पोहोचतो. आताच्या पावसाने नद्या तुडुंब भरल्या, त्यामुळे नदीच्या पूरक्षेत्रात असलेल्या मानवी वसत्या आपसूकच पाण्याखाली आल्या. ते नद्यांनी मानवी वसत्यांवर केलेले अतिक्रमण किंवा अत्याचार अजीबातच नाही. त्यामुळे 2004 साली आलेल्या त्सुनामी वादळाचा तडाखा भारतात समुद्रतटावर असलेल्या राज्यांच्या तुलनेत केरळला जास्त बसला. एरव्ही पडलेल्या पावसाचे पाणी नद्यांना पूर येऊन वाहून जाते. अर्थात ते समुद्रातच जाते.
 
 
पण, केरळमध्ये समुद्र नद्यांचे पाणी स्वीकारायलाच तयार नाही किंवा ते तितक्याच वेगाने तो बाहेर ढकलतो, अशी स्थिती आहे. कचर्याचे प्रदूषण त्यामुळे नाल्या-मोठे नाले आणि नद्या तुंबल्या आहेत. ही स्थिती भारतातील इतर विकसित राज्यांसारखीच केरळमध्येही आहे. त्यात इथे वाळूचा अवैध उपसा खूप मोठ्या प्रमाणात होतो. राज्यकर्त्यांना या वाळूमाफियांकडे दुर्लक्ष करावे लागते, त्यामुळे निसर्गाचे दोहन होतेच, शिवाय भूस्खलनाचे प्रमाणही केरळात मोठे आहे. आता यंदा तर जूनपासून केरळात 2344 मिलिमीटर पाऊस म्हणजे जवळपास 92 इंच पाऊस पडला. गेल्या पाच दिवसांत कुठे कुठे अकरा ते बारा इंच पाऊस पडला. केरळात खाणींचे प्रमाणही खूप आहे. त्यातही राजकीय साठमारी आणि भ्रष्टाचार असल्याने एवढ्याशा भूप्रदेशात दोन हजारांहून अधिक खाणींमध्ये जवळपास दोनतृतीयांश खाणी अधिकृत नाहीत. जास्त पाऊस हा केरळचा निसर्ग आहे. यंदा अतिवृष्टी झाली. पण, हा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाच नव्हता असे नाही.
 
 
गाडगीळ कमिटीने, जंगले तोडू नका, मायिंनग कमी करा आणि वाळूचा उपसा थांबवा, कचर्याची नीट विल्हेवाट लावा, लोकसंख्येची घनता कमी करण्याचा प्रयत्न करा नाहीतर आपत्ती कोसळेल, असा इशारा दिला होता. त्यासाठी निसर्ग नाही, तर मानवच जबाबदार असेल, असेही सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अत्यल्प भूभाग, वाढत जाणार्या वसत्या यांच्या सोयीसाठी करण्यात आलेले निसर्गाचे दोहन माणसांवर उलटले आहे. अशा वेळी जगभरातून केरळकडे मदतीचा ओघ वाहतो आहे. पूजा जयाराजन् या केरळमधल्या एका महिलेने केलेले ट्विट खूप काही सांगून जाणारे आहे. त्या म्हणतात, ‘‘आलेल्या जलप्रलयाने मंदिर, मशीद, चर्चदेखील वाहून गेले, पण देव आमच्यासाठी गणवेषात धावून आला!’’ त्यांचा संकेत थेट ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या स्वयंसेवकांकडे आहे. देशभरातील माध्यमांनी स्वयंसेवकांच्या या कार्याकडे दुर्लक्ष केले. मदतकार्यात असलेल्या विशाल व पी. रघुनाथ या दोन स्वयंसेवकांना प्राणाची आहुतीही द्यावी लागली. मात्र माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी, यासाठी हे कार्य कधी नव्हतेही आणि नाहीही. मात्र, या देशातल्या सर्वसामान्य जनतेने गेल्या अनेक दशकांपासून स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ सेवेची दखल घेतलेलीच आहे. म्हणूनच देशाच्या केंद्रस्थानी आणि जवळपास 24 राज्यांत राष्ट्रीय विचारांची सरकारे आहेत. केरळच्या या संकटाने मात्र देश एकसंध असल्याचा सुखद संकेत दिला आहे!

No comments:

Post a Comment