Total Pageviews

Sunday, 26 August 2018

अशीही एक राखी, फौजी बांधवांसाठी चिनी बनावटीच्या राख्याच नाही, तर सर्वच चिनी मालावर बहिष्कार टाका –… प्रभात वृत्तसेवा PRABHAT-नीलिमा पवार



राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सण आला की मनात लहानपणच्या आठवणी जाग्या होतात. आईवडिलांच्य मायेखाली साजऱ्या केलेल्या प्रत्येक सणाची आठवण मोठेपणी येत राहते. जाणारे-आपले वय वाढवणारे प्रत्येक वर्ष जुन्या आठवणी मुरलेल्या लोणच्याप्रमाणे अधिकाधिक सुखावह करत जात असते. शाळेत असताना भावंडांच्या कोवळ्या मनगटांवर बांधलेल्या साध्या रेशमी राख्यांच्या आठवणी मखमली मोरपिसांप्रमाणेच मनाला सुखावह होतात. पुढे मोठेपणीही भावंडाच्या मनगटांवर राख्या बांधल्या जातात, पण लहानपणचा हरवलेला निर्व्याज आनंद काही पुन्हा येत नाही. समज आली, व्यवहार आला, हिशोब आला की सारे बदलत जाते. कदाचित ही जगरहाटीच असावी. पण तरीही अशा गोष्टींची मनाला थोडी खंत वाटल्याखेरीज राहत नाही.
लहानपणी भावांच्या मनगटांवर बांधलेल्या साध्या रेशमी गोंड्यांच्या राख्यांची जागा पुढे महागड्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्यांनी घेतली. कधी चांदीच्या-मोत्यांच्या राख्याही बांधल्या, पण रेशमी धाग्यांचा मायाळू आनंद काही परतून आला नाही. आणि यापुढे कधी परतून येईल याची शक्‍यताही नाही. आता आपली मुलेबाळे-नातवंडे सण साजरे करतात; त्यांच्या निर्व्याज आनंदाचाच आता आनंद घ्यायचा.
आताही आपला सर्वांचा आवडता रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे. भावाबद्दलची माया व्यक्त करण्याचा हा सण आहे. रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला आपल्या लाडक्‍या भावाच्या मनगटावर एक साधा धागा बांधा, पण चिनी राख्या विकत घेऊ नका. भले त्या स्वस्त असतील, सुंदर असतील, त्यात भरपूर व्हरायटी उपलब्ध असेल आणि नाविन्यही असेल; पण तरीही चिनी राख्यांच्या मोहात पडू नका. चिनी राख्या खरेदी करू नका. ही आत्मघातकी खरेदी आहे. तेव्हा चिनी बनावटीच्या राख्याच नाही, तर सर्वच चिनी मालावर बहिष्कार टाका. चिनी माल खरेदी करू नका. गेले एक दोन आठवडे हा आणि अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चिनी राख्या आणि एकूणच चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे हे मेसेज वाचून खरोखरच मनाला समाधान वाटते. आपल्यात देशाभिमान जागृत असल्याची ही एक खूणच म्हणावे लागेल.
आज भारतात सर्वत्र चिनी मालाचा मोठ्या प्रमाणावर खप होतो आहे. चिनी माल भारतीय बाजार काबीज करीत आहे, असे म्हणायला हरकत नाही. केवळ स्वस्त आहे, एवढ्या एका क्वालिफिकेशनवर लोक चिनी मालाच्या आहारी जातात. भारत ही चीनची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातून चीनला जाणारा पैसा हा भारताच्या विरोधातच वापरला जात आहे. त्या पैशातून चीन पाकिस्तानला आर्थिक मदत करतो आणि पाकिस्तान तेच पैसे वापरतो अतिरेक्‍यांना मदत करण्यासाठी-भारताविरुद्ध कारवाई करणासाठी. जर चिनी माल खरेदी करायचाच नाही असा सर्वांनी निश्‍चय केला आणि तो अमलात आणला तर चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील. चीनचा आवाज बंद होईल.
राखी पौर्णिमा, गणपती आणि दिवाळी हे आपले तीन मोठे सण म्हणजे चिनी माल हातोहात खपण्याची पर्वणी म्हणावी लागेल. राखी पौर्णिमेला त्या मानाने काहीशी कमी असली, तरी पण गणपती दिवाळीला तर प्रचंड प्रमाणावर चिनी माल-विशेषत: डेकोरेशनचे सामान, लायटिंगचे सामान आणि फटाके यांची विक्री होत असते. जर राखी पौर्णिमला आपण चिनी मालावर बहिष्कार टाकायला सुरुवात केली, तर गणपती, नवरात्र आणि मुख्य म्हणजे दिवाळी या सणांना चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची सवय होऊन जाईल. तेव्हा या राखी पौर्णिमेला हवे तर भावाच्या मनगटावर एक धागा बांधा, पण चिनी राख्या विकत घेऊ नका हा संदेश माना-अमलात आणा.
राखी पौर्णिमासाठी भारतभरातून सीमेवरील जवानांना मोठ्या संख्येने राख्या पाठवल्या जातात. दर वर्षी. अनेक संस्थाचा त्यात पुढाकार असतो. भावाचे रक्षण करणे हा राखीचा एक उद्देश असतो. तेव्हा चिनी मालावर बहिष्कार टाकणे म्हणजे आपल्या सीमेचे रक्षण करणाऱ्या फौजीबांधवांच्या मनगटावर एक अदृष्य पण मजबूत संरक्षक राखी बांधण्यासारखेच आहे.


No comments:

Post a Comment