लंडनमध्ये कुणीतरी माथेफिरू चाकूहल्ला करतो आणि ब्रार यांच्या मानेच्या नसा कापायचा प्रयत्न करतो. अशा घटना ताजा कलम म्हणून घडत राहतात आणि खलिस्तानी चळवळीतील धग बाकी असल्याचे लक्षात येते. आता ही सगळीच चळवळ अस्मितेपेक्षा सधन आणि वर्चस्ववादी लोकांच्या हातात गेली आहे. पंजाबला प्रश्न सतावत आहे तो व्यसनाधीनतेचा. खरे तर या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन या प्रश्नावर काम करावे, इतका हा प्रश्न गंभीर आहे. मात्र, अस्मितेच्या मागण्या एकदा फुटीरतेकडे गेल्या की कशा तारतम्य हरपतात, त्याचेच हे उदाहरण मानावे लागले.
खलिस्तानच्या मागणीसाठी एकत्र आलेल्या ब्रिटनस्थित भारतीय नागरिकांनी सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. ब्रिटनच्या ताराफरगार चौकात एकत्र आलेल्या दोन हजार लोकांनी स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. या मोर्चाला उत्तर म्हणून याच चौकात रविवारी अन्य भारतीय मंडळींनीही निदर्शने केली. आपल्याला अशा कुठल्याही प्रकारच्या मागण्यांची गरज नाही, असे या प्रदर्शन करणाऱ्यांचे म्हणणे होते. ‘२०२० पंजाब रेफरेंडम’ असे फलक घेऊन उभे राहिलेले लोक आधीच्या मोर्चात उभे होते. याचा अर्थ २०२० पर्यंत आपण स्वतंत्र खलिस्तान घेऊ, असा या मागणीमागचा अर्थ आहे. आता यामागे कोण आहे? या चळवळीला पाठबळ कुणाचे आहे? अशा अनेक प्रश्नांची अनेक उत्तरे आहेत. ही मागणी परदेशातल्या पंजाबी मध्यमवयीन मंडळींना बांधून असली तरी नव्या पिढीला त्याचे फारसे काही घेणेदेणे नाही. त्याचे मुख्य कारण ब्रिटन, कॅनडा यांसारख्या देशांत प्रभावी संख्येने असलेल्या शिखांच्या पुढच्या पिढ्या या तिथेच जन्मलेल्या आहेत. मात्र, काही मूठभर लोकांच्या डोक्यातून स्वतंत्र खलिस्तानचा मुद्दा अद्याप जायला तयार नाही. ज्या प्रमाणात आज शीख समुदायाकडे आर्थिक पाठबळ आहे, ते पाहाता अशा लहानमोठ्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे अफाट पैसा आहे, हेही लक्षात येते.
भारतात या मागणीकडे मोठ्या आश्चर्याने पाहिले जाते. पंजाबची जनता काय करावे, या प्रश्नात बुडालेली आहे. तिकडे परदेशात असलेल्या मंडळींना इथे काही घडवून आणावे, असे वाटत असते. प्रत्यक्षात मात्र फारसा कुणीही प्रतिसाद देत नाही, अशी काहीशी स्थिती खलिस्तानी फुटीरवादी चळवळीची झाली आहे. खुद्द पंजाबमध्ये यासाठी पाठिंबा किती, हा प्रश्नच आहे. मात्र, जगभर पसरलेल्या पंजाबी मंडळींत निश्चितच काही लोक असे आहेत ज्यांना यात रस आहे. गावाकडच्या जत्रा-यात्रांना लोक येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून काही ना काही मदत पाठवित असतात तसेच काहीसे आहे.
खलिस्तान चळवळीचा इतिहास सुवर्णमंदिरात केलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ पासून सुरू होतो, असे आपल्याला वाटते. यासाठी इंदिरा गांधींना दोषी ठरविणारे आणि त्यांच्या धाडसी कारवाईचे कौतुक करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला आजही सापडतील. मात्र, याचे खरे कारण बऱ्याच आधीच्या राजकीय घडामोडीतच दडलेले आहे. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. बहुविधता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य होतेच. मात्र, राष्ट्रीय एकात्मतेचा एक वेगळाच अर्थ लावला गेला. ‘सोबत यायला तयार नसलेल्या मुसलमानांना राजी करून घेण्याचा हिंदूंसाठीचा कार्यक्रम’ असा हा कृतीरूप कार्यक्रम होता. यात भाषिक व प्रांतीय अस्मितांची खूप मोठी गळचेपी झाली. याचाच पुढचा भाग ही राज्ये एकमेकांच्या विरोधात उभी राहण्यात झाला. मात्र, पंजाबच्या बाबतीत जे झाले ते अधिकच गंभीर. १९५० साली अकाली दलाच्या नेतृत्वाखाली पंजाबींचे बहुमत असलेल्या स्वतंत्र राज्यासाठी पंजाबी सुभा चळवळ सुरू झाली होती. राज्य कारभार पंजाबी भाषेत चालावे इतकीच माफक मागणी ही मंडळी प्रारंभीच्या काळात करीत होती. मात्र, अकाली दल काँग्रेसला वरचढ ठरू नये म्हणून एक राजकारण खेळले गेले. या मागण्यांची दखलच न घेण्याचा प्रकार सुरू झाला. मागेपुढे का होईना, भाषावार प्रांतरचना स्वीकारण्यास नेहरूंनी संमती दिली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या सार्वत्रिक निवडणुका काँग्रेसने लढविल्या, त्यात भाषावार प्रांतरचनेचे समर्थन व आश्वासनही दिले होते. मात्र, पंजाबच्याच बाबतीत हा सवतासुभा करण्यात आला, कारण अकाली दलाचा वाढता प्रभाव. इथून जी काही खलिस्तानची वेगळी चूल मांडण्याची बिजे रोवली गेली ती कायमची. जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा खात्मा केल्यानंतर शिखांना भडकविणे अजूनच सोपे होते, कारण शिखांच्या पवित्र अशा सुवर्णमंदिरातच ही कारवाई केली गेली होती. शिखांच्या ज्या पहिल्या पिढी रोजगारासाठी भारताच्या बाहेर गेल्या होत्या त्यांना काय वाट्टेल ते सांगून फितविण्यात आले. आजही या मोठ्या प्रमाणावर अशाच मंडळींचा समावेश आहे. एक ठाम नेता नसलेली विचित्र चळवळ अशी या चळवळीची स्थिती झाली आहे.
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ होण्याआधीच १९७१ साली खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या जगजीतसिंह चौहान याने अमेरिकेचा दौरा केला होता. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये जाहिरात देऊन आर्थिक मदतही गोळा केली होती. त्याचा इथला साथीदार बलबीर सिंग संधू याने तर नोटा आणि टपाल तिकिटेही छापली होती. यानंतर ही सगळीच चळवळ सैरभैर होत राहिली आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती ही शिखांची धार्मिक संस्था, परंतु ती तिथल्या राजकारणावरही तितकाच प्रभाव राखते. समितीच्या भूमिकाही या सगळ्या विषयात तळ्यात-मळ्यातच असतात. गोपाल चावला म्हणून कुणीतरी निघतो आणि तो खलिस्तानी चळवळीसाठी हाफिज सईदला जाऊन भेटतो. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे नेतृत्व करणाऱ्या वयोवृद्ध लेफ्टनंट जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्यावर लंडनमध्ये कुणीतरी माथेफिरू चाकूहल्ला करतो आणि त्यांच्या मानेच्या नसा कापायचा प्रयत्न करतो, अशा घटना ताजा कलम म्हणून घडत राहतात आणि खलिस्तानी चळवळीतील धग बाकी असल्याचे लक्षात येते. आता ही सगळीच चळवळ अस्मितेपेक्षा सधन आणि वर्चस्ववादी लोकांच्या हातात गेली आहे. पंजाबला प्रश्न सतावत आहे तो व्यसनाधीनतेचा. खरे तर या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन या प्रश्नावर काम करावे, इतका हा प्रश्न गंभीर आहे. मात्र, अस्मितेच्या मागण्या एकदा फुटीरतेकडे गेल्या की कशा तारतम्य हरपतात, त्याचेच हे उदाहरण मानावे लागले
No comments:
Post a Comment