Total Pageviews

Tuesday 7 August 2018

इमरानकडून फार आशा नको! महा एमटीबी

पाकिस्तानात इमरान खान यांच्या नेतृत्वातील ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ अर्थात पीटीआय या पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे पीटीआयचेच सरकार स्थापन होईल आणि इमरान खान नव्या सरकारचे नेतृत्व करतील, हे स्पष्ट झाले आहे. कारण, कालच पक्षाने पंतप्रधानपदासाठी इमरान खान यांची निवड करून तशी घोषणाही केली आहे. आधी ठरल्याप्रमाणे इमरान खान हे 11 ऑगस्ट रोजी पदाची शपथ घेणार होते. पण, पाकमधील अस्थिर वातावरण, बहुमतापेक्षा कमी मिळालेल्या जागा यामुळे शपथविधीची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही. मात्र, पंतप्रधान इमरान खानच होणार, हे स्पष्ट झाले आहे. इमरान पंतप्रधान झाले तरी ते लष्कराच्या अधिपत्याखाली आणि दबावाखालीच काम करणार, हेही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. पाकिस्तानचे भारताबाबतचे जे धोरण आज आहे, तेच उद्याही कायम राहणार आहे. इमरान खान यांच्या येण्यामुळे त्यात काही बदल होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. नवाझ शरीफ यांच्या पक्षाविरुद्ध निवडणूक लढताना इमरान खान यांच्या पीटीआय या पक्षाला पाकिस्तानी लष्कर, त्या देशातल्या कट्टरवादी संघटना, अतिरेकी संघटना यांनी पाठिंबा दिल्यानेच इमरान खान स्वत: पाच मतदारसंघांतून विजयी झाले आणि त्यांच्या पक्षानेही 115 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील सरकार कुठल्या दिशेने जाणार, हे आताच स्पष्ट झाले आहे.
 
नवज्योतिंसग सिद्धू यांच्यासारखे भारतातील इमरानचे चाहते त्यांची कितीही प्रशंसा करीत असले, तरी पाकच्या शेपटाप्रमाणे इमरानचेही शेपूट वाकडेच आहे, हे सिद्धूसारखे लोक लक्षातच घेत नाहीत. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत माजी क्रिकेटपटू इमरान खान हेच ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले असले, तरी सरकार चालविण्याचा त्यांचा अनुभव शून्य आहे. क्रिकेट या खेळातून निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधानपदापर्यंत प्रवास करण्यास त्यांना 22 वर्षे लागलीत. पण, या 22 वर्षांत त्यांनी शासन-प्रशासनात कधीही काम केले नाही. जी सरकारं आली, त्या सरकारांना विरोध करण्याची भूमिका तेवढी त्यांनी निभावली आहे. ज्या पाकिस्तानात राजकीय नेते, लष्करातील अधिकारी आणि नोकरशाह भ्रष्ट आहेत, त्या देशात इमरान खान यांची स्वच्छ असलेली प्रतिमाही त्यांच्या विजयाचे एक कारण ठरली, हे अमान्य करण्याचे कारण नाही. शिवाय, इमरान खान हे दीर्घकाळ क्रिकेट खेळले असल्याने पाकमध्ये त्यांचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहेत, याचाही निवडणुकीत त्यांना लाभ झाला. पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्ष हे वंशवादी आहेत. निवडणूक प्रचारात इमरान खान यांनी वंशवादावरही जोरदार प्रहार केले. त्याचाही लाभ त्यांना निश्चितपणे झाला. अतिरेकी संघटना आणि कट्टरवादी यांची सहानुभूतीही इमरान खान यांना मिळाल्याने त्यांना ‘तालिबानी खान’ अशी पदवीही बहाल करण्यात आली, याकडे भारताला डोळेझाक करता यायची नाही.
 
सध्या तुरुंगाची हवा खात असलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी लष्कराचे वाजले होते. त्यामुळे लष्कराकडून नवा मोहरा शोधला जात होता. राजकारणात तो त्यांना इमरान खान यांच्या रूपात गवसला. लष्कराच्या दृष्टीने इमरान खान हे एक प्यादं आहेत. त्यांचा उपयोग भारताविरुद्ध कसा करायचा, हे लष्कराला चांगलं ठाऊक आहे. 1980 च्या दशकात नवाझ शरीफ यांनाही लष्कराचा वरदहस्त लाभला होता. पण, आज शरीफ यांची काय स्थिती आहे, हे आपण जाणतोच. जी स्थिती शरीफ यांची झाली, ती उद्या इमरान खान यांचीही होणार, हे निश्चित! त्यामुळे इमरान खान यांनीही हवेत राहण्याचे कारण नाही आणि भारतानेही त्यांच्याकडून फार आशा बाळगण्याचे कारण नाही. लष्कराच्या मदतीनेच नवाझ शरीफ पाकच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले होते. पण, नंतर लष्करासोबत त्यांचे मतभेद झाले. त्यांनी लष्करप्रमुखांशीच पंगा घेतला. पहिल्या दोन कार्यकाळात त्यांनी जनरल आसिफ नवाझ जंजुआ आणि जहांगीर करामत यांना बडतर्फ केले होते. त्याचप्रमाणे अब्दुल वहीद कक्कड या जनरलशी त्यांचे टोकाचे मतभेद झाले होते. ज्या परवेझ मुशर्रफ यांची जनरलपदी त्यांनी नियुक्ती केली होती, त्या मुशर्रफ यांच्याशीही त्यांचे पटले नाही.
 
 
मग, त्याच मुशर्रफ यांनी 1999 साली नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवली होती, हे दुर्लक्षित करता येणार नाही. पण, 2013 साली नवाझ शरीफ यांना तिसर्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली होती. जनरल मुशर्रफ यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून कठोर शिक्षा केली जाईल, असा ‘वादा’ केल्यामुळेच त्यांना तिसर्यांदा सत्ता मिळाली होती. पण, नवाझ शरीफ यांची ही कृती लष्करविरोधी असल्याची प्रतिक्रिया लष्करात उमटली आणि मग लष्कराने इमरान खान यांना नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाठिंबा देणे सुरू केले. 2013 साली झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाने गडबड-घोटाळा केल्याचा आरोप इमरान खान यांनी करावा यासाठी लष्करानेच त्यांना चिथावणी दिली. 2014 साली इमरान खान यांच्या पक्षाने देेशभर धरणे आंदोलन केले, मोर्चे काढले, सरकारचा निषेध केला. त्यामुळे पाकची राजधानी इस्लामाबादची गती ‘धिमी’ झाल्याचे जगाने अनुभवले. ही बाब लक्षात घेतली तर इमरान खान पंतप्रधान झाल्यानंतर कुणाच्या इशार्यावर काम करणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. इमरान खान यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही आणि इतरांच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार चालणार असल्याने भारताप्रती लष्कराची जी भूमिका आहे, तीच त्यांना मान्य करावी लागणार आहे. इमरान खान यांच्या नेतृत्वात जो पाकिस्तान आपण पाहणार आहोत, त्या पाकची आर्थिक स्थिती आणखी खालावलेली असणार आहे. कारण, आजच पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अशा दिवाळखोरीतल्या पाकिस्तानचे नवे सरकार आणि तिथले लष्कर आपले अपयश झाकण्यासाठी भारताविरुद्ध घातपाती कारवाया करून पाकिस्तानी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करणार, हेही तेवढेच खरे! पाकिस्तानची न्यायपालिकाही कायम लष्कराच्या आज्ञेतच राहिली आहे, याकडेही डोळेझाक करता येणार नाही.
 
 
न्यायपालिकेवर लष्कराचा किती दबाव आहे, याची प्रचीती जगाला आलीच आहे. नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत न्यायालयाने शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना शिक्षा ठोठावत तुरुंगात धाडले आहे. लष्कराच्या दबावाशिवाय हे घडलेच नाही. पाकिस्तानात नुकत्याच ज्या निवडणुका झाल्यात, त्यात इमरान खान यांच्या पक्षाला विजय मिळावा यासाठी लष्कराने तिथल्या मीडियावरही प्रचंड दबाव आणला होता. नवाझ शरीफ आणि दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या पक्षाची बदनामी होईल, अशा बातम्या प्रसृत करण्यासाठीही मीडियावर दबाव होता. नव्या पाकिस्तानची निर्मिती करणार असा जो नारा इमरान खान यांनी दिला होता, त्यालाही मीडियाने अपार प्रसिद्धी दिली आणि ‘हीरो’ बनविले. निवडणुका जिंकण्यासाठी इमरान खान यांनीही अनेक तडजोडी स्वीकारल्या. ईशिंनदेसारख्या कठोर कायद्यालाही इमरान खान यांनी पाठिंबा द्यावा, यातच सगळे आले! या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या, तर इमरान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान बदललेला असेल, अशी आशा करणे मूर्खपणाचे ठरेल! पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी भारताला अन्य जे शेजारी देश आहेत, त्यांच्याशी संबंध सुधारावे लागतील अन् मोदी सरकार त्या आघाडीवर निश्चितपणे प्रयत्न करेल, याची खात्री आहे

No comments:

Post a Comment