Total Pageviews

Thursday, 2 August 2018

मार्ग दाखवणारा रेल्वेमार्ग... महा एमटीबी



कुणी म्हणालं, कोकणचा कॅलिफोर्निया करू, कोणी अजून काही करू म्हणालं. पण, तो कसा, हे कोणीही सांगू शकलं नाही. कोकणात उद्योग आणावेत, की कोकणाची बागायती विकसित करावी, की पर्यटन विकसित करावं, यावरून अनेक वाद झाले. प्रत्यक्षात काहीच धड विकसित झालं नाही. बरं, याचं कुणाला काही पडलंदेखील नव्हतं. विकासासाठी, मूलभूत प्रश्नांसाठी इथे कधी तीव्र आंदोलन वगैरे उभारलं गेलंय, असं झालं नाही..

गोमु माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवाया गदीमांच्या ओळींचा आधार घेत कोकणाचं, कोकणी माणसाचं चित्र आपण सारेच आजवर रंगवत आलो आहोत. कोकणी माणसं कशी तर साधी-भोळी’! कोकणाबाहेरची आणि खुद्द कोकणी माणसंही आजवर याच भावविश्वात आणि स्मरणरंजनात रमली. कोकणाच्या डोळ्यांदेखत पश्चिम महाराष्ट्र सहकार आणि कृषी-उद्योगांच्या जोरावर पुढे निघून गेला, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नावाजलेलं पुणं आयटी हब, ग्लोबल सिटी वगैरे बरंच काय काय झालं, आणि मुंबई तर काय थेट कसारा, कर्जत-खोपोलीपर्यंत पोहोचली. परंतु, कोकण आहे तिथेच, होतं तसंच राहिलं. नाही म्हणायला कोकण रेल्वे झाली पण गणपती-शिमग्यात चाकरमान्यांना आपल्या गावाला पोहोचवण्याशिवाय त्या रेल्वेचा कोकणाला कितपत उपयोग झाला, किंबहुना कोकणाने कितपत करून घेतला, हाच प्रश्न. तर अशीही कोकणी माणसाची शोकांतिका.

कुणी म्हणालं, कोकणचा कॅलीफोर्निया करू, कोणी अजून काही करू म्हणालं. पण तो कसा, हे कोणीही सांगू शकलं नाही. कोकणात उद्योग आणावेत, की कोकणाची बागायती विकसित करावी, की पर्यटन विकसित करावं, यावरून अनेक वाद झाले. प्रत्यक्षात काहीच धड विकसित झालं नाही. बरं, याचं कुणाला काही पडलंदेखील नव्हतं. विकासासाठी, मुलभूत प्रश्नांसाठी इथे कधी तीव्र आंदोलन वगैरे उभारलं गेलंय, असं झालं नाही. अलीकडच्या काळात (उशिरा का होईना) कोकणचं भौगोलिक स्थान लक्षात घेऊन इथे काय करता येऊ शकेल यावर गांभीर्याने विचार सुरू झाला. तशी पावलं उचलली जाऊ लागली. जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती करण्याची क्षमता असणारे प्रकल्प येऊ लागले. त्याचजोडीने बंदरांचं महत्व अधोरेखित करण्यात आलं. हे सारं घडलं विशेषतः केंद्रातील मोदी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या पुढाकारातून. विजयदुर्गसारख्या खऱ्या अर्थाने प्राईम लोकेशनम्हणता येईल, अशा ठिकाणी बंदराच्या विकासाच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. उद्योग आणि त्याचजोडीने बागायती आणि पर्यटन या साऱ्यालाच पूरक ठरू शकेल, उपकारक ठरू शकेल, अशा वाहतूक सुविधा कोकणासारख्या दुर्गम भागात उभ्या करणं क्रमप्राप्त होतं. त्यासाठी मग बंदरांसोबत रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण, सागरी महामार्गाची निर्मिती, या साऱ्या गोष्टी घडू लागल्या. या सगळ्यातच बहुप्रतीक्षित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या बांधकामाला प्रारंभ होण्याच्या वृत्तामुळे या सर्व प्रक्रियेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे अखेर उशिरा का होईना, कोकण कात टाकतंय, असं म्हणायला वाव निर्माण झाला आहे, ही निश्चितच सुखावणारी गोष्ट आहे.

कोकणच्या या वाहतूक सक्षमीकरणात सिंहाचा वाटा आहे तो केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा. आता प्रभू रेल्वेमंत्री नसले तरीही रेल्वेची वाटचाल त्यांनीच पायाभरणी केलेल्या मार्गावरून सुरू आहे, हे आज क्षणोक्षणी जाणवतं. सुरेश प्रभू यांनीच सातत्याने पाठपुरावा करत रेल्वे दुपदरीकरण आणि चिपळूण-कराड, वैभववाडी-कोल्हापूर या दोन रेल्वेमार्गांची पायाभरणी केली. ते काम प्रभूंच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयानं केलं. प्रभू मूळचे कोकणातलेच आणि त्यात सिंधुदुर्गातून खासदार राहिल्यामुळे त्यांना कोकणाचं सामर्थ्य आणि दुखरी नस, दोन्हींचीही उत्तम जाण आहे. याआधी काँग्रेस सरकारच्या काळात सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पांत या मार्गांच्या सर्वेक्षणांची कित्येकदा घोषणा झाली. मात्र, त्यापुढे काही गाडी सरकली नाही. तरीही चिपळूण-कराड मार्गाच्या कामात कुठे ना कुठे माशी शिंकलीच. तथापि, वैभववाडी-कोल्हापूरचं काम सुरू होत आहे, ही बाब समाधानकारक आहे. पश्चिम महाराष्ट्राचं पठार आणि किनारपट्टी प्रदेश यांच्यामध्ये आडदांड, धिप्पाड असा सह्याद्री दिमाखात उभा आहे. मात्र, हाच सह्याद्री ओलांडून जाण्यासाठी मात्र आजही अवघडच असतो. विशेषतः कोल्हापुरातून सिंधुदुर्गात उतरणारे आणि सातारा जिल्ह्यातून रत्नागिरी-रायगड जिल्ह्यात उतरणारे घाट वाहनचालकांच्या, प्रवाशांच्या छातीत धडकी भरवणारेच. त्यामुळे येथून वाहतुकीला नैसर्गिक मर्यादा पडतात. याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी जवळ असूनही लांब राहते, दुर्गम बनते. व्यापार, मालवाहतूक, पर्यटन आदी सर्वच गोष्टींवर याचे बरेवाईट परिणाम होतात. मुंबईहून नाशिक आणि पुण्याकडे जाणारे रेल्वेमार्ग इतके व्यस्त असतात, की त्यांचं त्यांनाच झेपत नाही, अशी परिस्थिती. या साऱ्याचा विचार करता तळकोकणात पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रेल्वेमार्ग असणं गरजेचं होतं. हा रेल्वेमार्ग कोल्हापूरला जोडणं अनेकार्थांनी उपयुक्त असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुके, सिंधुदुर्ग जिल्हा, तसंच गोव्याचाही काही भाग यांचं कोल्हापूरशी नियमित दळणवळण असतं.

शिक्षण-आरोग्य सुविधा, व्यापार, रोजगार, कृषी मालाची आयात-निर्यात या सर्व बाबतीत कोल्हापूर हे तळकोकणासाठी महत्वाचं केंद्र आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा गणपती-शिमगादि उत्सवकाळात रस्तेमार्गांवरील आंबा, गगनबावडा, फोंडा, आंबोली आदी घाटांचा ताण वाढतो. ही उणीव या रेल्वेमार्गामुळे जवळपास पूर्णपणे भरून निघेल, यात शंकाच नाही. कोल्हापूरहून हा रेल्वेमार्ग पुढे मिरजेला येऊन मिळतो. त्यामुळे पुण्याच्या बाजूस शिवाय उत्तर कर्नाटकासही रेल्वेने जोडता येऊ शकेल. आज पुण्याहून कोकणात रेल्वेने जायचे म्हटल्यास कल्याण-पनवेल असा द्राविडी प्राणायाम करून यावं लागतं. या सर्व गोष्टी केवळ प्रवासी वाहतुकीशीच संबंधित नाहीत. त्याचा पर्यटन, कृषी मालवाहतूक आदी क्षेत्रांतही मोठा फायदा होऊ शकेल. सर्वांत महत्वाचं म्हणजे बंदरं अधिक जवळ येतील, जे पश्चिम महाराष्ट्रातील कृषीमालाला फायदेशीर ठरेल. कारण, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग पुढे विजयदुर्गपर्यंत नेण्याचा रेल्वेचा मानस आहे. यामुळे मिरज-कोल्हापुरातून थेट विजयदुर्गच्या किनाऱ्यापर्यंत मालवाहतूक करणं सहज शक्य होईल आणि ते आर्थिकदृष्ट्या परवडणारंदेखील असेल. यामुळे मुंबई बंदरावर असलेला ताणदेखील मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. याखेरीज आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वैभववाडीपडून जेमतेम एक तासाच्या अंतरावर राजापूरजवळच्या भागात विकसित होत असलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प. या प्रकल्पाच्या एका बाजूस बंदर आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रेल्वेमार्ग असल्यामुळे याचा फायदा या प्रकल्पाला आणि पर्यायाने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही होईल.

अर्थात, हे सारं एका दिवसात, चुटकीसरशी होणारं नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीत माशी शिंकणं, हा जणू सध्या प्रघातच होऊन बसला आहे. हे याबाबतीत होता कामा नये. कारण, हा रेल्वेमार्ग म्हणजे केवळ चार स्थानकांना जोडणारे रेल्वेचे रूळ नसून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची छोटीशी सुरूवात ठरणार आहे. त्यामुळे कोकणी माणसानेही आता या दृष्टीने पुढचा विचार करायला हवा, त्वेषाने जागतिक स्पर्धेत उतरायला हवं आणि त्यात पुढेही जायला हवं. हे करण्यासाठी हा रेल्वेमार्ग मार्ग दाखवणारा ठरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही


No comments:

Post a Comment