शांतीदूत’ नवज्योतसिंग सिद्धू यांचा पाकिस्तान दौरा अद्याप गाजत आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देश शोकसागरात असतानाच्या काळात सिद्धू यांनी त्यांचे ‘मित्र’ इम्रानखान यांच्या पाक पंतप्रधानपदी झालेल्या शपथविधीच्या निमित्ताने पाकिस्तानात साजरा केलेला आनंदोत्सव आणि शेरोशायरीही अद्याप ताजी आहे. शेकडो निष्पाप भारतीय नागरिक आणि अनेक भारतीय सैनिक यांचे बळी घेणाऱया दहशतवाद्यांना सर्व साहाय्य आणि समर्थन पुरविणाऱया पाक लष्कराचे प्रमुख बाजवा यांची सिद्धू यांनी घेतलेली गळाभेट तर क्रांतिकारक म्हणावी अशीच आहे. आपल्या उदात्त, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष परंपरेला साक्षी ठेवून शांतीचे एवढे सोपस्कार सिद्धूंनी यथासांग पार पाडल्यानंतर निदान ईद या मुस्लीमांच्या पवित्र सणादिवशी तरी काश्मीरमध्ये शांतता राखली जाईल अशी अपेक्षा होती. पण ती नेहमीप्रमाणे फोल ठरली. सिद्धूंच्या औदार्याचा आणि त्यांनी पाकिस्तानात नेलेल्या शांतीच्या ‘पैगामा’चा मुलाहिजा पाकपुरस्कृत फुटीर वाद्यांनी आणि दहशतवाद्यांनी ईदच्या दिवशीही ठेवला नाही. काश्मीरमध्ये उफाळलेल्या प्रचंड हिंसाचारात एक पोलीस अधिकारी आणि भाजपचा एक कार्यकर्ता यांचा बळी गेला. भारतीय सेनेच्या एका वाहनावर हल्ला करण्यात आला. मोठय़ा प्रमाणात दगडफेक करण्यात आली. इतकेच काय, तर गेले काही दिवस फुटीरवाद्यांचा पुळका आलेले नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांनी केवळ ‘भारत माता की जय’ म्हणण्याचा ‘प्रमाद’ केला म्हणून त्यांनाही ‘प्रसाद’ देण्यात आला. भारत-पाक शांतीच्या दिवास्वप्नांमध्ये गुंग असणारी मंडळी वस्तुस्थितीपासून कशी आणि किती दूर आहेत हेच या घटनाक्रमातून अधिकाधिक स्पष्ट होत आहे. फुटीरवादी आणि दहशतवादी यांचे ध्येय काश्मीर भारतापासून तोडण्याचे आहे. ते त्यापासून ढळणार नाहीत. पाकिस्तानातील राजकीय व्यवस्था, तेथील लष्कर आणि अतिधर्मवादी संघटना काश्मीरचा घास घेण्यासाठी टपलेल्या आहेत, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. कारण ते काश्मीरला ‘फाळणीचा अपूर्ण कार्यक्रम’ मानतात. भारत सरकारचा, भारतातील राजकीय पक्षांचा किंवा कथित विचारवंतांचा आशावाद कितीही उच्चकोटीचा असो, त्याला तसाच उत्कट प्रतिसाद दुसऱया बाजूकडून मिळणे दुरापास्त आहे. तरीही पुनः पुन्हा तोच शांतीचा राग आळवला जात आहे. तो आळवणाऱयांना त्यातील निरर्थकता माहीत नाही, असे मुळीच नाही. तथापि, त्यांनी तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनविल्याने आता त्यापासून सुटकाही करून घेता येणे अवघडच आहे. आपण हास्यास्पद ठरलो, नाचक्की झाली तरी हरकत नाही, पण शांतीपाठाची आवर्तने करण्याचे धोरण सोडायचे नाही, असा या मंडळींचा निर्धार आहे. पाक लष्करप्रमुख बाजवा यांनी आपल्याला शांतीचा संदेश दिला. त्यांना भारताबरोबर शांतताच हवी आहे, अशी साक्ष सिद्धूंनी आपल्या कृतीचे समर्थन करताना दिली. तथापि, प्रत्यक्ष बाजवा यांनी मात्र भारताच्या संदर्भात अद्याप पावेतो ‘शांती’ हा शब्ददेखील जाहीररित्या उच्चारलेला नाही. खरोखरच शांती प्रस्थापित करण्याची त्यांची इच्छा असेलच तर सिद्धूंना जो कानमंत्र त्यांनी गुप्तपणे दिला, तो जाहीररित्या उच्चारण्यासाठी कोणता शिष्टाचार आड आला होता? तथापि, ते तसे करणार नाहीत. समजा, पाकच्या खऱया धोरणकर्त्यांनी, म्हणजेच तेथील लष्कराने शांततेची जाहीर पाठराखण केलीच तर तोही त्यांच्या कुटिल डावपेचांचाच एक भाग असेल, असे निश्चित. त्यामुळे भारताने या जाळय़ात न सापडता स्वतःच्या संरक्षणाची आणि आवश्यकता भासल्यास प्रतिहल्ल्याची संपूर्ण सज्जता ठेवणे अनिवार्य आहे. कारण भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास शांती हा शब्द पाकच्या धोरणाच्या विरुद्ध आहे. हे आपल्या कित्येक लोकांना कळते पण वळत नाही, हे पाकचे नशीब आहे. ‘शांतीवार्ता’ हा भारताला जागतिक व्यासपीठावर नामोहरम करण्यासाठी पाकिस्तानने दशकानुदशके वापरलेला एक ‘माईंड गेम’ आहे. आपल्याकडील अनेक भोळेभाबडे लोक याला बळी पडत आलेले आहेत. आपण इतके प्रयत्न करूनही शांतता प्रस्थापित होत नाही, यात कुठेतरी भारताचीच चूक असली पाहिजे. आपण ती सुधारली पाहिजे. शांतीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. कितीही झाले तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते, त्यांचे सैन्याधिकारी ही आपल्यासारखी माणसेच तर आहेत. मग त्यांचे मनपरिवर्तन होण्यात अशक्य ते काय असे सद्विचार या मंडळींचे असतात. पण हे सद्विचार नसून आत्मवंचना आहे. ती नेहमीच घातक असते. भारतातील शक्य तितक्या मान्यवरांना, राजकीय नेत्यांना शांततेच्या या शाब्दिक जाळय़ात अडकवायचे आणि त्यांच्याच हातून आपला लाभ करून घ्यायचा, ही पाकची पद्धती आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीची चित्रफित या दृष्टीने अगदी बोलकी आहे. आपले परममित्र सिद्धू यांना त्यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या ‘राष्ट्राध्यक्षां’च्या शेजारी बसवले. पाकव्याप्त काश्मीर हा खरेतर कायदेशीरदृष्टय़ा भारताचा प्रदेश. तथापि, तो पाकने घशात घातला आहे. हा प्रदेश भारताचा असल्याचे भारतीय संसदेनेही स्पष्ट केले आहे. तो आपण भारताच्या नकाशात आपला म्हणून दाखवितो. अन्य कोणत्या संस्थेने तो भारतापासून वेगळा दाखविला तर त्या संस्थेविरोधात कारवाई केली जाते. असे असता त्या प्रदेशाच्या तथाकथित अध्यक्षाशेजारी आपल्या एका राजकीय नेत्याला बसवून पाकने पुन्हा त्याचा ‘माईंड गेम’ मध्ये विजय झाला, असेच दर्शवून दिले आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे. निदान यापुढे तरी अशा डावपेचांना फसणे टाळले पाहिजे. एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून आपला सन्मान टिकविणे आपल्याच हाती आहे. सिद्धू आपल्या मित्राच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात गेले यात आक्षेपार्ह काहीही नाही. तथापि, त्यांनी तेथे जे काही केले ते टाळावयास हवे होते. यांच्या दौऱयानंतरही ईदच्या दिवशी काश्मीरात उसळलेल्या हिंसाचाराने हाच धडा आपल्याला दिला आहे
No comments:
Post a Comment