Total Pageviews

Tuesday, 7 August 2018

चीनची सिंगापूरमधील घुसळण महा एमटीबी 07-Aug-2018-अनय जोगळेकर

केवळ ५३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सिंगापूरमध्ये घुसळण होत आहे. चिनीमलय आणि भारतीय वंशाच्या सिंगापुरी नागरिकांचे आपापल्या पूर्वजांच्या प्रदेशांशी आर्थिक आणि सांस्कृतिक बंध असणे साहजिक असले तरी आजवर या ओळखीच्या समांतर अशी सिंगापुरी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न तेथील सरकारने केला आहे.
 
९ ऑगस्ट १९६५ रोजी सिंगापूर मलेशियापासून वेगळे झाले. त्यामुळे ९ ऑगस्ट हा सिंगापूरचा स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्याच्या वेळेस बकाल वस्त्या आणि गलिच्छपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या या चिमुकल्या राष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष ली कुआन यू यांनी कायापालट करून त्याला जागतिक दर्जाचे शहर-राष्ट्र बनवले. एकेकाळी मुक्त आयात-निर्यात हाच प्रमुख उद्योग असलेल्या सिंगापूरने आज बँकिंग आणि अर्थकारण, स्मार्ट शहरं, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्या कर्तृत्त्वाचा असा ठसा उमटवला आहे की, जगभरातून लोक उत्तरदायित्त्व असलेले सरकार आणि प्रशासन, स्वच्छता, नगर रचनाशास्त्र, परवडणारी घरं, प्राथमिक शिक्षण, जलव्यवस्थापन आणि विकासाच्या अन्य क्षेत्रातील धडे गिरवायला सिंगापूरला येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सिंगापूरच्या विकास मॉडेलचा मोठा प्रभाव आहे. छोटा आकार, लोकसंख्या आणि नियंत्रित लोकशाही आणि माध्यमं यामुळे भारत आणि सिंगापूर यांच्यात तुलना होऊ शकत नसली तरी कुठलीही नैसर्गिक साधनसंपत्ती नसताना सिंगापूरने साधलेला विकास थक्क करणारा आहेऐतिहासिकदृष्ट्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव आणि मलेशियन द्वीपकल्पाचा भाग असलेल्या सिंगापूरमध्ये सर्वाधिक, म्हणजेच सुमारे ७५ टक्के लोकसंख्या चिनी वंशाची आहे. त्या खालोखाल मलय आणि भारतीय वंशाचे लोक आहेत. केवळ ५६ लाख लोकसंख्या असलेल्या सिंगापूरला गेल्या वर्षी १ कोटी ७४ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती. हा लेख सिंगापूरबद्दल असला तरी लेखाचा विषय सिंगापूर नाही तर चीन आहे.
 
एमी क्विन यांनी न्यूयॉर्कटाइम्समध्ये लिहिलेल्या लेखाचा त्याला संदर्भ आहे. (https://goo.gl/vQm6-C) सिंगापूरचे उदाहरण देऊन क्विन यांनी चीन कशाप्रकारे जगभरात स्थायिक झालेल्या चिनी वंशाच्या लोकांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे, हे मांडले आहे. पूर्वी हे प्रयत्न केवळ विदेशात राहाणाऱ्या चिनी नागरिकांपुरते मर्यादित होते, पण आता त्यात विस्तार करून चिनी वंशाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांची जगभरातील लोकसंख्या ६ कोटींहून अधिक असून आग्नेय आशियातील अनेक देश, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील त्यांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांपासून चिनी कम्युनिस्ट पक्षाचा भाग असलेल्या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट या शक्तीशाली संस्थेच्या लोकांचे सिंगापूरला येणे-जाणे वाढले असून तेथील चिनी वंशाच्या लोकांना चीनशी जोडण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नांना गती दिली आहे. इस्रायल गेली अनेक वर्षं जगभरातील ज्यू लोकांना आपल्याशी जोडण्यासाठी बर्थराइट इस्रायल (हिब्रूमध्ये ‘तगलित’) या नावाचा कार्यक्रम राबवतो तसेच कार्यक्रम चीननेही हाती घेतले आहेत.
 
यामुळे केवळ ५३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सिंगापूरमध्ये घुसळण होत आहे. चिनी, मलय आणि भारतीय वंशाच्या सिंगापुरी नागरिकांचे आपापल्या पूर्वजांच्या प्रदेशांशी आर्थिक आणि सांस्कृतिक बंध असणे साहजिक असले तरी आजवर या ओळखीच्या समांतर अशी सिंगापुरी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न तेथील सरकारने केला आहेत्याला चांगले यशही मिळालेकारण आजपर्यंत सिंगापूरची जीवनशैली आणि दरडोई सांपत्तिक स्थिती चीन, भारत आणि मलेशियाहून खूप पुढारलेली आहे. ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे सिंगापूरचे पाश्चिमात्य राष्ट्रांशीही घनिष्ठ संबंध आहेत. दुसरं म्हणजे १९९०च्या दशकापर्यंत चीन आणि भारत अंतर्मग्न होते, पण आज परिस्थिती बदलली आहे.आज चीन जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेला आव्हान देत असून जागतिक पटलावर भारतही झपाट्याने प्रगती करत आहेत्यामुळे एकेकाळी दारिद्य्र आणि बेरोजगारीला कंटाळून सिंगापूरमध्ये आलेल्या चिनी वंशाच्या काही लोकांना आपल्या पितृभूमीबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. हे आकर्षण तेथील भारतीय, मलय आणि सिंगापूरच्या नवीन ओळखीशी पूर्णतः एकरूप झालेल्या चिनी वंशाच्या नागरिकांनाही काळजीत टाकणारे आहे.
 
परदेशात स्थायिक झालेल्या चिनी लोकांना गुंतवणुकीसाठी आकृष्ट करण्याचे काम भारताप्रमाणेच चीन गेली काही दशकं करत आहे, पण २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले. २००८ साली चीनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्याज्या ज्या देशात चीनची ऑलिम्पिक ज्योत गेलीतिथे तिथे स्थायिक झालेल्या तिबेटी लोकांनी आणि समर्थकांनी त्याला विरोध म्हणून रस्त्यावर आंदोलनं केलीअशी आंदोलनं अनेक वर्षांपासून सुरू असली तरी २००८ साली या आंदोलनांना उत्तर म्हणून तिथे स्थायिक झालेल्या चिनी वंशाच्या लोकांनी चीनच्या समर्थनार्थ मोर्चे काढले. ही गोष्ट नवीन होती. तेव्हापासून यात सातत्याने वाढ होत आहे. २०१५मध्ये मलेशियात सरकारच्या दहा हजारहून अधिक समर्थकांनी कौलालंपूरच्या चायना टाऊनमध्ये चिनी वंशाच्या नेत्यांविरोधात मोर्चा काढला होताचीनच्या राजदूतांनी या प्रकाराची दखल घेऊन आपल्या लोकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास चीन कटिबद्ध असल्याचे ठामपणे प्रतिपादन केले होतेन्यूझीलंडमध्येही जिआन यांग या चीनमध्ये जन्मलेल्या संसद सदस्यावर आपला भूतकाळ लपवल्याने चीनसाठी हेरगिरी करण्याचे आरोप झाले होते.
 
भारतासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जगातील शंभराहून अधिक देशांत ३ कोटीहून अधिक भारतीय वंशाचे लोक स्थायिक झाले असून उच्च शिक्षण, संशोधन, व्यापार, कौशल्य याबरोबरच अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांत आता ते राजकीय पटलावरही चमकू लागले आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी अप्रवासी भारतीय तसेच भारतीय वंशाच्या लोकांशी संबंध सुधारण्याकडे विशेष लक्ष दिले होतेसंपुआ सरकारमध्ये ते कायम ठेवले असले तरी त्यात नवी ऊर्जा फुंकली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीआपल्या प्रत्येक विदेश दौऱ्यात त्यांनी कटाक्षाने प्रवासी भारतीयांशी संवाद साधला. अमेरिका, इंग्लंड, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती... ठिकठिकाणी त्यांनी मोठमोठ्या सभा घेतल्या. पण एकाही ठिकाणी भारत आपल्या लोकांना पाचवा स्तंभ म्हणून वापरत आहेअसा आरोप झाला नाही.
 
२०१६ साली एक पर्यटक म्हणून सिंगापूरला गेलो असता आझाद हिंद फौजेची सिंगापूरमध्ये झालेली स्थापना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल भारतीय वंशाचे सिंगापुरी लोक काय विचार करतात याबाबत मनात कुतूहल होतेदुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर सिंगापूरमध्ये उभारलेले आयएनए स्मारक तोडण्यात आलेआज जे छोटेखानी स्मारक आहे, ते काही मला पाहाता आले नाही.काही पिढ्या तेथे स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या सिंगापुरी मित्रांना त्याबाबत विचारले असता, आम्ही जसे भारतीय आहोत तसेच सिंगापुरीही आहोत. सिंगापूर ही ब्रिटिश वसाहत असल्यामुळे त्यांचा ऐतिहासिक वारसा हा आमचाही वारसा आहे, असे मोघम उत्तर मिळाले.नियंत्रित लोकशाहीमुळे अनेकदा सिंगापूरमध्ये तुम्हाला कुठल्याही राजकीय विषयावर अशीच गुळगुळीत उत्तरं मिळतातथोडक्यात काय तर ब्रिटिशांनी आणि नंतर ली कुआन यू सरकारने लिहिलेला हा आपला इतिहास आहे, असे तेथील चिनी, भारतीय आणि मलय वंशाचे लोक मानतात. कदाचित असे न मानल्यास सिंगापूरच्या राष्ट्रभावनेला तडे जातील. उदा. भारतीय वंशाचे लोक आझाद हिंद सेनेबद्दल अभिमान बाळगतील तर चिनी आणि मलय वंशाचे लोक जपान्यांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांच्या कटू आठवणी विसरू शकणार नाहीतआपला वैशिष्ट्यपूर्ण इतिहास जपण्याचे सिंगापूरचे प्रयत्न आपला नवा इतिहास सांगण्याच्या चीनच्या प्रयत्नांपुढे टिकाव धरू शकतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment