Total Pageviews

Monday 20 August 2018

जशास तसे’ धोरणाची गरज-लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)






डोकलाम प्रकरणाला एक वर्ष होत असतानाच चिनी सैन्याने जुलै महिन्यात लडाखमध्ये घुसखोरी केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. पूर्व लडाख भागातील डेमचोक सेक्टरमध्ये भारताच्या हद्दीत चिनी सैन्याने 400 मीटरपर्यंत घुसखोरी करत पाच तंबू उभारले असल्याची माहिती प्रसारित झाली आहे. डेमचोक हा भाग भारत आणि चीन सीमेवरील 23 संवेदनशील भागांपैकी एक आहे. तिथे लडाख, तिबेट आणि हिमाचल प्रदेश यांची सीमा एकत्र येते. त्यामुळे हे एक अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिबेटकडे जाण्यासाठी ती सर्वात जवळची वाट आहे. चिनी सैन्याला तिथे येणे सोपे पडते. याच मार्गाने भारताची मानसरोवर यात्रा जाते. हा भाग ट्रायजंक्शन म्हणजेच तीन सीमा एकत्र येत असलेला भाग आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये अशा भागावर वर्चस्व मिळवण्याचा, त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असतो. चीनसारखा साम्राज्यवादी, विस्तारवादी देश यामध्ये सर्वात अग्रेसर आहे. डेमचॉकवर वर्चस्व किंवा ताबा मिळवल्यास युद्धाच्या दृष्टीने चीनची स्थिती मजबूत होणार आहे. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. या भागात अनेक वेळेस चिनी सैन्य घुसखोरी करत असते. 
या वर्षात चीनने भारत-चीन सीमेवर 4057 किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या वेगवेगळ्या ठिकाणी 170 वेळा घुसखोरी केली आहे. दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये चिनी सैन्याने 273 वेळा भारतीय सीमा ओलांडली होती. गेल्या वर्षी तर तब्बल 426 वेळा घुसखोरी केली होती. डेमचॉक या भागात चीन वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते. लडाखमधील डेमचॉक हा शेवटचा भाग आहे. तिथून पुढे हिमाचल प्रदेश सुरू होतो. गेल्या दहा वर्षांपासून चीन सातत्याने या भागात घुसखोरी करत आहे. यामागचे कारण समजून घेणे आवश्यक आहे. सातत्याने अशा प्रकारची घुसखोरी केल्यामुळे भविष्यात संघर्ष झालाच, तर चीन असा दावा करू शकते की आम्ही दहा वर्षांपासून इथे येतो आहे. तेव्हाच आम्हाला का थांबवले नाही, आमचा निषेध का नाही केला. याचाच अर्थ, भारताने या घुसखोरीविरुद्ध काही आक्षेप घेतले नाही, तर ती जागा आमचीच आहे, असा दावा चीन करू शकतो. त्यामुळे चीनच्या विस्तारवादी धोरणाला अनुसरूनच जाणीवपूर्वक तो या जागेवर घुसखोरी करत आहे. 

आपण इतिहासात डोकावले आणि अभ्यासले, तर असे लक्षात येईल की, चीनचा हा सिद्धान्तच आहे. आपल्या शत्रुदेशाची जी जमीन आपल्याकडे आहे ती बळजबरीने ताब्यात ठेवलीच पाहिजे; परंतु जी जमीन आपली नाहीये, पण आपल्याला हवी आहे, त्यावर सतत दावा करत राहा. याच धोरणाने चीन सातत्याने घुसखोरी करत असतो. 
भारतीय सैन्याने चिनी सैन्याला रोखले, बंदी केली, करार केले, तरीही मूळ प्रश्‍न उरतोच, की ते तिथपर्यंत पोहोचतातच कसे? या सीमाभागात इंडो-तिबेट पोलिस फोर्स कार्यरत आहे. या पोलिसांनी चिनी सैन्याला डेमचॉकपर्यंत येऊच कसे दिले? चिनी सैन्य तिथे आल्यानंतर मग हालचाली करणे याला काय अर्थ आहे? अशाच प्रकारची बेफिकिरी राहिली, तर उद्या चिनी सैन्य घुसखोरी करून एखाद्या प्रदेशावर ताबा मिळवू शकतो. अशा वेळी ही पोलिस फोर्स हात झटकेल आणि सैन्याला लढाई करायला सांगेल. असे घडता कामा नये. सध्या असे घडते आहे. कारण, चीनलगतच्या या एका सीमारेषेवर दोन सैन्य दले कार्यरत आहेत. असा प्रकार केवळ भारतातच पाहायला मिळतो. लदाखजवळच्या या सीमेवर इंडो-तिबेट फोर्स तैनात असून तिथे काही गडबड झाली, तर लष्कराला बोलावले जाते. ही चुकीची पद्धती आहे आणि ही दुहेरी संकल्पना खोडून काढली पाहिजे. अशी पद्धत देशात अन्यत्र नाही. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, आज भारत-पाकिस्तान सीमेवर फक्त लष्करच काम करते. त्यामुळेच जेव्हा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होते, तेव्हा लष्कर ताबडतोब त्याला कडाडून प्रत्युत्तर देते. लडाखच्या सीमेवर मात्र आधी सीमा सुरक्षा दल सामना करते आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास अथवा जाऊ लागल्यास लष्कराची मदत घेतली जाते. या पद्धतीमध्ये कुठ ेतरी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 
लडाख क्षेत्र सामरिक दृष्टीने भारतासाठी जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो चीनच्या दृष्टीनेही बहुमोल आहे. कारण, चीनने पाकिस्तानमध्ये जो आर्थिक परिक्षेत्र विकास कार्यक्रम राबवला आहे,  तो याच भागातून जातो. या इकॉनॉमिक झोनला सुरक्षा देण्यासाठी चीन सर्व ती तयारी करत आहे. त्यासाठीच चिनी सैन्य सातत्याने या भागात येत आहे. गेल्या वर्षी चीनने डोकलाममध्ये घुसखोरी केली होती. तेव्हा 300-400 चिनी सैन्य डोकलाममध्ये आले होते. तथापि, हे सैन्य एकाच ठिकाणी येत नाही. ते वेगवेगळ्या ठिकाणी येतात. याचा अर्थ संपूर्ण सीमारेषाच विवादास्पद आहे, असा अर्थ घेतला पाहिजे.
माझ्या मते, चीन ज्याप्रमाणे भारताच्या अखत्यारितील भागावर दावा करत असतो, तशाच प्रकारे भारतानेही मूळ सीमारेषेवरील ज्या भागावर चीनने ताबा ठेवला आहे, तिथे भारताने आपले सैन्य पाठवले पाहिजे; मात्र असे प्रयत्न आपण कधीच करत नाही. याउलट, चीन मात्र भारतात सातत्याने घुसखोरी करत आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्ष उपस्थिती आणि एखादी व्यक्ती किंवा देश आपल्या स्थानावर हक्क सांगू लागल्यानंतर तिथून त्याला काढून टाकण्याची क्षमता किंवा ऐपत दाखवल्याशिवाय देशाची ताकद सिद्ध होत नाही. त्यामुळे सरकारने, लष्काराने याबाबत अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. जनतेनेदेखील याविषयी सतर्क होण्याची आवश्यकता आहे

No comments:

Post a Comment