लष्कराची पूलबांधणी
एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर
झालेल्या चेंगराचेंगरीनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मुंबई उपनगरीय
रेल्वेच्या तीन स्टेशनांवर नवे पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एल्फिन्स्टन
रोडसह करी रोड आणि आंबिवली या स्थानकांमध्ये हे पूल बांधण्यात येणार असून, तीन
महिन्यांत पूल पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट असल्याने हे काम लष्कराकडे सोपवण्यात
आले आहे.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री
पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी
एल्फिन्स्टन रोड स्थानकास भेट दिली. कोणताही गाजावाजा न करता आयोजित केलेल्या या
पाहणी दौऱ्यात लष्कराच्या बॉम्बे इंजिनीअर ग्रुपचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे
बडे अधिकारीही उपस्थित होते. लष्कराने तयार केलेल्या आराखड्याची पाहणी केल्यानंतर
संरक्षणमंत्री सीतारामन यांनी एल्फिन्स्टन दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेत राज्य
सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे केलेली पुलांबाबतची विनंती मान्य केली. नागरी भागात
लष्कराकडून बांधकाम होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘नेहमीच्या
पद्धतीने पूल बांधण्याचे काम हाती घेतले असते तर त्यास बराच कालावधी गेला असता.
लष्कराकडे त्यासाठी कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे कौशल्य असल्याने पूल उभारणीसाठी
संरक्षण मंत्रालयाकडे विनंती करण्यात आली होती’,
असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले; तर, ‘लष्कराने
पुलांच्या निमित्ताने राष्ट्रबांधणीचे काम हाती घेत आदर्श निर्माण केला आहे’, असे
रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले.
अशी होणार बांधणी…
-एलफिन्स्टन
रोड स्थानकात पश्चिम रेल्वेतर्फे प्रस्तावित १२ मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारला
जाणार आहे. लष्करातर्फे बांधण्यात येणारा पूल अतिरिक्त असेल.
-त्यात
प्रामुख्याने परळ स्टेशनवरील (दादर दिशेकडील) कमी वापराचा पूल हा एल्फिन्स्टन
रोडकडील फुलबाजार असलेल्या रस्त्याला जोडण्यात येणार आहे.
-साधारणपणे
हा पूल १० फूट रुंदीचा असून थेट फुलबाजारास जोडला जाणार असल्याने एल्फिन्स्टन रोड
पुलावरील गर्दी कमी होईल, असा दावा केला जात आहे.
-लष्कराकडून
पूल उभारणीसाठी बेली ब्रीज पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
-५
नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल,
असे संकेत असून पूल पूर्णत्वासाठी ३१
जानेवारी २०१८चे लक्ष्य ठरवण्यात आले आहे
No comments:
Post a Comment