लाखो लोकसंख्या असलेल्या या देशात पराकोटीच्या
आर्थिक-सामाजिक विषमतेमुळे गुन्ह्यांचे प्रमाण अधिक अाहे. ती केवळ गरिबीशी निगडित
आहे असेही नाही, ती समाजातील सर्वच थरांत सहजपणे दिसते. पण
गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवावी असेही नसते. त्यासाठी समाज
आधुनिक व्हावा लागतो. पोलिस व समाजात संवादाचा पूल असावा लागतो. जपानमध्ये
आधुनिकतेमुळे विषमता कमी झाली व तेथील गुन्हेगारी वेगाने घटली. त्यामुळे सध्या
तेथील पोलिसांना काम राहिलेले नाही. पोलिस दलाचा खर्च अनावश्यक वाढला आहे.
आपल्याकडे अपुरे पोलिस बळ, आर्थिक निधीची वानवा, पोलिसांचे
आर्थिक-कौटुंबिक प्रश्नही आ वासून उभे आहेत. त्यात पोलिसांवरच्या कामाचे ओझे,
वरिष्ठांकडून
होणारी छळवणूक, राजकीय नेत्यांची दादागिरी, पोलिस
व्यवस्थेतील जातीय उतरंड हे प्रश्न आहेतच. पण या प्रश्नांच्या चौकटीतून
पोलिसांच्या क्रूर वर्तनाचे उत्तर कसे मिळू शकणार? पोलिसांचा
समाजावर धाक असावा हे गृहीतक सातत्याने मांडले जाते. पोलिसांची भीती नसेल तर
समाजस्वास्थ्य बिघडते असेही सांगितले जाते. पोलिस जर समंजसपणे वागले तर गुन्हेगार
मोकाट सुटतील असाही एक दावा केला जातो. पण पोलिसांकडून होणारे क्रूर, अमानुष
कृत्य हा सामाजिक परिणाम असतो का? एखाद्याची हत्या करून ती लपवणे याचे
समर्थन केले जाऊ शकते का? पोलिसांनी सांगलीतील अनिकेत कोथळे या
युवकाचा पोलिसांकडून ज्या पद्धतीने खून झाला त्याकडे पाहता पोलिस यंत्रणेने
आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अनिकेत कोथळेचा गुन्हा दोन हजार रुपयांची रोकड
व मोबाइल पळवण्याचा होता. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीही दिली होती. पण आपले
काम वरिष्ठांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने सांगली पोलिस दलातील पाच पोलिसांनी
त्याला पोलिस कोठडीत पंख्याला उलटे टांगून थर्ड डिग्री देऊन बेदम मारले. त्यानंतर
त्याचे डोके पाण्यात बुडवले. या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हा खून
पटवण्यासाठी पोलिसांनी अनिकेत पळून गेला अशी बनावट कथा तयार केली व त्याचा मृतदेह
आंबोली घाटात दोनदा जाळला. अनिकेतच्या कुटुंबीयांनी जेव्हा पोलिस ठाण्यात
अनिकेतसाठी ठिय्या मारला व हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेले तेव्हा हा सगळा प्रकार
उघडकीस आला. या प्रकरणाकडे पाहिल्यास दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात येतात. एक
म्हणजे पोलिस खात्यात ज्यांची दहा-पंधरा वर्षे नोकरी झाली आहे, ज्यांना
प्रशासनाचा अनुभव आलेला असतो, गुन्ह्यांकडे आर्थिक-सामाजिक
समस्येच्या नजरेतून बघण्याची परिपक्वता यावी अशी अपेक्षा असते त्यांच्याकडूनच असे
हे धडधडीत कृत्य झाले. दुसरी बाब म्हणजे पोलिसांनी समाजाचे रक्षक असावे, पोलिसांचा
गुन्हेगारांवर दरारा-दहशत असावी; पण सामान्य माणसावर नव्हे. त्यांना
समाजात आदराचे स्थान असावे अशी जी मुक्ताफळे पोलिस परिसंवादात मंत्र्यांपासून
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळतात त्यांच्या म्हणण्याकडे पोलिस यंत्रणा
थेट दुर्लक्ष करतात.
अनिकेतच्या हत्येवरून एक स्पष्ट दिसतेय की,
आपण
आधुनिक समाजाच्या कितीही गप्पा मारल्या तरी पोलिस व समाजात एक उभी मोठी दरी आहे.
ती बुजवण्याचे प्रयत्न कोणत्याच पद्धतीने केले जात नाहीत. दोन दिवसांपूर्वी टाटा
सामाजिक िवज्ञान संस्था व ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी पोलिसांच्या
कारभाराचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात सुमारे ७५ टक्के लोक पोलिसांचे
वर्तन मैत्रीपूर्ण नसल्याने ते गुन्हे नोंदवण्यास पुढे येत नसल्याचे नमूद करण्यात
आले आहे. या अहवालात समाजातील दीनदुबळा गट व स्त्रियांविषयी पोलिस व्यवस्थेला
प्रचंड अढी असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. पोलिस यंत्रणांमध्ये
युद्धपातळीवर परिवर्तन आणण्याची गरज आहे. दिवसेंदिवस पोलिसांच्या कार्यपद्धतीवर
आक्षेप वाढलेले दिसतात. त्याला कारण गुन्ह्यांचा तपास करताना पुराव्यात जाणूनबुजून
व बेपर्वाईपणे राहणाऱ्या त्रुटी हेही आहे. दिल्लीतल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये
दुसरीतील मुलाची झालेली हत्या व हरियाणा पोलिसांचा भलतीकडेच सुरू असलेला तपास
सीबीआयने उघडकीस आणला आहे. आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण दिल्ली पोलिसांनी कसे
बेजबाबदारपणे हाताळले यावर काही दिवसांपूर्वी न्यायालयाने टिप्पणी केली होती.
पोलिसी प्रशिक्षणात गुन्ह्यामागचे मानसशास्त्र शिकवले जाते. त्यातून गुन्ह्यांची
उकल होत जाईल; पण या व्यवस्थेत माणुसकीची गरज आहे. ती मुरवली
तर अनेक प्रश्न सुटतील
No comments:
Post a Comment